पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१७४

कृष्ण सखी
कृष्ण सखी- १७४


कृष्णाची नेहमीसारखी तिच्यावर आलेली नजर तिच्यावरच अडकली होती-
भिरभिरत्या नजरेसोबत तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे ते मोहक हावभाव, मधूनच हलकेच थरथरून त्याच्या काळजाचा ठोका चुकवणारे ते फिक्कट गुलाबी ओठ, हवेमुळे हवेसोबत उडू पाहणारे वेणीतून बाहेर आलेले तिचे बारीक सोनेरी केस! तिच्या लालसर मऊसूद ओल्या गालावर आणि ओठावर पसरलेले ते दोन चार केस तर त्याला आगाऊच वाटले. ती मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून
हरवलेली समोरचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यात आणि
कोणीतरी हरवलेलं तिच्या चेहऱ्यावरचं ते नैसर्गिक मनोहारी सौंदर्य पाहण्यात!


सखी समोरच्या डोंगरावरून कोसळणाऱ्या मोठ्या धबधब्याकडे बारकाईने बघत होती आणि बघता बघताच ती शेजारी असलेल्या कृष्णाचा खांदा हलवत समोर बोट दाखवत उत्साहात बोलली,
“क्रिष्ण् ऽ तो पहा… तो पक्षी कसा मघापासून भिजतोय.”


तिच्या हलवण्याने, त्या आवाजाने त्याची शांतपणे लागलेली समाधी भंगली आणि त्याने तिच्या बोटाच्या दिशेने पाहिलं तर समोरच्या डोंगरावर घार, कोसळणाऱ्या धबधब्याभोवती इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करत होती.


सखी त्या घारीकडे बोट दाखवत तशीच नवल करत उत्साहात बोलली,
“पहा, पक्षांनाही धबधब्यात भिजावास वाटत.. आपल्याला वाटत पक्षी फक्त पाणी पिऊन बाजूला होतात.”


कृष्णा हसून बोलला,
“हे आम्हाला माहितीये. लहानपणापासून हेच तर बघत लहानाचे मोठे झालोय आम्ही.. मुंबईच्या माणसांनाच प्रत्येक गोष्टीचं अप्रूप!”


त्याच्या बोलण्याने आत्ताशी सखीची समोरून नजर हटली आणि ती लाडिकपणे रागावत बोलली,
“मुंबईची माणसं.. हा शब्द प्रयोग केल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही का?”


कृष्णा गुडघ्याभोवती आपले हात आवळत हसत बोलला,
“ते बोलल्यावर माझ्या जीवाला आणि जिभेला बरं वाटतं.”

प्रत्येक गोष्टीतंच त्याचं लयीच प्रामाणिक बोलणं! आतबाहेर जसा की एकच तो!


सखी हसली. तिने वर पाहिलं. काळ्या ढगामुळे त्यांच्या डोक्यावर आभाळाची सावली होती. साडेनऊ वाजून गेले असतील याचा तिला अंदाज होता पण या मोहक वातावरणात आणि त्याची सोबत असताना अजून थोडा वेळ बसण्याचा मोह तिला आवरता येत नव्हता आणि तो सुद्धा काही बोलत नव्हता.

आपल्यामुळे त्याला उशीर नको म्हणून शेवटी सखीच समोर धबधब्याकडे बघत बोलली,
“मी वेळेत पोहोचेन पण तुम्हाला उशीर होईल. तुम्ही इथूनच गेला तरी चालेल. मी जाईन एकटी.”


कृष्णा तिच्या चेहऱ्यावरच्या नजरेला त्रास न देताच बोलला,
“मी सरळ मिटींगलाच जाणार आहे, त्यामुळे उशीरा गेलो तरी चालतंय. तुम्हाला गडबड आहे काय?”


एव्हाना सखी समोर बघत असली तरी तिच्या लक्षात आलेलं. कृष्णा सरळसरळ तिच्याकडेच पाहतोय, त्यामुळे धबधब्याकडे पाहतानाही तिच्या गालात आपसुकच हसू येत होतं.


‘आपलं माणूस आपल्याकडे असं हरवून पाहतंय!’
किती सुखावणारी आणि गुदगुल्या करणारी भावना होती.


इथे त्यांना पाहायला कोणीही नव्हतं. ना कसली धावपळ होती. शाळेलाही अजून बराच वेळ होता. सखी समोर धबधब्याकडे बघतच गालात हसत बोलली,
“मलाही वेळ आहे.. थोड्यावेळ थांबूया इथंच!”


तिचा तो सुंदर लालसर चेहरा गालात हसताना तर काय दिसत होता! एकदम सुरेख!! तो चेहरा मोबाईल मध्ये टिपण्याचा मोह झाला आणि कृष्णाने लगेचच मोबाईल काढून तिचा स्वतंत्र फोटो काढला.

सखीने लगेचच त्याच्याकडे पाहिलं. कृष्णा मोबाईल समोर पकडून तिला अंगठा दाखवत बोलला,
“जरा जोरात हसताय काय.”

सखी त्याच्याकडे पाहून खरोखर हसली आणि कृष्णाने हसतच तिचा फोटो काढला. पुन्हा ते फोटो पाहताना तो स्वतःशीच कौतुकाने बडबडला,
“फोटो तर काय जबराट येतात तुमचे, काय खरं नाही बाबा!”

सखीला लाजल्यासारखं झालं!

आपल्या न विचारलेल्या केसांवरून बोटे फिरवत त्याने यावेळी परवानगी घेत विचारलं,
“एक सेल्फी काढणार काय माझ्यासोबत?”


सखीने हसून मान डोलवली आणि कृष्णा लगेचच बाजूला सरकला. खांद्याजवळ खांदा येऊन ही मोबाईल मध्ये चेहरे दिसेनात. त्याने हात दूर करून रात्रीसारखीच सेल्फी काढली आणि पुन्हा पाहिली.
त्याच्या मनासारखी आली नव्हती पण तोच फोटो पाहून सखी मात्र कौतुकाने बोलली,
“छान आहे आलाय फोटो.”


“छे! सेल्फी काय अशी असते काय.” कृष्णा मान हलवत बडबडला आणि तिच्या खांद्यावर एका हाताने हलकेच पकडून तिच्या डोक्याजवळ डोकं नेऊन मोबाईल मध्ये बघत बोलला,
“हसताय काय जरा..”

सखीने गालात हसत हळूच तिरप्या नजरेने जवळ आलेल्या त्याच्याकडे पाहिलं आणि कृष्णाने हसतच फोटो काढला आणि लगेचच सुरक्षित अंतर ठेवून तो बाजूला बसला. फोटोत तिला आपल्याकडे असं डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहताना त्याला गुदगुल्याच झाल्या. दोघांचा फोटो ही कडक होता.


“मला ही व्हाट्सअप वर पाठवा हं ऽ.”
सखी हळूच बोलली.

कृष्णा मोबाईल पुन्हा खिशात ठेवत हसत बोलला,
“असला लाड चालणार नाही काय.. माझे फोटो मी वाटत नसतो.”

सखी हसली,
“तुम्ही खवाटच आहात.. ते ही जात्याचे!”


कृष्णा तिच्याकडे पाहून मोकळेपणाने हसला. सखी ही हसली. कृष्णाने हसतच विचारलं,
“कोणाचं मागणं आलंय नैनाला?”


सखी पुन्हा विसरलेली. ती आता त्या ओलसर हिरवळीवर मांंडी घालून बसली आणि काय उत्साहात बोलली,
“तुम्हाला कधीपासून सांगायचं सांगायचं म्हणतीये.. पण मुहूर्तच नव्हता.”

तिचा उत्साह पाहून कृष्णाला हसू आलं,
“मग आता सांगा की.

सखी त्याच उत्साहात बोलली,
“मग ऐका तरं…. नाना प्रेमात पडलाय.”


“क्काय….???”
कृष्णाच्या गुडघ्याभोवतीचा वेढा या बातमीने क्षणात सुटला आणि तो ही सखीकडे फिरून बसत मोठ्ठ्या आश्चर्याने बोलला,
“कोणी सांगीतलं तुम्हाला? नानाने?”


सखी त्याची प्रतिक्रिया पाहून हसतच बोलली,
“सांगीतलं कोणीच नाही. मलाच कळलं.”


कृष्णा अविश्वासाने बोलला,
“हे! असं काय नसेल.. तसं असतं तर नाना मला बोलला असता की.”


सखी हसली,
“कदाचित तो पहिलं तुम्हालाच सांगेल पण त्याआधीच मला कळलं.”


तिचा आत्मविश्वास पाहून कृष्णाच डोकं सुन्न झालेलं. तो तिच्याकडे गोंधळून बघत होता. सखीने हसून विचारलं,
“मुलगी कोण असेल सांगा…. काही अंदाज?”


तिने मघाशी नैनाचा उल्लेख केल्यामुळे कृष्णा अंदाजे बोलला,
“नैना?”

सखी हसली,
“एकदम बरोबर.”


कृष्णा काहीसा गोंधळल्यासारखा हसत बोलला,
“तुम्हाला कसं कळलं? खबर शंभर टक्के खरी आहे काय?”

सखी वरून खाली मान हलवत हसतच बोलली,
“व्हय, एकदम खरी.”


कृष्णा इकडे तिकडे बघत मान हलवत हसतच बोलला,
“तरी मला वाटलंच होतं, हे बेनं सारखं लग्न लग्न करतंय.. प्रेमाचीच भानगड असणार.”


“पण तुम्हाला कसं कळलं?” कृष्णाने मध्येच आश्चर्याने विचारलं.


सखी हसत बोलली,
“तुम्ही कधी लक्ष दिलं नाही का? नाना नेहमी आपल्याला दारातूनच हाका मारतो आणि हाका मारताना नैनाताईंच्या घराकडे पाहतो.”


कृष्णा हसतच अंदाज लावत बोलला,
“असंय काय! तो सिग्नल देत असतो तरं.. “


सखी उत्साहात बोलली,
“हो.. मागे लावणी चालू होती तेव्हा तर नाना आपल्या अंगणात आणि नैनाताई त्यांच्या अंगणात एकमेकांकडे बघून किती भारी फोनवर बोलत होते.”


कृष्णा आश्चर्याने बोलला,
“तुम्हाला तेव्हापासून माहितीये!”


सखी हसली,
“हो ऽ, म्हणजे तेव्हाच खात्री पटली आणि तुम्हाला सांगता सांगता हा दिवस उजाडला.”


कृष्णा हसत बडबडला,
“च्यामारी! नाना तर लय छुपा रुस्तम निघाला. तोंडाला फेस येईपर्यंत बडबड करतो पण आजवर मनाचा थांब पत्ता लागू दिला नाही गड्याने!”


“कशी वाटली दोघांची जोडी?”
सखीने उत्सुकतेने विचारलं.


कृष्णा हसत पण मनापासून बोलला,
“दोघेही एक सारखेच आहेत. त्यामानाने नाना थोडा उजवा आहे पण त्याला पसंत आहे तर नैना ही चालेल. बडबडी असली तरी वाया गेलेली नाही. संसारिक मुलगी आहे ती.. सुलाईकाकूच्या हाताखाली वर्षभरात तयार होईल. सुखात राहतील दोघं.”


सखी तशीच उत्साहात बोलली,
“मग आता आपण काय करायचं? नानाच्या लग्नाचं बघायला हवं ना.. आपल्याशिवाय कोण पाहणार?”

कृष्णा हसत बोलला,
“हम्म… पण त्याला आधी तोंड उघडू तरं द्या.”
…आणि त्याने हसतच नानाला फोन केला.

कृष्णाचं नाव मोबाईलवर दिसतात नाना हसतच मोबाईल उचलून बोलला,
‘मला वाटलंच होतं तू फोटो प्रकरण विसरून जाणार.. आली का नाही माझी आठवण?’ स्वतःशीच बडबडला आणि त्याने हसतच फोन उचलला,
“बोल कृष्णा, काय बोलतोस?”


‘नानाने एका फोटोसाठी दीड दिवस तळमळत राहायला लावलेलं', रक्षाबंधनचा सखीचा फोटो आला तेव्हा कृष्णाची बैचेन जरा कमी झालेली. तो तळमळलेला दीड दिवस कृष्णा आयुष्यात कधीच विसरणार नव्हता. त्याच आठवणीने कृष्णा आळस देत बोलला,
“काम आहे जरा.. वेळ आहे काय?”

नाना घड्याळात नजर टाकत बोलला,
“पावणेदहा वाजलेत.. तुला बरा वेळ आहे आज?”

“तू कामाचं ऐक.”
कृष्णा सरळ मुद्द्याचं बोलला,
“आपली बहीण आहे म्हणजे माझ्या मित्राची बहीण.. ती माझी बहीण. तिच्यासाठी मुलगा पाहायचाय. तुझ्या ओळखीत कोणी सुशिक्षित, चांगली कमावती, चांगली मुलं असली तर कळव.”

नाना बरणीतलं चॉकलेट तोंडात टाकत सहज बोलला,
“एवढंच ना आपल्या गावात आहेत की एक नंबर चार-पाच मुलं.”

“होय काय.. कोण रे?”
कृष्णा हसला.

नाना चाॅकलेट चघळत बोलला,
“मुन्ना आहे बघ. तो इंजिनियर आहे.. चांगलं पॅकेज आहे त्याला मुंबईला. सुधीर पण कॉन्स्टेबल आहे बघ मुंबईला.. आणि दोघांच्या खोल्या पण आहेत हां.”

कृष्णा हसत बोलला,
“बरं पण तो सुधीर म्हणजे आमच्या शेजारच्या सुधीरचा मावस भाऊ काय?”

“हो तोच आणि वरच्या वाडीतला महादू पण आहे. माथाडी मध्ये मेथ्या मध्ये कामाला आहे. पोरगा चांगला आहे. सचिन पण आहे बघ.. कपड्यांच्या दुकानात कामाला आहे, वीस बावीस हजार पगार घेतोय.. पोरबरीच आहेत रे पण मुलगीच कसं काय? मुलगीचा बायोडेटा काय बोलतोय?” नाना एका दमात बोलून झाल्यावर कृष्णाच्या कुठल्या मित्राची बहिण असेल याचा विचार करू लागला.


मोबाईल स्पीकरवर असल्याने नानाचं बोलणं ऐकून
सखी ही हसत होती‌. कृष्णा विचार केल्यासारखा बोलला,
“मुन्ना आणि सुधीर ही दोन स्थळ मला आवडली. तुला काय वाटतंय?”

नाना बिनधास्त..
“एक नंबर आहेत.”

“व्हयं काय मग मी कळवतो तसं दत्ताला.”
कृष्णा हसू आवरत बोलला.

.. आणि दत्ताचं नाव ऐकताच नानाच्या घशात चॉकलेट अडकलं आणि तो ओरडला,
“कुणासाठी बघतोयस तू स्थळं? नैनासाठी?”


त्याचा घाबरलेला आवाज ऐकून कृष्णाला आता बरं वाटलं. तो हसत बोलला,
“व्हयं. नैनासाठी.”

नाना खुर्चीवरून उठत वैतागून बोलला,
“मग आधीच का नाही सांगितलेस? आपली बहीण का बोलला?”

“मित्राची बहिण ती आपली बहीण असते.”
कृष्णा हसून बोलला.

नाना वैतागून बोलला,
“तुझी बहीण असेल ती.. मित्राची बहिण ती माझी बहीण नसते.”

“गप्प बसतो काय! बरं त्या सुधीरचा नंबर पाठवून दे.”
कृष्णा मुद्दामून बोलला आणि नाना पाल अंगावर पडल्यासारखा विषय झटकत बोलला,
“नको नको तू सुधीर बेवडा आहे. लय दारू पितो.”

कृष्णाने लगेच भुवया उडवून सखीला खुणावलं. तो हसत बोलला,
“मग मुन्नाचा नंबर दे पाठवून. इंजिनीयर आहे ना.. चांगलं आहे.”

नाना गडबडून बोलला,
“तो सिगरेट पितो. सिगरेट शिवाय त्याचा दिवस सरत नाही.. आणि किती त्या त्याच्या मैत्रीणी.. नको. तो ही चांगला मुलगा नाही.”

कृष्णा आपलं हसू लपवत बोलला,
“महादू तो तर चांगला आहे बोललास..?”

नाना रागात बोलला,
“तो खाऊन खाऊन मातलाय नुसता.. आणि तंबाखू, पानसुपारी शिवाय मिनिटभर राहत नाही. तो तर रद्दच.”

त्याने मारलेली पलटी पाहून सखी तरं तोंडावर हात ठेवून हसत होतीच. कृष्णाने ही मोबाईल बाजूला घेऊन हसून घेतलं आणि पुन्हा मुद्दामून बोलला,
“वरची सगळी पोरं कामातनं गेलेली आहेत पण सचिन चांगलंय. त्याला मी ओळखतो. त्याचा नंबर आहे माझ्याकडं. चल, ठेवतो फोन.”


“ए ऽ ए ऽ कृष्णा.. लगेच कुठे ठेवतो? थांब की जरा.”
नाना टेन्शनमध्ये बोलला. त्याने आधी पाण्याची अर्धी बाटली खाली केली आणि मग सचिनचं तोंडभ कौतुक करत बोलला,
“तुला काय माहिती त्याच्याबद्दल? आमच्या शेजारी राहतो मला विचार सगळं. लय लफडेबाज आहे तो. एकदम बाद.. सहा महिन्यांत नवीन पोरगीसोबत फेसबुकला दिसतंय ते बेनं.. हुबलाक आहे तो.”

कृष्णा आपलं हसू लपवत स्थीर आवाजात बोलला,
“तुमच्या गावची सगळीच पोरं लय भंगार बघ!”

नाना लगेचच गडबडीत बोलला,
“तसं एक स्थळ आहे अजून.. बघ विचार करून..”

“व्हयं काय? कोणाचं?”
कृष्णा हसून बोलला आणि त्याने मोबाईल तळहातावर घेऊन सखीच्या आणि त्याच्या मध्ये पकडला.

पलीकडून नाना उत्साहात बोलत होता,
“आहे एक मुलगा.. प्रामाणिक आहे, दिसायलाही चांगला आहे. स्वतःचं दुकान आहे. शिक्षणही ग्रॅज्युएट आहे ग्रॅज्युएट! स्वतःचं घर आहे! स्वतःची बाईक आहे! अकाउंट मध्ये लग्नासाठी जमावलेले पन्नास हजार कॅश आहे! घरी फक्त एक आई आणि तो! बाकी कसलं टेन्शन नाही.” या मुलासाठी तू दत्ता दादाकडे शब्द टाकू शकतोस.

“हा मुलगा तुमच्या गावातला आहे?”
कृष्णने गंभीर आवाजात विचारल्यासारखं विचारलं.


“हो.. अगदी विश्वासातला आहे, बघ ना जरा.”
नाना केविलवाणा चेहरा करून बोलला.


कृष्णा अचानकच हसायला लागला,
“च्यामारी नाना! तुला सांगायचं राहिलं. रात्रीच दत्ताने कळवलेलं, नैनासाठी पोरगा बघितलाय.. आणि त्यांना स्थळ पसंत आहे. मी विसरलोच बघ.”

नाना गॅस वर होता कारण त्याला माहीत होतं तिच्या घरात मुंबईचाच मुलगा हवा होता. नाना टेन्शनमध्ये पुन्हा खुर्चीवरून उठला,
“खरंच व्हयं?”

“व्हयं तरं आणि मी उगाच एवढा वेळ वाया घालवला.” आणि कृष्णाने हसतच फोन ठेवला.

नाना पुन्हा संथपणे आपल्या खुर्चीवर गल्ल्याजवळ बसला. त्याला भयंकर टेन्शन आलेलं. काहीच सुचत नव्हतं. ‘तिचं लग्न ठरलंय’ हे ऐकून तरं तो फक्त रडायला बाकी होता. तिच्या घरचे तसे थोडे लालची, चित्र विचित्र आहेत हे तर त्याला माहीतच होतं. सगळं संपल्यासारखं त्याला वाटलं तेव्हाच त्याच्या नेहमीच्या रेडिओवर मघापासून वाजत असणार गाणं त्याला आत्ता ऐकू येऊ लागलं आणि नाना डोळे मिटून देवदास होत ते नावडतं गाणं ही आवडीने ऐकू लागला, जणू त्याच्यासाठीच रेडिओतील गायक रडत रडत गात होता-

तड़प तड़प के इस दिल से
आह निकलती रही है
मुझको सजा दी प्यार की
ऐसा क्या गुनाह किया
तो लुट गए… हाँ लुट गए ..


उर्वरित भाग पुढे

© प्रियांका सुभा कस्तुरी
०४/०६/२०२४

🎭 Series Post

View all