पुनर्विवाह (कृष्ण सखी)-९८

कृष्ण सखी एक रांगडी प्रेमकथा!
कृष्ण सखी - ९८

रात्री बराच वेळ गप्पा झालेल्या. गप्पांनंतर दोघेही
बऱ्याच दिवसांनी हसत मुखाने झोपी गेलेले. दोघांचीही गाढ झोप लागलेली त्यामुळे उठण्याची वेळ झाली तरी कृष्ण सखी अजून झोपेतच होते.

सोनाईने उठून चूल पेटवली आणि सखीची वाट पाहू लागली. पाणी तापलं तरी सुद्धा कृष्ण सखीच्या खोलीतून कसलीच चाहूल येत नव्हती. सोनाई स्वतःशीच बडबडली,
"आज बी उशीरा उठंल आनि उशीर झाला म्हनून नंतर घाय करंल."

सोनाईने चुलीपुढूनच सखीला आवाज दिला,
"म्हाळसा ऽ ऽ ऽ.. दिस डोक्याव आला गं ऽ."

सोनाईच्या आवाजाने झोपेच्या उंबरठ्यावर असणारी सखी दचकून जागी झाली. तिने आरवच्या अंगावर पांघरून घातलं आणि घाईत उठली. तिचं काहीच उत्तर न आल्याने सोनाईने चुलीपुढूनच तिला पुन्हा आवाज दिला,
"म्हाळसा ऽ ऽ ऽ ऽ."

"उठले आई ऽ ऽ ऽ."
सखी घाईतच स्वयंपाक घरात आली.

"साॅरी हा आई, जरा उशीरच झाला."
सखी घाईघाईत आपले विस्कटलेले केस मागे घेत बोलली.

"आग आसू दे…" सोनाईने बोलतच सखीवर नजर टाकली आणि तिच्या सुटलेल्या निऱ्या पाहून हसत बोलली,
"आगं ती साडी बग.. लोळते खाली."

सखी लगेच सोनाईला पाठमोरी उभी राहिली आणि निऱ्या घालत बोलली,
"झोपेतून उठून सरळ इथंच आले. साडीकडे लक्षच नव्हतं माझं."

सोनाईने लाकूड पुढे सारत सहज विचारलं,
"किशना उठला व्हयं?"

निऱ्या घालत सखीने ही तितक्याच सहजतेने उत्तर दिलं,
"नाही."

-आणि पुढच्याच क्षणी उंबऱ्यातून आवाज आला,
"हो उठलोय."

त्याच्या आवाजानेच सखी चमकली. तिने क्षणात खांद्यावरून पदर घेतला आणि पटकन .. त्याला तिरपी होती ती पाठमोरी उभी राहिली. तिने घाईघाईत राहिलेल्या निऱ्या घातल्या आणि खोचल्या सुद्धा!

कृष्णाचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. कृष्णा खूप दिवसांनी सोनाई शेजारी चुलीपुढे बसला. सोनाई नवल करत बोलली,
"आज काय भानगड हे? बिना हाक मारता उठलायस? आनि आगदी चुलीफुडं बसलायंस?"

कृष्णाने सोनाईला आपल्या दोन्ही हातांनी कवटाळलं आणि हसत बोलला,
"ए ऽ म्हातारे, भानगड काय भानगड?
आज वाटलं मला माझ्या आईच्या कुशीत बसावं म्हणून बसलोय."

त्याच्या गच्च मिठीने दंड दुखल्यामुळे सोनाई आपले हात सोडत काहीशी हसत वैतागून बोलली,
"आरं सोड, लगेच दुपट्यात आसल्यावानी करतोया."

काल सकाळीच कृष्णाने पाण्यावरून चिडचिड केल्यामुळे सोनाई कृष्णाला थोडी लाडीगोडी लावत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली,
"किशना ऽ, दोन ख्यपा पान्याच्या आनल्यास म्हंजी पानी शिलकला ऱ्हाइल. आन की त्यवड्या."

कृष्णाची कुरकुर चालू होईल असा सोनाईचा अंदाज होता पण तो साफ चुकीचा ठरला. कृष्णा हसतच तिचा गाल ओढत बोलला,
"आणतो की मग, मी कधी नाही बोललोय काय?"

त्याचा वेगळाच मूड पाहून सोनाईला खरंच नवल वाटलं. कृष्णा सखीकडे पाहून हसला आणि लगेच बादल्या घेऊन आडावर गेला.

अंघोळीला पाणी उतरणाऱ्या सखीला सोनाईने विचारलं,
"म्हाळसा ऽ,किशना लै ग्वाड ग्वाड बोलतोय आसं वाटलं का गं तुला?"

सखी थोडीशी हसून बोलली,
"सुरजचे बाबा तुमच्याशी अधेमधे गोड बोलतातच की."

"त्यो कदी ग्वाड बोलतो त्यं मला चांगलं ठाव हाय."
सोनाई तोंडात पुटपटली.

थोड्यावेळाने-
सखीने भाजी फोडणीला दिली आणि कृष्णा टॉवेलने चेहऱ्यावरचा घाम पुसत स्वयंपाक घरात आला पण तिथं सोनाई नव्हती. त्याने लगेच ओटीवर जाऊन पाहिलं. सोनाई घरात नाही हे पाहून तो घाई करत विचारलं,
"आई कुठे गेली?"

"दूध आणायला गेलेत. येथील इतक्यात."

"तुम्ही बोलला काय तिच्याशी?"

"दोघांनी बोलायचे ठरलेलं ना.. मी एकटी कशी बोलू?"

"हम्म ऽ.. मी आंघोळ करून घेतो, मग बोलूया."

त्याला घामाजलेलं पाहून सखी माठातील थंड पाण्याचा तांब्या पुढे करत बोलला,
"मुलं झोपलीयेत तरं आत्ताच बोलून घेऊ, नंतर दोघांनाही एकत्र वेळ मिळणार नाही."

"हम्म ऽ ऽ." कृष्णा विचार करत हुंकारला आणि तहानलेला असल्याने त्याने तांब्या मोकळा केला.

मागच्या वेळी मुऱ्यावर जाण्याचा विषय निघाल्यावर सोनाईने घर डोक्यावर घेतलेलं हे आठवूण सखी काळजीने बोलली,
"क्रिष्ण् ऽ…."

सोनाईला मनवायचं कसं.. हा विचार करत असतानाच सखीने आवाज दिल्यामुळे कृष्णाची विचार श्रृंखला उठली,
"काय?"

सखी चिंतीत स्वरात बोलली,
"आई रागावतील, ओरडतील पण तुम्ही रागावू नका."

पाण्याचा तांब्या हातात घट्ट पकडत पुढच्याच क्षणी कृष्णाने विचारलं,
"मी कधी रागवतो काय?"

त्याच्या या वाक्यावर तिला नेहमी बोलू वाटायचं,
हो रागावता.. तुम्हाला खूप राग येतो क्रिष्ण्.. पण कालच तरं त्यांच्या मैत्रीची मुहूर्तमेढ रोवलेली. त्यामुळे त्याच्या कलाने घेत सखी एक-दोन सेकंद थांबली आणि नंतर त्याचा अंदाज घेत हळूच बोलली,
"कधी कधी थोडेसे रागवता ना?"

ती सांगत होती की त्यालाच विचारत होती. कृष्णा थोडासा हसला. त्याला हसताना पाहून सखी सुद्धा थोडीशी हसली.

"काय काम हाये किशनाकडं?"
सोनाईचा अंगणातून आवाज आला.

तसे कृष्ण सखी सावध झाले. सखी हळू आवाजात बोलली,
"मी विषय काढते. सुरुवात मीच करते तुम्ही फक्त रागवू नका."


"मी कुठे रागावतो आणि आईला तर कधीच रागावत नसतो." कृष्णाच्या मोकळ्या आवाजात बोलल्याने सखीने पटकन ओठांवर बोट ठेवलं,
"शू ऽ काही बोलू नका."

कृष्णाला चोरी केल्याची फिलिंग आली. तो थोडासा हसला.

"सकाळी त्याची शाळंत जायाची गडबड आसती. सांच्याला यं आनि बग काय बोलतोय." सोनाईचा पुन्हा बाहेरूनच आवाज आला आणि काही सेकंदात उंबऱ्या पाशी चप्पल काढत अगदी ओटीवर आवाज आला,
"पोरं उठली व्हयं गं?"

"नाही आई ऽ."

"आगं मं उठवायचं ना त्यांना…. " बोलतच सोनाई स्वयंपाक घरात आली आणि तिला पुन्हा नवल वाटलं कारण ती नसताना कृष्णा स्वयंपाक घरात उभा होता.

नक्की काहीतरी भानगड आहे, सोनाईला पक्की खात्री झाली पण तिने काही न बोलता दूध पातेल्यात ओतलं आणि चुलीवर ठेवलं.

"सकाळी सकाळी घशाला कोरड पडते बया.. पावसाला कुनी बांदून ठेवलंय काय म्हायंत." स्वतःशीच बडबडत पाण्याचा तांब्या घेऊन सोनाई स्वयंपाक घराच्या बाहेरच्या पायरीवर हवेला बसली.
कृष्ण सखीची चाललेली खुणवाखूणव तिने पाहून सुद्धा न पाहिल्यासारखी केली.

… आणि सखी थोडीशी अडखळत बोलली,
"आई ऽ… मला ना थोडं बोलायचं होतं."

पाण्याचा तांब्या स्वयंपाक घरात सारत सोनाई तोंडावरून पदर फिरवत बोलली,
"माह्याराला जायाच हाये का?"

यावर कृष्णाची नैसर्गिक प्रतिक्रिया-
"त्या बोलल्यात का तसं? आधी ऐकून तर घे."

-आणि मनातच कुरकुला,
"आत्ता आले नाहीत की लगेच का जायचं असेल माहेराला?"

लगेचच सखीने कृष्णाकडे "तुम्ही शांत रहा ना" अशा नजरेने विनवणी करत पाहिलं आणि ती पुन्हा बोलली,
"नाही. थोडं वेगळं आहे."

"आगं मं बोल की धडाधडा. कशाला फिरावत्यास?"
आता सोनाई सुद्धा त्यांना नक्की काय बोलायचं आहे हे ऐकण्यासाठी आतुर झाली.

सोनाईची प्रतिक्रिया एकदा डोळ्याने पाहिल्यामुळे यावेळी सखीनेच थोडं पाणी पिऊन घेतलं आणि नंतर अगदी शांतपणे हळू आवाजात बोलली,
"आई ऽ, मला …. म्हणजे मी ठरवलंय… म्हणजे…
फक्त माझीच इच्छा आहे की मी मुलांना शिकवावं."

तिचं एकच वाक्य पाॅज घेऊन बोलल्यामुळे इतकं मोठं झालेलं की तिचं वाक्य पूर्ण होईपर्यंत सोनाईचा श्वास अडकल्यासारखा झालेला. तिचं बोलणं ऐकून सोनाई मोकळा श्वास सोडत मोकळ्या आवाजातच बोलली,
"आगं मं घाबारत्यास कशाला बोलायला? शिकव की बिंदास."

तिने महत्त्वाचा शब्द न बोलल्यामुळे कृष्णाने मान हलवत कपाळाला हात लावला. सखीने एकदा कृष्णाकडे पाहिलं आणि खांद्यावरच्या पदराचंं टोक बोटाभोवती गुंडाळत मनातच बडबडली,
"यांना तर सगळं सोपंच वाटतं."

सखीने मोठा श्वास घेतला आणि सोनाईकडे बघून हळूच बोलली,
"मी मुऱ्यावर बोलतीये."

तिच्या बोलण्याने रंगीकडे बघणाऱ्या सोनाईची मान
गर्रकन सखीकडे वळली आणि सोनाई गरजली,
"काय बुल्लीस?"

सखी जराशी घाबरलीच,
"मुऱ्यावरच्या मुलांना…. शिकवावं अशी माझी…"
सोनाईच्या एकटक बघण्याने आणि तिचा पारा चढला आहे हे तिच्या चेहऱ्यावरच्या रेषा वाचून कळल्याने सखीने आवंढा गिळत पुढचे शब्द ही गिळले.

सोनाई पायरीवरून उठून वेगाने घरात आली तशी सखी घाबरली. जुन्या भीतीचा अंश उफाळून आला आणि "आता आई मारणारच.." या विचाराने घाबरून ती दोन पावले मागे गेली.

सोनाई तरातरा कृष्णाच्या पुढ्यात येऊन उभी राहिली आणि त्याच्यावर बरसली,
"म्हनून सकाळपास्न लै गुळगुळ पानी चाललंय व्हयं तुजं? तू आसं समजू नगं मला काय बी कळत न्हायं. तूच बोलतोयास तिज्या तुंडून."

"ए ऽ आई ऽ, काय पण काय बोलते गं? सखी स्वतः बोललेत ना त्यांची इच्छा आहे म्हणून? माझ्यावर कशाला भडकतेस?" कृष्णा ही जरासा रागात बोलला.

सोनाई एकसारखी रागावत होती,
"कसली विच्छा? तिजी का तुजी? माग बगीतलंस ना धरणीला टिकली पुरगी? तरी तुजं समादान झालं न्हायं?"

"तुला सांगितलं ना स्वतःच्या त्या मर्जीने बोललेत."

यांच्या आरडाओरड्याने मुलं उठल्यावर घाबरून रडतच उठणार याची खात्री असल्याने
दोघांचाही वरचा सूर पाहून सखीने आधी स्वयंपाक घराचा दरवाजा बंद केला.

सोनाईच्या एकसारख्या बरसण्याने कृष्णाही रागावला. तो मोकळ्या आवाजात बोलला,
"मला हे आधीच माहीत होतं. तू माझ्यावरंंच घसरणार. तुला मीच चुकीचा वाटणार."

सोनाई रागारागात बडबडत होती,
"तुला म्हायती आसनारंच रं.. कारन तुचं भरीला घातलंयंस तिला.."

सखी घाईतच दरवाजा बंद करून दोघांजवळ आली. सोनाई त्याच्यावर भयंकर चिडलेली त्यामुळे त्याचा
ही पारा वर चढलेला पाहून सखीने हळूच पदराच्या आडून त्याचा हात हातात घेतला आणि -

..‌आणि अचानक कृष्णाच्या हाताला नाजूक स्पर्श झाला. जणू काही भडकलेल्या आगीवर पाण्याचा वर्षाव व्हावा आणि आग आटोक्यात यावी अगदी त्या एका स्पर्शाने ही किमया केली.

सोनाई रागात बडबडतच होती पण कृष्णाचं लक्ष त्या नाजूक स्पर्शाने वेधलं. त्याने सखीकडे पाहिलं. सखीने बारीक चेहरा करून काळजीने खुणावलं, रागावू नका ना!

त्या काही क्षणांमध्ये सोनाईच्या बोलण्याकडे कृष्णाचे लक्षच नव्हतं पण सखीमुळे त्याला तेव्हा जाणीव झाली,
आपण जरा जास्तच रागावलो.

जसा अलगद तो स्पर्श कृष्णाला झाला तसाच अलगद सखीने हात हळूच काढून घेतला. जणू तिच्या स्पर्शात संमोहन होतं कारण तो नाजूक स्पर्श लांब गेल्यावर कृष्णाच्या कानांवर सोनाईचे शब्द येऊन पडू लागले,
"तुजी आय हाये मी.. तुज्यापरीस तुला वळाखते त्यामुळं… "

"आई ऽ ऽ ऽ ऽ…. "
कृष्णा शांत झाल्यावर सखीने सोनाईच्या हाताला पकडून तिला स्वतःकडे फिरवलं.

"काय हाये तुज मधी?"
सोनाई सखीवर ओरडली.

अचानक ओरडण्याने सखी दचकली. पण तिने सोनाईचा हात सोडला नाही. तिचा हात तसाच हातात पकडून सखी सोनाईला पोटतिडकीने बोलली,
"आई ऽ, मी खरंच बोलतीये, सुरजच्या बाबांनी मला आग्रह नाही केला. ही माझीच इच्छा… "

"कसली विच्छा? ह्याज्या नादी लागून डोकं फिरलंय तुजं पन." सोनाई सखीवर ही भडकली,
"मागच्यायळी चार दिस लंगडत व्हतीस इसारलीस का? का मीच आटवन करून द्याला पायजे?"

सोनाई सखीच्या प्रेमापोटी तिच्यावर रागवत होती हे सखीला कळत होतं. सखी सोनाईचा तसाच हात हातात घेऊन पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करत बोलली,
"आई, प्रश्न फक्त चालण्याचा आहे तर मी सराव करेन. एकदा चालण्याचा सराव झाला की मग तुम्हाला काही काळजी नाही ना?"

सोनाई भयंकर रागवलेली. ती सखीच्या हातातून हात काढायचं बघत रागात बडबडत होती,
"गावातली मानसं बी दोन चार म्हैन्यानं पान्याच टाकं धुवायला वर मुऱ्याव जायाचा कटाळा करत्यात आनि तुला समदं सोपं वाटतया. रोजरोज जायचं खाव हाये व्हयं?"

तिने बोलता बोलताच कृष्णाकडे पाहिलं आणि तशीच रागावून बोलली,
"आनि तू आजून बगीतलंयस काय? तुला म्हायंत न्हायं ह्याला बी म्हायंत न्हायं व्हयं? पावसात डोंगराला झरं फुटत्यात, वाट्या निसरड्या व्हत्यात, हिवाळ्यात मरनाचा गारठा पडतोया. त्या मुऱ्याव तं नुसतं धुकं आसतया. उन्हाळ्यात तरं भाजायला व्हतया."

सोनाईची काळजी समजून सखी तशीच तिला समजावत राहिली,
"आई ऽ, चांगलं काम करताना थोडासा त्रास होणारंच… चालेल मला."

सखीने आपली बाजू लावून धरलेली पाहून सोनाईने एक जोरदार हिसका देऊन सखीच्या हातातून आपला हात सोडवला आणि कृष्णावरचा राग तिच्यावर निघाला,
"तू गप बसतीस का? आय आय बोलतेस म्हनून राग गिळते न्हायं तं.. "

सोनाई तशीच रागात बोलली,
"सोनीला पिच्चर दावाया घिवून ग्येला आनि तुला कुट न्येलं? मुऱ्याव? सोनीला घरा भायर न्हायं कदी काडली आनि तुला मास्तरीन बनवतोया मुऱ्याव."

सोनाई सखीच्या काळजीने बडबडत होती. ती तिच्या ठिकाणी बरोबर होती पण बोलता बोलता तिने नकळत आरती सोबत तिची तुलना केलेली. आरतीचा विषय निघाला की कृष्णाला त्रास होतो, हे माहीत असल्याने सखीने लगेच कृष्णाकडे पाहिलं.

कृष्णा पाठमोरा आडवा हात कपाळावर ठेवून उभा होता. वातावरण खूपच बिघडलेलं. कृष्णाकडे जावं की सोनाईजवळ थांबावं? सखी ही दडपणाखाली होती.

मघापासून चालणारा त्रागा काही क्षण तरी थांबावा. शांतता यावी; कदाचित या शांततेतून काही मार्ग सुचेल म्हणून सखीने माठातील थंड पाण्याचा तांब्या सोनाईच्या हातात दिला.

बडबड करून तिच्या घशाला कोरड पडलेलीच. सोनाई चुलीपुढे बसली आणि गटागटा पाण्याचा तांब्या संपवला. कृष्णा शांत होता. सखी शांत होती. पाणी पिल्यावर सोनाई ही गप्प बसली.

स्वयंपाक घरात शांतता पसरली. सखीला कृष्णाची काळजी वाटत होती. तो शांत का? हा प्रश्न मनात डोकावला आणि कृष्णाचा घोगरा आवाज आला,
"आई ऽ, तुला जेवढं बोलायचं तेवढं बोललीस आता मी बोलणार आणि तू ऐकायचं."


सखीने कृष्णाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत हलकसं पाणी तरळत होतं. कृष्णा सोनाईजवळ येऊन गुडघ्यावर बसला आणि तसाच घोगऱ्या होतात बोलला,
"काय म्हणालीस तू? आरुला मी घरात ठेवलं काय? ती प्रेग्नेंट होती आई आणि तरी तू अशी बोलतेस?"

आरतीच्या आठवणींनी आपसूकच कृष्णाच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा भरल्या आणि तो दुःखाने बोलला,
"तुला काय वाटलं? आज आरू असती तर मी तिला घरात ठेवलं असतं काय? म्हणजे माझं तिच्यावर प्रेम होतं म्हणून मी तिची काळजी घ्यायचो आणि सखींबद्दल मला काहीच वाटत नाही? असं वाटतं तुला? तुला मी इतका उलट्या काळजाचा वाटतो आई काय?"

रागाच्या भरात का होईना पण आपण आरतीचं नाव नव्हतं घ्यायला पाहिजे. आपण उगाच त्याच्या डोळ्यांत पाणी आणलं, याची जाणीव सोनाईला झाली.

कृष्णा तसाच दुःखाने बोलला,
"आज जरं आरु असती तरं मी तिला माझ्यासोबत हट्टाने प्रत्येक रविवारी घेऊन गेलो नसतो काय? तू एवढं मला ओळखत नाहीस काय? पण जर आज ती असती तरं…."

कृष्ण बोलता बोलता थांबला. तिची आठवण आली की त्याला असं भडभडून यायचं. त्याच्या डोळ्यांत पाणी पाहून सखीलाही रडू आलं.

आपल्या लेकाच्या डोळ्यांत पाणी पाहून सोनाईचे सुद्धा डोळे पाण्याने भरले. ती त्याचे डोळे पुसत मायेने बोलली,
"ऱ्हाव दे आता… गप."

कृष्णा तसाच दुःखाने बोलत होता,
"मी खरंच सांगतोय आई, आज आरु असती तरं
ती सुद्धा मुरल्यावर शिकवत असती. मुऱ्यावर शिकवण्यासाठी मी तिच्यावर हक्काने जबरदस्ती केली असती पण तुझी शपथ गं.. मी सखींना आग्रह नाही केला. मी एका शब्दाने ही त्यांना काही बोललो नाहीये. त्यांना त्रास व्हावा असं मला वाटेल काय?"


"हम्म ऽ.."
सोनाई त्याचे डोळे पुसत हुंकारली आणि पुन्हा काळजीने बोलली,
"तिला तरास व्हैल. रोजरोज डोंगर पायाखाली तुडवाया ती काटक न्हायं. ती मुंबैची पोर हाये.. लै नाजूक आनि तू पन यवढा तरास करून घेतोस त्यो कुनासाटी? काय मिळतं तुला? यक पैका कौन देत? आठ वरीस झालं उगा तगातगा करत जात आसतोस त्यो?"

सोनाई त्याच्या आणि सखीच्या काळजीपोटी बोलतीये, त्यांच्याशी भांडतीये हे कृष्णालाही कळत होतं. कृष्णाने आपले डोळे पुसले आणि शांत आवाजात बोलला,
"प्रयत्नांती परमेश्वर आई! आपण काय लगेच त्यांना मुऱ्यावर पाठवणार नाहीये. मी स्वतः त्यांच्यासोबत असेन. मी स्वतः त्यांचा सराव करून घेईन. एकदा त्यांचा चालायचा सराव झाला की एक काय दहा डोंगर चढतील त्या. थोडा वेळ लागेल, थोडासा त्रास होईल पण…."

"थोडासा तरास.. ? आरं पण कशाला जीवाचं हाल करून घ्यायचं?" सोनाई काळजीने बोलली.


कृष्णा काहीतरी आठवूण थोडासा हसला आणि शांतपणे बोलला,
"आई मी तुला गोष्ट सांगतो. ही गोष्ट फार पूर्वीची आहे. एक मुलगा होता. त्याला शिक्षणाचं वेड होतं. तो शिक्षणासाठी ठार वेडा होता. त्याकाळी स्त्रियांना शिकवलं जायचं नाही पण त्याने त्याच्या बायकोला शिकवलं.‌ आता तू जशी माझ्यावर रागावलीस तसे त्याच्यावर सुद्धा त्याच्या घरातले, शेजारचे, आजूबाजूचे, हा समाज सगळे सगळे रागावले पण त्या मुलाने हार मानली नाही.

त्याकाळी फक्त मुलांसाठी शाळा होत्या. पुरुष फक्त शिकत होते पण त्या मुलाने आपल्या शिक्षीत बायकोच्या साथीने पहिली शाळा काढली. त्यांना खूप त्रास झाला. त्यांच्यावर चिखलफेक झाली.. शब्दांची आणि खरीखुरी ही. त्या माऊलीने तरं अंगावरच्या नेसत्या साडीसकट संसार केला.. शिक्षणाचा आणि खराखुरा ही.

हे सगळं त्यांनी का केलं? स्वतःसाठी? नाही. आपण या समाजाचे काही देणं लागतो. देवाने जन्माला घातलंय ते स्वतः सोबत इतरांचा उद्धार करण्यासाठी हे त्यांना माहीत होतं म्हणून ते लढले. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत झटले आणि त्यांच्यामुळेच .. फक्त त्यांच्यामुळे आज मुली शिकतायत. बघ, तुझी नात सुद्धा आज शाळेत जातीये. हे सगळं कोणामुळे? तर त्या एका मुलामुळे!"

कृष्णाने आवंढा गिळला आणि पुन्हा घोगऱ्या आवाजात बोलला,
"आई ऽ, मी त्या मुलासारखा थोर नाही. त्यांच्या पायाची धूळ सुद्धा नाही पण त्यांना आदर्श मानून जरं मी सुद्धा शिक्षणाची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न करतोय.

तू चटणी भाकरी खायला घालून मला मोठं केलंस, शिकवलंस, मला या लायक बनवलंस की
दुसऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो.
आज जर मी शिकलो नसतो तर कुठल्यातरी गवंड्याच्या हाताखाली कुठेतरी बिगारी काम करत असतो. गरीबतून बाहेर येण्याचा एकच मार्ग आहे आई... ते म्हणजे शिक्षण! माझ्या या प्रवासात सखी माझ्या सोबत आहेत फक्त तू नाही बोलू नकोस आई."

सोनाईचे डोळे सुद्धा ठिबकत होते. ती पदराने नाक पुसद बोलली,
"म्हणजे तुमचं आधीच ठरलंय तरं. मं मला कशाला इच्यारायचं? उगा म्हातारीचं मन राखाया."

आपले डोळे पुसून सखी ही सोनाईजवळ आली आणि ओलावल्या आवाजात बोलली,
"नाही आई, तुम्हाला फक्त विचारायचं म्हणून आम्ही विचारत नाही आहोत. तुम्ही आमच्या दोघांसाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहात. तुमचा नकार असेल तर आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटेल पण मला खात्री आहे तुम्ही नकार नाही देणार.. कारण जो मुलगा मुलांना शिकवण्यासाठी इतका धडपडतोय त्याच्या आईचं मन नक्कीच त्याच्यापेक्षा मोठं असणार."

सखीच्या बोलण्याने तिने सोनाईच्या काळजाला हात घातलेला. तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरले. सखी सोनाईचे पाय पकडून बोलली,
"ज्या दिवशी तुमची खात्री होईल की मी डोंगर चढू शकते त्या दिवसापासूनच माझा प्रवास चालू होईल.
प्लीज तुम्ही मला आशीर्वाद द्या. माझ्या पाठीशी उभ्या रहा.. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आई."

कृष्णाने सोनाईच्या पायाला स्पर्श केला आणि गहिवरल्या स्वरात बोलला,
"आई ऽ, आजवर प्रत्येक प्रसंगात, आयुष्याच्या चढ उतारात माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिलीस तशी आजही रहा ना! तुझे आशीर्वाद खूप गरजेचे आहेत आमच्यासाठी!"

शिकलेल्या मुलाने सुनेने आपल्या अडाणी आईची पाय धरावे, आशीर्वादासाठी विनवणी करावी मग तिचे डोळे वाहणार नाहीत तरं नवलच!

सोनाई दोघांच्याही डोक्यावर थरथरता हात ठेवत पुटपुटली,
"लै लै मुठ्ठी व्हा!"

एकदाची सोनई तयार झाली हे बघून कृष्ण सखीला किती आनंद झाला सखी हसत बोलली,
"तुम्ही होकार दिला आई!"

कृष्णाने आनंदाने सोनईला कवटाळलं,
"मला माहित होतं, म्हातारी थोडा भाव खाईल पण नंतर तयार होईल."

"तुझी आई म्हातारी.. सोड मला." सोनाई त्याच्या हाताचा विळखा सोडत हसत बोलली.

"मग तिलाच तर बोलतोय म्हातारी." कृष्णा ही हसला.

"आता जा आंगूळ करून घे, न्हायं तं यळ व्हैल."

कृष्णा हसतच पाणी उतरत बोलला,
"डब्याला भाकरीच करा म्हणजे तुमची ही गडबड होणार नाही."

"बरं." सखी ही हसली. मघाशी बिघडलेलं वातावरण आता निवळलेलं, प्रसन्न झालेलं. सोनाईच्या होकाराने तरं कृष्ण सखी मध्ये तर वेगळाच उत्साह संचारलेला.

थोड्यावेळाने मुलं उठल्यावर सखी मुलांमध्ये व्यस्त झाली. कृष्णाने आपलं आवरलं आणि तो ही वेळेत शाळेत निघाला.

"आई ऽ येतो गं ऽ."
कृष्णाचा आवाज आल्यावर सखी गौरीला केसांचा गुंता काढायला सांगून दरवाजा जवळ आली.

"दमानं जा."
स्वयंपाक घरातून सोनाईचा आवाज आला.

"हो.." बोलतच कृष्णाने मागे पाहिलं. सखी दरवाजात उभी होती. तिच्याकडे पाहून तो थोडासा हसला,
"येतो."

"हम्म ऽ.."
सखीने हसून मान हलवली.

कृष्णा हसत निघाला पण दोन चार पावले चालून तो पुन्हा माघारी वळला आणि दोन पावलं सखीकडे येत उत्साहात बोलला,
"आज पासूनच सराव चालू करू. संध्याकाळी तुम्ही तयार रहा ‌"

सखीला ही आनंद झाला,
"चालेल."

"येतो."
कृष्णा हसून पुन्हा शाळेत जायला निघाला. तो दोन चार पावलंच चालला असेल की पुन्हा तो माघारी वळला आणि तसाच उत्साहात बोलला,
"मुलं घरी आल्यावर त्यांना आधीच तयार करून ठेवा, नंतर वेळ नको."

सखीने आश्चर्याने विचारलं,
"मुलांना सुद्धा न्यायचं?"

कृष्णा हसत बोलला,
"ती मागे लागणार नाहीत काय? माझ्या नाही पण तुमच्या मागे लागणारच.. ती तुम्हालाच चिटकून असतात."

त्याच्या बोलण्याने सखी सुद्धा हसली,
"बरं करते तयार."

"येतो."
कृष्णा हसला आणि पुन्हा निघाला तर पुन्हा दोन-चार पावले चालला असेल की तो पुन्हा माघारी वळला. सखी उंबऱ्यातच चौकटीला धरून त्याच्याकडे पाहत होती. ती हसली,
"काय?"

कृष्णा सुद्धा थोडासा हसतच बोलला,
"एक काम कराल काय, थर्मासमध्ये चहा सुद्धा तयार ठेवाल काय? तिथेच घेऊया."

निसर्गाच्या सानिध्यात कृष्णासोबत चहा, विचारानेच सखीच मन प्रफुल्लित झालं. ती आपली उत्सुकता लपवत बोलली,
"चालेल."

स्वतःच्या कल्पनेवर खुष होतंच कृष्णा हसत बोलला,
"चला. येतो आता."

सखी चौकटीला टेकून त्याच्याकडे पाहत होती. आता त्याने पुन्हा माघारी वळाव आणि असंच मनवेधक काहीतरी बोलावं असं वाटत असतानाच चार पावले चाललेला कृष्णा पुन्हा माघारी वळला आणि उत्साहात बोलायला,
"तुम्ही सूर्यास्त पाहिलाय कधी?"

सखी किंचित नाराजीने बोलली,
"खूप वर्ष नाही."

कृष्णा उत्साहात बोलला,
"मग आज तुम्ही पाहूनच घ्या."

सखीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला,
"चालेल."

तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कृष्णा ही आनंदी झाला. तो हसत बोलला,
"चला येतो." आणि कृष्णा पुन्हा निघाला चार पावले चालल्यावर तो पुन्हा माघारी वळला.

.. आणि सखीने हसून विचारलं,
"आता काय?"

कृष्णा स्वतःवरच हसला,
"काही नाही. येतो."

सखी सुद्धा हसली,
"लवकर या."

हेच ऐकण्यासाठी कदाचित तो मघाशी फिरलेला. त्याने पुन्हा तिच्याकडे एकदा मागे वळून पाहिलं आणि हसून मान हलवली.

निसर्गरम्य वातावरण.. ती, कृष्णा, गरम चहा आणि तो सूर्यास्त! या सगळ्याचा विचार करून सखीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर मावत नव्हता.

उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
१२/०२/२०४
………

(भाग थोडा मोठा होता त्यामुळे काल येऊ शकला नाही पण वाचून तुम्हाला आनंद नक्कीच झाला असेल अशी खात्री वाटतेय. आता खरंच आनंद झाला का माझा गोड गैरसमज आहे ते तुम्ही समिक्षां मध्ये सांगा.

पुढचा भाग लिहिण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे..
तर येऊ द्या समीक्षा!

भेटू लवकरच!)


🎭 Series Post

View all