Login

पुनर्विवाह (कृष्ण सखी)-२११

कृष्ण सखी
कृष्ण सखी -२११


बाहेरचा दरवाजा ढकलताना त्याच्या मनातील चुळबुळ भलतीच वाढली. खोलीतील गुलाबाचा सुगंध घरभर पसरलेला. अचानक कानी पडणारी, त्याला नेहमीच भुरळ घालणारी ती बांगड्याची किणकिण ऐकून तोच रोमांचीत होत होता.

'मंजीलसे खुबसुरत सफर होता हैं'
याची प्रचिती तो क्षणाक्षणाला घेत होता.

त्या क्षणांमध्ये धुंद होत कृष्णा डोळे बंद करूनच स्वतःशीच पुटपुटला,
'सखी ऽ.. सखी ऽ..  सखी!'

सखीची चाहूल स्वयंपाकघरातून येताच कृष्णाने उंबऱ्यातून आतमध्ये डोकावलं. सखी त्या बाजूच्या दरवाजाला टेकून गालात हसत दूर कुठेतरी बघत गालात हसत होती. त्या दरवाजातून झेपावणाऱ्या थंड हवेलाही जणूकाही सखीच्या सुडौल देहाची भुरळ पडलेली म्हणून तर ती तिच्या केसांना हवेवर उडवत तिच्या गोबऱ्या गालाला स्पर्श करत होती.  पदराभोवती खेळत साडीशी लंपडाव करत चोरून तिच्या नाजूक देहाला स्पर्श करत होती.


कृष्णा अगदी खेचल्यासारखा तिच्याकडे आला. तिच्या चेहऱ्यावर भुरभुणाऱ्या केसांनी मधूनच तिची बारीक होणारी नजर, थंंडीचा शहारा आल्याने मधूनच थरथरणारे ओठ, मघापासूनच्या हवेने जागा सोडलेली साडीची किनार तिची प्रत्येक लहान-सहान गोष्ट तिच्या सौंदर्यात भरच घालत होती.

सखी त्यांच्या गोड क्षणांच्या कल्पनेत इतकी समरस झालेली की कल्पनेत त्याने तिच्या ओठांंचा ताबा घेतला आणि प्रत्यक्षात सखीने डोळे मिटले. तिचे श्वास वाढले.

तिच्याकडे पाहताना कृष्णाच्या तिच्याविषयीच्या भावना अगदी उचंबळून आलेल्या. मन प्रेमाने काठोकाठ भरलेलं. नजरेला त्याच्या भावना आवरत नव्हत्या त्यामुळे त्या हलक्या ओलसर झालेल्या. तिची ती समाधी लागलेली सौंदर्य संपन्न काया अशीच जपून ठेवावी, या भावनेने तिला डोळे भरून पाहून त्याने डोळे सावकाश बंद केले. तिला नजरेत साठवल्याचं समाधान मनात उमटून तो गालात हसला.

थंड हवेची झुळूक आली तशी सखी थंडीने शहारली. थंडीचा काटा अंगभर उमटला तरी सखीची तंद्री भंग झाली नाही. हाताची घडी घालून थंडीने कुडकुडत तिला दूरवर गालात हसत पाहताना बघून कृष्णा गालात हसला.

हवेमुळे तिचे चेहऱ्यावर भिरभिरणारे बारीक केस पाहताना कृष्णाने थोडं पुढे होऊन त्या केसांवर फुंकर घातली.‌

जागेपणी स्वप्नात हरवलेल्या सखीला ती फुंकर सुखावून गेली, लगेच दुसरी फुंकर मग एकामागोमाग एक गरम फुंकरीने त्या थंड वातावरणात ही ती शहारली आणि नजर आपोआप समोर आली.

नजरानजर झाल्यावर सखी काही क्षण त्याचं धुंदीत होती. कृष्णाने चूल पाहिली आणि गालात हसत बोलला,
"स्वयंपाक झाला वाटतं?"

आपल्या स्वैर भावनांना ताळ्यावर आणत सखी गोंधळून,
"हं ऽ?"


सखीचं बावरलेपण पाहताना कृष्णा हसला. तो हसला म्हणून सखीही नजर चोरत हसली. त्या हसण्यात दोघांचीही छुपी आतुरता स्पष्ट झळकत होती. तिला मिठीत घेण्यासाठी त्याचे बाहू इतके आतुर होते की त्याला स्वतःला सावरणं अवघड होत होतं पण याक्षणी ही तो तिचीच वाट बघत होता. तिचा भूतकाळ पाहता तिचा पुढाकार, तिची इच्छा, तिची संमती यापेक्षा महत्वाचं त्याच्यासाठी काही नव्हतं.

दुपारपासून त्याला त्रास देणाऱ्या त्याच्या भावना सखीसमोर असताना आता तर अनावर होऊ लागलेल्या. सखी खाली बघत गालात हसत होती.

'त्याच्यासोबत काय बोलावं? कुठून सुरुवात करावी?' लाजऱ्या जाणीवेने तिला काही कळत नव्हतं.

तिच्या गौरवर्णीय कमरेवर नजर जाताच त्याच्या मनात चुळबुळ झाली. त्या मऊसूत कंबरेला स्पर्श करण्याचा मोह मनात दाटून आला आणि क्षणात त्याचा हात पुढे सरसावला पण 'तिचा पुढाकार' हे शब्द मनात घोळले आणि कमरेपर्यंत जाऊन त्याचा हात अडखळला. इथंही दूधाची तहान ताकावर भागवत तिच्या कमरेला खोचलेला पदर चिमटीत पकडून बाहेर काढत तो मिश्कीलपणे बोलला,
"कामावर निघालाय काय?"

सखीने स्वतःकडे पाहिलं आणि वर खोचलेल्या निऱ्या खाली सोडत ती गालात हसली.

'हंबा ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ हंबा ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ.'
गोठ्यातून सूर आला आणि कृष्णा कपाळाला हात लावून बोलला,
"हिला विसरलोच होतो."

त्याच्यासारखाच क्षणभर ही दुरावा नकोसा वाटणारी सखी हळूच बोलली,
"धार काढायला मलाही शिकवता का?"

कृष्णा गालात हसत बोलला,
"धार रात्रभर काढायची आहे काय? आलो लगेच."

दूधाचा टोप घेऊन तो ओटीवर गेला असेल की सखीने मागून आवाज दिला,
"पण मला खरंच शिकायचं होतं."

"आजचाच मुहूर्त आहे काय? पुन्हा कधीतरी शिकवेन." तो हसत बोलला आणि गोठ्यात गेला.

तो गेल्यावर सखीने मोठा श्वास घेतला. उगाचच गालात हसली. पुन्हा चेहऱ्यावर सपासप पाणी मारलं. पदराने चेहरा पुसत ती खोलीत आली. घाईघाईत केस मोकळे केले आणि पुन्हा केसांची‌ सैलसर वेणी घातली. हातावर पावडर घेतला आणि स्वतःला आरशात पाहिलं.

थोड्या वेळात या गोबऱ्या गालांवर त्याचे प्रमाचे ठसे उठतील, या विचाराने तिचे गाल लाल झाले. ओठांकडे पाहताना तरं लाजऱ्या कल्पनेने ती लाजली. मनात बहुरंगी तरंग उठले आणि त्यावर स्वार होऊन सखी हलकी हलकी होऊन जणू हवेत तरंगू लागली.


मन थाऱ्यावर नसल्याने कृष्णाने कशीतरी धार काढली. दूध शिंकोळ्यावर ठेवलं. बाहेर नजर टाकली. पहिल्यांदाच बाहेर तो अंधार पाहून कृष्णाच्या मनात आनंद पसरला. सखीची चाहूल लागत नसली तरी ती खोलीतच असावी या अंदाजाने त्याची आतुरता क्षणोक्षणी वाढत होती.

स्वयंपाकघराचा दरवाजा बंद करून त्याने दिंडीचा दरवाजाही बंद केला आणि वेगाने अंगणात जाऊन आला. बाहेरचा दरवाजा बंद करताना त्याच्या भावना जशा की उचंबळून आलेल्या.

तो संथ पावलांनी खोलीत आला. सखी अजूनही हातात पावडर घेऊन आरशासमोर उभी होती. तिची पुन्हा तंद्री लागलेली पाहून तो स्वतःशीच हसला.
'मनात गोड खलबतं चालू आहेत वाटतं!'

तिचं बावरलेपण पाहताना तो वेडावत होता. तिच्या समोर चुटकी वाजवताच सखी दचकली.

कृष्णाने मुद्दामून खोडकरपणे विचारलं,
"कसली तयारी चालूये?"

सखी हातातील पावडर झाडत लाजरी हसली. पुन्हा दोघेही वरून शांत पण आतून दाटून आलेल्या भावनांनी दोघांच्या मनातील काहूर उचंबळून आलेलं.
खोलीभर पसरलेला गुलाबाचा सुगंध आता श्वासात मिसळून दोघांनाही आतून बाहेरून गुलाबी व्हायला मजबूर करत होता.

कृष्णाने हातातील गुलाब सखीसमोर धरला. तिच्याप्रतीच्या भावना व्यक्त करताना त्याची रुंद छाती वेगाने वरखाली होऊ लागली.

सखी त्याच्या तोंडून इच्छीत ऐकण्यासाठी आतुरली.
कृष्णा सखीच्या डोळ्यांत पाहत प्रेमाने बोलला,
"सखी ऽ, अगदी काळजातलं बोलू काय?"

सखीने आतुरतेने मान हलवली,
"बोला ना."

आपलं दोन दिवसांतील वागणं पाहून तो ते गुलाबाचं फुलं बघून हसत बोलला,
"माझा राग आलाय काय?"

सखी तोंड पाडून बोलली,
"नाही...
उलट माझा राग आला ना तुम्हाला?"

कृष्णा गुलाबाची एक एक पाकळी तोडत शांतपणे बोलला,
"राग नाही आला पण लय बेकार वाटलं."

त्याच्या हातावर हात ठेवून सखी मनापासून बोलली,
"खरंच साॅरी. कधीकधी इच्छा असूनही आपण आपल्याच इच्छेविरुद्ध वागतो."

कृष्णाही तिच्या डोळ्यांत पाहत मनापासून बोलला,
"सखी, तुम्हाला माझं वागणं पाहून वाटलं असेल, कृष्णा वेडा झालाय. बरोबर काय?"

सखी पुन्हा तोंड पाडून बोलली,
"नाही. उलट मीच कमी पडतीये या विचाराने माझंच मन मला खात होतं."

गुलाबाची एक एक पाकळी तोडत कृष्णा गंभीरपणे बोलला,
"मला बोलू द्या सखी... "

तिला डोळे भरून पाहत शब्दांची जुळवाजुळव करत कृष्णा काही क्षण तसाच थांबला.

मनाची कवाडं खुलू लागलेली. भावना कुठून तरी पाझरू लागलेल्या तसे दोघेही व्यक्त होऊ लागले.

कृष्णाच्या रुंद छातीवर हात ठेवत त्याच्या डोळ्यांत पाहत सखीने प्रेमाने विचारलं,
"काय पाहताय क्रिष्ण्?"

कृष्णा एकाच हाताने तिचा अर्धा चेहरा ओंजळीत घेऊन प्रेमाने बोलला,
"हा चेहरा कितीही पाहिला तरी मन भरतच नाही सखी.. मनातून फक्त एकच आवाज येतो-
अजून..  अजून... अजून!"

सखी लाजून गालात हसली. तिच्या डोळ्यांवरून नजर न उठवता कृष्णा तिच्या ओठांवरून हलकेच बोट फिरवत बोलला,
"या ओठांतून निघणारे बोल कितीही ऐकले तरीही  एकच आवाज अंतरंगात घुमत राहतो -
"अजून.. अजून.. अजून!"

ओठांवर फिरणाऱ्या त्याच्या बोटाच्या स्पर्शाने सखी शहारली. ती लाजरी हसली. त्याची प्रेम व्यक्त करण्याची पध्दत ही त्याच्यासारखीच वाढीव होती.
त्याचे प्रेमाने ओथंबलेले बोल ऐकून तरं आनंदाने तिचे डोळे ओले झालेले.

मनातील भावना व्यक्त करताना कृष्णाच्या ही डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या. कृष्णा पुन्हा हातातील गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या करत भाऊक होत बोलला,
"माझ्या या अवस्थेला तुम्ही काय बोलाल सखी?"

त्याची प्रेमाची कबुली सखीला झेपत नव्हती. तिचा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता.  ती हसताना ही तिच्या डोळ्यांतून पाणी आलं.
सखी हसता हसताच बोलली,
"तुम्ही….. तुम्ही प्रेमात पडलाय का?"


कृष्णाची छाती आनंदाने भरून आली. तो हसत बोलला,
"व्हय."

त्याच्या जवळ येत सखीने आनंदाश्रू वाहत विचारलं,
"को.... कोणाच्या?"

कृष्णा तिच्या गालाचा गालगुच्चा घेत हसतच बोलला,
"माझ्या बायकोच्या!"

कृष्णाकडून प्रेमाची कबुली होताना सखी आनंदाने थरथरत होती.
"क्रिष्ण् ऽ ऽ ऽ!"
ती आनंदाने ओठांत पुटपुटली.


तिच्या अंतरंगात आनंद मावत नव्हता. त्याच्याकडे पाहताना सखी हसता हसता रडली आणि हसतच त्याच्या हक्काच्या मिठीत शिरली. कृष्णाने तिला हसतच कवटाळलं. कृष्णाला घट्ट मिठी मारत सखी ओठांत काहीतरी बोलली.

आपलं प्रेम व्यक्त केल्यावर कृष्णाही आनंदाने हसला. आरतीसारख्याच सखीसाठीच्या भावना दाटून आल्याने त्याने सखीला घट्ट कवटाळलेलं. सखीच्या स्पर्शातून, तिच्या आनंदाश्रूंमधून तिच्या भावना त्याला कळत होत्या तरीही तिच्या तोंडून ऐकण्यासाठी तो आतुरला.

काही क्षण तिला बिलगल्यावर कृष्णा अधीर होत तिच्या खांद्याला पकडून बोलला,
"सखी, तुम्ही बोलणार नाही काय?"


सखी आनंदाने हसली. तिच्या मनीच्या भावना तरं बेलगाम झालेल्या. तिचे ओठ थरथरले.
सखी त्याच्या डोळ्यांत बघत हसता हसता थरथरत्या ओठांनी बोलली,
"क्रिष्ण् ऽ ऽ ऽ…"

काही क्षणांसाठी कृष्णाचं काळीज आनंदाने स्थिरावल्यासारखंं झालं.

सखी मोठा श्वास घेत आनंदाश्रू वाहत बोलली,
"मला तर कळलंच नाही मी कधी तुमच्या प्रेमात पडले. माझं... माझं ना तुमच्यावर अमाप प्रेम आहे क्रिष्ण्!"

कृष्णा शहारला. त्याचे कान जसे की तृप्त झाले. तो अत्यानंदाने बोलला,
"पुन्हा बोलाल काय!"

आपलं प्रेम व्यक्त करताना सखी लाजली. ती
डोळ्यांतील पाणी पुसत लाजून बोलली,
"अं हं ऽ!"

तिला लाजताना बघून कृष्णा हसत खट्याळपणे बोलला,
"आज जर तुम्ही लाजला, तरं तुमचं काही खरं नाही."

त्याच्या बोलण्याने तरं सखी लाजेने गोरीमोरी झाली. नजर पलंगावर जाऊन ती त्या गोड क्षणांच्या ओढीने बावरली. मावशीच्या साडीवर नजर जाताच ती लाजून ओठांत पुटपुटली,
"तुम्हाला साडी नेसताना पाहायचं----"

"नाही."
तिच्या बोलण्याचा अर्थ ओळखून तो तिच्या कानात कुजबुजला,
"आज साडी विस्कटण्याचा इरादा आहे."

त्याच्या बोलण्यानेच तिचे श्वास वाढले आणि ती साडीही लाजली.

'म्याऊ ऽ .. म्याऊ ऽ.. म्याऊ ऽ.'
खिडकीतून आलेली मनी सखीच्या पायात घुटमळल्यावर दोघांनाही एकमेकांकडे पाहिलं आणि हसले.

"आलेच."
बोलत सखी लगेचच स्वयंपाकघरात गेली. सखीने मनीला दूधभात खायला दिला, तिच्या नेहमीच्या वाटीत पाणी ठेवलं आणि तिच्या पाठीवर हात फिरवत हळूच बोलली,
"मनी, खाऊन शांतपणे झोप हं! मी जाते."

बोललेलं कळल्यासारखं मनीने "म्याऊ" केलं आणि सखीची नजर सहजच चुलीवर गेली. तिने कपाळाला हात लावला आणि आपल्या खोलीत आली. कृष्णा हातातील गुलाबाच्या पाकळ्या गालात हसत बघत होता की सखी अपराधीपणे बोलली,
"तुम्हाला भूक लागलीय का?"

कृष्णाने गालात हसत तिच्याकडे पाहिलं. सखीला खूप वाईट वाटलं. ती अपराधीपणे बोलली,
"साॅरी! मी.. मी स्वयंपाक केलाच नाही."

ती लगेच गडबडीत बोलली,
"मी खिचडी करते हं, होईल लगेच!"

कृष्णा हसत मुद्दामून बोलला,
"माझी आई घरात नाही तरं दोन घास मिळण्याचे ही हाल!"

सखीच्या जीवाला लागले त्याचे शब्द!
स्वतःचाच राग आला. कसली ही धुंदी!
अपराधीपणाने डोळ्यांत टचकन पाणी आलं आणि ती एवढासा चेहरा करून बोलली,
"खरंच साॅरी, मी दिवसभर तुमच्याच विचारांत होते पण स्वयंपाकाच माझ्या डोक्यातून गेलं म्हणजे भानच--"

"श्श ऽ!"
कृष्णाने तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि डोळे पुसत प्रेमाने बोलला,
"मी विनोदाने बोललो मास्तरीणबाई!"

"पण मला खरंच वाईट वाटतंय!"
सखी एवढासा चेहरा करून बोलली.


कृष्णाने तिला क्षणात उचलून घेतलं आणि पलंगाकडे जात गालात हसत बोलला,
"मग तुम्हाला शिक्षा तरं मिळायला हवी की!"

त्याच्या नजरेतील भाव पाहून त्याच्या मानेला हातांचा वेढा देत सखीने किंचित हसत होकारार्थी मान हलवली.

कृष्णा तिच्या ओठांकडे बघत मादकपणे बोलला,
"आज तुम्ही मला खा आणि मी तुम्हाला खातो, मग पोट भरतंय की."

सखीची लाजरी नजर झुकली.‌
कृष्णाने सावकाश तिला पलंगावर ठेवलं आणि हातातील गुलाबाच्या पाकळ्यांची तिच्यावर उधळण केली. अंगावर, पलंगावर पडलेल्या गुलाबाच्या पाकळ्या पाहताना सखी आनंदाने हसली. कृष्णा तिच्याजवळ सरकला की सवयीने तिची नजर उघड्या दरवाजावर गेली.

तिची नजर ओळखून कृष्णा हसत बोलला,
"घरात कोणी नाहीये."

ती लाजून ओठांत पुटपुटली,
"तरीही, प्लीज लावा ना दरवाजा!"

कृष्णाने हसत मान हलवली आणि दरवाजा आतून बंद करताना हसत बोलला,
"बरोबर आहे तुमचं, घरात कोणी नाहीये तरीही रिस्क नको, काय?"

सखी लाजरी हसली. झिरो बल्ब पेटला आणि त्या मंद प्रकाशात, मंद गुलाबाच्या सुगंधात कृष्णा संथपणे पलंगावर सरकला. पुन्हा एकदा नजरेला नजर भिडली. भावनांना जसं की उधाण आलं. ह्रदयाची धडधड दोघांचीही समान वेगाने होऊ लागली.

कृष्णा तिचा हात धरुन श्वास सांभाळत बोलला,
"एक सांगू काय?"

सखी त्याच्याकडे खेचली जात बोलली,
"बोला ना."

कृष्णा तिचा हात आपल्या गालावरून फिरवत सखीच्या डोळ्यांत पाहत प्रेमाने बोलला,
"तुमचा स्पर्श झाल्यावर माझ्या देहाची फक्त एकच मागणी असते सखी-
अजून... अजून.. आणि अजून."

मग त्याने सोडून सुद्धा तिचा हात त्याच्या उघड्या देहावरून हक्काने फिरू लागला. नजरेच्या संवादाला स्पर्शाची जोड मिळाली आणि स्पर्शच बोलू लागले. त्याच्या अलवार स्पर्शांनी ती मोहरली. त्याच्या ओठांच्या भिरभिरत्या ओल्या स्पर्शांनी ती फुलू लागली.

तिच्या नाजूक देहावर तितक्याच अलवारपणे प्रेमाची उधळण करताना कृष्णा त्याचा उरलाच नव्हता. समर्पित भावनेने आपल्या शरीराचा कण न कण त्याला अर्पण करू पाहणारी सखी तरी तिची कुठे उरली होती. तिच्या देहावरच नाही तरं तिच्या अंतर्मनावरही एकच नाव कोरलं गेलेलं -
'क्रिष्ण्... क्रिष्ण्... क्रिष्ण्'

फुलणाऱ्या श्वासांनी, धपापणाऱ्या देहांनी लाजून लाजेचे पडदे दूर सारले. त्याच्या वाढलेल्या श्वासांमध्ये तिचे लाजवीट हुंकार समरस होऊ लागले. जसे
श्वासात श्वास मिसळावे अगदी तसेच आज खऱ्या अर्थाने कृष्णसखी एकमेकांत समरस झाले.

© प्रियांका सुभा कस्तुरी
२४/१०/२०२४

.........


तुम्ही आतुरतेने वाट बघत होता या भागाची कल्पना आहे पण असले नाजूक क्षण शब्दांत उतरणं अवघड असतं म्हणून थोडासा वेळ घेतला.

भाग कसा वाटला जरूर जरूर कळवा! मागच्या दोन्ही भागाच्या समिक्षेसाठी मनापासून धन्यवाद!

भेटू लवकरच!)

🎭 Series Post

View all