Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-११

Read Later
कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-११

कौटुंबिक कथा

शीर्षक - कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग - ११


          शेवटी तो दिवस उगवला ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते.  आज सकाळपासूनच मोहित्यांच्या घरात गडबड चालू होती . कृष्णा चे मामा त्याच्या कुटुंब कबिल्यासह आले होते . मावशी आपला मुलगा आणि दोन मुलींना घेऊन आलेली. त्यामुळे  घराला लग्न घराचं स्वरूप प्राप्त झालेलं.


   मामांनी गडबड करून सर्वांच्या मागे लागून सर्वांना बाहेर काढलं.  त्यामुळे सगळे वेळेच्या आधीच कोर्टात पोहोचलेले.  कृष्णा ला येऊन १५ मिनिट झाले तरी सखी आणि तिच्या घरच्यांचा पत्ता नव्हता.  नाना एकसारखा फोन करत होता.

'हो आलो..  पोहोचलोच ! '
अशीच उत्तर येत होती.

मामीं ची कुरकूर चालू होती.  आरव आईला बघायला उतावीळ झालेला.  तो एकसारखा कृष्णाला प्रश्न विचारून भंडावून सोडत होता.

" कधी येईल आई? अजून किती उशीर?
आई माझ्याशी बोलेल ना ?
आई माझे लाड करेल ना?
आई... आई.. आणि आई....!!"


"मघाशी च सांगितलं ना आरव , आई तुझे लाड करेल !"
कृष्णा आरवच्या प्रश्नांना वैतागलेला.

"मग कधी येईल आई ?"

" येईल आता"

कृष्णाने नानाकडे पाहिलं . तो पुन्हा फोन करत होता. कृष्णा ने आरव ला सोनाबाईंकडे पाठवलं आणि तो नाना जवळ गेला.

"काय झालं ? अजून आले नाहीत?"

"अरे गाडी मध्येच बंद पडलेलीये."

"आपण येऊन २० मिनिट झालेत नाना.
त्यांनी सुद्धा आधीच यायला हवं होतं .
वेळेची किंमत आहे की नाही?"
कृष्णा रागावला.

"अरे बाबा तू आता पुन्हा चालू होऊ नको .
गाडी बंद पडली त्यात त्यांचा काय दोष?"
नाना समजावत..

"म्हणजे तू त्यांची बाजू घेतोय?"

"ती कोणी परकी आहेत का कृष्णा?
आणि तसंही अजून दहा मिनिट वेळ आहे.
जरा थंड घे."

"मला वेळ वाया घालवलेला अजिबात आवडत नाही."

"मग कशाला आधीच येऊन थांबलास ?"
नाना हसत बोलला.

"हसू नकोस मला राग येतो."
कृष्णा डोळे वटारत बोलला.

"माणसाला हसताना पाहून राग येणारा तू पहिलाच प्राणी असशील ."
असं बोलून नाना पुन्हा हसायला लागला.

"नाना त्यांना सांगून ठेव ..
वेळेच्या बाबतीत मला कमी जास्त आवडत नाही."

"त्यांना कुणाला?
सागरला ? त्याचा नि तुझा पुन्हा कधी संबंध येईल?"

"त्यांना म्हणजे सागरला कसं असेल ?"
कृष्णा जरा वैतागून..

आणि नाना आठवल्यासारखं करत हसत बोलला,

"अच्छा ! ...अच्छा !
तुझ्या त्यांना का ?"

"नाना..  !!"
कृष्णा पुन्हा डोळे वटारत...


"ही विनोद करण्याची वेळ आहे का नाना?"

"अरे विनोद करायला वेळच बंधन नसतं ...
कसला रे मास्तर तू !"
नाना पुन्हा हसत..

"तुझं तोंड बंद कर आणि त्यांना फोन कर .
बघ कुठे आलेत ?"

आत मध्ये फक्त नाना , मामा आणि कृष्णा होते. मामा जरा एका बाजूला जाऊन बसलेले.
बाकी महिला मंडळ बाहेरच होतं.  सगळे फोटो काढण्यात बिझी होते . विशेष म्हणजे सोनाबाई सुद्धा त्यांच्यात हिरीरीने सहभाग घेत होत्या.

   त्या सर्वांपासून मामी एका बाजूला बसून होत्या.  कृष्णा एका मुलाच्या आई सोबत लग्न करतोय ही गोष्ट त्यांना रुचली नव्हती.  त्या मनात कुढत असताना समोरून सावळी , अंगापिंडाने मजबूत अशी मुलगी नटून थटून  आली . तिच्या सोबत नटलेल्या करवल्या सुद्धा होत्या.

" ही ?? आणि कृष्णासाठी ??"
तिला पाहून मामीच्या तोंडून एवढेच निघालं आणि त्यांनी नाक मुरडल.

" ही चार पोरांची आई वाटते . काय बघितलं कृष्णाने आणि काय बघितलं वैनसंनी  कुणास ठाऊक? तिच्यापेक्षा जया काय वाईट होती ? पण नाही माझ्या खानदानातली पोरगी नको यांना ."

आणि  त्या बडबडत असतानाच ... नुकतीच गाडीतून उतरलेली सखी त्यांना दिसली . बेताची उंची,  नाजूक काया, गोरी गोमटी देखणी
सखी त्यांना बघताक्षणी आवडली . तिच्याकडे पाहतच त्या पुटपुटल्या,

" अशी पोरगी पाहिजे होती म्हणजे जोडा शोभला असता "
आणि त्यांच्या बाजूने गेलेल्या त्या मघासच्या मुलीकडे पाहून त्या पुन्हा तोंडात पुटपुटल्या,

" नाहीतर ह्यांचा जोडा तोंडात मारण्यासारखा दिसेल."        नानावर रागावून कृष्णा तिथेच बसलेला आणि नाना ते आलेत का नाही हे पाहायला बाहेर आलेला.  नानाला पाहून सागर , गाडी कशी बंद पडली ? मग कशी चालू केली?  इथपर्यंत येईपर्यंत किती त्रास झाला?  हे सगळं सविस्तर सांगत होता.


इकडे आतमध्ये कृष्णा मनात बडबडत होता,
मला वेळ अशी वाया घालवलेला अजिबात आवडत नाही . मी त्यांना स्पष्ट सांगणार आहे.  हे असं वागणं मला रुचणार नाही.  वेळेला काही किंमत आहे की नाही?  स्वतःमुळे दुसऱ्याच्या वेळेची माती !

त्याचं स्वतः शीच चालू असताना त्याला ओळखीचा आवाज आला,

" बाबा .. बाबा...!"
आणि तो बघेपर्यंत पर्यंत सुरज नि येऊन त्याच्या गळ्यात हात टाकले.

"सुरज ऽ "
कृष्णा ने त्याला हसतच उचलून मांडीवर घेतलं आणि समोर पाहिलं...  तर सखी !!!

आणि बघताक्षणी नजर तिच्या वरचं खिळली.
त्याने या आधी दोन वेळा तिला पाहिलेलं.  तेव्हा ती अगदी साध्या साड्यांमध्ये होती आणि साधीच होती पण् आज तिची नाजूक काया दुकानाच्या बाहेर उभ्या केलेल्या देखण्या स्टॅचू सारखी दिसत होती किंवा त्या स्टॅचू पेक्षा ही रेखीवच ...!

  आज काठ पदराची गुलाबी साडी तिच्यावर खुलून दिसत होती . नाजूक चेहर्यावर हलकासा मेकअप,  गुलाबी ओठ, केसात माळलेला गजरा आणि नेहमीसारखी त्याला पाहून झुकलेली तिची नजर .. तो तिच्यावर रागावलेला हेच विसरला आणि ओठात पुटपुटला,

"सुंदर....!"

पण् तिला ऐकायला गेलं नाही.

ती खाली बघूनच बोलली,
"थोडा उशीर झाला.. साॅरी..!"

"तुमची गाडी बंद पडलेली.. त्यात तुमच काय दोष?"
तो तिच्या कडे बघत शांतपणे..

आणि ती खाली बघतच मान हलवत बोलली,
"हो ना ऽ.."

आणि तो गालात हसला.पुढच्या पाच मिनिटात मॅरेज रजिस्टर वर सह्या करून दोघेही कायद्याने पती पत्नी झाले .


"अभिनंदन मिस्टर कृष्णकांत मोहिते आणि अभिनंदन मिसेस सखी कृष्णकांत मोहिते." नोंदणी अधिकार्याने अभिनंदन केल्यावर कृष्णा अनोळखी हसू ओठावर आणत थँक्यू म्हटला आणि सखीच्या तो शब्द कानात घुमत राहिला ,

'मिसेस कृष्णकांत मोहिते. '

जी व्यक्ती आवडते तिची प्रत्येक गोष्ट आवडू लागते. . अगदी त्या व्यक्तीचं नाव सुद्धा !!
ती आज पासून मिसेस कृष्णकांत मोहिते होती.

कृष्णाला वाटलेल नाना काही तरी पांचट बोलून अभिनंदन करेल पण् त्याने घाईघाई करून त्या दोघांना बाहेर काढलं.

कृष्णाच्या मामे बहिणी आणि मावस बहिणी सखीच्या अवतीभवती होत्या . त्या तिच्याशी बोलत होत्या
आणि ती फक्त बावरून हो किंवा नाही इतकंच उत्तर देत होती.

आणि नानाने सरप्राईज दिल.
तो हट्टाने त्यांना शेजारीच असलेल्या मंदिरात घेऊन आला आणि तिथे जळता होम आणि ब्राह्मण पाहून कृष्णाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि सखीला ही कल्पना आली.

कृष्णा आश्चर्याने..
"हे काय आहे नाना?"

"तू जे  पाहतोय ते."
नाना हसत..

"मग ते मंगळसूत्र काय तिथेच घालणार होतास का?"
मागून मामा बोलले.

" म्हणजे मामा तुम्ही सुद्धा?"
कृष्णा पुन्हा आश्चर्याने..

"मीच नाही अक्का सुद्धा."
मामा ही हसत..

"आई ????
मला सांगितलं नाहीस ??"
कृष्णा सोनाबाईंकडे आश्चर्याने पाहत होता.

"आर ते काय बोलतात सरपरायज का काय ते..ते द्याच होत तुला? "

सोनबाई हसत बोलल्या आणि सर्व आपापली पोझिशन घेऊन बसले.

" चला नवरा मुलगा इथे बसा .
नवरी मुलीने इथे बसा ."
ब्राह्मणाने सांगितल्यावर कृष्णा आणि सखी आपापल्या पाटावर बसले आणि सोनाबाई आणि सुलभाताई आनंदाने नजर काढू लागल्या,

"आत्ता जरा लगीन वाटलं..
न्हाय तर सह्या करून लगीन आमच्या बाप जन्मात कुणी केल नव्हत.. त्याला ना साज ना शोभा ."
सोनाबाई कोर्टाच्या लग्नाला ना पसंती दर्शवत बोलल्या.

"पण बरं झालं तुम्ही हा छोट्याशा कार्यक्रमाच नियोजन केलं. मुलांच्या आठवणी राहतील आणि आपल्यालाही त्यांना आशीर्वाद देता येईल."
सुलभाताई आपल्या लेकीला डोळे भरून पाहत बोलल्या.

"त्येच ना.. कसली ग्वाड दिसत्यात दोघपण !"
सोनाबाई कृष्णा आणि सखी ची लांबूनच नजर काढत बोलल्या आणि त्यांनी बोट कनपटिवर कडाकडा मोडली.


सुरज सुलभाताईंच्या मांडीवर तर आरव सोनाबाईंच्या मांडीवर बसून आपल्या आई-बाबांना बघत होते. ब्राह्मण मंत्र पुटपुटत होता आणि कृष्णाच्या आरती सोबत च्या सुखकर आठवणी जाग्या होत होत्या. तो खूप अस्वस्थ होता.

सखीच सुद्धा असंच काहीसं झालेलं . तिला त्या आठवणी नको होत्या आणि पुन्हा सगळं तेच होत होतं पण हे नव्याने होतं. यावेळी जोडीदार दुसरा होता.
जेव्हा ब्राह्मणाने सखीला मंगळसूत्र घालायला सांगितल . तेव्हा कृष्णा मंगळसूत्र हातात घेऊन मंगळसूत्रालाच पाहत होता. तो आरती पासून खूप खूप लांब जातोय असं त्याला वाटत होतं. आणि त्याची बेचैनी अजून वाढली.

सखी खाली मान करून तयारीत होती. कोणत्याही क्षणी गळ्यात मंगळसूत्र पडेल . मघाशी सही करताना तिला इतकं काही वाटलं नव्हतं . तसंही आता कायद्याने ती त्याची पत्नी होती पण हा क्षण तिच्या अंतर्मनावर कोरणारा होता.  तिचं अंतर्मन स्वीकारणार होतं,  की हो !
तू आता फक्त कृष्णाची आहेस....!
मिसेस कृष्णकांत मोहिते...!

ती डोळे मिटून त्या क्षणाची वाट बघत होती आणि गळ्यात मंगळसूत्र घातल्याच तिला जाणवलं आणि तिला भरून आलं. तिच्या कानात एकच शब्द घुमत होता.

'अभिनंदन मिसेस कृष्णकांत मोहिते...! '


नानाने खुणवल्यावर कृष्णाने मनाचा हिय्या करून मंगळसूत्र सखी च्या गळ्यात घातलं आणि त्याची नजर सखी वर गेली . तिच्या बंद डोळ्यांच्या कडा त्याला ओल्या झाल्या सारखा वाटल्या.

'नवीन नातं स्वीकारताना यांना सुद्धा त्रास होतोय का? \'
कृष्णाच्या मनात प्रश्न निर्माण झाला.


आणि पुन्हा ब्राह्मणाचे मंत्र चालू झाले. नाना त्या दोघांच्या आठवणी मोबाईलच्या कॅमेरात कैद करत होता. त्याला हे ठाऊक होतं एक दिवस याच आठवणी दोघे एकांतात आठवत बसतील.

टू बी कंटिन्यू...

©® प्रियांका सुभा "कस्तुरी"
०१/०९/२०२२

जिल्हा -
सातारा, सांगली
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//