कृष्णसख्याची जडली बाधा भाग 10

अवी रंजनाला कबुली देणार.

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 10

मागील भागात आपण पाहिले की अविनाश रंजनाला कोणत्या कारणाने नकार देत होता. ते कारण रंजनाला कसे समजेल? त्यानंतर ती अवीला कसे तयार करेल?


वरदचे प्रश्न ऐकून रंजना त्याला म्हणाली,"समजा,तुला एक फुल आवडले आणि नंतर त्याची एक पाकळी वाकडी असल्याचे समजले तर तू फुल फेकून देशील का? मला अवी आवडला होता तो माझा सखा म्हणून. नर असणारे अनेकजण आजूबाजूला वावरत होतेच की."

"मॉम पण तुला हे सगळे समजले कसे?"
"तुझा बाप खूप शांत आहे आणि तितकाच भावनाशील अन हट्टी. त्याचा नकार आहे हे समजताच मला प्रचंड वाईट वाटले. मी सुवर्णाला ते सांगितले.

त्यावर ती म्हणाली,"पुरुष मेले सारखेच,त्यांना बाई फक्त मॉडर्न हवी,सुंदर हवी. त्याच्या मैत्रिणी बघ. तुला मी आधीच सांगितले होते."

मला मात्र हे पटत नव्हते. परंतु दरम्यान एक गोष्ट झाली. अविनाश अंजूच्या जास्त जवळ जाऊ लागला. तिच्याकडे लक्ष देऊ लागला. त्यामुळे मला प्रचंड त्रास होत असे.

एक दिवस अंजू जाताना दिसली आणि माझा तोल गेला,"सौंदर्याने भुलवलेला पुरुष भुंगा असतो. मध संपले की जाईल उडून."

मी रागात बोलून गेले. नेमके ते मागून आलेल्या अवीने ऐकले.

"मुळात भुंगा भुलायला फुल सुंदर असायला हवे." ताडकन बोलून तो अंजुला घेऊन निघून गेला.

मी प्रचंड चिडले होते. हॉस्टेलवर आल्यावर मी खूप रडले.


मग मी ठरवले अवीला आपल्या आयुष्यातून,आठवणीतून पुसून टाकायच. त्याच्या घरी जायचे आधी बंद केले. तरीही कुमुद मला भेटायला येत असे. पण मी मात्र अगदी तुटक वागे तिच्याशी.

तिने लाख वेळा विचारले तरी मी अजिबात सांगितले नाही. अवी आता शेवटच्या वर्षाला होता. सिनिअर सेंड ऑफ पार्टी ठेवली होती. मला जायची अजिबात इच्छा नव्हती तरीही सुवर्णा मला आग्रह करून घेऊन गेली. भरपूर नाच गाणे,गप्पागोष्टी चालल्या होत्या. सगळेजण आनंदी होते.

अवी मित्र मैत्रिणींच्या गराड्यात होता. रात्री पार्टी संपवून आम्ही जायला निघालो. हॉस्टेल जवळच असल्याने पायी जायला लागलो. अचानक ध्यानी मनी नसताना पाऊस सुरू झाला.

तेवढ्यात अवी आणि पराग मागून गाड्या घेऊन आले. परागने गाडी थांबवली आणि सुवर्णा त्याच्या गाडीवर बसली. मी मात्र पावसात भिजत तशीच उभी होते.


पराग सुवर्णाला घेऊन पुढे गेला. अवी हॉर्न वाजवत असूनही मी उभीच होते.

"भिजून मरायची मला हौस नाही." अवी ओरडला.

"जा ना तुझ्या सुंदर फुलांना घेऊन इथे कशाला आलास?"

प्रयत्न करूनही अश्रू थांबत नव्हते.अवी गाडीवरून उतरून माझ्या दिशेने चालत येऊ लागला. पावसात नखशिखांत भिजल्याने त्याचे सौष्ठव दुरूनही दिसत होते. त्याचे ओले केस,अंगाला चिकटलेला पांढरा शर्ट आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारा अस्वस्थ भाव.


अवी माझ्या जवळ आला.माझ्या डोळ्यांत पाहिले त्याचा श्वास मला जाणवत होता. मी कितीही ठरवले तरी हृदय मेंदूचे ऐकत नव्हते.

इतक्यात तो म्हणाला,"काही भुंगे अपूर्ण असतात. ते कोणत्याही फुलाला फुलवू शकत नाहीत."

इतके बोलून अवी झरकन मागे वळला. मी क्षणात त्याचा हात धरला त्याला वेगाने मागे खेचले. माझा एक हात त्याच्या खांद्यावर,डोळे त्याच्या डोळ्यात मिसळलेले.

" भुंगा अपूर्ण आहे की पूर्ण हे फुलाने ठरवायचे." एवढे बोलून माझे ओठ अवीच्या ओठात मिसळले आणि आमचे उष्ण श्वास एकत्र झाले.

तेवढ्यात अवी वेगाने बाजूला झाला.

अवी,आज तू काहीही न सांगता गेलास तर माझा कृष्णसखा केवळ एक पुरुष होता,एक नर ज्याला मादीची गरज पुरी करायची आहे.

त्याच क्षणी अवी थांबला आणि आवेगात मला मिठीत घेतले.

गेले कित्येक महिने मी अस्वस्थ आहे. अवी मला सगळे सांगत होता आणि आमच्या ह्या कबुलीला पाऊस साक्षी होता.

अवीने मला हॉस्टेलवर सोडले आणि जाताना म्हणाला,"तुझा निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य तुला आहे. अपूर्णता पुढे जाऊन झेपेल का? याचा विचार कर."

अवी निघून गेला आणि माझ्या मनातील निर्धार अधिकाधिक पक्का होत होता.


रंजना अविचा स्वीकार करेल का? मातृत्व मिळायची शक्यता नसलेले नाते ती स्वीकारेल का? कृष्णसख्याला त्याची सखी मिळेल की सोडून जाईल?


वाचत रहा.
कृष्णसख्याची जडली बाधा.
©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all