Mar 01, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-१०

Read Later
कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-१०
विषय - कौंटुबिक कथा

शीर्षक - कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग -१०

त्याच्या बाईक चा गेल्याचा आवाज आल्यावर तिने एकदा मागे वळून पाहिलं.  तो पाठमोराच दिसला आणि लगेच नजरेआड झाला.   त्याने सुद्धा मागे वळून पाहायला हव होतं अस उगाच तिला वाटलं. अनपेक्षित घडलेला आज !!

तिला कल्पनाही नव्हती आज त्याच्यासोबत वेळ  घालवायला मिळेल . दुपारपासून ते दोघे सोबत होते पण तिला कुठेही अनकम्फर्टेबल  वाटलं नव्हतं.  सोनाराच्या दुकानात त्याने तिला प्रोटेक्ट केलेलं. काळजीने घरी सोडलं. तो दिसण्यापेक्षा माणूस म्हणून सुद्धा तो खूप चांगला आहे यावर तिचा विश्वास बसला आणि याचमुळे मनाच्या कोपऱ्यात जोडीदारा बद्दल ची  कुठेतरी सुप्त इच्छा होती..ती जागी होऊ पाहत होती.


    आणि पुन्हा नको त्या आठवणी आठवण करून देऊ लागल्या . आठवणी असतातच अशा नको असतात त्याच आधी येतात . नितीन ची आठवण आली आणि तिचा चेहरा उदास झाला . तिला बाईकवर बसलेला चा प्रसंग आठवला. पहिल्यांदा बाईक वर बसताना नितीन किती ओरडलेला तिला.  ती अक्षरशः रडत होती. दुसऱ्यांदा बाईकवर बसल्यावर सुद्धा त्याने तेच केलं.  पुन्हा तिला रडवल.  त्याचं टोचून बोलणं, टोमणे मारणं,  क्षणाक्षणाला माहेरचा उद्धार करण खूप मनस्ताप व्हायचा तिला. वरून दिसायला सगळं चांगलं होतं पण मानसिक त्रासाचं काय ?
तो कोणाला सांगता येतो ? आपली मुलगी खात्यापित्या घरी गेली हा विचार करून आई आणि दादा खुश आहेत असं तिला वाटायचं .
त्यामुळे तिने कधी एका शब्दाने ही त्यांच्याकडे तक्रार केली नाही. पण त्यांनी सुद्धा नितीन च वागणं लग्नानंतर पाहिलेलं त्यामुळे त्याच्या स्वभावाची  त्यांना कल्पना आलेली पण् त्याला उशीर झालेला. त्यामुळे आपल्या साध्या भोळ्या सखी ची त्यांना ही काळजी वाटू लागलेली.‌

सखी लग्नाच्या आधी इतर मुलींसारखीच हसरी होती. स्वभावाला तशी शांतच पण समजूतदार होती. परिस्थितीने तिला गंभीर बनवलं. कमी वयातच गरजे पेक्षा जास्त समजूतदार झाले ती.. वयाच्या २४ व्या वर्षी चार वर्षाच मूल पदरात घेऊन चार वर्षांचं वैधव्य स्वीकारत ती समाजाच्या घाणेरड्या नजरा सहन करत होती. 

  नको नको म्हणत असतानाही नितीनच्या आठवणी मनात येऊन तिचा चेहरा लगेच उतरायचा . आताही तसंच झालं आणि अचानक तिला ठेस लागली आणि अंगठ्याला थोडंसं लागलं. तिने खाली बसून अंगठा तसाच दाबून धरला आणि स्वतःशीच बडबडली,

'जरा वेंधळेपणा कमी कर सखू.. आज कशी वागत होतीस तू ? काय म्हणाले असतील ते ? 
त्यांना वाटलं असेल सखी वेडीच आहे.

पण मी तरी काय करू ? ते बोलायला लागली की मला काही सुचतच नाही . इतकं स्पष्ट आणि नजर रोखून बोलतात की मी गोंधळून जाते .'
तिच्या प्रश्नाचं तिनेच उत्तर दिलं.

मग नितीन चा विचार जाऊन ती कृष्णाच्या विचारातच घरी पोहोचली. तोपर्यंत सुरज उठलेला तो धावतच तिच्याकडे आला . तिने पर्स मधील कॅडबरी काढून त्याला दिली. त्याचा आनंद गगनात मावेना. ती इतकी मोठी कॅडबरी पाहून सुलभाताई सखी ला बोलल्या,

"अगं जरा बारीक आणायची . लहान मुलांना इतकी मोठी कॅडबरी ?? दात कीडतील त्याचे..
आता एकदा दिल्यावर मन भरेपर्यंत खाली ठेवणार आहे का तो?"

सखी पर्स कपाटात ठेवत बोलली,
"अग ती  यांनी दिलीये सुरज साठी."

"यांनी म्हणजे?
पाहुण्यांनी?"

"हो ऽ "

सुलभाताई थोडा गोंधळल्या,
"पण, तुला नानाने बोलावलेलं ना?"

"तू बस ..
मी सांगते तुला..!

मंगळसूत्राची डिझाईन पसंत ‌ करायला मला बोलावलेल. नाना आणि हे दोघेही होते . मंगळसूत्र बनवायला टाकलं. अंगठ्या घेतल्या . पैंजण घेतल्यावर जोडवी घेतली. नाना मला घरी सोडणार होता पण वहिनीने बोलावून घेतलं मग यांनी मला गावाच्या वेशी पर्यंत सोडलं."
सखी ने सगळ सांगीतलं.

"पाव्हणं मला समजूतदार वाटलं."

"मला ही..!"
सखी बोलून गेली.

"तू मनापासून तयार आहेस ना सखी ?
 'उगाच आगीतून उठून फोफाट्यात'असं नको व्हायला."
सुलभाताईंनी काळजीने विचारलं.

"हो आहे .
हे सुरज ला अंतर देणार नाहीत..
 असा विश्वास वाटतोय मला."

"अगं पहिल्या भेटीतच सुरज सोडत नव्हता त्यांना.. पाहिलंस ना तू !"
सुलभाताई कौतुकाने बोलत चहा ठेवायला गेल्या. 

…………


स्थळ : पळसगाव

कृष्णा घरी आला संपूर्ण प्रवासात तो सखीचाच विचार करत होता. घरी आल्यावर सुद्धा सखी त्याच्या नजरेसमोर होती. तिचा बावरलेला चेहरा त्याच्या नजरेसमोरून हटत नव्हता . 

'किती भोळ्या आहेत . किती साध्या !!
त्यांचा साधेपणा चेहऱ्यावरून दिसतो .
त्यांच्यासोबत बोलताना तो जाणवतो.‌ लहान वाटतात दिसायला पण वयाच्या मानाने तशा प्रौढ वागतात. 

 अरे पण त्यांचं वय किती ??? '
तो या विचारावर येऊन थांबला.


आणि लगेच त्याने नानाला फोन केला.
नाना सासुरवाडीला गेला असल्यामुळे त्याचा फोन लागला नाही. 

' जाऊ दे माझ्यापेक्षा लहानच असतील. '

 हा विचार मनात आला आणि तो हसला . 

'असतील म्हणजे ? लहानच आहेत त्या ...
आता मी तिशी ओलांडली .. त्या थोडीच तिशीत असणार आहेत? चार-पाच वर्षाचा अंतर असेल आमच्यात . '

सोनाबाईंनी त्याला चहा आणून दिला. त्याला स्वतःशीच हसताना पाहून त्यांना बरं वाटलं.

 तो सखी ला भेटून आलाय हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे हसण्याच कारण सखी आहे हे सांगायची त्यांना गरज नव्हती. सखी आल्यावर तो हळूहळू बदलेल अशी आशा त्यांना वाटू लागली.


   आरती पेक्षा सखी दिसायला तशी उजवी होती. रंगाने उसळ होती . आरती ही कृष्णाची पसंत होती म्हणून सोनाबाईंनी तिला स्वीकारलेलं‌ . स्वभावाला जितकी शांत तितकीच रागीट, त्यांनी सासूपणा कधी गाजवला नव्हता. दोघींचं नातं चांगलं होतं. पण तिचं आणि कृष्णाच नेहमी वाचायचं. त्या दोघांच्या भांडणात सोनाबाई कधी पडायच्या नाहीत . ते कधी भांडतात, कधी गोड होतात हे त्यांनाच कळायचं नाही.  

    घरात लहान मुलं नसलं तरी ते दोघेही लहान मुला पेक्षा कमी नव्हते. लग्नाच्या वेळी दोघेही २३ वर्षांचे त्यामुळे भर तारुण्यात त्याच्या प्रेमाला उधाण आलेलं. एकमेकांशिवाय त्यांच दुसरं जगत नव्हतं. सोनाबाई सुद्धा आपल्या मुलाचा सुखी संसार बघून खूप खुश होत्या आणि अशातच त्यांना त्या आजी होणार हे कळलं. तेव्हा तर त्या आरतीला खूप जपू लागल्या. कृष्णा सुद्धा तिला जपत होता. याचं त्यांना भारी कौतुक ! 

    पण काळाला त्याचा संसार बघवला नाही आणि बाळ झाल्यावर काही तासांतच आरती सोडून गेली. आणि त्यांच्या घरावर अवकाळा पसरली. कृष्णा बदलला . एकटा एकटा राहू लागला . खूप चिडचिडा झाला . तो आरव मध्येच आरतीला पाहू लागला. दुसऱ्या लग्नाचा विषय घरात बंद झाला . 
या सगळ्यामध्ये नाना चा खूप आधार होता. 


 आज कृष्णाला स्वतःमध्ये हरवलेलं हसताना पाहून सोनाबाई मनोमन सुखावल्या.

पुढच्या रविवारीच घराचं कलर काम उरकून घेतलं कपड्यांची खरेदी झाली . घरात किराणा सामान आणलं. लग्नाचा माहोल झाला. सोनाबाईंची तर धावपळ आणि उत्साह दोन्ही लहान मुलासारखा होता. कृष्णाने लग्नासाठी चार दिवसांची रजा घेतली.


   इकडे सखी ला चुडा भरण्यासाठी कासारणीला घरी बोलावलेलं. भुंड्या हातात चुडा भरताना सखीला भरून आलं. चुडा भरताना कासारीण प्रत्येक मुलीला हळद कुंकू लावून चुडा भरायला सुरूवात करायची.. पण् ती हातात कुंकवाचा करंडा घेऊन तशीच सखी कडे बघत होती. 

\" हीला कस लाव कुकू ? \"
असा विचार मनात येऊन तिने सरळ चुडा भरायला सुरुवात केली.

त्या चूड्याच्या बांगड्या भरताना सखी चे डोळे ओलावले. सुलभाताई सुद्धा रडतं होत्या. पण ते आनंदाश्रू होते. आपल्या मुलीच पांढर कपाळ पाहताना त्यांचा काळीज तुटत होतं पण् आज पुन्हा तिच्या हातात हिरवा चुडा पाहून त्यांचे डोळे आनंदाने भरून आले . 

मुंबईवरून सागर , वहिनी आणि त्यांचं छोटास पिल्लू सुद्धा आलेलं. सुरज तर बाबाकडे जाणार म्हणून भलताच खुशीत होता. तो कृष्णाला कोणालाच विसरु देत नव्हता. त्याचं बाबा पुराण नेहमी चालू होतं . 

"मी बाबाकडे गेल्यावल हे करणाल .. 
मी बाबाकडे गेल्यावल करणाल.‌ बाबा मला उचलून घेतो .. बाबा मस्त आहे. " त्याची नेहमी बडबड चालू असायची. ते ऐकताना सखीच्या नजरेसमोर हलकेच कृष्णाचा चेहरा तरळायचा. 

सखी साठी चांगला मुलगा भेटला यामुळे तिच्या घरचे सुद्धा आनंदी होते.

 लग्नाच्या आदल्या दिवशी वहिनी सखी च्या हातावर मेहंदी काढत होत्या. शेजारच्या काही मुली सुद्धा आलेल्या. हातावर मेहंदी काढून घेताना सखीच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आल. या आधी तिने पहिल्या लग्नात मेहंदी काढलेली, त्यानंतर आज..... !

सगळ्याच भावना सगळ्यांना सांगता येत नाहीत. काही गोष्टी मनातच राहतात . मन हे सगळ्याच आठवणींचं एक गाठोड असतं. त्याला हवं तेव्हा..
 हवं ती आठवण बाहेर येते. 
आपण त्याचेच गुलाम !!

"ताई आता डोळ्यात पाणी आणू नका.
 आता तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे . हे बोलत होते मुलगा खूप चांगला आहे.
 तो तुम्हाला सुखात ठेवेल."

वहिनी मेहेंदी काढता काढता सखी ला प्रेमाने समजावत होत्या.

"हम्म ऽ"
त्यावर सखी फक्त हुंकारली.

सुरज धावतच आला . त्याच्या दोन्ही हातावर दोन फुले काढलेली .

" हे मी बाबाला दाखवणाल" , तो नाचत बोलला.

त्याच्या वेड्या वाकड्या उड्या पाहून सखी आणि वहिनी दोघेही हसल्या आणि सखी ला कृष्णाची आठवण आली. उद्या त्याला भेटायचं आणि त्याच्यासोबत निघून जायचं या विचाराने तिचं काळीज धडधडल. 

 मुलांसाठी असलं तरी ते दोघे उद्या नवरा बायको होणार होते . कसा असेल प्रवास ? 
कशी असेल त्याची सोबत ? 
कसं असेल घर ? कशा असतील सासुबाई ? 
खूप सारे प्रश्न होते. उत्तर येणारा काळ देणार होता. 


 पण एक दोन भेटीतच तिचा कृष्णा वर विश्वास जडलेला. तो नितीन सारखा नाही हे तिचं मन सांगत होतं. रागीट असला तरी मनाने चांगला आहे. 'तिची काळजी घेईल ' असं तिचं तिलाच वाटत होतं.

मन उधाण उधाण  !!

तिचं मन हे क्षणात इथे तर क्षणात पळसगाव ला जात होतं. कृष्णाची विचारपूस करून त्याला भेटून पून्हा येत होतं. तिच्याही नकळत ती कृष्णाचा विचार करत होती . 


टू बी कंटिन्यू..

©® प्रियांका सुभा "कस्तुरी"
२९/०८/२०२२


जिल्हा -

सातारा, सांगली

(मागच्या भागाला समिक्षा देणार्यांचे मनापासून धन्यवाद)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//