पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१७७

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१७७


सुरेखाने लहानग्या आरवच्या मनात सावत्रपणाचं विष पेरावं! काय वैर होतं तिचं सखीसोबत याचा सखीलाच थांब पत्ता नव्हता पण सखीचा पारा मात्र असा सर्रकन चढला!

आतापर्यंत सुरेखाकडे दुर्लक्ष केलेल्यालाचा तिला खूप खूप पश्चाताप झाला. आज जणू शंभरावा गुन्हा करून सुरेखाचा घडा भरलेला.

सावत्र शब्दाची टोचणी खोलवर टोचल्यामुळे सखीमधील आईने फणाच काढला. ती आपल्या निऱ्या खोचत रागातच बाहेर गेली आणि पायरीवरून त्या रागाच्या धाराने सुरेखाला आवाज दिला,
"ए ऽ सुरखे ऽ.... बाहेर निघ!”


तिचा सूर ऐकनच कृष्णाने आश्चर्याने पाठमोऱ्या सखीकडे पाहिलं. त्यालाही सुरेखाचा राग आलेलाच पण सखीचंं पहिलं वहिलं भांडण डोळ्यांनी पाहण्याचा मान मिळाल्यामुळे तो मान पटकावत कृष्णा ओटीवरच थांबला.


कलाईच्या ओटीवर दोघीही सासु-सूना बोटभर लांबीच्या स्टिलच्या डब्यातील मशेरी तळहातावर घेवून ते बरबटलेलं बोट डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून पुन्हा डावीकडे फिरवत बसलेल्या की नवीनच खणखणीत आवाज ऐकू आला,
‘ए ऽ सुरखे.... बाहेर निघ!’


कलाई मशरी लावता लावता थांबली आणि आवाजाचा कानोसा घेत तोंडाचा चंबू करून बोलली,
“कंची बोलावते? सुरखे काय केलंस?”


सुरेखा मशेरी लावण्याचं काम थांबवून उसंत घेऊन बोलली,
“काय बी न्हाय.. मला यकतर फुड्यातली कामं सरंनात.. “


दोन वेळा श्वास घेऊन ही सुरेखा अजून बाहेर आली नाही, हे पाहून सखी पुन्हा तिथूनच जोरात ओरडली,
“ए ऽ सुरखे ऽ ऽ, बहिरे.. बाहेर निघ आधी..”


पुन्हा खणखणीत हाक आल्यावर कलाई पदरावर सांडलेली मशेरी झाडत बाहेर येत सुरेखावर खेकसली,
“नवा आवाज यतोय..कुनाला जोर आलाय.. सुरखे काय केलंयस सांग?”


सुरेखाला अंदाज होताच ती सखी असेल त्यामुळे सुरेखा आरामात आपली मांडी सोडत बोलली,
“बया, हिकडं माझ्या पायाला मुंग्या आल्यात.. त्यांना काय हाये, भांडुऱ्या बायांंना त्यवढीच कामं.”


सखी सोबत भांडायचं म्हटल्यावर सुरेखा लयीच खुष झाली. 'मुंबैचं यड माज्याशी भांडतंंय.’ स्वतःशीच उपहासाने बोलत सुरेखा, खूप दिवसांनी मनसोक्त भांडून सखीचा पानउतारा करण्यासाठी
हातावरची मशेरी झाडतच बाहेर आली.


सखीच्या आवाजाने सुरेखा बाहेर येईपर्यंत दिपाबाय, धुरपा, वासंती, रूपाली, सीता, नीता, अनिता, वनिता, अशा कितीतरी ‘ता’ आणि कितीतरी ‘बाई’ पटापट बाहेर डोकावल्या. चिल्ल्यापिल्ल्यांची, म्हाताऱ्यांची गर्दी झाली.


सुरेखा बाहेर आल्यावर त्या गर्दीवर नजर फिरवून, आपल्या चौकटीतूनच सखीकडे बघत साळसूदपणे बोलली,
“काय वं सखूआक्का? कशाला आवाज देताय?’


तिच्या त्या बोलण्याचाही सखीला राग आला आणि सखी कपाळावर आठी आणत रागावली,
“सगळ्यांसमोर आक्का? आणि पाठीमागून सखी? अगंं ऽ, किती दोन जीभी आहेस तू..”


मशेरीच्या तोंडावरून पदर फिरवत कलाईने कुतूहलाने विचारलं,
“आगं पन काय केलंय हिनं?”

सखी सुरेखाकडे बघून संतापली,
“आमच्या घरात विष पेरायला निघाली ही.. आरुला एकाच दोन सांगून भडकवून दिलं हिने.”


सगळ्या बायकांनी सुरेखाकडे उपहासाने पाहिलं कारण कोणाचं सुख पाहिलं की सुरेखाच्या पोटात दुखणार, हे सगळ्यांनाच माहीत होतं.


सुरेखा कमरेवर हात ठेवून ठेक्यात बोलली,
“मी तसलं काय बी केलं न्हाय.. उगा खोटं आळ घ्यायचं काम नाही.”


“खोटं?”
सखी पायऱ्यांवरून उतरून तरातरा आपल्या तालीवर आली आणि सुरेखाकडे बघून संतापाने थरथरून बोलली,
“अगं दोन तोंडी गांडूळ आहेस तू.. कधीच खरं बोलत नाहीस. माझ्या डोळ्यांनी मी तुला आरुला चॉकलेट देताना पाहिलंंय आणि आता पलटी मारतेस? खोटारडे.. आंबट तोंडे!”


सखी तालीवर गेल्यावर कृष्णा तिच्या शिव्या ऐकत आपसूकच हसत आंब्याखाली जाऊन उभा राहिला.


सुरेखा ही जीभ सैल सोडत तोऱ्यात बोलली,
“ए ऽ बया, आईकून घेते म्हनून काय बी बुलू नगं. आपण कदीच खोटं बोलत न्हाय.”

सखी रागात बोलली,
“गप्प बस, गांडूळ जिभे… “


'गांडूळ जीभ श्यॅ!’
कल्पना करूनच कृष्णाला कसंतरी वाटलं. दोन तोंडी सुरेखा नजरेसमोर येऊन कृष्णा एकटाच आंब्याखाली हसत होता.

सखीचं सुटलेलं तोंड पाहून सुरेखाला अंदाज येत होता.. आपण सखीला जरा जास्तच हलक्यात घेतलं, ती सुद्धा कंबर खोचत बोलली,
“ए ऽ सखे, लै जीभ वळवळ करत आसली तं दावीन माझा इंगा.”


सखी पहिल्यांदा इतकी रागवलेली; अक्षरशः संतापाने थरथरत होती. वाऱ्यामुळे निघालेला पदर पुन्हा कमरेला खोचून सुरेखाकडे बोट दाखवत ओरडली,
“मी मुंबैचं पाणी दाखवलं ना… तर पळता भुई थोडी होईल तुझी, हेकने.. आजीबाईच्या बुटात घालून अशी फिरवेन.. अशी फिरवेन की सरळ चौपाटीवर निघशील..”


सखीच्या कृपेने कृष्णाची बत्तीशी काही केल्या थांबत नव्हती. किती दिवसांनी तो एकटाच विनोदी कार्यक्रम पाहत असल्यासारखा पोट धरून हसत होता.

सोनाई घरात नसल्यामुळे सुरेखा ही सुटलेली. ती ही रागात बोलली,
“ए सखे, नादी लागू नको माझ्या.... तुला म्हायती न्हाय ही सुरखी काय चीज हाये.”


सखी नजर रोखून आपल्या बांगड्या मागे करत दम दिल्यासारखी बोलली,
“मला चांगलंच माहितीय, दुर्गंधीयुक्त गटारातला किडा आहेस तू.. ज्याला दुसऱ्यांच चांगल बघवत नाही, असा पापी आत्मा आहेस तू… मला एक जरी घाणेरडी शिवी दिलीस ना.. तरं खाली येऊन एका सुरखीच्या दोन सुरख्या करेन… कळलं काय?”


तिच्या या धमकीतूनच सोनाई आणि कृष्णाची छबी बाहेर डोकावली, वाण नाही पण त्यांचा गुण लागलेला!

बाहेर अचानक झालेल्या आरड्याओरड्यामुळे
दत्ता घाईघाईत अंघोळ उरकून ओल्या अंगावर कपडे चढवून बाहेर धावला. त्याला वाटलं दिपाबाय आणि सुरेखाची जुंपलीये पण सखीला भांडताना पाहून त्याने कपाळाला हात लावला-

सखी भांडते म्हणजे आपल्या बायकोने पुन्हा माती खाल्ली, हा त्याला आत्मविश्वासच होता.

दत्ता सुरेखालाच ओरडला,
“ए ऽ सुरखे, काय केलंस?”

सुरखा फणकाऱ्याने बोलली,
“आत्ता गं बया‌.. शेजारनी समूर बायकूची बाजू घ्याची आसती.”

दत्ताने मान हलवली आणि सखीलाच विचारलं,
“वैनी काय केलं हिनं? काय बुल्ली का?”


सखी सुरेखाकडे खाऊ की गिळू अशी बघत डाफरली,
“ही हिडिंबा माझ्या आरुच्या मनात विष पेरायला बघत होती. ह्या गांडूळ जिभेने त्याला सांगितलं,
तो माझ्या सावत्र मुलगा आहे आणि मी त्याची सावत्र आई आहे. आमच्या घरात नाक खुपसायची हिची गरजच काय?”


सगळ्या बायकांनी माना डोलावल्या आणि सुरेखाचा उद्धार ही केला-
अनिता कुजबुजली,
‘हिला काड्या टाकायलाचं यत्यात.’

सुनिता ही लगेच..
‘ही सुरखी त्यवढ्याचं कामाची.’

वनिता..
‘मास्तरनीनं चांगलं चिचून काढायला पायजे हिला.’

वासंती..
‘सोनाय आसती तं सुरखी बाराच्या भावातच गिली आसती.’

वनिता..
‘सोनाय नसली म्हनून काय झालं.. मास्तरीन काय कमी वाटली व्हय.. तिजा बी सोनाय सारखा व्हटाला व्हट कुठं लागतोय.’


इकडे गर्दीचं नेत्रसुख घेत, तोंड सुख घेणं चालू होतं तेव्हाच सखीचं बोलणं ऐकल्यावर दत्ता सुरेखावर ओरडला,
“ए ऽ सुरखे, कशाला यवढी गुनं उधाळतीस?”


सुरेखा लगेच साळसूतपणे बोलली,
“आता गं बया, मी काय केलं? आनि कदी सांगीतलं? मी तं दिपीबरुबर व्हते.. काय गं दिपे.”

समोरच्या अंगणात उभी असलेली दिपाबाय आपल्या मैत्रिणीसाठी धावून येत मान हलवत बोलली,
“व्हय.. व्हय.. ताय माज्याबरुबरच व्हत्या.”


मघापासून सखीचं दिपाबायकडे लक्ष नव्हतं. ते तिच्याच कृपेमुळे आता गेलं. आजवर खूप वेळा दोघीही सखीच्या डोक्यात गेलेल्या. त्या रागामुळेच सुरेखावरची जळजळीत नजर दिपाबाय वर आणत सखी गरजली,
“ए ऽ दिप्पे ऽ.. खोटं बोललीस तरं जिभेवर फिनेल ओतीन बघ.”


कृष्णाने हससंच त्या सगळ्यांकडे पाठ केली. त्याचे हसून हसून गाल दुखायला लागलेले. तो हसतच आरामात खाटेवर बसला. आता त्याला सखीची काळजी नव्हती, काय तयार झालेली ती!


“बया…” दिपाबायची बोटं लगेच ओठांवर गेली आणि ती काहीशी दबकून बोलली,
“मी खरंच सांगत्या.. आऱ्याच खोटं बोलला आसंल.. ल्हाना हाय त्यो.. त्याला काय कळतंय.”


सखी रागातच तालीवरून खाली उतरली. अंगणाच्या एका कोपऱ्यात जांभळीच्या फांद्यां खडसलेला ढीग रचलेला. त्यातील एक लांबसडक पातळ काठी सखीने खेचली आणि पुन्हा तालीवर उभी राहून ती काठी दिपाबायला दाखवत पुन्हा गरजली,
“किती वेळा सांगितलं तुला आरव बोलत जा.. लक्षात राहत नाही काय? आता पुन्हा आऱ्या बोललीस तर खाली येऊन सडकीन बघ.”


तीच काठी सुरेखाला दाखवत सखी तशीच गरजली, “आऱ्या-सुऱ्या बोलायला खायला घालत नाही तुम्ही लोकं.. शिस्तीत राहायचं आणि शिस्तीतच बोलायचं.”


कलाईच्या खालच्या दारात उन्हाला बसलेली म्हातारी आपल्या सुरकुतलेला थरथरता तोंडावर ठेवून हसत सखीचं कौतुक करत बोलली,
“बाय माजी! सोनायची सून म्हणजे दुसरी सोनायच! यकीला झाकून दुसरीला काढावी!”


तिच्या हातात काठी बघून सुरेखा सुद्धा दिपाबाय सारखीच घाबरली. ती लगेच भांडणाचा पवित्र सोडून देत बोलली,
“मी यवढं काय बोलले वं आक्का? ज्यं खरं व्हतं त्यंच सांगितलं ना?”


आजवर राग गिळून गिळून पिलेल्या सखीला आज इतका राग आलेला.. इतका राग आलेला की ती संतापाने थरथरायला लागलेली. तिचे गालही तिच्या डोळ्यांसारखेच लाल झालेले.


सखी हातातील काठी घट्ट पकडून सुरेखाकडे रागाने बघत बोलली,
“सुरखे, गांडूळ जिभे, करपी तोडांचे, जळाऊ लाकूड.. इतक्या वाईट वाईट शिव्या येतायेत ना तुझ्यासाठी.. तोंड बंदच कर हं ऽ.. खरं बोलायला माझंच घर सापडलं का तुला? पुन्हा खरं बोलण्याची तुला हुक्की आली ना.. तरं तुझ्या घशात एकदाच फेविकॉल ओतीन आणि कायमचंच तुझं तोंड बंद करीन.”


दिपाबाय आणि सुरेखा सखीचा रुद्रावतार बघून हादरलेल्या. त्या दोघींनाही सोनाई बरी वाटली पण सखी नको. दिपाबाय विषय संपत बोलली,
“ताय, माफी मागून इषय मिटवा.. तुम्ही खरं बोलायला जाताव पन तुमचंच ताॅंड दिसतं.”


दिपाबायच्या बोलण्याने तरं सखीचा पारा आभाळाला भिडला. सखी तिला हातातील काठी दाखवत प्रचंड रागात बोलली,
“ए ऽ दिप्पे ऽ, चिपट्याच नाक घेऊन मिरवतेस नुसती… मापात रहा जरा… दोघीही सारख्याचं.. उंदराला मांजर साक्ष..”


सखी आपल्या उजव्या हातातील काठीचा शेंडा डाव्या हाताने पकडून त्या दोघींकडे बघून भुकेलेल्या वाघिणीसारखी रागात बघत बोलली,
“शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा.. पण तुम्ही शहाण्या नाहीत. तुम्ही पुन्हा माती खाणारचं.... तुमच्या दोघींना मुंबईचंच पाणीच पाजते… थांबा…आलेच!”


सखी संतापाने थरथरत तालीवरून खाली उतरली. बायका, मुलं, म्हाताऱ्या, गडी माणसं.. सगळ्यांचे उत्सुकतेने श्वास आता वाढलेले. सुरेखा आणि दिपाबायचे भितीने हातपाय गार पडलेले.

सखीची गर्जना ऐकून दत्ता कृष्णाला मदतीसाठी साद घालत बोलला,
“मास्तर ऽ, आवंं.. आवरा की वैनींना.. “

सखी काठी हातात घेऊन तरातरा खाली निघालीच होती की अंगण उतरण्याआधीच कृष्णाने पुढे येऊन तिचं मनगट पकडलं. सखी हाताला हिसका देत बोलली,
“तुम्ही मध्ये पडू नका.. सोडणार नाही मी त्यांना.”


तिचे लालेलाल डोळे, लालभडक गाल, रागाने भरलेली ती नजर, संतापाने थरथरणार शरीर पाहून कृष्णालाच तिची काळजी वाटली. पहिल्यांदाच रागवलेल्या तिला राग झेपला नाही तर तिचा बीपी कमी जास्त व्हायचा, या काळजीने कृष्णा तिलाच समजावत बोलला,

“राहू द्या सखी.. बोलला तेवढं भरपूर झालं.”


सखी हाताला झटका देत खाली सुरेखाकडे बघत तशीच रागात बोलली,
“तिच्यावर चार काठ्या ओढेन तेव्हा भरपूर होईल.”


“बया…”
सखीचा राग पाहून सुरेखा घाबरून तोंडात बडबडली.

कृष्णा तिच्या हाताला धरून तिचं मनकट घट्ट पकडत काळजीने बोलला,
“बास झालं सखी, शांत व्हा.. नाही तर तुमचा बीपी वाढायचा.”

सखी त्याचं मनगट डाव्या हाताने सोडण्याचा प्रयत्न करत दिपाबायकडे बघून बोलली,
“तुम्ही सोडा आधी..”

कृष्णाने सखीला रोखलेलं पाहून दत्ता सुरेखावर डाफरला,
“ए ऽ सुरखे व्हय घरात.. का मारा खायाचा हाये?” सुरेखा लगेचच घरात गेली पण दरवाजा आडून चोरून सखीकडे बघतच होती.


सुरेखा घरात गेल्यावर सखीची नजर दिपाबायवर अडकली आणि दिपाबाय लगेचच पार्टी बदलत तोंड पाडून बोलली,
“सखूआक्का, मी तंं कवाच तुम्हाला काय बी बोलत न्हाय.. त्या तायंंच बोलत आसत्यात.”


“व्हय का शहाणे? तू हिकडं ये जरा.. तू काही बोलतेस का ते मीच सांगते.” सखी हाताला हिसका देत रागात बोलली.

दिपाबाय शहाणी बनून लगेच घरात पळाली आणि त्या दोघीही नजरेआड झाल्यावर सखी कृष्णावर ओरडली,
“तुमच्यामुळे सुटल्या त्या… सोडा मला.. कुठं जातात मी बघतेच.”


तिची थरथर पाहता, तिचा राग पाहून सखी आता ही जाऊन काठीने त्यांना शाबासकी द्यायला कमी करणार नाही, अशी कृष्णाला कुठेतरी खात्रीच होती.. त्यामुळे कृष्णा सखीचं मनगट घट्ट पकडून तिला घरात जवळजवळ ओढत नेत बोलला,
“तुम्ही आधी घरात चला.. आपल्याला असं भांडणं शोभा देत नाही.”


सखी त्याचं मनगट दुसऱ्या हाताने सोडत त्याच्यासोबत तशीच ओढली जात मागे बघून गरजली,
“ए ऽ गांडूळ जिभ्यांनो, पुन्हा जर माझ्याकडे पाहून हसताना जरी दिसला ना... तरं तुम्ही आहात आणि मी आहे. मुंबईचं पाणी कसं बोळ्याने पाजतात ते बघाच मग!”


उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
०७/०६/२०२४

………


कसा वाटला भाग…आणि कशी वाटली सखी!


🎭 Series Post

View all