Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी (नविन नात्याचा प्रारंभ) भाग-३

Read Later
कृष्ण सखी (नविन नात्याचा प्रारंभ) भाग-३
विषय - कौटुंबिक कथा

शीर्षक - कृष्ण सखी भाग -३

पांढरा शुभ्र इन केलेला शर्ट.. ब्लॅक पॅन्ट वर उठून दिसत होता.  निमगोऱ्या रंगावर तो शर्ट तसा खुलूनच दिसत होता. अर्ध्या कपाळावर आलेले केस..  चेहऱ्यावर हलकीशी दाढी मिशी  ,त्या गोल चेहर्यावर शोभून दिसतं होती.
त्यानेही गोंधळून समोर पाहिलं आणि तो बोलायचं विसरला.

तिची नजर त्याच्या आरपार गेली. किती ते निरागस डोळे.. त्याला कळलंही  नाही तो चौकटीतून तिच्यापर्यंत कधी आला.

'सुरज चे डोळे असे का ? '
या प्रश्नाचे उत्तर तिच्या डोळ्यांनी दिल. तिला बघून त्यालाही आश्चर्य वाटलं .. ही खरंच चार वर्षाच्या मुलाची आई आहे?

दोघांनाही याची जाणीव झाली की आपण एकटक पाहतोय !  लगेच पुढच्या क्षणाला दोघांनीही नजरा  चोरल्या ती लगेच उठून उभी राहिली. त्यावर तो लगेच बोलला,

" तुम्ही बसा ना !"

"नाही तुम्ही बसा !"
ती अडखळत बोलली.

"नाही खरंच सांगतोय.. बसा तुम्ही !"

"असं कसं ?
तुम्ही उभे असताना मी कशी बसू?"
ती हळू आवाजात कशी बशी बोलली.

त्याने खोलीत नजर फिरवली बसण्यासारखं काय आहे ? का तू शोधू लागला.  एका कोपऱ्यात एक छोटा प्लास्टिकचा स्टूल होता.  त्याने तो आणला आणि त्याच्यावर बसत बोलला,
" आता तुम्ही बसा."

ती खाटेच्या एका कोपऱ्यात बसली.

'कोण आहेत हे? '
तिच्या मनाने लगेच प्रश्न विचारला.

तिच्याशी काय बोलावं ?
जे बोलायचं होतं.. ते आता त्याला विसरायला झालेलं. दोघेही शांत होते पण विशेष म्हणजे दोघांनाही आपापल्या बाजू क्लियर करायच्या होत्या,  मनातल्या काही गोष्टी सुस्पष्टपणे बोलायच्या होत्या.


ती खाली बघत पदराच्या टोकाने बोटाशी खेळत होती. तिचं तिचं मनात चाललेलं,

\"इथे आलेत म्हणजे हेच तर मला पाहायला आले नसतील ?  मी विचारू का ?  पण शी बाबा असं कसं विचारणार? ते सुद्धा काही बोलत नाहीत .\"

आणि ....

"नमस्कार मी श्रीकृष्ण मोहिते !"
आवाज आला.

आणि ती खाली बघतच हुंकारली ,
"हम्म ऽ"

त्याला तिच्याकडून तिच्या ओळखीची अपेक्षा होती पण तिचं बोटाने पदराच्या टोकाशी खेळणं चालूच होतं.  ती कसल्यातरी तरी विचारात हरवली आहे तिच्या चेहऱ्यावरून हे कळलं.

त्यामुळे तो हुंकारला आणि पुन्हा बोलला,
"नमस्कार मी श्रीकृष्ण मोहिते "


\"अरे बापरे म्हणजे मी माझं नाव सांगायचं का ? \"
ती मनातच बोलली.

"मी सखी..! "
अगदी हळू आवाजात उत्तर आलं.

पुन्हा दोघांमध्ये शांतता... अवघडलेपणाची !
अनोळखीपणाची ! शेवटी तोच बोलला,

मला तुमच्या सोबत काही गोष्टी आधीच स्पष्ट बोलायच्या आहेत.

"मला सुद्धा..!"
ती खाली बघूनच बोलली.

मला स्पष्ट बोललेलं आवडतं आणि मी ही स्पष्टच बोलतो .
त्याच्या या बोलण्यावर ती पुन्हा खाली बघूनच हुंकारली,

"हम्म ऽ"

"माझ्या मुलाला तुम्हाला तुमच्या मुलासारख स्विकारायला जमेल? "

तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं आणि गालात हसली त्याला तिच्या हसण्याचा अर्थ लागला नाही ती पुन्हा तिच्या  आणि सुरज चा फोटो कडे बघत शांतपणे बोलले,

"आई बाप म्हटलं की पहिल्यांदा आपण मुलाचा विचार करतो मी सुद्धा सुरज साठीच या लग्नाला तयार झालीये . त्यामुळे मला कल्पना आहे तुम्हाला काय वाटत असेल. पण मी माझ्या आणि तुमच्या मुलामध्ये कधीच फरक करणार नाही.. त्याला कधीच परक  लेखणार नाही. "

"मी सुद्धा त्याच्यासाठीच या लग्नाला तयार झालोय. त्याला आईची गरज आहे. तू खूप मिस करतो त्याच्या आईला."

ती पुन्हा खाली बघतच हुंकारली,
"हम्म ऽ "

आणि तिने हळु आवाजात विचारलं,
"माझा सुरज सुद्धा त्याच्या बाबाला खूप मिस करतो."

"ते आलं माझ्या लक्षात ..आत्ताच बाहेर भेटला."

तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं ,
"खरंच ??"

"हो ,
मला आवडला तो."

"नाही म्हणजे तो अनोळखी लोकांकडे सहसा जात नाही ..म्हणून विचारलं."

"ते काय मला माहित नाही, पण तो माझ्या जवळ आला आणि खूप छान गप्पा मारल्या त्याने."

पुन्हा दोघेही शांत...
" तुमची काही अपेक्षा माझ्याकडून?"

त्याने तिच्या नजर झुकलेल्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं,

आणि तिने पटकन त्याच्याकडे पाहिलं.
दोघांची नजरा नजर झाली तिच्या आर पार नजरेत तो पुन्हा हरवला.

" कशाबद्दल बोलत आहात तुम्ही?"
तिने हळू आवाजात विचारलं.

" हं? म्हणजे मी ते .....!"
तो थोडं गोंधळला नंतर डोळे बंद करून स्वतःला सावरत बोलला,

"हे लग्न मी फक्त माझ्या मुलासाठी करतोय कारण त्याला आईची गरज आहे. नाना माझा मित्र त्याचा खूप विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही माझ्या आरवला आईची कमी भासू देणार नाही आणि म्हणूनच मी या लग्नाला तयार झालोय."

"त्यांच्यामुळेच मी सुद्धा...!"
सखी एवढेच बोलली.

"हम्म ऽ"
यावेळी तो हुंकारला.

थोडक्यात दोघांनाही समजलेलं की , ते दोघेही आपापल्या मुलांसाठी लग्नाला तयार झालेत .
आई बाप म्हणून आपापल्या मुलांसाठी त्यांनी जोडीदार म्हणून एकमेकांना पसंत केलेल पण कुठेतरी स्वतःचा जोडीदार म्हणून ते मनाच्या कोपऱ्यात एकमेकांना पाहत होते कदाचित ; हे कळायचं बाकी होतं.

"येतो "
एवढं बोलून कृष्णा बाहेर गेला.

आणि तिने मोकळा श्वास घेतला. तो गेल्यावर ती भिंतीला टेकून गुडघ्याभोवती हातांचा फेरा टाकून बसली मघासच टेन्शन आता राहिला नव्हतं .तिला नवरा मुलगा तिला पसंत होता. त्याचं बोलणं, त्याचे विचार, तिला सगळं आवडलं होतं.  खरं तर पहिलं लग्न ठरलं त्यावेळी तिला तितकासा आनंद झाला नव्हता कारण ती घरच्यांसाठी हो बोललेली. पण यावेळी निर्णय तिचा तिला घ्यायचा होता आणि तिने घेतलेला . सुरज चा बाबा म्हणून तिने कृष्णाला पसंत केलेल.

त्याचं स्पष्ट आणि नजरेला नजर देऊन बोलणं तिला सारखा आठवत होतं आणि अचानक तिने पुन्हा चौकटीत पाहिलं . कारण तिला चौकटीत धडपडल्यासारखा भास झाला पण् तिथे तरं कोणीच नाही, हे पाहून ती स्वतःशीच गालात हसली.

"वेडी "
स्वतःशीच बडबडली.
आणि बाहेरून सुरजचा रडण्याचा आवाज येऊ लागला तशी ती तिच्या विचारातून बाहेर येतं आवाजाच्या दिशेने धावली . पाहते तर कृष्णाने सुरज ला उचलून घेतलेलं आणि तो रडत होता.

तिला काहीच कळेना,
\"सुरज का रडतोय?\" सगळे हसत होते.

"काय झालं , सुरज का रडतोय ?"
तिने आपल्या आईला विचारलं.


"तूच बघ."
सुलभाताई हसत बोलल्या.

सुरज सखी कडे पाहून रडत बोलला,
"आई , मी पण ज्यातो ना बाबा शोबत."

सखी गोंधळली. तिला काय बोलावं काहीच कळेना. कृष्णा ने सखी कडे पाहिलं. तिचा चेहरा गोंधळलेला दिसला खरंतर तिथून निघताना, एकदा तिला पहावं असं कुठेतरी कृष्णाच्या मनात होतच . ते सुरज मुळे शक्य झाल. कृष्णा सूरजला समजावत बोलला,

"शहाणी मुलं रडतात का कुठे?
तू आता आई जवळ जा..
मी तुला खाऊ घेऊन येतो."

"नो नो ... मला काऊ नको ."
सुरज तसाच हातांचा वेणा कृष्णाच्या मानेला टाकून रडत होता.

"तुझा बाबा तुला पुन्हा भेटायला येईल ..
आता जाऊ दे त्याला ."
नाना हसत बोलला त्याच्या या बोलण्यावर कृष्णाने चमकून नानाकडे पाहिलं.

"अरे गंमत करतोय ..तसं तुला यायचं असेल तर मला सांग."
नाना गालाच्या कोपऱ्यात हसत बोलला.

\"सगळ्यांसमोर कसली याला गंमत सुचते ?\",
कृष्णा मनातच नानावर रागावला.

सुलभाताई पुढे झाल्या आणि सुरजला घेऊ लागल्या पण सुरज जास्तच रडायला लागला. त्याला कृष्ण सोबत जायचं होतं , तो हट्टलाच पेटलेला जणू !
आजपर्यंत त्याने शंभर वेळा बाबा बाबा केलं असेल, आज बाबा म्हणणारी व्यक्ती त्याला सापडलेली त्यामुळे सुरज ला त्याला जाऊ द्यायचं नव्हतं.

नानाने मोबाईल काढला आणि सुरजला घेऊ लागला तरी सुद्धा सूरजने नानाकडे पाहिलं नाही .तो कृष्णा च्या मानेत तोंड खुपसून तसाच रडत होता आणि सारखं तेच बडबडत होता,

"मी पण एतो ...मी पण एतो."

आरव इथे आल्यापासून झोपलेला .तो अजूनही झोपलेलाच होता. सोनाबाईंनी त्याला खांद्यावर घेतलेलं. त्या सुद्धा हसत बोलल्या,

"आर लेका , तू येतोस का आमच्यासोबत? येणार आसलास तरं चल.
पण तुझी आय न्हाय येणार.!"

सुरज ने लगेच रडतच सोनाबाईंकडे पाहिलं आणि तसाच डोळ्यांवरचा हात खाली गालांवर आणत डोळे पुसत त्याने सखी कडे पाहिलं ,

"आई , तू पण चल ..त्याच पुन्हा चालू झाल."

सखी पुन्हा गोंधळली. त्याच्या प्रश्नांना सर्वांसमोर काय उत्तर द्यावीत ? हेच तिला कळेना.
तिने हात केला आणि सुरज ला घेत त्याला समजावत बोलली,

"शहाणं बाळ असं रडतं का ?
आईकडे ये पाहू !
तुला मी नंतर गंमत सांगते."

सुरजचा रडण्याचा वेग थोडा कमी झाला आणि सखी ने सुरज ला घेतला . सुरजला देताना कृष्णाला तिचा ओझरता स्पर्श झाला आणि एक वेगळीच त्याच्या भावना मनाला स्पर्शून गेली.

सखी ला सुद्धा त्याचा हलकासा स्पर्श झाल्यावर तिच्या अंगावर हलकासा शहारा आला . ती पटकन घरात गेली.

एकाच भेटीत एखाद्या व्यक्तीबद्दल इतकी ओढ वाटण कमाल होतं ! कृष्णाला स्वतःवर विश्वास बसत नव्हता . थोड्या वेळापूर्वी तो लग्नाला नाही म्हणत होता आणि आता राहून राहून नजर सखी कडे वळत होती. ती घरात गेल्यावर सुद्धा चौकटीवर नजर खेळत होती. नानाला त्याच्या मनाची अवस्था कळत होती. सखी त्याला आवडली आहे, हे न सांगताच नानाने ओळखलेल.

सखी होतीच अशी !
फक्त दिसायलाच सुंदर नाही, मनानेही सुंदर ,
लाघवी मुलगी , पण तिच्याच नशिबी दुःखाचा डोंगर कोसळलेला . ऐन तारुण्यात वैधव्य आलं . एका लहान मुलाची जबाबदारी अंगावर येऊन पडली. खूप मुश्किलीने नानाने , सागर ने आणि सुलभाताईंनी तिला दुसऱ्या लग्नासाठी तयार केलेलं. सुरज ला बापाची गरज आहे हे तिला पटवून दिलेलं.
नानाने सारखं बाबा बद्दल बोलून सुरजच्या मनात बाबाची इमेज तयार केलेली. त्याने एक दोन वेळा कोणीही नसताना सुरज ला कृष्णाचा फोटोही दाखवलेला आणि हाच तुझा बाबा असही सांगितलेलं, त्यामुळे कृष्णाला समोर बघून सुरजने बाबा म्हणून लगेच त्याला स्विकारलं.


कृष्णाची आतल्या दरवाजावर खिळलेली नजर पाहून नाना त्याचा खांदा थोपटत हसत बोलला,

"निघायचं का राहायचं?"

तसं पुन्हा कृष्णाने चमकून नानाकडे पाहिलं.
\"तुला घरी पाहतो \" ,
या अविर्भावात कृष्णा नानाकडे पाहत होता.

टू बी कंटिन्यू..

© प्रियांका (सुभा) "कस्तुरी"
१७/०८/२०२२


जिल्हा - सातारा,सांगली.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//