Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी ( नवीन नात्याचा प्रारंभ) भाग -५

Read Later
कृष्ण सखी ( नवीन नात्याचा प्रारंभ) भाग -५


विषय - कौटुंबिक कथा

शीर्षक - कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ)  भाग -५

लग्न पंधरा दिवसांवर आलेल. कृष्णाला फक्त रविवारची सुट्टी होती . आता फक्त दोन रविवार शिल्लक होते.   सोनाबाईंनी नानाला बोलवून घेतलेलं.  अख्ख्या पळस गावात कृष्णाच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा होती .पळसगाव म्हणजे शंभर  उंबरठे असलेल छोटंसं खेड. त्यामध्ये सुद्धा तरुण वर्ग नोकरी निमित्त शहरी भागात.. खुप कमी तरुण होतकरू गावात होते. कृष्णा पहिल्या पासून स्वावलंबी होता. प्रत्येकाला मदत करणारा त्यामुळे त्याला गावात विशेष किंमत होती. तरी सुद्धा त्याच्या लग्नाच कळल्यावर पारावर विषय होऊ लागले.


कोणी म्हणत होतं...

"नशीबवान आहे गडी , मुंबईची पोरगी भेटली ."

"पोरगी कुठली एका पोराची आई आहे !
आता कोरी थोडीच भेटणार ?"

"आता तोच एका पोराचा बाप तर त्याला कोरी कुठून भेटणार?"

"तेच तर , तेव्हाच लग्न केलं असतं तर एक वेळ कोरी भेटली सुद्धा असती."

"जाऊदे भाकरी भाजायला झाली.. बास झाली."


तर कोणी बोलत होत....

"उशिरा का होईना लग्नाला तयार झाला हे बरं झालं.. एकट्यान आयुष्य जगणं लय वंगाळ."

गावातील लोक आपापल्या परीने कृष्णाच्या आणि सखीच्या लग्नाचा विषय आवडीने चघळत होते.

..........

      नाना दुपारीच पळस गावात आला. तो आल्या आल्या सोनाबाईंनी त्याचा जाळ काढला,

"आलास ??
तुला बोलवायला बोलावणं धाडव लागलं . लग्न पंधरा दिवसावर आलं आणि तुझा पत्ताच न्हाय ?
हे बघ नाना ,  जसं लग्न जमवलंस तसं सगळं गप गुमान पुढं लागून करायचं."

"अग काकू  भडकतेस कशाला ?
मी लग्नाची तयारीच करतोय पंधरा दिवस झाले. "
नाना पाण्याचा तांब्या घशात खाली करत बोलला.

"कसली तयारी करतोयस ?
इकड तर फिरकला पण न्हायस."
सोनाबाई त्याच आवाजात गरजल्या.


"अगं सागर लगेच मुंबईला गेला . त्याचा सुट्यांचा प्रॉब्लेम आहे.  त्यामुळे घरी फक्त सखी आणि सुलभा काकू .. त्यात सुरजची तब्येत पण खराब होती .. आणि घरात  गडी माणूस पण कोण नाही त्यामुळे मलाच बघावं लागलं."
नाना समजावत..

"कसा आहे सुरज ? काय दुखत होत?"
कृष्णाने आतमध्ये येतं नानाच शेवटचं वाक्य ऐकलं..त्यामुळे लगेच काळजीने विचारलं . त्याच्या नजरेसमोर गुबगुबीत गालाचा गोंडस दिसणारा लहानगा  सुरज आला.

"आता बरा आहे वायरल होतं.
बाकी काही नाही." नाना सोफ्यावर कृष्णा ला बसायला जागा करत बोलला.

"तरीपण चौकशी करायला हवी."
कृष्णा विचार करत स्वतः शी बोलल्या सारखा बोलला.

"हो तर चौकशी करायलाच हवी ."
नाना गालत हसत बोलला.  कृष्ण विचारत असल्यामुळे नानाच्या बोलण्याची टोन त्याच्या लक्षात आला नाही.

"पण तुझ्याजवळ नंबर नसेल ना?"
नानाने विचारल्यावर कृष्णा विचार करतच बोलला,

"नंबर तर नाही."

लगेच नानाने मोबाईल काढला आणि सखीला कॉल केला.  रिंग वाजल्यावर फोन कृष्णा समोर केला,

"धर आणि बोल."

"अरे असं काय बोलू  मी ?
तूच विचार, कसा आहे सुरज?"

"मी काय विचारू?
मी आत्ताच त्याला भेटून आलोय.
तुला बोलायचं होतं ना?  तूच चौकशी कर."

रिंग वाजल्यावर सखी ने फोन उचलला,

"हॅलो"

फोन स्पीकरवर असल्यामुळे आवाज सगळ्यांनी ऐकला. तिचा आवाज ऐकून कृष्णा शांत झाला.

"नाना ,काही काम होतं का?"
किती सुस्पष्ट शांत आवाज.. कृष्णा ची नजर आपोआप मोबाईल वर स्थिर झाली

"अग काही नाही,  माणसांना चौकशी करायची होती." नाना कृष्णाकडे बघत हसत बोलला आणि कृष्णाने कपाळाला हात लावला.

"दे इकडं फोन ..पोरगी बोलते आणि तुमचं काय चाललंय ."
सोनाबाईंनी बडबडतच नानाच्या हातातून मोबाईल घेतला,

"बोल पोरी कशी हायेस ?"

"मी ???

मी बरी आहे."

सखी कोण बोलत असेल याचा अंदाज लावत होती,  पण तिला काही कळेना तिने अंदाज लावतच विचारलं,

"मावशी बोलताय का?"
नानाची आई असेल असा तिचा अंदाज गेला.

"अगं मी कृष्णाची आय बोलते."
कांताबाई हसत बोलल्या आणि  तिकडे सखी शाॅक झाली ..ती गोंधळली.

"हा बोला ना ..कशा आहात?"

"मला काय धाड भरले.. मी ब्येस आहे.

पर सुरज ची तब्येत बरी नव्हती ना?"

"हो,  पण आता बरा आहे."

"बर काय करत होतीस?"

"काही नाही बसलेले."
बोलताना सखी ला जरा अवघडल्यासारखं झालेलं.

"बर थांब जरा."
सोनाबाई सखीला बोलल्या आणि..

"धरे बाबा ऽ चौकशी करायची व्हती ना पोराची..
कर ."
असं म्हणत सोनाबाईंनी मोबाईल कृष्णा पुढे केला. मोबाईल स्पीकरवर होता त्यामुळे कृष्णाला नाही म्हणता आलं नाही.

त्याने नाना आणि सोनाबाईंकडे बघत मोबाईल घेतला आणि त्यांच्या जवळून उठून दिंडीच्या दरवाजात जाऊन उभा राहिला.  स्पीकर ऑफ केला आणि फोन कानाला लावून उभा राहिला.

पलीकडून सखी सुद्धा शांत होती. तिने कांताबाईंचा आवाज ऐकलेला तिला उगाच असं वाटत होतं सोनाबाई कृष्णाला बोलल्या असतील आणि आता कृष्णा बोलेल. सखी सोबत अनपेक्षित पणे बोलण्याचा योग आलेला त्यामुळे कृष्णाला खूप वेगळं वाटत होतं.

कृष्णा काहीच बोलत नाही, हे बघून नानाने मागून हसत आवाज दिला,

"अरे काही बोलणार आहेस का?
की झोप बीप लागली?"

कृष्णाने एकदा मागे वळून पाहिलं आणि डोळे वटारत बोटानेच नानाला शांत राहायला खुणावलं आणि तो शांतपणे बोलला,

" नमस्कार "

त्याचा आवाज ऐकून तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. ती सुद्धा शांत आवाजात..

" नमस्कार "

©® प्रियांका (सुभा) "कस्तुरी"
१९/०८/२०२२

जिल्हा - सातारा, सांगली.

.............

(नमस्कार आदरणीय वाचक मंडळी,

माझंच नाही इरावरील कोणतंही साहित्य वाचल्यावर लाईक आणि कमेंट नक्की करत जा.. यामुळे लेखकांना प्रोत्साहन मिळतं.
धन्यवाद ?)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//