Login

पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१७६

कृष्ण सखी

कृष्ण सखी-१७६


“क्रिष्ण् ऽ ऽ ऽ… मी… मी हरले हो ऽ … “ सखी रडवेली होत बडबडली आणि कृष्णा बावरला. त्याला काहीच अंदाज येईना.

“काय झालं सखी?.. मुलं तरं ठीक आहेत ना?”
बाईक चालू करत कृष्णाने घाबऱ्या आवाजात विचारलं.

सखी मुसमुसत बोलली,
“ठीक आहेत.

“मी… मी आलोच.. तुम्ही रडू नका काय.”
तो घाबऱ्या आवाजात बोलला आणि मनात शंकाकुशंकांचा समुद्र घेऊनच बिथरलेल्या मन:स्थितीत सुसाट वेगाने घरी यायला निघाला.


काही मिनिटांपूर्वी:

सखीने सोनाईला निरोप दिला. कृष्णाची बाईक गेल्यावर सखी पुन्हा मोकळ्या मनाने घरात आली. घर ही तिच्या मनासारखंच मोकळं होतं. सोनाई, सुरज, कृष्णा आत्ताच गेलेले. गौरी, आरव खालच्या आळीला खेळत होते. तिने पदर खोचला आणि हातात केरसुणी घेतली. देवघरातील झाडू मारल्यावर ती ओटीवर झाडू मारत आली आणि उंबऱ्यात कचरा भरत असताना सहजच तिची नजर समोर गेली तेव्हा सुरेखा आरवला हसतच चॉकलेट देत होती.

ते बघून सखी स्वतःचीच बडबडली,
‘आरुला खाऊ द्यायला दिवस कुठे उगवला.. जाऊ दे सखू, तुला वाटतं तितकी वाईट नसावी ती.’


सखी तिथून आतमध्ये आली आणि स्वयंपाकघरात केरसुणी फिरवतच होती की बाहेरून सुरात आरोळी आली,
“आयं ऽ ऽ, ए सवतार आयं ऽ ऽ ऽ..."


सखी जागीच स्तब्ध झाली. तिचे अंगावरचे केस ताठल्यासारखे उभे राहिले जणू आरवने तिच्या सनकन थोबाडीत मारलेली. तिचा आपल्या कानांवर विश्वास नसेना.. पुढच्या काही क्षणांत आरव नेहमीसारखा तिच्या कमरेला बिलगला आणि हसत बोलला,
“आयं ऽ, तू सवतार आय हायेस व्हयं?”


'सावत्र आई?' तो शब्द जणू सखीला कानांन शिसे ओतल्यासारखा वाटला.


सखी वाढलेल्या श्वासांनी कशीतरी बोलली,
“क.. काय बोलतोयस तू आरु? शांत.. शांत बस पाहू..”


आरव हसतच बोलला,
“सवतार म्हंजे काय आसंत पन?”


‘सावत्र’ हा शब्द त्याच्या तोंडून पुन्हा पुन्हा ऐकून सखीचं डोकं बधीर झाल्यासारखं झालेलं. आरवच्या तोंडून ऐकताना तरं तिच्या ममतेला वेदना झाल्या.


आरवने तिच्या कमरेचा वेढा सोडला आणि पाणी पिऊन दिंडीच्या दरवाजाने खेळायला गेला. सखी मात्र सुन्नपणे तशीच उभी होती.


‘ए ऽ सवतार आयं ऽ ऽ.’ आरवची ती हाक तिच्या कानांत घुमत होती. त्या शब्दाची सल तिचं काळीज कुरतडून काढू लागली.


सखी मोठे श्वास घेत कशीतरी पुटपुटली. दुःखाने बोलताना ही तिचे ओठ थरथरले,
‘कृष्णा, मी… मी सावत्र आई आहे रे .. विसरलेच होते.’


तिच्या सौंदर्यावर, तिच्या चारित्र्यावर लागलेले डाग
तिच्यातील स्त्रीने सहन केले पण आता ममतेवरच्या सावत्रपणाचा अकस्मात उपजलेला डाग तिच्यातील आईला सहन होईना!


तिच्यातील आई आक्रोश करत होती,
‘मी नाही सावत्र.. आरु माझाच मुलगा आहे.. मीच त्याची आई आहे.’

सखी सुन्नावस्थेत तशीच उभी होती की बाहेर खिडकीवरचा मोबाईल वाजला. ती जड पावलांनी बाहेर गेली. मोबाईल स्क्रीनवर सोनाईचं नाव पाहून तरं तिला रडूच आलं.

‘आई ….’ तिने लगेच मोबाईल कानाला लावला आणि पलीकडून सोनाई नेहमीसारखी मोकळ्या आवाजात बोलली,
“म्हाळसा ऽ, हितं बापूची रिक्षा भेटल्या.. मं मी आता त्याज्यासंगच जाते. किशना यिल बग घरी. घाबरू नगं तवर.”

“हम्म…” सखी कशीतरी हुंकारली आणि त्या गोंधळात सोनाईने फोन ठेवला.

सखी जड पावलांनी ओटीवर आली. बधीर झाल्यासारखी भिंतीला टेकून बसली. थरथरत्या हाताने तिने कृष्णाला कॉल केला आणि कॉल लगेच लागला.

तो नेहमीसारखा हसून बोलला पण त्याचा आवाज ऐकून तर सखीला जास्तच रडू आलं.

“बोला, काय बोलताय..”


सखीचा हुंदका गळ्यात दाटलेला. तो गिळत ती कशीतरी बोलली,
“क्रिष्ण् ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ‌….

“काय झालंय सखी?”
त्याने काळजीने विचारलं.


सखी भिंतीला टेकून डोळे बंद करून मुसमुसत बोलली,
“क्रिष्ण् ऽ ऽ ऽ… मी… मी हरले हो ऽ … “ हुंदक्यामुळे तिने बोलता बोलता तोंंडावर हात ठेवला.


“काय झालं सखी?.. मुलं तरं ठीक आहेत ना?”
त्याने घाबरून विचारल्यावर

सखी तोंडाने श्वास घेत कशीतरी बोलली,
“ठीक आहेत.”


“मी… मी आलोच.. तुम्ही रडू नका काय.”
पलिकडून तो गडबडीत बोलला आणि सखीने मोबाईल बाजूला ठेवून दिला.


‘शब्दांचे बाण काळीज चिरतात’ तोच अनुभव सखी घेत होती. ज्याला माझा म्हणलं. स्वतःच्या मुलापेक्षा प्रेम दिलं, माया दिली त्यानेच ‘सावत्र आई’ अशी हाक मारावी. याचा अर्थ ‘सावत्रपण’ त्यांच्यात आज ना उद्या डोकावणार.. म्हणजे तिच्या मातृत्वावर पुढे जाऊन बोट उचलणार. तिच्या मायेची किंमत होणार. कितीतरी वेदनादायी विचारांनी सखीच मन पोखरून खाल्लं.


वेदनेचा, दुःखाचा तो क्षण खूप नाजूक असतो, त्याचं क्षणात सखीच मातृत्व पोळून निघत होतं. ती लहान मुलासारखी रडायला लागली.


कृष्णा वेगाने घरी पोहोचला. बाईक अंब्याखाली रस्त्यावर उभी करून तो सखीला हाका मारतच घरात धावला,
“सखी ऽ ऽ.. सखी ऽ ऽ…”


धावत आलेला कृष्णा उंबऱ्यात अडखळला. सखी ओटीवर गुडघे उराशी घेऊन गुडघ्यांवर डोकं ठेवून बसलेली दिसली. तिला पाहून तो ओठांत पुटपुटला,
“सखी ऽ…”

घाईघाईने सॅंडल पायरीवर उतरवून तो तिच्याजवळ जात बोलला,
“सखी ऽ, काय झालंय?”

सखीने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तिचा रडलेला चेहरा पाहून कृष्णा बावरला.


‘नितीन तर पुन्हा आला नाही?’ या विचारासोबतच तो वेगाने आपल्या खोलीत, स्वयंपाकघरात, देवघरात सुद्धा डोकवला संपूर्ण घर मोकळं होतं. तो पुन्हा तिच्याजवळ गुडघ्यावर बसला आणि त्याने काळजीने विचारलं,
“काय झालंय सखी.. सांगताय काय आता?”

सखी मुसमुसत दुःखाने बोलली,
“क्रिष्ण् ऽ… आरु… आरु मला सावत्र आई बोलला हो.”

“क्काय??” कृष्णाच्या कानांना पचलच नाही. तो अविश्वासाने बोलला,
“तुम्ही चुकीचं ऐकलं असेल सखी.. तो कधीच असं बोलणार नाही.”

त्याच्याकडे पाहताना पुन्हा सखीचे डोळे भरले. ती थरथरत्या ओठांनी बोलली,
“मला सुद्धा हेच वाटलं की मी चुकीचं ऐकलं पण तो सावत्र आई असंच बोलला. सावत्र म्हणजे काय विचारत होता. मी त्याची सावत्र आई आहे, हे सुद्धा त्याला कळलं.”


कृष्णा तिचे डोळे पुसत तिला धीर देत बोलला,
“तुम्ही आधी शांत व्हा. लहान आहे तो..
त्याला काय कळतंय?”

सखी दुःखाने बोलली
“तो लहान आहे पण मी नाही. त्या शब्दाची सल मला जाणवतीये क्रिष्ण्.”

कृष्णा पुन्हा तिचे डोळे पुसत तिला प्रेमाने समजावत बोलला,
“तुम्ही ज्या अर्थाने पाहताय.. तो त्या अर्थाने बोललाच नसेल उगाच मनाला लावून घेताय तुम्ही.. शांत व्हा बरं..”


सखी रडवेली होत दुःखाने बोलली,
“तो नाहीच बोलला त्या अर्थाने पण सावत्र हा डाग तर लागला ना माझ्या पदराला?

बोलताना सखीचं मातृत्व असं उचंबळून आलेलं. हुंदक्यामुळे तिचे श्वास वाढलेले. ती मातृत्वाच्या दुःखाने बोलत होती,
“तुम्हाला खरं सांगू क्रिष्ण्, मी विसरूनच गेलेले हो.. की तो माझा नाही. आज त्याने हसता हसता मला आठवण करून दिली. आज त्याने विचारलं. उद्या पुन्हा विचारेल, त्याच्या उद्या पुन्हा… पुन्हा..”


सखी आपला चेहरा ओंजळीत घेऊन रडत बोलली,
“मला नाही सहन होणार हे! दुसरेपणाचा शाप अजून काय काय दुःख देणार आहे!
मला नाही सहन होतं हे…. “


कृष्णाच्या डोळ्यांच्या कडा सुद्धा ओल्या होत्या कारण ‘सावत्र’ शब्दाची टोचणी त्याला सुद्धा जाणवत होती. तिच्या मनातील भीती कुठेतरी त्याच्याही मनात होतीच की!

तिला रडताना पाहून कृष्णा तिला तशीच छातीशी कवटाळत बोलला,
“सखी, मी बदलेन सावत्र शब्दाची व्याख्या! मी सांगेन आपल्या मुलांना सावत्र म्हणजे काय!”


सखी बसल्या बसल्याच त्याच्या कमरेभोवती हातांचा वेढा देत मुसमुसत बोलली,
“तुम्हीच सांगा.. मला ते कधीच जमणार नाही.”


तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत कृष्णा घोगऱ्या आवाजात बोलला,
“आपण इतकं प्रेम देऊ आपल्या मुलांना की आपण सावत्र या शब्दाची व्याख्याच बदलून टाकू!”

“हम्म…” ती रडत हुंकारली.

कृष्णाने पहिलं स्वतःला सावरलं मग तिच्या डोक्यावरून तसाच हात फिरवत प्रेमाने बोलला,
“शांत व्हा सखी.. दोन मुलांची आई अशी रडते काय..”

सखी आपले डोळे पुसत त्याच्यापासून बाजूला होत बोलली,
“ती आई आहे… म्हणूनच रडतीये!”

तिच्याच पदराने तिचे डोळे पुसत कृष्णा उगाच हसत बोलला,
“आता रडायचं नाही काय.. मी बोलतो आरवशी.”

“हम्म….”

कृष्णाने लगेचच दिंडीच्या दरवाजातून मागच्या आळीला खेळणाऱ्या आरवला हाक मारली,
“आरव ऽ ऽ ऽ ऽ ऽ….”

रस्त्यावर खेळणारा आरव तिथूनच ओरडला,
“काय बाबा ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ..”

“घरी ये ऽ लगेच…..….”
कृष्णाचा मोकळा आवाज पोहचला आणि आरव धावतच घराकडे निघाला.

सखी लगेच काळजीने बोलली,
“अजिबात ओरडू नका हं आरुला.. प्रेमाने बोला.”

कृष्णा हसला,
“मला राग येतो काय?”

त्याच्या बोलण्याने सखी सुद्धा थोडीशी हसलीच,
“नाही तर.. तुम्हाला कुठे राग येतो.”

आरव धावतच मागच्या दाराने ओटीवर आला आणि धापा टाकत बोलला,
“काय बाबा?”

आरव तरं नेहमीसारखाच कृष्णाला हसतमुख वाटला. कृष्णाने शांत आवाजात विचारलं,
“काय करत होतास?”

“ख्येळत व्हतो. गौरीदीदी बी तिथंच ख्येळते.”

कृष्णा त्याचा हात पकडून आपल्या खोलीत जात गप्पा मारल्यासारखा बोलला,
“व्हयं काय.. पण खेळत काय होतास?”

आरव उत्साहात बोलला,
“लपाछुपी ख्येळतोय.. मी घरी आल्यालो कुनालाच म्हायती न्हाय, आता गन्या समद्यातनं शोधल.”

कृष्णा उगाचच हसत पलंगावर बसत बोलला,
“मघाशी तू तुझ्या आईला काय बोललास काय?”

“न्हाय…” आरव लगेच..

कृष्णाने पुन्हा उगाच हसत शांतपणे विचारलं,
“नीट आठव बरं.. काहीतरी विचारलंस ना तू आईला?”


आरवला आठवलं आणि तो नवीन गुपित कळल्यासारखा आनंदाने बोलला,
“व्हयं… व्हयं… मी आयला.. म्हंजी माज्या सवतार आयला इचारलं, की नेमकं सवतार म्हंजी काय?”

दरवाजात असणाऱ्या सखीकडे पाहून आरवने पुन्हा हसतच विचारलं,
“आय, तू सवतार म्हंजी सांगीतलंच न्हाईस की?”

‘सावत्र’... शब्द उच्चारतानाही सखीला कसंसच झालं. ती इकडे तिकडे बघत कशीतरी बोलली,
“मला नाही माहीत.”


आरवने नवीन गुपीत कळल्यासारखं पुन्हा आनंदाने विचारलं,
“व्हयं आयं ऽ,.. मी बी तुजा सवतार पोरगा हाये व्हयं?”


आरव किती सहजपणे बोलला पण त्याचे शब्द सखीच्या मनाला खोलवर लागले.

‘सत्य ऐकणंही कधी कधी दिव्यच असतं!’

सखी आपल्या अश्रूंना आळा घालत प्रेमाने बोलली,
“नाही आरु, तू माझा आहेस.”

“मं फकस्त तू सवतार आय हायेस व्हयं माजी?”
आरवने हसत विचारलं.

सखी पुन्हा नि:शब्द झाली. तिने वेदनेने कृष्णाकडे पाहिलं. तो ही दुःखाने आरवकडे पाहात होता.

चक्रव्यूहात अडकल्यासारखी तिच्या कृष्णाकडे जणू मदत मागत सखी या कृष्णाकडे बघत दुःखाने पुटपुटली,
“काय सांगू?”


कृष्णाने मोकळा श्वास सोडत तिला डोळ्यांनीच आश्वस्थ केलं आणि आरवचं मनगट पकडून त्याला आपल्या शेजारी बसवत बोलला,
“मी सांगतो.. इकडे ये.”

आरव उत्साहात आपल्या बाबांजवळ गेला.

कृष्णा त्याचे दोन्ही हात हातात घेऊन प्रेमाने बोलला,
“बरोबर बोललास तू.. सखी तुझ्या सावत्र आई आहेत.”

त्याच्या तोंडून असं काही ऐकून सखीला वाईट वाटलं. डोळ्यांत पुन्हा पाणी येण्याआधीच सखी खोलीतून बाहेर गेली तरीही कृष्णा आरवला काय सांगतोय हे ऐकण्यासाठी ती खोलीच्या बाहेरच घुटमळली.


“व्हयं ना.. मी पन ह्यंच बोल्लो की मं..” आरव आपण बरोबर बोललो, या आनंदात हसत बोलला.

कृष्णाने त्याचा हलकासा गाल थोपटला आणि त्याला समजावत बोलला,
“सावत्र म्हणजे काय माहितीये काय?”

“न्हायं.. मला काय बी म्हायती न्हाय म्हनून तं आयला इचारलं पन तिला बी म्हायती न्हाय.” आरवचं प्रामाणिक उत्तर आलं.

कृष्णा आरवच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलला,
“आरव, मी जे सांगतोय ते लक्षात ठेवायचं काय!”

“व्हयं बाबा.” आरव उत्साहात लगेच ताठ बसला.


कृष्णा तसाच त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ..सावत्र हा शब्दातील विष पुसून टाकण्याचा प्रयत्न करत तळमळीने बोलला,
“‘सा’.. म्हणजे सावरून घेणारी!
तुझ्या सगळ्या चुका, तुझ्या सगळ्या खोड्या हसत हसत आपल्या पोटात घेणारी, तुझ्या नाठाळ स्वभावाला तुझ्यासकट आयुष्यभर आपल्या पदरात सावरून घेणारी.. अशी!

‘व’... म्हणजे वरदहस्त ठेवणारी!
काहीही झालं तरी तुझ्या डोक्यावर आपल्या प्रेमाचा, तुझ्यावर असणाऱ्या विश्वासाचा वरदहस्त तिन्ही त्रिकाळ ठेवणारी.. अशी!

‘त्र’... म्हणजे त्रसरेणूसारखी!
तू कितीही दूर गेलास तरी त्रसरेणूसारखी अत्यल्प.. कणाकणाने तुझ्या अवतीभवती कायम आपल्या मायेच्या रूपात घुटमळणारी.. अशी!

म्हणजे ‘सावत्र!’ बघ सावत्र आई म्हणजे किती वाढीव असते नाही!” कृष्णा ही बोलता बोलता भाऊक झाला.


कृष्णाच्या तोंडून ‘सावत्र’ या शब्दाची जगावेगळी, कधीच, कुठेच न ऐकलेली, न वाचलेली व्याख्या ऐकून सखीचे डोळे भरून आले.

ती स्वतःशीच भारावून बोलली,
‘क्रिष्ण् ऽ तुम्ही कित्ती कित्ती चांगले आहात.. इतके उदात्त विचार एका निर्मळ मनातूनच जन्माला येऊ शकतात!’


आरवची छाती भलतीच फुगली. आरव स्वतःचाच अभिमान वाटल्यासारखा बोलला,
“मं आसली भारीवाली आय फकस्त माजीच हाये ना!”

कृष्णा हसला आणि त्याचे गाल थोपटात बोलला,
“हो फक्त तुझीच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव आरव….

लक्षात नाही.. तू आज मला शब्द दे!”
कृष्णा आपला हात पुढे करत बोलला.


आरवने लगेच कृष्णाच्या हातावर आपला हात ठेवला. शेवटी त्याचाच मुलगा!
तो बिनधास्त बोलला,
“काय बुलू?”


कृष्णा त्याच्या हातावर आपला हात ठेवत प्रेमाने बोलला,
“आज नंतर तू कधीही सावत्र हा शब्द तुझ्या तोंडातून काढणार नाहीस आणि तुझ्या आईला याबद्दल कधीच विचारणार नाहीस.”

“यवढंच ना.. मं लै लै दिला शब्द!”
आरव हसत बोलला आणि परड्यात लपण्यासाठी धावत गेला.


‘सावत्र’ या शब्दाचा दुनियादारीचा विषारी अर्थ तिला नकोच होता. आज कृष्णाने जो अर्थ सांगितलेला तो सखी कधीच विसरणार नव्हती.

त्याच्यासारखा कोमलचित्ती व्यक्ती आपला जोडीदार आहे, आपल्या मुलाचा बाप आहे, यामुळे तिला पुनः पुन्हा स्वतःचाच हेवा वाटला.

कृष्णा बाहेर आला तेव्हा सखी स्वतःमध्येच हरवलेली भिंतीला टेकून उभी होती. तो तिच्या खांद्याला हलकासा स्पर्श करत बोलला,
“सखी ऽ, लहान आहे आरव.. जाऊ द्या की आता.”


सखी आपले डोळे पुसत बोलली,
“मी रागवले नाही पण वाईट वाटलं हो…”


सखी तिच्या सख्याला तिच्या दुःखाची खोली दाखवत आपल्या काळजावर बोट ठेवून गहिवरून बोलली,
“इथे लागला हो शब्द.. माझ्या आईपणाला.. माझ्या ममत्वाला तो शब्द शिवी सारखा वाटला.” बोलता बोलता सखीचा चेहरा पुन्हा रडवेला झाला.


कृष्णा तिचे दोन्ही डोळे पुसत अगदी प्रेमाने बोलला,
“वेडाबाई! सावत्र या शब्दाचा मी आत्ताच अर्थ सांगितला.. तुम्ही ऐकला नाही काय? किती मोठा अर्थ आहे त्या शब्दाचा.. आणि तुम्ही शिवी बोलता!”


सखी त्याच्याकडे बघत हलकासा उसासा घेत बोलली,
“तुमच्यासारखी मी हाडाची शिक्षक नाही, त्यामुळे शब्दांचे साधेसे अर्थच लगेच माझ्या काळजाला भिडतात.”

अगदी सुरजसारखीच ती उसासे देताना गोड दिसत होती. तिचे डोळे पुसत तो पुन्हा प्रेमाने बोलला,
“पण आज पासून मी सांगितलेला अर्थच तुम्ही लक्षात ठेवायचा.”

..आणि नेहमीसारखा ठेक्यात पण प्रेमाने बोलला,
“लक्षात येतंय काय?”


सखी त्याच्याकडे बघून हलकीशी हसली. जांभळीच्या बुंध्याशी लपलेल्या आरवकडे पाहताना कृष्णाच्या मनात पाल चुकचुकली,
‘आजवर कधीच नाही आणि आज अचानकच त्याने अशी हाक कशी मारली? ही प्रश्नांची सरबत्ती कशी?’

कृष्णाने त्याला तिथूनच आवाज दिला,
“आरव, जरा इकडे ये.”

“श्शू ऽ बाबा हाक मारू नगा.. मी लपलोय.”
आरव तिथूनच तोंडावर हात ठेवून बोलला.

कृष्णा ओटीवरून आवाज सावरत बोलला,
"लगेच जा.. पण आधी इकडे ये."

आरवने बगळ्यासारखी मान करून इकडे तिकडे बघीतलं आणि सुसाट घरात आला,
"काय बाबा?"

कृष्णाने शांतपणे विचारलं,
"तू कुठे ऐकलायस तो शब्द? तुला कोणी काय बोललंय काय?"


"व्हयं. ती सुरखी काकू बुलली, माजी आय सवतार...... आय शाॅटच!" आरवने बोलता बोलता तोंडावर हात ठेवला.


आरव गुन्हा केल्यासारखा डोक्यावर हात ठेवून बोलला,
"आत्ताच शप्पत दिली आणि मोडली बी!”


कृष्णा हसला,
"बरं, एवढी वेळ माफ..."

आरव कानाला हात लावूनच स्वतःशीच बडबडला,
"यकबार चुकलं.. यकबार चुकलं‌." आणि पुन्हा पुढे बोलला,
"ती सुरखीकाकू बुलली माजी आय.. ती भारीवाली आय हाये आनि मी बी तिजा त्यो भारीवाला पोरगा हाये."


सुरेखाचा काळा चेहरा पाहून आपसूकच कृष्णाचा आवाज बदलला,
"बरं. आता जा खेळायला."


सुरेखाने लहानग्या आरवच्या मनात सावत्रपणाचं विष पेरावं! काय वैर होतं तिचं सखीसोबत याचा सखीलाच थांब पत्ता नव्हता पण सखीचा पारा मात्र सर्रकन चढला!

आतापर्यंत सुरेखाकडे दुर्लक्ष केलेल्यालाचा तिला खूप खूप पश्चाताप झाला. आज जणू शंभरावा गुन्हा करून सुरेखाचा घडा भरलेला.

सावत्र शब्दाची टोचणी खोलवर टोचल्यामुळे सखीमधील आईने फणाच काढला. ती आपल्या निऱ्या खोचत रागातच बाहेर गेली आणि पायरीवरून त्या रागाच्या धाराने सुरेखाला आवाज दिला,
"ए ऽ सुरखे.... बाहेर निघ!"


उर्वरित भाग पुढे...

© प्रियांका सुभा कस्तुरी
०५/०६/२०२४

.............

(बऱ्याच वेळा तुमच्या समिक्षेला प्रतिक्रिया देताना मी तुमची सखी आहे, असं समजूनच देते. त्यामुळे कधी कधी हक्काने काही बोलले तरं समजून घ्या. आवडलं नाही तर कळवू शकता..पण रागावू नका.)


सावत्र शब्दाची व्याख्या कशी वाटली आणि एकंदरीत भाग कसा वाटला जरूर कळवा.