Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ)भाग -१२

Read Later
कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ)भाग -१२


शीर्षक - कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ)भाग -१२

    मंगळसूत्र घातल्यानंतर सागर ने घाई घाईत अंगठी चा बाॅक्स नानाच्या हातात दिला आणि नानाने त्याच्या शेजारी असलेल्या कृष्णाच्या हातात दिला.
आणि सखीला द्यायला सांगितला.


ती अंगठी पाहून कृष्णाने पुन्हा ती अंगठी नानाच्या हातात दिली आणि हळूच बोलला,

" मी आधीच सांगितलेलं मला काही नकोय."

"आता केली ना तर घाल."
नाना सुद्धा हळू आवाजात..

"कशाला उगाच !
तू सागरला सांग मला काही नको ."
आणि कृष्णाने ती अंगठी नानाच्या हातात ठेवली सागर लगेच बोलला,

"आम्ही जास्त काही घातलं नाही.  एक अंगठीच केलीय तर रागावू नका."

सागर चुकीचे समजतोय हे कृष्णाच्या लक्षात आलं. तो समजावत बोलला,
"माझा देण्या घेण्यावर विश्वास नाही आणि मला काहीच नको. तुम्ही तुमची बहीण दिलीत हेच खूप आहे."

कृष्णा  सागर सोबत बोलत असताना सखीने नानाला जवळ यायला खुणवलं . नाना पटकन सखी च्या पलीकडे जाऊन बसला,
" बोल काय बोलतेस?"

सखी नानाच्या कानात कुजबुजली,
"त्यांना सांग मी केलीये ...
घ्या"

"मग तूच सांग की."
नाना पुन्हा हळू आवाजात..

"नाही तूच सांग."

सखी च बोलून झाल्यावर नाना पुन्हा कृष्णाच्या शेजारी येऊन बसला आणि त्याच्या कानात बोलला,

"अंगठी सखीने केलीये घाल." आणि अंगठी चा बॉक्स कृष्णाच्या हातात दिला.

"तुला माहिती होतं?"
आवाज शांत असला तरी नजरेने कृष्णा रागावतोय हे नानाच्या लक्षात आलेल.

"मला काहीच माहिती नव्हतं "
नाना समजावं आणि कृष्णा च्या शेजारून हळूच आवाज आला,

"घाला ना प्लीज ऽ "

घाल ना प्लीज .....
खूप वर्षांनी हीच टोन ऐकली  आणि कृष्णाला आरू ची आठवण झाली.  ती लाडात आल्यावर अशीच बोलायची.

ती टोन ऐकल्यावर कृष्णाने संथपणे तिच्याकडे पाहिलं.  ती पुन्हा तशीच बोलली,

"घाला ना प्लीज."

आणि कृष्णा ने अंगठीचा अंगठी चा बॉक्स पुढे धरला. तिने वरच्यावर बॉक्स उचलला. कृष्णाने कधी हात पुढे केला . तिने कधी अंगठी घातली त्याला काहीच कळलं नाही.

सप्तपदी साठी दोघेही उभे राहिले. आणि नानाची फोटो काढण्याची गडबड पुन्हा चालू झाली.

" हा थांबा थांबा .. हा इकडे बघा... इकडे बघा."

सखीला लाजल्यासारखं होत होतं. होमामधील अग्नी प्रज्वलित होत होता. सप्तपदीला सुरुवात करताना कृष्णाने प्रथे प्रमाणे हात पुढे केला पण सखी च लक्ष नव्हतं. ती लाजून खाली पाहत होती आणि हळू आवाजात..

"अहंम् अहंम्...."

आवाज आल्यावर ती मनातच..
' आता इतक्या लोकांसमोर यांना काय बोलायचं आहे? '
असं मनात बोलून तिने पुढे पाहिलं तर त्याने डोळ्यांनीच त्याचा हात दाखवला आणि तिने हलकीशी जीभ  चावली. आणि पुन्हा मनातच बोलली,

'इथूनच वेंधळेपणाला सुरुवात झाली . '

तिने पटकन हात पुढे केला. पण त्याच्या हातापर्यंत हात नेऊन ती थांबली. दोघांचेही हात जवळजवळच होते.

ब्राह्मणाचे मंत्र चालू झालेले. तिचा नाजूक हात त्याने अलगद हातात घेतला आणि त्याच्या उबदार  हाताचा पहिल्यांदाच स्पर्श होताच सखीच्या अंगावर शहरा आला .

   प्रत्येक पाऊला सोबत ते नव्याने वचनात बांधले जात होते.  मनापासून प्रत्येक पाऊल चालत होते.
ब्राह्मणाच्या पाठोपाठ दिलेले वजन स्वीकारत होते.

सखी प्रत्येक पावला सोबत त्या अग्नीमध्ये जुन्या आयुष्यातील जळमट स्वाहा करत होती . आजपर्यंत सहन केलेला त्रास , मनस्ताप , दुःख समाजाच्या घाणेरड्या नजरा , सगळं ती अग्नि कुंडाला समर्पित करत होती. तिचा भाऊ ,वहिनी आणि आई तिच्या नवीन आयुष्यासाठी, तिच्या आनंदासाठी देवाजवळ मनापासून प्रार्थना करत होते आणि सोनाबाई सुरज आणि आरव या दोन्ही नातवंडाना मांडीवर घेऊन आपल्या लेकाच्या संसाराची घडी पुन्हा  बसताना डोळ्यात आनंदाश्रू आणून त्या दोघांनाही पाहत होत्या.


    सप्तपदी झाल्यावर नानाच्या आग्रहास्तव आणि मामांच्या  शब्दाखातर फोटोज काढले गेले.
नाना खूप  चाणाक्ष  !

सखी आणि कृष्णाचे फोटो काढताना त्याने  मामांना तिथेच शेजारीच उभं केलेलं . मामा असताना कृष्णा चा ओरडा कमी मिळेल हा त्याचा हेतू...
आणि ओरडलाच तर मामांसमोर जरा सौम्य भाषेत ओरडेल.. हे नाना ला माहीत होतं.

अगदी शेजारी शेजारी उभे राहून फोटोज् काढलेत. काही क्लोज अप, खूप मुश्किलीने कृष्णाने सखीच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढलेला . मग मुलांना घेऊन , घरच्यांसोबत , सुलभाताईंच्या,  मामांच्या - मामींच्या आणि सोनाबाईंच्या पाया पडताना असे पारंपारिक पद्धतीने सुद्धा फोटो काढले गेले मग पुन्हा पुन्हा सर्वांसोबत फोटो.

"फोटोज काढण्यामुळे लग्न एन्जॉय केल्यासारखं वाटलं."  असं कृष्णाची मामे बहीणच बोलली .

खरंतर लग्न हे प्रत्येकाच्या नजरेतून वेगळंच असतं आणि हा प्रत्यय प्रत्येक लग्नात प्रत्येक जण अनुभवत असतो.


स्थळ: पळसगाव

            नवी नवरी घरी आल्यावर बायका कोणत ना कोणत कारण काढून सखीला पाहायला येत होत्या.

"इतकी देखणी बायको ?"

काहीजणी मनापासून कौतुक करत होत्या तर काहीजणी फक्त तोंडावर कौतुक करून घरी जाताना कुजबुजत होत्या,

"देखणी तर देखणी ! पण एका पोराची आई आहे."
हे बोलताना सखी त्यांच्यापेक्षा देखणी ही असूया त्यांच्या मनातून बाहेर येत होती.

दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या निमित्ताने गाव जेवण झालं. आणि रात्रीच मामा - मामी, मावशी आपापल्या घरी गेले परंतु सखीला करमण्यासाठी सोनाबाईंनी भाच्यांना राहून घेतलेल.  शाळेलाही सुट्ट्या होत्या त्यामुळे मामाच्या तीन मुली आणि कृष्णाच्या दोन मावस बहिणी राहिलेल्या . आठ-दहा दिवस त्यांच्यासोबत निघून गेले. त्या उठल्यापासून झोपेपर्यंत सखी भोवतीच असायच्या. आणि त्यांच्या सोबतीला आरव आणि सुरज .

आरव आणि सुरज ची गट्टी जमलेली . उठल्यापासूनच एकत्र ! मग जेवताना , खेळताना प्रत्येक गोष्ट एकत्रच..! फक्त आठ दहा दिवसात आरवला सखी ची सवय लागलेली.

" आई ..आई ..आई "
करून तो तिला भांडावून सोडायचा.


    शाळा चालू होण्याच्या दोन दिवस आधी कृष्णाच्या मामाच्या मुली आणि मावस बहिणी आपापल्या घरी निघून गेल्या.  आता घरात फक्त घरचे उरलेले .
कृष्णा , सखी , सोनाबाई आरव आणि सुरज.

शाळा चालू होणार म्हणून कृष्णा सुद्धा तयारीला लागलेला. दुपारी त्याने कपडे इस्त्री केले आणि आरवला आवाज देऊ लागला,

"आरव , आरव कुठे आहेस तू?"

आरव अंगणात खेळत होता आणि कृष्णा त्याच्या खोलीमधून आवाज देत होता . सखी ने बाहेर जाऊन आरवला आवाज दिला,

"आरव,  बाबा बोलतात."

"आई मी खेळतोय ना."

सखी हसली आणि आत मध्ये आली.  कृष्ण पाठमोरा इस्त्री करत होता.  ती दरवाजापाशीच अडखळली . या आठ-दहा दिवसात या खोलीत ती आलीच नव्हती.

लग्न झाल्यापासून ती पहिल्यांदा त्याच्यासोबत बोलणार होती.  इतक्या दिवसात म्हणजे लग्न झाल्यापासून एकमेकांसोबत बोलण्यासाठी काही कारण नव्हतं.  ना उसंत होती. माणसांनी घर गजबजलेलं असलं की काम आपोआप होऊन जातात मग बोलण्यासाठी कारणच उरत नाही.

त्याने पुन्हा आवाज दिला,
" आरव"

आणि ती दरवाजातूनच बोलली,
"तो खेळतोय"

तिचा आवाज ऐकून त्याच शर्ट वर इस्त्री करण्याचं स्पीड आपोआप कमी झालं.
तो शांतपणे..

"त्याला विचारा ,
त्याच्या शाळेचे कपडे कुठे आहेत?"

"त्याला काय माहित ?"
ती तिथूनच आश्चर्याने बोलली.

त्याने एकदा पाठीमागे वळून पाहिल.
"मग कोणाला माहित? "

आणि सखी तिथूनच  अंगणात गेली.  सोनबाई आंब्याच्या झाडाखाली खाटेवर बसलेल्या. सखी ने आवाज दिला,

" आई,  आरव चे शाळेचे कपडे कुठे आहेत?"

"त्याच्या कपाटात असतील."

"बरं "
आणि ती पुन्हा घरात आली . पुन्हा दरवाजातूनच
तिचा कृष्णासाठी निरोप..
"त्याचे कपडे कपाटात असतील."

कृष्णाने हाताच्या पंजाने चेहरा झाकला आणि तोंडात पुटपुटला,

'आता कपाटात कपडे शोधत बसू का? '

त्याने थोडी मान वाकडी करून अंदाज घेतला.  सखी अजूनही दरवाजातच होती.  तो हळू आवाजात खाकरला,

" अहंम्म.. अहंम्म....."


"काय? "

"कपाटातून आरवची कपडे शोधून देता का?"
यावेळी त्याचा शांत आवाज..

"मी आत मध्ये येऊ ?"

गुणी विद्यार्थ्याने विचारावं तसा सखीचा प्रश्न होता आणि सवयीनुसार तो शांतपणे बोलला,

" या"

सखी आत मध्ये आली आणि रूमवर नजर न फिरवता.  ती सरळ कपाटा जवळ गेली.  कपाट उघडलं आणि समोरच नजर साड्यांवर गेली. आजही त्या साड्यांना परफ्युमचा वास तसाच होता. त्या संपूर्ण कपाटात तो एकच गप्पा व्यवस्थित नीटनेटकेपणा  होता.  एका बाजूला साड्या तर दुसऱ्या बाजूला ड्रेस व्यवस्थित घडी घालून एकावर एक रचून ठेवलेले.

बाजूला कृष्णाचे कपडे बऱ्यापैकी नीट होते. खाली आरवचे कपडे कोंबून कोंबून ठेवल्यासारखे होते.
ती खाली बसली आणि एक एक कपडा बाहेर काढताना . तिने सगळेच कपडे बाहेर काढले आणि त्या ढिगार्यातून त्याच्या शाळेचे कपडे शोधून दिले.

"थँक्स"
यावेळी तो..

आणि तिने मूकपणाने फक्त मान हलवली.

"आता ते कपडे ??"
तो टेन्शनमध्ये..

आणि ती पुन्हा तिथेच खाली बसत शांतपणे,
"मी ठेवते "

"थँक्स"
तो पुन्हा मोकळा श्वास घेत
आणि ती गालात असली.  त्याचं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसलं होतं.

कपड्यांची घडी घालताना तिची मधूनच नजर खोलीवरून फिरत होती आणि त्याच्या बेडच्या वर भिंतीवर येऊन थांबत होती. आरव चे कपडे इस्त्री झाल्यावर त्याची आपोआप नजर सखीकडे धावत होती . तिचं चोरून चोरून त्या फोटोकडे पाहणं तिच्या मनात प्रश्न निर्माण झालेत हे सांगत होतं.

तिच्या स्वभाव पाहता ती विचारणार नाही म्हणून तोच बोलला,

"फोटो पाहायचा आहे ?"
आणि तिने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं.

तोंडातून  हो बोलताना ती मानेने नाही बोलली,
"हो"

त्याने भिंतीवरचा फोटो काढला आणि तिच्या शेजारी ठेवून तो पुन्हा बेडवर बसला. अर्ध्या कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या त्या फोटोला पाहताना अर्ध्या कपड्यांच्या घड्या कधी घातल्या आणि कधी कपडे  कपाटात ठेवले हे तिला समजलं नाही.  मघाशी तिरप्या नजरेने फोटो पाहताना तिच्या लक्षात आलं नव्हतं तो दोघांचा फोटो होता.

कृष्णाचा आणि आरतीचा.

का कुणास ठाऊक !
त्या दोघांचा इतका हसताना , आनंदी फोटो पाहून तिला वाईट वाटलं .. खूप वाईट वाटलं.
सखी ने फोटो हातात घेतला. तिला सांगायची गरज नव्हती ही त्याची पहिली बायको आहे .
किती आनंदी होता तो तिच्यासोबत !
दोघेही मोकळेपणाने हसतानाचा फोटो होता.
अगदी डोक्याला डोकं लावून हसत होते. आणि त्याचा आवाज आला,

" आरू.... माझी आरु .... !!"

त्याचे शब्द तर तिच्या मनालाच लागले. तिला वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नव्हती कारण लग्न तर तिने फक्त सुरज साठी केलेल आणि तिने आरवला स्वीकारलेलं ही ..  पण नकळत तिचं मन कृष्णावर जडलेल. कदाचित याचमुळे त्याचे शब्द तिच्या मनाला लागले आणि डोळ्यात पाणी आलं.


टू बी कंटिन्यू.

©® प्रियांका सुभा कस्तुरी
०४/०९/२०२२

जिल्हा -
सातारा, सांगली


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//