Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-१४

Read Later
कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-१४
विषय - कौटुंबिक कथा

शीर्षक - कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग -१४

सखीने फोन ठेवल्यावर कृष्णा सुद्धा थोडा अंतर राखून बसला . पावसाला सुरुवात झाली नसली तरी वळवाचा पाऊस पडून गेल्यामुळे टेकडीवर हिरवळ पसरलेली.  त्या गवतावर हलक्या हाताने हात पसरत सखी ओठात पुटपुटली,

"थँक्यू"

आणि तो हुंकारला,
"हम्म ऽ"

तिने त्याच्याकडे तिरप्या नजरेने पाहिलं आणि गालात हसली. तो गुडघ्याला हातांचा वेढा देऊन समोर बघतच बोलला,

"हसू नका..

तुम्ही मला का घाबरता ते सांगा‌?"


"ते नाही सांगू शकत ."
ती सुद्धा समोर बघतच हळू आवाजात..

"मला कोणी घाबराव इतका मी वाईट आहे का ?"
तो पुन्हा समोर बघत आणि यावर सखीच लगेच उत्तर,

" नाही तुम्ही खूप चांगले आहात."

तो तिच्याकडे पाहून शांतपणे बोलला,
"मग का घाबरता मला?"

"तुम्ही रागवता ..
आणि कोणी रागावल,  की मला भीती वाटते."

"मी आरवला सुद्धा रागवतो.  तो नाही मला इतकं घाबरत.  मी आईला सुद्धा रागवतो.  मी तिला रागवल्यावर तीच मला रागवते . हेच वातावरण आहे आपल्या घरचं.  त्यामुळे रागवणं ही आपल्या घरात खूप शिल्लक गोष्ट आहे.."
तो तिला समजावत..


"तरीही मला भीती वाटते."
ती हळू आवाजात  बोलली.

त्याने खांदे उडवत मोकळा श्वास घेतला.
" ठीक आहे."

"म्हणजे तुम्ही यापुढे रागवणार नाही?"
तिने अंदाज घेत विचारलं.

तो थोडासा हसला,
"ठीक आहे मी अर्थाने बोललो,  की आमच्या सोबत राहून राहून तुम्ही सुद्धा रागवायला शिकाल आणि तुमची रागवण्याची भीती निघून जाईल."
त्याचं बोलणं ऐकून  सखी हसली मग तो सुद्धा हसला.

आणि कृष्णा अचानक बोलला,
"ते पहा .!"

सूर्य अर्धा डोंगराआड गेलेला.  मग अर्धा सूर्य नजरेआड होईपर्यंत दोघेही शांतपणाने , शांत मनाने ते दृश्य पाहत होते. सूर्य नजरेआड झाल्यावर कृष्णाची नजर सखी वर आली.  ती अजूनही त्या सूर्याची किरणे पाहत होती. किती प्रसन्न चेहरा होता तिचा . ते निरागस डोळे,  चेहऱ्यावर प्रसन्न हलकसं हसू..  एकदा पाहिलं की पुन्हा तिच्यावरून नजर  उचलणं खूप अवघड ! काही लोक इतके आकर्षक का असतात ?  की त्यांना पाहिलं की पाहतच राहावंसं वाटतं. की आपल्याच नजरेत सौंदर्य असतं ?  की आपल्या नजरेतल् प्रेम असतं कुणास ठाऊक?

"तुम्हाला आरव जास्त त्रास देतो का?"

त्याच्या प्रश्नाने ती थोडीशी हसली.

"नाही !
उलट त्याने मला इतक्या लवकर आई म्हणून स्वीकारलं.. याचा मला आनंद होतो."

"त्याचा त्रास तुम्ही अजून पाहिलाच नाही .खूप आगाऊ आहे तो . आई म्हणते माझ्यावर गेलाय." कृष्णा थोडासा हसत बोलला.

"मग  असेल आगाऊ..!"
सखी ने हसत त्याच्याकडे पाहिलं मग दोघेही हसले.


"तुम्हाला आपल्या घरी करमत नाही का?"

"करमत"

"काही प्रॉब्लेम असेल ..करमत नसेल.. तुम्हाला काहीही वाटलं तरी बिनधास्त मला किंवा आईला सांगत जा."

त्याचं इतकं  आपुलकीने बोलणं पाहून सखी ने हसत होकारार्थी मान हलवली .

तो पहिल्यांदाच इतक्या जवळून तिच्या चेहऱ्यावर हसू पाहत होता.  ते पाहून त्याच्याही चेहऱ्यावर आपोआप हसू येत होतं.  प्रसन्न वाटत होतं. घरट्याकडे परतणारे पक्षी चिव चिव करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते . थंड हवा सुटलेली. त्या प्रसन्न वातावरणात सखीने त्याला विचारलं,

" थोडावेळ इथे थांबूया?"

"चालेल "
त्यालाही घरी जावं असं वाटत नव्हतं .कदाचित तिच्यासोबत अजून वेळ घालवावासा वाटत होता. एक वेगळी अनुभूती त्याला होत होती.  ते दोघेही थोडावेळ थांबून पुन्हा घराकडे परतले .

गावातून जाताना वयस्कर आजीने विचारल,

"ए किशना कुठ गेलेला?"

कृष्णा बाईक वरून जातच जोरात बोलला ,

"फिरायला गेलेलो."

"अरे बायकोचं नाव तरी सांग ."
पाठीमागून त्या आजीचा आवाज आला .कृष्णाने बाईक थांबवली आणि  पाठीमागे वळून  सखीकडे पाहिल. दोघांची नजरानजर  झाली .सखीने लगेच नजर चोरून  त्या आजींकडे पाहिलं आणि कृष्णाचा जोरात आवाज कानात घुमला ,

" सखी ....."

(सखी  ...सखी .. सखी)


तो एकदाच बोलला पण त्याच्या तोंडून तिचं नाव  पुन्हा पुन्हा तिच्या कानात घुमत राहिलं.
आणि लगेच ते घरी पोहोचले.

सखी घरी आली तेव्हा दोन्ही मुलं कॅडबरी खात होती आणि सोनाबाईंनी स्वयंपाकाला सुरुवात केलेली. सखी आल्यावर ती ही स्वयंपाक घरात गेली आणि कृष्णा दिवाबत्ती करून मुलांना घेऊन शुभंकरोती म्हणू लागला.

संध्याकाळची जेवण झाल्यावर कृष्णा नेहमीसारखा  बेडवर आडवा झाला . सखी गोंधळून बाहेर ओटीवर बसलेली‌ .  सोनाबाई आत मध्ये गेल्या आणि खाली बिछाना अंथरला.  कृष्णाला सांगायची गरज नव्हती तो कोणासाठी आहे. तो मोबाईल मध्ये डोकं खुपसून  बसलेला.  सोनाबाई बाहेर गेल्या आणि सखीला प्रेमाने बोलल्या,

" जा .. आत मध्ये जाऊन पड ..
दिवसभर दमलेस."

सखीने फक्त मान हलवली आणि खोलीकडे जायला निघाली की सोनाबाई मागून त्यांच्या नेहमीच्या सुरात बोलल्या,

"आज बिछाना मी टाकला . उद्यापासून तुझा तू टाकायचा , नाहीतर म्हणशील बरं झालं कामाला सासू मिळाली."

सखी पाठमोरीच हसली आणि तिने हसतच मागे वळून  पाहिलं ,

"काय आई ...काही पण."

सोनाबाईंनी हसतच डोळे मिचकावले आणि त्या त्यांच्या बिछान्यावर पडल्या.

सखी साठी खोली नवीनच होती. तिला अवघडलेपण जाणवत होतं. त्यात भर म्हणजे सुरज थोडासा उठून सारखा कृष्णाला बघत होता आणि सखी त्याला हळू आवाजात  दटावत होती,

"गपचूप झोप ना."

"मी बाबा जवळ जाऊ?"

"नाही माझ्याजवळच झोप."
सखी त्याला हळू आवाजात बोलली.   तो तसाच गाल फुगवून बोलला,

"नो"

सखी पुन्हा मानेनेच नाही म्हणून बोलली

तो पुन्हा तसाच गाल फुगवून,
"नो"

आणि सखीला आरव चा आवाज आला,
"बाबा मी आई जवळ जाऊ?"

"आईला त्रास देऊ नको.. झोप शांतपणे."
कृष्णाच्या बारीक आवाज काढण्याच्या  प्रयत्नाच सखीला हसायला आलं.

"येऊ द्या त्याला ."
सखी बोलताच आरव ने बेड वरून उडी मारली आणि सखीचा  पांघरुणात शिरला.

" आई "
तो प्रेमाने बोलला आणि सखी त्याच्याशी बोलते ना बोलते तोवर सुरज शेजारून उठून कृष्णाच्या पोटावर बसला ही.

" बाबा मी तुझ्या पोटावर झोपू ?"
तो  खाली वर खाली वर मान हलवत गोड हसत बोलला आणि कृष्ण हसला.

"बिनधास्त "
लगेच सुरज त्याच्या पोटावर झोपला आणि कृष्णाने प्रेमाने त्याला मिठीत घेत कुशीत घेतलं आणि  एका हाताने मोबाईलचे अपडेट पाहू लागला.  सखी आरवच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत त्याला थोपटत गुणगुणू लागली.

" लिंबोणीच्या झाडामागे ऽ ऽ
चंद्र झोपला ग बाई ऽ  .."

शांत वातावरणात तिचा नाजूक हळुवार आवाज त्याला इतका सुरेख वाटला की तो सुद्धा मोबाईल बाजूला ठेवून सुरज ला कुशीत घेऊन डोळे बंद करून ऐकू लागला.

त्याने मोबाईल ठेवल्यावर त्याला डिस्टर्ब झालं की काय?  असं तिला वाटलं.  ती शांत झाली.
तिला शांत झालेल पाहून त्याने मागे वळून पाहिलं,

" गा ना ऽ "

"आई बोल ना ऽ "
आरव सुद्धा बोलला आणि सखी आरव च्या डोक्यावर हळुवार थोपटत पुन्हा गाऊ लागली,

"लिंबोणीच्या झाडामागे ऽ ऽ
चंद्र झोपला ग बाई ऽ 

आज माझ्या पाडसाला ऽ ऽ
झोप का ग येत नाही ऽ ऽ


लिंबोणीच्या झाडामागे ऽ ऽ ऽ......"

सखी हळू आवाजात सुरात गात होती . तिची पूर्ण अंगाई संपेपर्यंत सुरज आरव आणि कृष्णा सुद्धा झोपी गेलेला. त्याच्या घोरण्याचा आवाज ऐकून सखीला हसू आलं.
तिने खोलीतील लाईट घालवली.
दरवाजा ओढला आणि ती सुद्धा झोपी गेली.

टू बी कंटिन्यू...

©® प्रियांका सुभा "कस्तुरी"
०७/०९/२०२२

जिल्हा -
सातारा , सांगली

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//