Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-६

Read Later
कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-६


विषय - कौंटुबिक कथा

शीर्षक - कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-६कृष्णा काहीच बोलत नाही हे बघून नानाने मागून आवाज दिला,

"अरे काही बोलणार आहेस का?
की झोप बीप लागली?"

कृष्णाने एकदा मागे वळून डोळे वटारून पाहिलं आणि बोटानेच नानाला शांत राहायला खुणावलं आणि तो शांतपणे बोलला,

"नमस्कार"

त्याचा आवाज ऐकून तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. तिचा शांतपणे आवाज..

"नमस्कार"

"सुरज ची तब्येत ठीक नाही अस कळलं."
तो सरळ मुद्द्याचं बोलला.

"हो,  पण आता बरा आहे."
तिचं सुद्धा शांतपणे उत्तर..

"जरा तिची पण चौकशी कर."
मागून नानाचे उपदेशाचे डोस चालू झाले.

कृष्णाने मागे वळून एकदा त्याच्याकडे रागात पाहिलं आणि मोबाईल वर हात ठेवून तोंडात बडबड्या,

"दोन मिनिट शांतपणे बोलून देणार नाही हा."

आणि तो तसाच बाहेर गेला.  दिंडीच्या दरवाजातून निघाल्यावर समोर एका गर्द आंब्याच्या झाडाखाली खाट ठेवलेली होती .तिथे जाऊन तो बसला.  त्या थंड वातावरणात त्याला छान वाटलं.

त्याने पुन्हा विचारलं ,
"काय बोलला तुम्ही?"

"मी म्हटले,  सुरज बरा आहे आता."

"काय झालेलं त्याला?"

"खूप ताप होता  , उतरतच नव्हता .
नाना होता म्हणून बर झालं.  आम्ही रात्रीच त्याला घेऊन गेलो."

"अरे बापरे ..
डॉक्टर काय बोलले?"

"व्हायरल आहे ..असंच बोलले."

"अच्छा ठीक आहे."
तो बोलायचा शांत झाला.

मग तिनेच विचारलं,
"आरव कसा आहे?"

"बरा आहे."

"किती वर्षांचा आहे?"

"नऊ"

"आरव च्या आईचं नाव काय …..?"
ती पुढे विचारणारच होती की तो दोन वेळा जोरात शिंकला.
आणि तिने जीभ लावली ती मनातच बोलली,
मूर्खासारखं मी काहीही विचारतीये.

त्याने चोंदलेल नाक पुसत पुन्हा विचारलं,
"काय बोलला तुम्ही ? मी ऐकलं नाही."

"गर्मी खूप आहे ना."
तिने विषय बदलला.

"एप्रिल महिना चालू आहे म्हटल्यावर तेवढं चालायचंच पण तुमच्या मुंबईसारखा उकाडा इथे नसतो. आणि इथे आपल्या गावात तर गर्मी म्हणजे काय हे कळतच नाही. "
तो गर्द आंब्याच्या झाडाकडे बघत बोलला.

त्याचे आपलं म्हणणं तिला सुखावून गेलं. ती फक्त हुंकारली,

"हम्म ऽ"

"मग काही विशेष?"
त्याने विचारायचं म्हणून विचारलं.

"काही नाही."

"मग ठेवू?"
तो शांतपणे बोलला.

"हम्म ऽ"
आणि तिने फोन ठेवला.

फोन कट झाल्यावर तो तिथेच आंब्याच्या झाडाखाली बसला. का कुणास ठाऊक पण सखी सोबत बोलून त्याला शांत वाटत होतं. आणि पुन्हा त्याला त्याच्या पहिल्या बायकोची आरतीची आठवण आली.

' आरती' जिच्यासाठी कृष्णा वेडा होता.  दोघेही एकाच कॉलेजमध्ये . पहिली मैत्री आणि मैत्रीतून प्रेम जडल. कॉलेज नंतर दोन वर्षांनीच त्या दोघांनी लग्न केल. संसार सुखाने नहात होता. कृष्णा ला सुद्धा नुकताच टेम्पररी शिक्षक म्हणून शाळेमध्ये नोकरी मिळालेली.  सगळं कसं छान चालू होतं .


    त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक फुल उमलणार होतं कारण आरती प्रेग्नेंट होती. दोघांचंही वय कमी असलं तरी दोघेही येणाऱ्या बाळामुळे खूप आनंदी होते . सोनाबाई तर आपल्या सुनेला फुलासारखं झपत होत्या. कृष्णाचा घरी आल्यानंतरचा सगळा वेळ आरतीचा होता. तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांने तिला तळहाताच्या फोडा सारखा जपलेल.  कारण आरती खूप नाजूक होती तिला त्रास अजिबात सहन व्हायचा नाही.  तिच्या सुजलेल्या पायांना कृष्णा आपल्या आई समोर तेल लावायचा आणि आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून सोनाबाई सुद्धा खुश होत्या पण आरतीच्या प्रेग्नेंसी मध्ये कॉम्प्लिकेशन्स होत्या ही गोष्ट फक्त त्या दोघांना माहीत होती आणि हेच कारण होतं की कृष्णा तिला फुलासारखा जपत होता . तो  तिच्या बाबतीत प्रचंड पजेसिव्ह होता. तो रागावल्यावर आरती लाडीगोडी लावून त्याला लगेच मनवायची. तिचा नाजूक आवाज कृष्णाला खूप आवडायचा .

\"ए श्री तू सारखा रागावत जाऊ नको हा ..
नाहीतर मी तुला सोडून जाईन\"
हा आरतीचा फेवरेट डायलॉग..

ती गेल्यानंतर तिचं बोलणं आठवूण कृष्णा एकांतात खूप वेळा रडला.  तो जगायचं विसरला . तिची जागा दुसऱ्याला देण त्याला कधीच शक्य नव्हतं.  पत्नी म्हणून एखाद्या परस्त्रीला स्वीकारणं , तो स्वप्नातही कल्पना करू शकत नव्हता.

त्या दिवशी सखीला भेटल्यावर सुद्धा त्याला आरतीचीच आठवण आली आणि आज तिच्याशी बोलल्यावर तिचा नाजूक आवाज ऐकल्यावर जणू काही आरती सोबतच बोलला असं त्याला वाटत होतं. त्याचं मन सखी मध्ये आरतीला शोधून पाहत होत.

जेव्हा नाना बाहेर आला तेव्हा कृष्ण शून्यात बघत बसलेला,

"कृष्णा समाधी लागली का?"
नानाने हसत विचारलं.

नानाच्या आवाजाने कृष्णा त्याच्या विश्वातून बाहेर आला.
"अं ऽ काय बोललास तू ?
मी ऐकलं नाही."

"ऐकलं नाही बरं झालं."
नाना हसत बोलला.

"सारखा काय रे हसत असतोस ?"

"का रे बाबा?"

" जा बघावा तेव्हा दात काढत असतोस."
कृष्णाने शेजारचा मोबाईल उचलून नाना पुढे केला.

"अरे हसण्याने आयुष्य वाढतं .
माणसाण हसत राहावं."
नाना पुन्हा हसतच बोलला.

त्यावर कृष्णा गंभीर स्वरात कुठेतरी हरवल्यासारखा बोलला,
"असं काही नसतं . सतत हसरी माणसं सुद्धा अल्प आयुष्य घेऊन येतात आणि आपल आयुष्य व्यापून टाकतात."

तो आरती बद्दल बोलतोय हे कळून सुद्धा नाना विषय बदलत बोलला,
"अरे पंधरा दिवसांवर लग्न आलय..
तुझी कसली तयारी नाही अजून?"

"तयारी म्हणजे? "
कृष्णा ने कपाळावर हलकी आठी आणत विचारलं.

"लग्न तरी कोर्ट मॅरेज होणार असल तरी सुद्धा तिला मंगळसूत्र हवच,  कपड्यांची खरेदी आली,  लग्नानंतर गाव जेवण आलं , त्यामुळे किराणा सामान खरेदी आली आणि घरात मंगल कार्य होतय तर जरा घराला सुद्धा रंगाचा हात लावूया ."कृष्णाने एकदा घराकडे पाहिलं घराचा रंग पूर्ण उतरलेला.  बाहेरच्या बाजूने पावसाने अर्ध्या भिंतीचा रंग धुवून गेलेला तो फक्त हुंकारला,

"ठीक आहे .पुढच्या रविवारी बघू."

"आणि मंगळसूत्राच काय?
काकू बोलत होत्या आरतीचा मंगळसूत्र आपण नवं जुनं करूया."

"नाही ते आरुच आहे आणि ते तिचच राहील यांच्यासाठी आपण दुसर घेऊ."
कृष्णा लगेच बोलला.

तिची प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची होते.

"कृष्णा अरे सोनं किती महाग झालय .
त्यामुळे बोललो मी."

"असू दे , पण यांच्यासाठी आपण दुसरच घेऊया.
दोन तोळ्याच बास होईल ना?"

"बास की !
तसही तिला दागिन्यांचा शौक नाही."

"चल मग आजच खरेदी करू."

कृष्णा खाटेवरून उठत घरामध्ये येत बोलला.


नानाच्या डोक्यात खुरापत शिजत होती . तो सुद्धा कृष्णाच्या पाठी पाठी येत बोलला,

" मी काय म्हणतोय ,
माझ्या लग्नावेळी केलेल मंगळसूत्र  माझ्या बायकोला  आवडलंच नाही."

कृष्णाने  मागे वळून विचारलं ,
"का?"

"म्हणे घालणार मी तर माझी पसंत नको का?"

"बरोबरच आहे की !
आम्ही सुद्धा आरुच्या पसंतीनेच मंगळसूत्र बनवलेलं."

"मी काय म्हणतोय , सखी घालणार तर तिच्याच पसंतीने घेऊ या का ?
काय काकू?"

सोनाबाई  लसून सोलत दोघांकडे बघत बोलल्या,
"तुम्हाला पटल तसं करा .
माझी ना न्हाय."

कृष्ण गोंधळून नानाकडे पाहत होता. त्याचा गोंधळलेला त्याचा चेहरा पाहून नाना पुन्हा त्याला समजावत बोलला,

"आता आपण करू  आणि तिला पसंतच पडलं नाही तर ? त्यामुळे बोलतोय तिच्या पसंतीने घेऊया."

तरी सुद्धा कृष्णा नानाकडे तसाच पाहत होता.

\" अरे काहीतरी बोल घुम्या .\"
नाना मनातच बोलला ‌.

"पण त्या येतील?"
कृष्णाच्या कपाळावर हलकीशी आठी आली.


"तिला मी आणतो . त्याची काळजी तू करू नको .
तू तयार हो ."

आणि लगेच नाना पळस गावातून बाहेर पडला.
नानाने फोन करून सखीला बाजारात बोलवून घेतलं काही काम असेल हा विचार करून सखीने सुरजला आईजवळ ठेवलं आणि ती निघून आली.


   कृष्णा पोहोचला तेव्हा नाना आधीच सराफच्या दुकानात होता.  कृष्णा दुकानात डोकावत बोलला,

" अजून आल्या नाहीत?"

"दिसतय  तरी विचारतोस?
आणि पुन्हा बोलतोस मी असं का बोलतो?"
नाना हसत बोलला.

"फोन करून विचार किती वेळ लागेल ?"

"अरे येते बोलली पाच मिनिटात."

पाच मिनिटानंतर पुन्हा कृष्णा ..
"अजून झाली नाहीत का पाच मिनिट?"

"येईल रे थांब थोडा वेळ..!"

पुन्हा पाच मिनिटानंतर कृष्णाची रिएक्शन..
"आपला वेळ वाया जातोय नाना..
त्यांना वेळेची किंमतच नाही."

"अरे बाबा झाला असेल उशीर..
आत्ता येईल ती ."
नाना समजावत..

पुन्हा पाच मिनिटानंतर कृष्णा फेऱ्या मारत बडबडला,

"मला वेळ न पाळणारे अजिबात आवडत नाहीत. सगळी काम वेळेतच व्हायला हवेत."

"आता ही काय शाळा आहे का?
झालं थोड इकडं तिकडं  तर काय फरक पडतो.?"

"तू गप्प बस!
तुला तर काहीच कळत नाही.
कृष्णाने सखीचा राग नानावर काढला.

"आता मी काय केलं?"

"तूच बोलवलस त्यांना."

"तिचा राग आलाय ना  मग ती आल्यावर तिला ओरड..  उगाच मला ओरडू नको."

"सांगणारच आहे मी त्यांना..
वेळेचा अपव्य मला आवडत नाही ."
कृष्णा पुन्हा घड्याळ बघत बोलला.

नानाने तिला फोन केला आणि फोन ठेवल्यावर बोलला ,
"दोन मिनिटात येईल."

कृष्णा घड्याळाकडे नजर लावूनच बसलेला.
दोन मिनिटांनी त्याची पुन्हा रिएक्शन,

"त्यांच्या घड्याळ्यात मिनिटे दिसतात का?"

"अरे तू जरा शांत हो.
कशाला उगाचच चिडचिड करतोस?"

"पाऊण तास झाला वेड्यासारखे उभे आहोत आपण आणि तू बोलतोस उगाच चिडचिड करतोय.?"
कृष्णात वैतागलेला..

"का एवढा वेळ लागतो हिला ?
इकडे कृष्णा किती गरम झालाय आणि तिचं इथे यायचं नाव नाही."
नाना स्वतः शीच बडबडला.

"राहू दे , मी निघतो आता.
मंगळसूत्र त्या आल्यावर त्यांच्या पसंतीने तू घे."

"वेडा आहेस का तू?"

नानाच्या या वाक्यवर कृष्णाने रागात त्याच्याकडे पाहिलं आणि नाना ने त्याच वाक्य पुन्हा माघारी घेतलं,

"मीच वेडा .. खुश !!!

पण फक्त शेवटचे पाच मिनिट थांब..
येईल ती."


कृष्णा रागात इकडून तिकडे येणाऱ्या घालत होता.
" किती हा वेळेचा अपव्य ..
एखाद्याला किती वाट पाहायला लावायची ? माणसांना वेळेची किंमतच नाही."

त्याची कुरकुरी चालू होती. आणि समोरून ती आली. खांद्यावर पर्स अडकवलेली.  फिकट पिवळ्या रंगाची साडी नेसलेली.. ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली तरी कृष्णा तिच्या कडेच बघत होता.
तिने थोडास अडखळत विचारलं,

"खूप उशीर झाला का मला?"

कृष्णा तिच्या डोळ्यात पाहत होता . किती निरागस डोळे .. तिच्या चेहऱ्यावर मेकअप चार लवलेशही नव्हता.  तिचा नितळ रंग ..तिचा साधेपणा हेच तिचं सौंदर्य होतं.

कृष्णा तिच्याकडे एकटक पाहतोय हे पाहून नाना मुद्दामून तिला ओरडला,

"खूप उशीर झाला तुला !
गेला पाऊण तास आम्ही वाट पाहतोय.
इतका उशीर कसा झाला ?"

"मी कधीची निघाले होते पण  गाडीच भेटली नाही म्हणून वेळ लागला."
तिने नानाला शांतपणे सांगितलं.

"माझ्यामुळे तुम्हाला वाट पहावी लागली. तुमचा वेळ वाया गेला,  सॉरी."
ती कृष्णाकडे पाहत पुन्हा शांतपणे ..

"गाडीचा प्रॉब्लेम होता त्यात तुमची काय चूक?  तुम्ही सॉरी बोलू नका."
कृष्णा शांतपणे बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून नाना त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता .

"गेला पाऊण तास माझं डोकं खातोय आणि आता बघा कसे गौतम बुद्ध झालेत." नाना स्वतःशीच बडबडला.

नाना सराफाच्या दुकानात जात पाठमोरा हसत बोलला ,
"मी आत मध्ये जातोय ,
तुम्ही सुद्धा या हळूहळू .........!"


टू बी कंटिन्यू

©® प्रियांका (सुभा)  "कस्तुरी"
२०/०८/२०२२

जिल्हा -

सातारा, सांगली
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//