कृष्णा तू असतोस पाठीशी

She meets krishna in difficult times.

विषय- आणि कृष्ण  भेटला!

स्पर्धा -  गोष्ट छोटी डोंगराएवढी .

शीर्षक -  कृष्णा तू असतोस पाठीशी ! 

लेखिका - स्वाती  बालूरकर, सखी



गौरी ऑफिसातून दमून घरी आली. मुलाने ग्लासभर पाणी दिलं प्यायला अन आशेने तिच्याकडे पहायला लागला. तिच्या लक्षात आलं. पर्समधून चिप्सचं पाकीट काढलं व हातात दिलं.
‌"आई हे नाही ? ते. . माझं. . ?"
‌"हॉल तिकीट ना? ठीक आहे ना ,राजा आज काही जमलं नाही. उद्या. . . उद्या बघते !"
‌"आई प्लीज! शेवटचे चार दिवस राहिलेत. मला त्याच्या मूळं अभ्यासात मन लागत नाही . तू जर ते आणु शकली नाहीस तर मी अभ्यास करून तरी काय उपयोग? असं सारखं वाटत राहणार!"
"काळजी करू नको बाळा असं होणार नाही. तुझं वर्ष मी वाया जाऊ देणार नाही काहीतरी करीन थांब दोन- तीन दिवस, नक्की "
आणि तिला सगळं कळत होतं पण हातात पैसे नव्हते.
शाळेतून काल फोन येऊन गेला,
हॉल तिकीट घेऊन जा असा!
मुलाचं दहावीचं वर्ष, हातामध्ये ४०० रुपये उरलेले. महिना संपायला अजून तीन दिवस बाकी.
सगळे मार्ग जणू बंद झाले होते.
दुसर्‍या दिवशी ती ठरवूनच निघाली, काहीही करायचं, कोणासही मागायचे पैसे . . .पण मुलासाठी हॉलतिकीट आणायचं.
नवरा काल रात्री खूप नशेत घरी आला होता. त्याला सांगावं का नको असं वाटलं. तिने हळूच सांगून पाहिलं पण त्याला कळलंही नाही .
पैशांचा अंदाज सांगितला, हवेत म्हणाली तसा हॉलतिकीट आणण्यास नको म्हणालाच अन् मग म्हणाला "तुझा मुलगा नाहीये का तो? असं का वाटतं की सगळं मीच करावं? तू पण कमावतेसचा ना !काय झालं स्त्री समानतेचा नारा संपला का?"
हे त्यालाही व्यवस्थित माहीत होतं की तिच्याकडे पैसे नाहीयेत, तिला त्याने बर्‍याच कमिटमेंट मधे असं गुंतवलं होतं की ती स्वतःसाठीही काहिच खर्च करू शकत नव्हती.
पण त्याच्याकडून आहे, हे असं आहे ,तो कबूल करणारा नव्हताच.
त्यामुळं त्यावेळी मुलाचं दहावी गेलं तरीही चालेल पण तो त्या क्षणी काहीच करू इच्छित नव्हता.
ती काय करते हे त्याला पाहायचे होते आणि पुढे त्या गोष्टींचाही फायदा त्याला घ्यायचा होता. त्याचा स्वभाव असाच बनलेला होता यादरम्यान . अप्पल पोटी आणि ऐतखाऊ!
दुसऱ्या दिवशी तिने ऑफिसमध्ये फोन केला की मी एक तासभर उशिरा येते आणि उल्हासच्या शाळेमध्ये गेली.
त्याची शेवटची फी बाकी असल्यामुळे क्लार्कने हॉलतिकीट देण्याचे मनाई केली.
प्रिन्सिपलना भेटा व परमिशन मागा असं सांगितलं.
प्रिन्सिपल मिटींगमध्ये बिझि होती. ती जास्त वेळ बाहेर थांबू शकली नाही मग तिने पियुन करवी आत निरोप पाठवला.
त्यांनी फी भरा आणि हॉलतिकीट घेऊन जा, आमची काही हरकत नाही असा निरोप दिला.
तिने पुन्हा एकदा चौकशी केली , शाळेची तर सहा हजार रुपये फी बाकी होती.
\"सहा हजार रूपये\" तिच्यासाठी त्यावेळी खूप मोठी गोष्ट होती. कारण तिची पगारच त्यावेळी ७ हजार होती. कुणाकडूनही उधार घेतले तर कधी परत देणार याचे उत्तर तिच्याकडे नव्हतं आणि तिची एक महिन्याची पगार दिली तरीही ती पुढचा महिना घर कशी चालविणार होती.
नवऱ्याने तर गेल्या वर्षभरात हात उचलले होते, जणू फक्त लॉजवर तो झोपण्यासाठी आल्यासारखा घरी यायचा.
मुलाच्या अभ्यासाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता पण तिलाही तो हिशेबात पकडत नव्हता.
तशी काहितरी नोकरी करत होता पण बदलतही रहायचा. पगार मिळायची परंतु व्यसनाधीन झाला होता त्यामुळे घरी पोहचतच नव्हती.
कधीतरी एखाद्या दिवशी तो थोडासा नॉर्मल बोलत असे पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा वेगळा सूर लागायचा.
तिचे सासरे त्यांच्या मुलीकडे राहात असत. न राहवून त्यादिवशी तिने शेवटी त्यांना फोन केला आणि सांगितलं.
आजोबा नातूचा विचार करत होते पण त्यांना तिचाच खूप राग आला.
" तुझ्या नवऱ्याकडून का घेत नाहीस?
इतका हळवेपणा काय? त्याला खडसावून सांग, पैसे आणून दे म्हणावं!"
निराश होऊन ती ऑफिसात आली.
यंत्रवत काम करत होती. अचानक सासऱ्याचा फोन आला. "गौरी, तुझ्या ऑफिसजवळ माझा एक जुना मित्र राहतो त्याला फोन केलाय. तो तुला सहा हजार रुपये आणून देईल. मी त्याला दोन-तीन महिन्यात परत करेन माझ्या पेन्शनमधून . पण ते पैसे घेऊन घरी जाऊ नकोस शाळेत जा आणि हॉलतिकिट आण. कारण पैशाला पाय फुटायला वेळ लागत नाही. आणि हो कैलासला सा्गू नकोस मी दिलेत म्हणून."
ती फक्त हो म्हणाली. आबांचं हे फणसा सारखं रूप तिला आधार देवून गेलं. तिने वर पाहिलं व नेहमीप्रमाणे म्हणाली,"कृष्णा तू आहेस रे! आहेस ना पाठिशी!"
घरातले कितीतरी खर्च त्या वेळी डोक्यात असूनसुद्धा लंच टाईममध्ये ती पटकन शाळेतल्या क्लर्क कडे गेली आणि घाई घाईने काउंटर वर सर्व पैसे भरले.
मग वाट पहात थांबली. काळे मॅडम ने सही घेतली व म्हणाली मॅडम " आता तरी मी तुम्हाला हॉल तिकीट देऊ शकत नाही ."
"का काय झालं ?"
"मागच्या वर्षी उल्हास शाळेकडून ट्रिपला गेला होता. त्यावेळी तुम्ही अर्धेच पैसे भरले होते व बाकीचे पुन्हा देते म्हणून अर्ज केला होता. प्रिंसिपल मॅडम ने दोन वेळा तुम्हाला सूट दिली होती. या वर्षभरात आम्ही विचारलंच नाही पण आता?"
झटक्यात तिला आठवलं की तिची ऐपत नसतानाही तिनं मुलाला ट्रिपला पाठवलं होतं. या आनंदाला मुलाने मुकु नये म्हणून. ट्रिपचे अर्धे पैसे ती भरू शकली होती, त्यावेळी त्यानेही थोडे दिले होते, खर्चायला वगैरे आणि बाकीचे प्रत्येकवेळी ती पुन्हा भरते असं म्हणून फक्त फीस भरून परत येत होती.


आता शाळेला शेवटची संधी होती पालकांकडून पूर्ण पैसे घेतल्याशिवाय त्यांचा हॉल तिकीट द्यायचं नाही.
" ते किती?"
" मॅडम ते साडे चार हजार बाकी आहेत."
आता मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली.
किती मुश्किलीने तिने शेवटचा सर्वोत्तम मार्ग वापरला होता आणि सासऱ्यांकडून पैसे घेतले होते.
हॉल तिकीट मिळणार नाही आणि मुलाचे दहावी होणार नाही या चिंतेने तिचं मन तिला पोखरू लागलं.
"काल का नाही सांगितलं मॅडम ?"
"मी आता दोन महिन्यांपूर्वीच जॉइन झाले. मला ही जुनी बाकी माहित नव्हती. काल वरच्या अकाउंट डिपार्टमेंट कडून सगळ्या मुलांचा हिशोब आला त्यात हे होतं."
ती निराशेने परतली.
त्या रात्री नेहमीप्रमाणे तो नशेत होता. साडे दहाच्या आसपास घरी आला.
खूप उद्विग्न मनस्थितीत होता. ऑफिसचं रडगाणं संपतच नव्हतं .
म्हणून मनात असेल नसेल ते सगळं साठवून त्यावेळी त्याला ती बोलली .
त्याने शेवटी विचारलं "काय झालं? प्रॉब्लेम काय आहे? तुझं काय चाललंय?तुझे म्हणणे काय आहे? तुझा पण आधार नाही का आता मला ?"

तिने कपाळावर हात मारून घेतला त्यांच्यापर्यंत काहीही पोहोचलच नव्हतं.
मुलगा घराच्या एका कोपरामध्ये भेदरलेल्या अवस्थेत पुस्तके समोर ठेवून बसला होता.
त्याला आईची अवस्था कळत होती पण?
दुसऱ्या दिवशी सकाळी तो म्हणाला
"आई असू दे . मला नाही द्यायची परीक्षा! इतका त्रास करून तू तरी कसे व कुठून आणणार पैसे? असू दे!"
" नाही बाळा! तू तुझी हिंमत हारू नकोस. आपल्या घरातल्या किरकिर तुला सहन होत नसेल तेव्हा बाजूच्या महेशकडे जाऊन तू अभ्यास कर . माझ्यासोबत माझा कृष्ण असतो रे नेहमी कुठल्या ना कुठल्या रूपात! होईल काहीतरी विश्वास ठेव!"
"हो का आई मी अभ्यास करतो , तुझे कष्ट वाया नाही जाऊ देणार!महेश आणि मी सोबत अभ्यास करेन अन बाबा झोपल्यावर घरी येईन !" तो म्हणाला .
तिने कौतुकाने डोक्यावरून हात फिरवला.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेली खरी पण त्या साडे चार हजारांसाठी सारखं डोकं काम करत नव्हतं .
तिला काळजी व त्याला काहिच नाही.
आता या क्षणी किती बोल ले तरी उपयोग नव्हताच. ही वेळ निभावणं गरजेचं होतं.
उद्या शेवटचा दिवस!
ऑफिस मधला कृष्णाचा फोटो पाहून ती मनात म्हणाली \"तूच सखा, तूच बंधू, तूच माझी आई बाप आहेस, तू एकटाच माझं रक्षण करत आलास पण ही एवढी कठोर परीक्षा का पाहत आहेस? सांभाळ आता तूच हा संसार , मला सगळं असह्य होत आहे .\"
डोळे अश्रूंनी काठापर्यंत भरले होते.
फोनवर नवर्‍याचा मेसेज होता. \"मी जगातला सर्वात दुर्दैवी बाप आहे, या क्षणी कळत असूनही तुझी मदत करू शकत नाही! तूच बघ काय करतेस ते! सॉरी!\"
कृष्णावर सगळा भार टाकून ती बाहेर आली.
स्टाफ मीटिंग चालली होती. त्यातलं काही ही तिला कळत नव्हतं . आता फक्त तिचं शरीर बसले होते.
मीटिंग संपली व मिनटस चे रिकामे रजिस्टर घेवून ती बॉस च्या केबिन मधे जाण्यासाठी समोर येवून उभी राहिली. मनात तेच विचार- तिसरा दिवस आणि हॉलतिकीट घेण्याचा लास्ट दिवस!
शाळेतून फोन आला .
\"काय मॅडम तुमच्या मुलाच्या चांगल्या भविष्याचा पण विचार नाहीय का?"
" अहो पण माझ्या मुलाचं भविष्य तुमच्या शाळेत आहे, तो खूप हुशार मुलगा आहे. त्याची परीक्षा होईस्तोपर्यंत कसेही करून मी भरते तुम्हीच असा विश्वास नाही ठेवला तर कसं चालेल?"
क्लार्क म्हणाला," मॅडम आम्ही असहाय आहोत. आमची नोकरी आहे ही!"
त्या वेळेला मात्र ती मनातून पूर्ण कोलमडली .काही कळलं नाही.
ती टेबलजवळ गेली व सरळ आपली पर्स घेतली सरांच्या केबिनमध्ये जाऊन बसली. तिथे चर्चेसाठी काही जण उभे होते. बॉसने नजरेने त्यांना बाहेर जाण्यास खुणावले.
" मुलगा दहावीला आहे व हॉल तिकीट घेण्यासाठी. . . . म्हणजे घेण्याचा शेवटचा दिवस आहे." ती इतकच बोल ली. घळाघळा अश्रू व्हायला लागले.
"मग काय प्रॉब्लेम आहे? मला सांगू शकता मॅडम !" त्यांच्या या एका वाक्याने मनाला चार हत्तीचं बळ आलं.
"साडे चार हजार रु . . . बाकी आहेत ते नाही भरले तर हॉल तिकीट द्यायला नाही म्हणतात." यांत्रिकपणे ती बोलली. इच्छा नव्हती वैयक्तिक गोष्टी ऑफिसपर्यंत आणण्याची पण वेळ काहीही करवते!

त्यांनी एक सेकंदाचाही विचार न करता एका कागदावरती लिहिले.
" ऊठा व वेलणारे कडे जा , अकाऊंट डिपार्टमेंट ला. . . . हॉल टिकीट घेऊनच भेटा मला! परत फेडीचं टेंशन घेवू नका! मला दहावीचं महत्व समजतंय!"
तिला बोलण्यासाठी काहीच राहिलं नाही. आता अक्षरशः त्यांचे आभार व्यक्त करण्याचंही भान नाही. फक्त ओघळणारे अश्रू!
एखाद्या भुकेला माणूस कसा अधाशासारखा अन्नाकडे पाहतो तशा आशेने चिठ्ठी घेतली आणि खाली अकाऊंटटकडे गेलेी.
वेलणारेच्या चेहऱ्यावर ते खूप मोठं प्रश्नचिन्ह ? इतकी मोठी रक्कम सरळ कॅश द्या असं लिहिलंय!
बॉसची चिठ्ठी पाहून रक्कम द्यायची.
त्याने काही विचारलं नाही.
सहा हजार रुपये . . . त्याने दिले , पर्समध्ये ठेवले, रिक्षा पकडली, अन शाळेत !
काऊंटर वर पैसे भरले आणि ती हॉल तिकीट घेऊन आली.
हॉल तिकीट घेवून सरळ घरी जायचा विचार होता. . . . पण नाही. . . अॉटो ऑफिस समोर थांबवली. वरती आल।
सरां समोरच्या टेबलवर ते ठेवलं आणि हात जोडले.
"सर , तुम्ही आज काय केलंय त्याची किंमत मी जाणते\" उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही!"
"झालं ना मॅडम , हात जोडू नका ,हे सगळं नको. सरळ घरी जा आणि मुलाला हॉलतिकीट द्या. त्याचं अभ्यासात मन लागेल."
"सर इथल्या कामाचं?"
"मी बघून घेतो!"
ती कृतकृत्य झाली.
ऑटोत बसून घरी आली.
"उल्हास बघ ना हॉलतिकीट!" हातात दिलं.
मुलाने आईला मिठीच मारली.
"आई तू ग्रेट आहेस! मला याचाच ध्यास लागला होता. तू कुठून आणलेस काय केलंस मला माहित नाही पण थँक्यू आई, बघच मी आता किती अभ्यास करतो आणि चांगल्या मार्ग आणतो!"
" बेटा तुला मी नेहमी म्हणते ना तो असतो रे! कृष्ण असतो माझ्यासोबत हजार संकटे येतील कुठल्यातरी रूपात येतो! कधी मित्र, कधीओळखीचा तर कधी अनोळखी, कधी बंधू कधी मायबाप. . पण कृष्ण असतो पाठीशी!"
" आई हे मला कधीच कळलं नाही. . ."
" पण तो असतो आसपास आणि सतत झेलत असतो. . . मला आजही कृष्ण भेटला !"
आज संध्याकाळी तोही वेळेवर घरी आला.
थोडा शुद्धीत होता.
हातात पैसे नाहित त्याचं गिल्ट घेवून आला होता,
"बाबा आई ग्रेट आहे बाबा ! पाहिलं का अाईने माझं हॉलतिकीट आणलंय. आता मी दहावीची परीक्षा देणार!"

" अरे वा ! कशी काय व्यवस्था केलीय तिने, समजलं नाही! राहू देत त्याने मला काय फरक पडतो? मी नाही करू सदकलो व्यवस्था. . . उल्हास मी तुझा अपराधी आहे!"
त्याने पाहिलं की ती किचनमदफून बाहेर येत होती.
त्याने तिला दंडवत घातला! ती गांगरलीच. त्याला उठवलं.
"मी कितीही वाईट असेल. . . परिस्थिती पण वाईट असेल पण या आईने म्हणजे तू केलेले उपकार हा कैलास कधीच विसरणार नाही. मी जन्मभर ऋणी , येथून पुढे तुझे ऋण माझ्यावरती राहील ."
त्याचं हे काहीही बोलणं तिला ऐकू येत नव्हतं जणु!

तिने देवाजवळ दिवा लावला.
गोपाळकृष्णाला हात जोडले-
" प्रत्येकवेळी असंच माझ्या संकटकाळी भेट रे कृष्णा! नाथा भक्तांच्या हाकेला धावून येत जा! कृष्णा तू माझ्या पाठिशी असल्यावर मला काय चिंता!"
कैलास मनात गौरीला कृष्ण रूपात पहात होता आणि गौरी मदत करणार्‍या प्रत्येकाला!

समाप्त
©®स्वाती बालूरकर, सखी
दिनांक -२८ .०८ .२०२२