पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१०८

कृष्ण सखी एक रांगडी प्रेमकथा!
कृष्ण सखी -१०८

सखीचा राग आणि तिच्यासोबत भांडण्याच्या कल्पनेनेच कृष्णा हसत होता. त्याला सखीचा राग पाहण्याची उत्सुकता होती. ती त्याच्यासोबत कशी भांडेल हे पाहण्यासाठी तो आतुरलेला पण सखी शांत झाली. तिने टेन्शनमध्ये तिच्या सख्याला मनात साद घातली,
"कृष्णा, प्लीज क्रिष्ण् च काही ऐकू नकोस.. तुझी लीला दाखवून आमचं नातं बिघडवू नकोस. काही झालं तरी तू सोबत रहा रे आमच्या."

सखीला स्वतःत गुंग पदराच्या टोकाभोवती खेळताना बघून कृष्णा तसाच हसत बोलला,
"झालं का तुमच्या सख्याशी बोलून?"

"हं..?"
सखी त्याच्याकडे बघत हुंकारली.

तप्त जमीनीवर पावसाची हलकी सर यावी आणि पाण्याच्या प्रभावाने जमीनीवर शीतलता पसरावी अगदी असंच कृष्णाच झालेलं. काही क्षणांपूर्वी रागावरेला, भडकलेला कृष्णा आता प्रेमळ सखीच्या संपर्कात आल्यावर तिच्यासारखाच शांत झालेला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होत.

"सखी.."

"काय?"
सखी अगदी सहजतेने..

कृष्णा गमतीने बोलला,
"एकदा रागवा ना."

सखी त्याच्याकडे बघून हसली,
"काहीही.."

कृष्णाही हसला.. मग त्याने विनोद बाजूला ठेवून शांतपणे विचारलं,
"आईने तुम्हाला बाहेर बसायला सांगितल्यावर तुम्हालाही वाईट झाला असेल ना?"


तिला दुपारपासून दिलेली वागणूक, त्या बायकांचं बोलणं आठवणूच तिचा चेहरा उतरला. ती बारीक चेहरा करून बोलली,
"मला खूप वाईट वाटलं. हे सगळं माझ्यासाठी नवीनच त्यामुळे तरं खूप जड गेलं. आजवर जे लांबून पाहिलेलं, ऐकलेलं आज त्याचाच भाग होताना हे सगळं किती भयंकर आहे हे अनुभवलं.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला कोणालाच फरक पडू नये? फक्त देवाला पुढे करून हे सगळं केलं जातंय. एका स्त्रीला आपल्याच घरात अस्पृश्याची वागणूक दिली जातेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही."

सखी उदासपणे बोलली,
"आणि वाईट याचं वाटलं की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला अशी वागणूक देते."

सोनाईच्या वागण्याने तिला वाईट वाटणार हे सहाजिकच होतं पण कृष्णा लगेच आपल्या आईची बाजू तिच्या पुढे मांडत बोलला,
"माझी आई दुसऱ्या सासवांसारखी नाहीये. तिने जेवढं आयुष्यात बगितलंंय, त्यामुळे ती घाबरते. काही वाईट घडेल ही भीती नेहमी तिच्या मनात असते. त्यामुळे तिने तुम्हाला भावनेच्या भरात तशी वागणूक दिली असली तरी तिच्या मनात तसलं काही नव्हतं. तुम्हाला दुखवायचा तर ती विचारच करणार नाही.. तिच्या वागण्याला फक्त देवाची भीती एवढंच कारण होतं. तुम्ही आईबद्दल मनात भलता सलता विचार करू… "

"नाही नाही… आईंबद्दल मी स्वप्नात सुद्धा वाईट विचार करू शकत नाही. कधीच नाही." सखीची नैसर्गिक प्रतिक्रिया आली आणि कृष्णाने मोकळा श्वास सोडला.

आरतीच्या त्या दिवसांत तिच्या चेहऱ्यावर ओठाजवळ एक लालसर पुरळ यायची. ती आठवण येऊन कृष्णाने सखीच्या चेहऱ्यावरून त्या अर्थाने नजर फिरवली. तिचा चेहरा स्वच्छ होता. कुठेही हलकीशी काळपट टिकली सुद्धा नव्हता.

तिच्या चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या मनात आलं,
अरे असं कसं? आरु तरं बोललेली प्रत्येक मुलीला पिंपल्स येतात.. मग..?

मनात हे विचार घोळत असतानाच त्याची नजर सखीच्या चेहऱ्यावर ती खूण शोधत होती. तिचे गाल… नाक… हनुवटी.. अशी त्याची नजर खेळत राहिली.

तिच्याकडे पाहताना मनात हलकेच आरतीची आठवण डोकावली आणि तो स्वतःवरच हसला.

तारुण्यात प्रवेश केलेलं प्रेमीयुगल नुकतेच नवरा बायको ही झालेले. लग्नानंतर त्यांच्या प्रेमाचा बहर दिवसेंदिवस फुलत होता. रात्रीचं जेवण लवकरच व्हायचं आणि लवकरच ते दोघे एकांत शोधायचे अस असताना त्या रात्री स्वयंपाक घरातील आवरावर होऊन ही आरती त्यांच्या खोलीत आली नव्हती. तिची वाट पाहून कृष्णा वैतागला होता. बऱ्याच वेळाने आरती खोलीत आली तेव्हा कृष्ण पलंगावर बसूनच तिला तिरकसपणे बोलला,
"कशाला आलीस? जा की चूली पुढं शेकत बस."

आरती लगेच कमरेवर हात ठेवत ठसक्यात बोलली,
"गार लागल्यावर शेकतंच ना माणूस? भांडतोय काय असा?"

"अर्धा तास झाला तुझी वाट बघतोय त्याचं तुला काहीच नाही आणि वर माझ्यावरच आवाज चढवतेस?" कृष्णा रागात बोलला.

सोनाईला त्यांचं हे असलं बोलणं नवीन नव्हतं. सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्री कधीही दोघांच्या भांडणाचा सूर हाच! आपण नवीन नवरा बायको आहोत, थोडं हळू बोलावं या असल्या गोष्टी त्यांच्या डोक्याच्या बाहेर होत्या. आत्ता भांडले तरी पुढच्याच क्षणी गळ्यात गळा घालणार हे माहीत असल्याने सोनाई ही त्या दोघांमध्ये पडायचीच नाही.

त्यांची आताही बडबड चालू झाल्यावर सोनाई बिछान्यात शिरून गोधडी अंगावर घेत डोळे मिटत बोलली,
"किशना ऽ, बोलताना दरवाजा लावून बोलावं."


कृष्णा आरतीचा राग त्या दरवाजावर काढत तो अर्धवट उघडा दरवाजा.. धडाम.. असा आवाज येईपर्यंत पूर्ण उघडून आरतीकडे बघून बोलला,
"भांडताना कशाला लावायला पाहिजे दरवाजा? तो तसाच राहू दे की."

"लै शहाणा!"
आरतीने बडबडत त्याच्या दरवाजावरच्या हाताला हिसका दिला आणि दरवाजा बंद करून त्याच्याच सुरात बोलली,
"लग्ना आधीच चांगला होतास आता लै नवरा झालायंस जरा पण समजून घेत न्हायं."

तिचं असलं बोलणं आलं की, त्याला त्याच्या प्रेमावर बोट ठेवल्यासारखं वाटायचं. कृष्णा आरतीच्या कमरेत हात घालत गुरगुरल्यासारखा बोलला,
"व्हयं काय? आरे, कधी समजून घेतलं नाही तुला?"

कृष्णाच्या मानेला हातांचा वेढा देत आरती गाल फुगूनच मान दुसरीकडे फिरवून बोलली,
"आत्ताच कुठं घेतलं? उगा भडकतोय."

दुसऱ्या हातानेही तिची कंबर बंदिस्त करून तिला स्वतःजवळ खेचत कृष्णा तसाच कुरकुरला,
"व्हयं का? अर्धा तास तुझी वाट पाहतोय त्याचं काही नाही तुला?"

आरती त्याच्या मानेला हातांचा वेढा देऊन गाल फुगूनच दुसरीकडे बघत होती. कृष्णा सुद्धा तिला जवळ घेऊन तिच्याकडे हलक्या रागात बघत होता पण इतक्या जवळ असताना दोघांचा राग तग धरेल कसा?

कृष्णाची बोटे तिच्या कमरेवरून फिरली तशी आरती चुळबुळ करत हसायला लागली,
"ए किस्सू ऽ, गुदूकल्या नाही हा करायच्या."

ती हसल्यावर तिला एका हातानेच मिठीत बंदिस्त करत दुसरा हात तिच्या कमरेवर फिरवत कृष्णाही हसत बोलला,
"आता का… आता का.. आता रागवून दाखव."

आरती त्याच्या मिठीतच त्याचा हात पकडून हसायला लागली,
"बास की आता.. हसून हसून पोटात दुखायला लागलं."

त्या दोघांच खो खो हसणं ऐकून बाहेरून सोनाईने आवाज दिला,
"आरं हासताना तरी हाळू हासा.. झुपू द्या मला."


सोनाईच्या आवाजाने दोघेही अजूनच हसायला लागले. हसता हसता तिच्या कमरेला हातांचा वेढा देऊन कृष्णाने तिला जवळ ओढलं की आरती आपली हनुवटी वर करून हुंकारली,
"किस्सू ऽ.. हम्म ऽ ऽ.."

तिच्या खुणवण्याने कृष्णा मूडमध्ये गालात हसत हसला. तो गालात हसतच तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात आरतीने आपला चेहरा दुसरीकडे फिरवला आणि पुन्हा त्याच्याकडे बघत हनुवटी वर करून तशीच बोलली,
"अरे, हे बघ.. हे."

त्याच्या वेड्या मनाला तिला खुणावणाऱ्या ओठांपेक्षा
दुसरं काही दिसत नव्हतं. तो तिच्या ओठांकडे बघत बोलला,
"ते बोलवत्यात मला.. तुझं लवकर उरक काय आहे ते."

त्याच्या डोळ्यांत नेहमीसारखी नशा बघून आरती किंचित लाजत तिच्या कमरेवरचा त्याचा हात काढत बोलली,
"आज मला सुट्टी."

कृष्णा लाडाला येत बोलला,
"आरे दोन दिवस झाले तुझी बडबड ऐकत झोपतोय पण आज नाही हा.. " तो आरतीच्या ओठांवर बोट ठेवत मादकपणे बोलला,
"आज फक्त माझे ओठ बोलतील तुझ्या ओठांसोबत."

आरती त्याच्या स्पर्शाने शहारली आणि त्याचा हात
खाली घेत हसून बोलली,
"आज नाही जमणार.."

कृष्णा तिला पुन्हा जवळ घेत लाडात बोलला,
"पण मी आज तुझं काही ऐकत नसतो..."

आरती किंचित लाजत बोलली,
"किस्सू ऽ, समज ना.. " आणि पुन्हा ती हनुवटी वर करून बोलली,
"ही बघ ना इथं पिंपल आलीये."


तिने सांगितल्यावर कृष्णाच्या नजरेने आता तिच्या हनुवटीकडे पाहण्याचे कष्ट घेतले आणि तिच्या हनुवटीवर लाल पिवळी पुरळ पाहून तो त्या पुरळीवर ओठ टेकवत बोलला,
"असू दे.. तुझ्या सगळ्या चेहऱ्यावर जरी अशा पुरळ आल्या तरी मला फरक पडत नसतो."

आरती त्याच्याकडे पाहून हसली आणि पुन्हा ती पुरळ बोटाने दाखवत बोलली,
"ही फुटकूळी काही अशी तशी नाहीये. हा सिग्नल आहे माझ्या सुट्टीवर जाण्याचा."

"कसली सुट्टी?" कृष्णा थोडा गोंधळला.

आरती भुवया उडवत बोलली,
"ती… ती… "

कृष्णा आपलाच अंदाज लावत बोलला,
"मासिक सुट्टी?"

"व्हयं." आरती हसली.

कृष्णा लगेच तोंड एवढेच करून बोलला,
"ए ऽ आरे, लगेच कोण जात काय सुट्टीवर? आत्ताच चार दिवसांपूर्वी तर गेलेलीस ना?"

आरती त्याला मिठी मारत लाडीगोडी लावत बोलली,
"असं काय करतो किस्सू, महिना झाला की त्याला."

ती मिठीत आली तरी तिच्या कमरेला असलेल्या त्याच्या हातांचा वेढा सैल झालेला. ती जवळ असूनही तिच्यापासून चार दिवस दुराव्याच्या कल्पनेने तो नाराजीने बोलला,
"आरे, महिन्याला नको ना जात जाऊन.. दोन-तीन महिन्यांनी जात जा ना."

त्याच्या खांद्यावर ठेवलेली मान जराशी वर उचलून आरती ही तोंड पाडून बोलली,
"ते काय आमच्या हातात असतं का किस्सू? महिन्यालाच इतका त्रास होतो. दोन-तीन महिन्यांनी सुट्टीवर गेले तर माझा तर जीव जाईल."

तिचा उतरलेला चेहरा पाहून कृष्णाने काळजीने विचारलं,
"तुला त्रास होतोय काय?"

ती पुन्हा त्याच्या कुशीत शिरत तोंड पाडून बोलली,
"मला तर लै त्रास होतो."

तिला काळजीने आपल्या मिठीत बंदिस्त करत कृष्णा तिच्या डोक्यावर थोपटत बोलला,
"तुझा त्रास कमी करायला मी काय करू शकतो काय?"

आरती अजून त्याला घट्ट बिलगत बोलली,
"फक्त असाच मिठीत घे. तुझ्या मिठीत सगळा त्रास विसरायला होतं."


तिच्या केसांवर ओठ टेकवून कृष्णाने तिला आपल्या मिठीत बंदिस्त केलं आणि कुतूहलाने विचारलं,
"आरु, तो सिग्नल सगळ्या नवऱ्यांसाठी असतो काय?"

"व्हयं. तुझ्यासारख्या आगाव नवऱ्यासाठी तर असतोच."

"आगाव काय? मग हे घे… " कृष्णा हसतच बोलला आणि त्याची बोटे पुन्हा तिच्या कमरेवरून फिरू लागली तशी आरती.. "ए ऽ किस्सू ऽ नको ना.." अशी बडबडत खळखळून हसू लागली.

………….

कृष्णा ऐकतोय असं समजून सखी तिच्या मनाचा पडदा खोलत बोलली,
"तुम्हाला एक गोष्ट सांगू, मला ना भांडणाची खूप भीती वाटते. म्हणजे पहिल्यापासूनच.. लहानपणापासून वरच्या आवाजात बोलणार घरात कोणीच नव्हतं कदाचित त्यामुळे असेल.‌
पण आवाज जरा जरी कोणी चढवला ना.. तरी माझा जीव घाबरा होतो हो. मघाशी ते पाटील काका नाहीत का.. ते बोलत होते ना तेव्हा सुद्धा मी खूप घाबरलेले, त्यानंतर तुम्ही बोलायला लागल्यावर तर…" सखी बोलता बोलता थांबली.

त्याला असं तिच्याकडं एकटक बघताना पाहून सखी खाली बघूनच पदराचंं टोक बोटाभोवती गुंडाळत बोलली,
"तुम्ही बोलायला लागल्यावर तर खूप घाबरलेले मी. तिथलं वातावरण पाहून असं वाटलं होतं की खूप मोठं भांडण होणार.. याचा शेवट काय होणार? याचा विचार करून करून माझा जीव नुसता खाली वर होत होता..

पण तुम्ही…."
बोलता बोलता सखीच्या पदराचंं टोक तिच्या बोटाभोवती अगदी तिच्या शब्दांसारखंच संथपणे गुंडाळू लागलं.

त्यांचं कौतुक करताना सखी एक एक शब्द जसा का मोजून मापून बोलत होती,
"पण तुम्ही.. म्हणजे.. संपूर्ण गावासमोर असे निर्भीडपणे बोलला ना… ते.. म्हणजे… तुमच्या धाडसाचं कौतुक वाटतं मला.."

त्याच्याबद्दल खूप काही वाटत असताना एक एक शब्दच असा मुखातून बाहेर पडल्यावर ही सखी स्वतःशीच गालात हसत होती. कृष्णा अजूनही काहीच बोलला नव्हता. तो पाहतोय एवढेच पुरेसं होतं तिला लाजण्यासाठी.

त्याच्या बोलण्याची वाट पाहून सखीने अगदी संथपणे त्याच्याकडे पाहिलं.
कृष्णाला आपल्याकडे एकटक पाहताना बघून सखी खाली बघून गालात हसू लागली. किती सुंदर भावना होती ती.. कृष्णा समोर होता‌..तिच्याकडे पाहत होता. त्याच्या फक्त पाहण्याने सखीला लाजायला होत होतं.

धपाधप दरवाजावर थाप पडली तसे दोघेही दचकले. कृष्णाची तंद्री भंगली आणि तो दरवाजाकडे जात बोलला,
"दरवाजा फक्त ओढून घ्यायचा ना.. कढी का लावली?"

"ते… मघाशी बोलता बोलता लावली."
सखी स्वतःशी बोलल्यासारखीच बोलली.

कृष्णाने दरवाजा खोलल्यावर आरव आणि गौरी धावतच सखीजवळ आले. आरव तिच्या कमरेला हातांचा वेढा देत तक्रार केल्यासारखा बोलला,
"मला भायर ठिवून यकटीच बाबांबरूबर काय करत व्हतीस?"

त्याने निरागसपणे विचारलेला प्रश्न ऐकूण सखीला किती लाजल्यासारखं झालं.‌ ती त्याचं बोलणं टाळत कशीतरी बोलली,
"तुम्ही .. तुम्ही कुठे गेलेला एवढा वेळ?"

"आम्ही व्हयं…." आरव आपल्या खिशात हात घालत बोलला,
"गौरी दीदे तू सांगतीस का मी सांगू?"

गौरी सखीचा हात धरून तिला खोली बाहेर नेत उत्साहात बोलली,
"मामी आज मी तुमच्यासाठी यकमॅक आणलंय.. च्हला तुम्ही."

कृष्णा समोर आरव आणि गौरी सखीला बाहेर घेऊन गेले. त्या तिघांना पाहताना कृष्णाच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू होतं.

कृष्णा तिथेच होता की बाहेरून आरोळी आली,
"मास्तर ऽ ऽ ऽ .. ओ ऽ मास्तर ऽ ऽ ऽ."


कृष्णा उंबऱ्यात येईल तोवर सोनाई खेकसली,
"कशाला आलायंस? च्हंल निघ हितंन."

राकेश अंगणाच्या पायरीवरूनच बारीक तोंड करून बोलला,
"ए ऽ काकू ऽ, माझ्याव कशाला कावतेस? मी काय केलंय?"

कृष्णाने दरवाजातूनच विचारलं,
"काय रे राकेश?"

राकेश महत्त्वाची बातमी सांगत असल्याच्या अविर्भावात बोलला,
"आवं मास्तर, आता आठ वाजताच आर्जंट मिटिंग हाये. तुम्हाला बी बोलावलंय."


मुलांना खायला देऊन सखी ही ओटीवरून ऐकत होती. राकेश पाठोपाठ अजून तीन-चार मुलं इकडे येताना दिसले त्यांना बघून सोनाई खाटेवरून उठत बडबडली,
"कुनी बी आंगनाच्या वर याचं न्हायं. तिथंच थांबायचं."

कृष्णा आपल्या शर्टची बाही दुमडत अंगणात जात बडबडला,
"आई ऽ, ते काय बोलतात ऐकू तर दे. तू पण ना एकदा चालू झाली की थांबत नाहीस."


सखी दरवाज्याच्या आडूनच फक्त त्यांचा संवाद ऐकत होती. मीटिंग होती.. कृष्णाला बोलावलेलं, हे ऐकूनच ती अस्वस्थ झालेली.

सोनाईची बडबड चालूच होती,
"आता कशाला आलीतंय मास्तर मास्तर करत? मगाशी तो पाटील काठी आपटत बोटं नाचवत व्हता तवा काय तुमचं डोळं झाकलेलं व्हयं? आख्ख्या गावासमूर तुमच्या मास्तरावनं त्वांडाला यिल त्यं बोंबलंत व्हता.. तवा काय कान बंद केल्यालव व्हयं समद्यांनी? आता बी पाटील त्याजी मानसं घिवून यिल तवा बी फकस्त बगतच बसा."

सोनाईचं बोलणं ऐकून भीतीने सखीचा हात आपल्या डोरल्यावरून फिरला आणि ती स्वतःशीच बडबडली,
"पाटील माणसं घेऊन येईल? कृष्णा.. मला भीती वाटतेय रे.."

सोनाईच्या बोलण्याने नाही म्हटले तरी मुलं खजिल झालेली कारण बोलण्याची इच्छा असूनही तेव्हा सगळे मूग गिळून गप्प होते. कृष्णा सोनाईला हातानेच गप्प बस असं खुणावत बोलला,
"थोडावेळ गप बसशील काय?"

सखी दरवाज्याच्या आडूनच बघत होती. कृष्णाने सांगून सुद्धा सोनाईची बडबड चालूच होती. सोनाईच्या धाकामुळे सगळे अंगणाच्या खाली उभे होते. कृष्णा अंगणाच्या पायरीवर उभा राहून त्यांच्याशी बोलत होता‌. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन सरळ सरळ दिसून येत होतं. काहीतरी गंभीर चर्चा चालू होती. त्यांचे चेहरे बघूनच सखीचा जीव वर खाली होऊ लागला.

कृष्णा मला भीती का वाटतेय रे... सखी स्वतःशीच बडबडत होती.

कृष्णाचा राकेशसोबत बोलतानाचा आवाज दारापाशी आल्यावर सखी लगेच मागे झाली. कृष्णाचं इकडं तिकडं लक्षं नव्हतं. तो तसाच बोलण्याच्या नादात घरात आला आणि सॅंडल चढवत बोलला,
"आज एक घाव दोन तुकडे झाल्याशिवाय मी पण ऐकत नसतो."

त्याचं बोलणं ऐकून तरं सखी पुरती घाबरली.

"पाटील बी कच्चा न्हायं.. बगीतलंव ना तुम्ही?"

"आजपर्यंत त्यांच्या वयाचा मान राखत होतो पण आता पाणी डोक्यावरून गेलंय."
बोलता बोलता कृष्णाने दुसरा सॅंडल सुद्धा चढवला.

त्यांचा संवाद ऐकताना सखीचा जीव घाबरा झालेला.
पाटीलांच्या काठीचा ठेका आठवून आताही भीतीने तिच्या काळजाचा ठेका चुकत होता. पाटील आणि त्यांच्या डोळ्यांतील कृष्णा प्रति ईर्षा ही तिला विसरण्यासारखी नव्हतीच!

त्याच्या काळजीने सखी अस्वस्थ झालेली. त्याला पाटलांकडून काही दगा फटका झाला तर? विचारानेही ती रडवेली झाली.

कृष्णा बोलण्याच्या नादातच सॅंडल घालून निघाला तसं सखीने त्याला थांबवण्यासाठी लगेच त्याचं बोट पकडलं.

"माझ्या मतावर मी ठाम….." कृष्णा उंबऱ्यातून बाहेर पाऊल उचलत होता की पाठून त्याचं बोट पकडलं गेलं. त्याने क्षणात मागे पाहिलं. सखीच्या डोळ्यात पाणी होतं. तिची नजर लगेच झुकली. त्याचे बोटही सुटलं गेलं. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि नाही अशी मान हलवत डोळ्यांची कडा पुसत.. त्याच्या काळजाचा ठाव घेऊनच आपल्या खोलीत गेली.

"मास्तर पाटलाचा डाव आज त्याज्यावंच उलटावायचा… काय बोलताव?"


राकेश बोलला खरा पण कृष्णाचं चित्त त्याच्या खोलीत सखी जवळ होतं.

"मास्तर च्हलताव ना?"

राकेश बोलल्यावर कृष्णा पायातील सॅंडल उतरवत गडबडीत बोलला,
"तुम्ही पुढे व्हा.. मी आलोच."


उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
२८/०२/२०२४

………

(तुमच्या समीक्षांसाठी मनापासून धन्यवाद..

भेटू लवकरच!

कदाचित उद्याच!)

🎭 Series Post

View all