Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी ( नविन नात्याचा प्रारंभ)भाग-४

Read Later
कृष्ण सखी ( नविन नात्याचा प्रारंभ)भाग-४

विषय -कौटुंबीक कथा 

कृष्ण सखी

(नविन नात्याचा प्रारंभ)  भाग -४


कृष्णाची आपल्या दरवाजावर खेळलेली नजर पाहून नाना त्याचा खांदा थोपटत हसत बोलला,

"निघायचं का राहायचं?"

तसं पुन्हा कृष्णाने चमकून नानाकडे पाहिलं.
'तुला घरी पाहतो ..!'
या अविर्भावात कृष्णा नानाकडे पाहत होता.


"चला मंडळी येतो आणि जवळचा मुहूर्त पाहून बार उडवून देऊ म्हणजे पोरं संसाराला लागतील."
मामा हसत बोलले.

"हो तुम्ही मुहूर्त बघा आणि आम्हाला कळवा."

निरोप घेऊन नाना आणि मोहिते कुटुंब निघून गेले. लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं ठरलं. मामा नी पुढच्या अर्ध्या तासातच लग्नाचा मुहूर्त कळवला.
एका महिन्याने चांगला मुहूर्त होता आणि वडीलधारी म्हणून त्यांनी तोच मुहूर्त दोन्ही कुटुंबांना सांगून टाकला.

'फक्त एक महिना ??
इतक्या लवकर ??
कशी व्हायची तयारी ??'
हीच रिएक्शन दोन्हीकडे होती.

मोहिते कुटुंब प्रवासात असतानाच मामांनी त्यांना मुहूर्त सांगितला.

'फक्त तीस दिवस ?'
कृष्णाच्या मनात  चलबिचल झाली आणि नानाने हसतच संधी साधली,

" काकू लवकरच सुनबाई घरात येणार मग तुझी मज्जा !"

"हो बाबा मला तर आस झालंय कधी यकदा ती पोर घरात येते . काय तिच्या हाताला चव आणि दिसायला बी यकदम नक्षत्रासारखी गोरी गोमटी."
सोनाबाई हसत बोलल्या.

नाना तिरप्या नजरेने कृष्णाकडे पाहत गालात हसत बोलला ,

"तुझीच काय ती आल्यावर सगळ्यांचीच मज्जा होईल."

त्याच्या या वाक्यावर कृष्णाने कपाळावर आठी आणून त्याच्याकडे पाहिलं.‌

" तुझ्या जिभेला लगाम घाल . उगाच काहीही बरळू नकोस."
तो जरा रागात बोलला.


"अरे म्हणजे आरव ची सुद्धा मज्जा होईल ना ..
असं बोलायचं होतं ."

"तुझ्या बोलण्याचा अर्थ न समजण्या इतका मी लहान नाही आणि तुला मी चांगलाच ओळखतो.  तू कधी काय बोलतोस हे मला चांगलं कळतं ."
कृष्णा पुन्हा त्याच्यावर रागावला.

ते घरी पोहोचलेले बाहेर ओटी वर बसून तिघांचा संवाद चालू होता.

"तिथे सुद्धा तोंडाला येईल ते बोलत होतास तू .
तुला कळत नाही चार माणसात कसं वागावं?
कसं बोलावं?"

नाना हसत बोलला,
"अरे ते सुद्धा माझंच घर आणि आपल्याच घरी आपल्याच माणसांसमोर काय लाजायचं."

"बघ की !"
सोनाबाई तोंडात पुटपुटल्या.

"आणि आई , तू सुद्धा तुझ्या माहेर गेल्यासारखी तिथे वागत होतीस . कसे वागत होता तुम्ही दोघेही ?"
कृष्ण दोघांकडेही आळीपाळीने रागात पाहत होता.

" आता माझ्याकड येऊ नको बाबा.
मी काय केलं ? माणसं चांगली व्हती ..वातावरण हसून खेळून राहण्यासाठी मी पण हसून खेळून बोलत व्हते यवढच."

"तुला माणसं आवडली ना?"

"हो"

"सुरज आवडला ना?"

"आवडला ."

"आणि  सखी पण् आवडली  ना ?"
नाना ने मुद्दामून विचारलं.

"आवडली"
कृष्णा पटकन बोलला.

सोनाबाईंनी लगेच विठ्ठलाला हात जोडले आणि नाना हसला.

"आवडली पण आरवची आई म्हणून..
त्या आरवची आई  होऊ शकतात.
याच्यापुढे जाऊन माझ्याकडून तुम्ही दोघेही कोणत्या अपेक्षा करू नका ."

"अरे गाई ओरडतेय का ?"
नानाने मुद्दामून विषय बदलला.

"आई निघण्यापूर्वी तिला पाणी दाखवलेलं ?"


"मला कुठल्या उचलतात बादल्या? काल पाठीत पुन्हा चमकल म्हणून तर म्हणते ती पोर आल्यावर सगळं बघेल."
सोनाबाई पुन्हा सखीच्या विषयावर आल्या.

"तुझं तर लहान मुलासारख झालंय.  मला मघाशी सांगायचं ना....  रंगी तान्हेने हंबरतीये बघ किती!"
आणि कृष्णाने शर्ट काढून भिंतीला टांगून ठेवलं आणि बनियान वर स्वयंपाक घरातून मागे गोठ्यात केला.

"याचं बघ असं असतं!
कसं व्हायचं नाना ?
पोरगी चांगली भेटली.  पण हा असा..
याच घटकच घड्याळ ! कधी बी बिघडत.
कसं व्हायचं मला तर काहीच कळंना."
सोनाबाई झोपलेल्या आरवला नीट पांघरूण घालत काळजीने बोलल्या.

नाना सोनाबाईंना समजावत बोलला,
"लोक पहिली नवरा बायको होतात आणि नंतर आई बाप होतात . पण यांचं थोडं उलट आहे.  हे पहिलेच आईबाप आहेत.. तर पहिले आई बापच होतील. पण आईबाप होताना  नंतर  कधी ते नवरा बायको होतील हे त्यांचं त्यांना ही कळणार नाही... तू नको काळजी करू काकू ."

सोनाबाई कृष्णा आला नाही ना हे बघत नानाला हळूच बोलल्या ,
"नाना लग्नाला गौरीला आणि आरव च्या  मावशीला बोलूया का?"

"आपल्याला आधी कृष्णा सोबत बोलाव लागेल.
त्या दोघींना समोर बघून तो इतक्या माणसांमध्ये सुद्धा भडकेल आणि उगाच रंगाचा बेरंग व्हायचा."

"त्याचा मूड बघून तूच विषय काढ."
कांताबाईंनी सुचवलं.

"बघू , त्यांना बघितलं ती भडकतो  आणि त्या दोघींचं नाव जरी काढलं तर मग बोलायलाच नको."

"गौरीसाठी जीवन तुटतो रे माझा .. पोटची पोर आहे माझ्या."
सोनाबाईंनी डोळ्याला पदर लावला.

नाना सोनाबाईंचा मूड चांगल्या करण्यासाठी बोलला,
"अग काकू , तुला सांगायचं राहिलं . गौरी मागच्या बाजारात मला भेटलेली."

गौरीच नाव ऐकून सोनाबाईंचा चेहरा खुलला,
"काय बोलली , कशी आहे पोर?"

"ती बरीच आहे.  तुझी चौकशी करत होती. कृष्णाबद्दल विचारत होती आणि आरवला तिने माझ्याजवळ खेळणी सुद्धा दिली."

"म्हणजे तू त्या दिवशी ती गाडी घेऊन आलेला ..ती गौरीने दिलेली?"

"हो , पण कृष्ण होता त्यामुळे तिच्याबद्दल काही बोलताच आलं नाही. "

त्याचं बोलणं ऐकून लगेच सोनाबाईंचा चेहरा पडला नाना त्यांना समजावत बोलला,
"काकू तू नको काळजी करू.. त्याचा मूड बघून मी बोलतो त्याच्यासोबत."

"असा नव्हता कृष्णा.. तुला सुद्धा माहितीये पण आरती सोडून गेली आणि तो पार बदलला.  आत्ता कुठं चार शब्द बोलायला लागलाय..
नाही तर ते पण नव्हतं."

"हो ना , तेव्हा त्याचं वय काय होतं चोवीस वर्षांचा होता . आपण किती गळ घातली त्याला दुसऱ्या लग्न करायला तरी सुद्धा  त्याचा नकार ठाम होता . त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर मुलाचं कारण सांगून तेव्हाच दुसरं लग्न केलं असतं पण आपल्या कृष्णा वेगळाच ! आता पण किती मुश्किलीने त्याला लग्नासाठी तयार केलं मी !

"आत्ता त्याचं दुसरं लग्न ठरवलं?
मध्ये दहा वर्षे झोपल्याला का??
आधीच का न्हाय बघितलं त्याच्या लग्नाच?"
सोनाबाई नानाला धारेवर धरल्यासारखं बोलल्या.

"काकू तुला काय वाटलं ..मी तेव्हा शांत बसून होतो का ? पण विश्वासातील मुलगी भेटतच नव्हती. जी आरवला सांभाळेल आणि घराला आपलं मानेल. गेल्या वर्षी सखी अशीच सुट्ट्यांसाठी गावी आलेली तेव्हा तिला पाहून वाटलं हीच मुलगी कृष्णासाठी योग्य आहे पण
तेव्हा त्यांच्याही घरी लग्नाचा विषय नव्हता ."

"मग ??"

"मग काय वर्ष लागलं मला या लग्नाची सेटिंग करायला."
नाना हसत बोलला.

"म्हणजे सेटिंग म्हणजे नक्की काय केलंस तू?" सोनाबाईंनी कुतूहलाने विचारलं.

नाना ने पहिलं हसून घेतलं.  कृष्णा आला नाही ना याचा अंदाज घेतला आणि हसत बोलला,

"कृष्णाला सांगू नको .. मी बऱ्याच वेळा सखीचा फोटो आरवला दाखवून हीच तुझी नवी आई असं बोलायचो. त्याला कृष्णा जवळ आईसाठी हट्ट करायला सांगायचो. जेव्हा तो सारखा  'आई आई' करायला लागला त्यामुळे कृष्णालाही कुठेतरी वाटलं की त्याला आईची गरज आहे.  त्या दिवशी मी आलेलो तेव्हा आरव आईसाठी हट्ट करत होता मग मीच त्याच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला.  सुरुवातीला कृष्णाची नकाराची घंटा वाजवत होती ...
मग नंतर आरवला आईची गरज आहे..हे सारखं सारखं सांगून कुठे तो  तयार झाला‌ .

'मुलगी माझ्या विश्वासातील आहे. त्याच्या मुलाला सांभाळेल .घर सांभाळेल .' हे पटवून देताना माझा खूप कस लागला . तुला माहीतच आहे कृष्णाचा स्वभाव लवकर कोणावर विश्वास ठेवत नाही.  मग ज्या मुलीला पाहिलंच नाही तिच्यावर तरी कसा विश्वास ठेवणार"

"लई साथ दिलीस नाना.. असाच सोबत राहा बाबा  कृष्णाच्या..  नाहीतर तो एकलकोंड्या सारखा एकटाच असतो."

"मी तर आहेच..  आणि लग्न झाल्यावर तर सखीच्या हातचं खायला नेहमीच येत जाईल."

"ये बाबा.. तुझच घर आहे.""

"बर मी काय बोलतोय काकू ,
लग्नाला गौरी नसली तरी वाईट वाटून घेऊ नकोस. कृष्णाच्या मनाच्या विरोधात आपण काहीच नको करायला. सगळं त्याच्या मनासारखं होऊ दे ."

नाना बोलतच होता की कृष्णा दिंडीच्या दरवाजाने आत मध्ये आला. की नानाने लगेच विषय बदलला.
कृष्णा काहीतरी विचार करतोय हे नानाचा लक्षात आला त्यांनी अंदाज लावत विचारलं,

"तुला सखी बद्दल काही विचारायचं आहे का?"

नानाच्या प्रश्नाने कृष्णा विचारातून बाहेर आला,

"अं ऽ हो ... म्हणजे त्या कधीपासून आईकडे राहतात?"

"चार वर्षे झाली."

"अच्छा..!"

"तुला अजून काही विचारायचं आहे का?"
नानाने पुन्हा विचारलं.

"नाही ....
काही नाही ..?"
कृष्णा विचार करत बोलला.

नाना स्वभावानुसार मोकळेपणाने बोलायला,
"हे बघ कृष्णा,  लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही हे मला पण माहितीये,  त्यामुळे तिच्याबद्दल मनात शंका कुशंका येऊ देऊ नकोस . जे काय असेल ते स्पष्ट विचार."

"अरे नाही नाना...
तसं काही नाही.. !"

"लग्न झाल्यावर वर्षाच्या आतच तिचा नवरा गेला.  तेव्हा ती प्रेग्नेंट होती . सासूबाई नव्हत्याच. फक्त सासरे होते ते सुद्धा दोन वर्षांपूर्वी गेले त्यामुळे तिच्या सासर कडून काही त्रास होईल किंवा काही प्रॉब्लेम होईल तर तशी शक्यता काहीच नाही. "

ते दोघे बोलत असताना सोनाबाई घरात काम करायला निघून गेल्या .
कृष्णाने सहज विचारलं,

"त्यांनी सुद्धा माझ्याबद्दल चौकशी केलीच असेल की?"

नाना डोकं खाजवत बोलला,

"त्यांनी म्हणजे सुरजने?"

"नाही….
अरे त्यांनी...!"
कृष्णा लगेच बोलला आणि नानाच्या डोक्यात प्रकाश पडला. तरी सुद्धा न कळल्याचा आव आणत नाना तसाच डोकं खाजवत बोलला,

"सुलभा काकू ने?"

"नाही बाबा ऽ..

अरे त्यांनी त्यांनी ..!"

नानाला त्याच्या  'त्यांनी' च हसायला आलं. तो हसतच बोलला,

"सरळ बोल ना सखी ने विचारलं का? नाव घ्यायला लाजतोस का?"

"उगाच काही बोलू नको.. मी कशाला लाज"

"मग हे त्यांनी त्यांनी काय लावलंय?"

"अरे असं परस्त्रीला नावाने आवाज देण किंवा एकेरी आवाज देण अवघड वाटतं. समजून घे जरा."

"परस्त्री??"

"तुझ्या होणाऱ्या बायकोला तू परस्त्री बोलतोस?"
नाना पुन्हा हसत..

कृष्णाने नानाची मान पकडली आणि वैतागून बोलला,

"तुझी नाटकं मला कळत नाहीत..
असं समजू नको नाना."

नाना मान सोडवण्याचा प्रयत्न करत हसता बोलला,
"ए बाबा,  तू असा रांगडा गडी ..माझी मन मोडशील ..सोड मला आणि लग्नानंतर सखीला  मारशील बिरशील..  तुझा हात लागतो खूप."

"लागतो ?
मग हे घे ."
असं म्हणत कृष्णाने नानाच्या पाठीत धपाटा घातला.

"आणि राहिला प्रश्न त्यांचा ..?
तर आमच आम्ही बघू ..
तू मध्ये मध्ये करू नको ."
कृष्णा त्याच्याही नकळत बोलून गेला.


लगेच नानाने कृष्णाच्या हातून मान सोडवली आणि समोर उभा राहत हसत बोलला,

"वा रे वा .. आमचं आम्ही बघू ?
खूपच प्रगती केलीस की रे कृष्णा."

"अरे म्हणजे तसं नाही.. तू चुकीचा अर्थ घेतोस."

"लबाड आहेस.. मी बरोबर अर्थ घेतला.
बरं का काकू ."
नाना स्वयंपाक घरात डोकावत बोलला,
"वार बदलायला लागलंय."

कृष्णाने वैतागून डोक्याला हात लावला आणि कांताबाईंनी हसतच चहा ठेवला.

© प्रियांका (सुभा) "कस्तुरी"
१८/०८/२०२२

जिल्हा -

सातारा, सांगली 

................

( वाचकांना एक विनंती,

माझच नाही इरावरील कोणतंही साहित्य वाचल्यावर लाईक आणि कमेंट जरूर करतं जा.. हे प्रोत्साहन असतं लेखकांसाठी.. धन्यवाद ?)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//