पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१०५

कृष्ण सखी एक रांगडी प्रेमकथा!





कृष्ण सखी - १०५


रविवार सोडला तर सर्वांचा दिनक्रमच ठरलेला. शाळेतून यायचं. हातपाय धुवायचे आणि टेकडीवर चालायला जायचं. मुलांसाठी टेकडी म्हणजे खेळण्याचं ठिकाणच झालेली. त्यांच आवडतं ठिकाण! म्हणून तरं मुलं शाळेची घंटा वाजताच दप्तर खांद्यावर अडकवून घर गाठायचे.

कृष्णासाठी चालायला जाणं म्हणजे
सखीसोबतचा सहवास होता. त्यांच्या हलक्या फुलक्या गप्पा होत्या आणि न सांगता येणारी ओढ होती. त्यामुळे कृष्णा सुद्धा टेकडीवर जाण्याच्या ओढीने पंधरा मिनिटांत घरी पोहचायचा.

सखीसाठी टेकडीवर जाणं म्हणजे तो सूर्यास्त, तो गरम चहा आणि चहा पिताना न विसरता त्याचं "फुंकून प्या." हे सांगणं आणि तिथूनच त्याचे किस्से चालू होणं.  त्याला ऐकताना तिच्या चहाची चव जशी द्विगुणीत व्हायची, त्यामुळे सखीसाठी टेकडीवर जाणं हा एक सुखद प्रवास होता.

त्या दोघांमधील वाढलेली सहजता पाहून सोनाई देखील त्यांच्या चालायला जाण्यावर खुष होती. थोडक्यात सगळेच टेकडीवर जाण्यासाठी दररोज उत्साही होते.

आजही सखी संध्याकाळची वाट पाहत दुपारी सोनाईसोबत अंगणातल्या खाटेवर  घरचे उडीद निवडत बसलेली. एवढ्यात हातात कुंकवाचा करंडा घेऊन कलाई अंगणाच्या पायऱ्या चढून त्यांच्याजवळ आली आणि सखीच्या कपाळावर हळदी कुंकवाची बोटं टेकवीत बोलली,
"काय करताय किशनाची आयं?"

"उडीद निवडत्या." सखीच्या कपाळावरचं हळदी कुंकू पाहून सोनाई अंदाजे बोलली,
"काय गं कले, सवासनी घालत्यास का काय?"

मिसरीची पिचकारी बांधावर मारून पदराने तोंड पुसल्यावर कलाई बोलली,
"माझ्या न्हायं, धुरपीच्या हायेत."

पांढऱ्या कपाळामुळे स्वतःला कधीच इच्छा असूनही देवाधर्माच्या कार्यात सामील होता आलं नाही त्याचं दुःख सोनाईच्या मनात तसंच होतं पण आता सखीमुळे तिची ती सल भरून निघणार होती.

सखीला पहिल्यांदाच सवाष्ण म्हणून भावकीत सांगण्यात आलं होतं, तिला पहिल्यांदाच भावकीत सुवासिनीचा मान दिला गेलेला त्यामुळे सोनाई मनोमन खुषीत होती पण चेहऱ्यावर तसं न दाखवता ती उडदांमध्ये बोटं फिरवतच कलाईला उद्देशून तोऱ्यात बोलली,
"आतापतूर चाललं पन याफुड माज्या बी घरात आता लक्षूमी हाये ह्यं इसरू नगा."

नियमात घावल्यावर सोनाई सोडत नसते हे माहीत असल्याने.. सोनाईच्या धाकाने कलाई खाटेवर टेकत उगाचच हसत बोलली,
"आवं आसं काय करताय किशनाची आय. पैल्यांदा हितनंच सुरवात केले बगा."

"कुठल्या हायेत?"

"आवं रगंड हायताय.. पाच घरातल्या, पाच रासायच्या, पाच जननीच्या समद्या यकदमंच घालत्या." सुवासिनी सांगायला आपल्याला त्रास पडल्यामुळे कलाई जरा नाक मुरडतच बोलली.

"इतक्या माणसांचं जेवण त्या एकट्या करणार?" सखीने आश्चर्याने विचारलं.

"यकटी कशाला? मं भावकी कशाला आसती? लै न्हाय पन तीस चाळीस मानूस उठंल. चार घरच्या चार आल्याव व्हवून जाईल. उद्याच्या दिस तू बग घरचं मी जाईन सकाळचीच."

उडीद निवडता निवडता सासु सूनेचा संवाद चालू होता. बऱ्याच दिवसांनी त्यांच्याकडेला बसल्यामुळे कलाईसुद्धा निवांत बसलेली. त्या दोघींना असं गोड गोड बोलताना पाहून, आपल्या नशिबी अशी सून का नाही? म्हणून तोंडातल्या तोंडात तिने सुरेखाला चार शिव्या समर्पित सुद्धा केलेल्या.

सखीकडे पाहताना इकडे कलाई सुरेखाची आठवण काढत होती आणि खाली अंगणातच सुरेखा दिपाबासोबत इकडेच बघत कुजबूज करत होती.


त्या दिवसानंतर सखी सुरेखा आणि दिपाबायसोबत एक शब्दही बोलली नव्हती. तिच्याशी बोलण्याच्या निमित्तानेच त्या दोघींची खुसूरफुसूर झाली आणि दोघीही सोनाईच्या अंंगणात आल्या.


सुरेखाला पाहून कलाई लगेच नावडीने बोलली,
"काय गं सुरखे, हिकडं कशाला आलेस?"


सुरेखा बोलणार एवढ्यात सोनाईचं सुरेखाच्या बाजूने बोलली,
"बसू दे की मानसात.. तुजं काय डोकं धरून बसायचं हाये का?"

आपल्या सासूला तोडीस तोड दिल्याचा आनंद सुरेखाच्या चेहऱ्यावर उमटला. ती सखीच्या शेजारीच ताटली घेऊन बसलेल्या सुरजच्या हातातील ताटली खेचत हसत बोलली,
"ए ऽ सुऱ्या, दे की मला ताटली."

सुरजला सुऱ्या म्हटलेलं सखीला रुचलं नाही.‌ ती उडीद निवडतंच सुरेखाला उद्देशून बोलली,
"सुरज नाव आहे त्याचं."

"घरातली बोलत्यात त्यं चालतं वाटतं?" सुरेखा मनातच चरफडली पण चेहऱ्यावर हसू आणत बोलली,
"व्है की, इसारलेच व्हते बगा."

सुरज ती ताटली पकडून सुरेखाकडे बघून गाल फुगवून बोलला,
"मै नहीं देगी.. मी बी दळान करते."

"मुंबेच यडं."
सुरेखाने मनातच आनंद घेतला आणि दिपाबाकडे बघून हसली. तिचं हसणं बघून सखीला सुरेखाचा राग आला. तिने गुपचूप सुरजच्या हातातील ताटली सुरेखासमोर ठेवली आणि त्याला मांडीवर घेऊन उडीद निवडू लागली.

सखी, सोनाई, कलाई तिघीही खाटेवर बसलेल्या. एकाच ताटलीत थोडे उडीद घेऊन दिपाबाय आणि सुरेखा आंब्याच्या सावलीत खाली बसल्या.

दोघींची खुसूरफुसूर इथेही चालू होती.
"दिपे, तू बोल... "

"आवं मी किती यळा बोलले पन सखूआक्का बोलतंच न्हायं माज्याशी."

"समद्यांशी बुलती मं आपून दुघींनीच काय घोडं मारलंय हिजं?"

"बगा की आता."

त्या दोघींचं कुजबूज चालू होती की सोनाईने सुरेखाला सहज विचारलं,
"सुरखे ऽ, तू बी आसशील ना सवाशीन?"

"आव आत्या, सवासनी परवा पायजेत आनि माजा म्हैना भरतोय ना. तारीख जरा बी हिकडची तिकडं नसती माजी." सुरेखा उडदामध्ये बोट फिरवत अगदी सहज बोलली.

"दिपे तू गं?"

दिपाबाय सुद्धा सुरेखाच्या ताटलीत बोट फिरवत बोलली,
"मी हाये बया सवाशीन, आजचं पाचवा दिस."

"हिजी आजची आंगूळ त्यं बरं झालं पन आता सुरखी भायरची झाल्याव घरात आनि तिकडं माजाच पिठ्या पडंल नुसता. मंडम बसंल आरामात."

कलाईचं बोलणं सुरेखाने ठसक्यातच खुडलं,
"तं? न्हेत लै आराम करते. बोलन करत्यात.. हूं."

कलाई सोनाईकडे लगेच तक्रार करत बोलली,
"बगितलंं ना किशनाची आयं? कशी आंगाव यती? मी बोलल्याव माजं त्वांड दिसतं तुम्हाला?"

"तू बी कमी न्हायंस.. जरा मवाळपनान बोलत जा की." कलाईला जरा नरमपणे बोलल्यावर सोनाई सुरेखाला नेहमीसारखी ठसक्यात बोलली,
"सुरखे, तुझं लै यळा बगितलंंय. चार मानसात सासूशी बोलताना आवाज कमी ठेवावा यवढं बी कळंत न्हायं व्हयं तुला?"

"आता भायरची व्हनं काय माज्या हातात हाये व्हयं आत्या?" सुरेखा आंबट तोड करून बोलली.

मघापासून पाळीबद्दल किती सहज बोलत होत्या त्या.. सखीला त्यांचं खूप नवल वाटलं. उडदातील खडा काढतच दिपाबायने ही तितक्याच सहजतेने विचारलं,
"सखूआक्का, तुम्ही बी आजून भायरच्या झाला न्हायं ना? कदी म्हैना भरतो तुमचा?"

दिपाबायच्या बोलण्याने सोनाई, सुरेखा, कलाई तिघींच्याही माना सखीकडे वळल्या. सखीला आजवर असं कोणी विचारलंच नव्हतं. तिला कसंतरीच वाटलं.‌

दिपाबायच्या बोलण्यावर सुरेखाच्या अकलेचे घोडे वेगात पळाले आणि ती तोंडावर हात ठेवून आश्चर्याने बोलली,
"सखूआक्का आवं म्हैना झाला की लगीन व्हवून. म्हैना बदलला का काय वं? म्हंजे पिरेगनेंट.. पिरेगनेंट.."

सुरेखाच्या बोलण्याने सखीला लाजल्यासारखं झालं. एका महिन्यात बाळ? काय यांचे अंदाज!
कृष्णा, बघतोयस ना रे.

सखी लाजेने मान खाली घालून उडीद निवडू लागली. तिला लाजलेली बघून दिपाबाय आणि सुरेखाची खुणवाखूणव झाली. कलाई ही त्या दोघींसारखीच उत्तरासाठी सखीकडे बघू लागली.
दिपाबाय आणि सुरेखाच्या नजरा लगेच सखीच्या शरीरावरून फिरून अंदाज घेऊ लागल्या.‌

जर आरती आणि कृष्णासारखं या दोघांचं नातं असतं तर सोनाईचा ही तसाच अंदाज गेला असता पण सोनाईला आतली गोष्ट माहीत होती त्यामुळे सुरेखाच्या बोलण्याला सखीची वाट न बघता तिनेच उत्तर दिलं,
"ए ऽ सुरखे, यका म्हैन्यात पोरं व्हयाला त्यांना काय दुसरं काम नसतं व्हयं गं?"

सोनाईचं उत्तर ऐकून तरं सखीचं लाजेने पाणी झालं. तिची मान अजून खाली गेली.

दिपाबाय लगेच सुरेखाची बाजू सांभाळून घेत..
"आवं ऽ आत्या, यखूद्याला लगीच ऱ्हातंय म्हनून बोलल्या ताय. व्हयं ना ताय?"

"न्हायं तं काय, आनि किशना भावजी तं बया आमच्या सामनी पन आक्कांनासारकंच उचलून घेत्यात मं यकट्या आसल्याव काय खाली ठेवत आसतील व्हयं?" सुरेखा फिदीफिदी हसत बोलली त्यावर दिपाबायने ही आपली बत्तीशी दाखवली.

कृष्णा, किती रे हा फाजीलपणा.
सखीने मनात बोलतच मान हलवली आणि सोनाई सुरेखावर खेकसली,
"सुरखे ऽ, लै शिफरू नगं बोलायला. ती काय ननांद हाय व्हयं तिजी मस्करी करायला? थोरल्या जावंशी आसं बोलत्यात व्हयं?"

"आवं आत्या, मी आपलं आसंंच.."
सुरेखा लगेच आतल्या काट्यावर आली आणि कलाई तिथून उठत बोलली,
"च्हले सुरखे ऽ, जरा म्हनून मानसात बसून दिव नगं. आपलं उडीद पडलतंय त्यं निवडत बस, च्हंल."

-आणि जाताना पुन्हा आठवणीने बोलली,
"आता तुझा बी म्हैना भरलाच आसंल, तं उद्यापरेंत भायरची झालीस तर सांग."

"मी बसले ना कुठं की माझ्या सासूच्या आसं पोटात दुखतं." सुरेखा दिपाबायच्या कानात कुजबुजली आणि जाताना सखीचा निरोप घेत साखरेसारखी गोड होऊन बोलली,
"आक्का तुम्हाला यळ आसल्याव यत जा की आमच्या हितं."

सखी एक नाही की दोन नाही तिने वर नजर करून सुद्धा पाहिलं नाही. सुरेखा लगेच तोंडात बडबडली,
"ही सखी लै पक्की हे.. बोलतंच न्हायं."

"बघू नंतर.. च्हला तुम्ही." दिपाबाय बोलल्यावर तिचाच हात धरून अंगणातून जाताना सुरेखाने सूर ओढला,
"च्हला आत्या, जाते.. न्हायं तं सासू यिल हाका मारत."

त्या दोघी गेल्यावर सखी आणि सोनाई दोघीही शांत होत्या पण दोघींची कारणं वेगळी होती. आपल्याला न मिळालेला मान आपल्या सूनेला मिळाल्याने सोनाईला खूप खूप आनंद झालेला.

दोघी सुद्धा आपापल्या विचारात दंग होत्या की
सोनाईने नाक ओढल्याचा आवाज आला आणि सखीने सहज सोनाईकडे पाहिलं.

चेहऱ्यावर हसू असणाऱ्या सोनाईच्या डोळ्यांत पाणी पाहून सखीने काळजीने विचारलं,
"आई काय झालं? काही त्रास होतोय का तुम्हाला?"

सोनाई पदराने नाक पुसत अत्यानंदाने बोलली,
"म्हाळसा ऽ, आगं तीस एक वर्षांन माज्या घरातली सवाशीन देवाधर्माच्या पंगतीला बसनार. माजा जीव लै मोठ्ठा झाला बग."

बोलताना पुन्हा सोनाईच्या डोळ्यांत आनंदाने पाणी आलं. कुंकवाची आवड असून एकतीस वर्ष पांढरं कपाळ वागवणाऱ्या सोनाईलाच कुंकवाची किंमत माहीत! कुंकवाची आवड असून त्याला स्पर्श करणं सुद्धा निषेध मानले गेलं तिच्यासाठी. एकतीस वर्षांनी मोहित्यांची सून भावकीत सवाष्णी जाणार त्याचा आनंद सोनाईच्या डोळ्यांत तरळला.

सोनाई पुन्हा अत्यानंदाने  बोलली,
"म्हाळसा ऽ, आगं हाळदीकुकवाचा मान लै मोठ्ठा. त्यो काय कुणालाबी भेटत न्हायं. त्याला नशीबच लागतं बग." बोलताना सोनाईचे डोळे पाण्याने आपोआप भरलेले; कदाचित तिच्या शब्दांशी तिच्या मनाने नकळत स्वतःची तुलना केलेली.

सोनाईच्या आनंदात सखीला तिच्या मनातील सल दिसत होती.

सोनाई पुन्हा स्वतःला सावरत सखीला समजावत बोलली,
"तू आता सुरखी संग बुलली न्हायंस नगं बुलूस पन यक गोष्ट ध्यानात ठेव म्हाळसा, समोर वैरी जरी आला तरी त्याजा त्याला हाळदीकुकवाचा मान द्याचा. तिथं आपण चुकायचं न्हायं आनि कुनालाच चुकवायचं न्हायं."

"मी लक्षात ठेवेन आई पण एकतीस वर्षांनी म्हणजे? आरती ताईंना नव्हतं का कोणी सवाष्ण सांगितलं?"

सोनाई थोडीशी हसली,
"ती भायर बसायची न्हायं आनि नंतर दोन जीवांची झाली."

बाहेर म्हणजे? सखीच्या लगेच लक्षात आलं नाही पण सोनाई इतकं मनापासून भरभरून बोलत होती की सखी उडीद निवडता निवडता फक्त हुंकारली. 

सोनाई आनंदाने एकसारखी बोलत होती. तिचं ऐकता ऐकता "आलेच."  एवढंच बोलून सखी घरात गेली आणि थोड्यावेळाने पुन्हा आली. येताना ती थोडी  अवघडली होती.

पिरेड आल्यावर सुवासिनी राहता येणार नाही त्यामुळे सोनाई नाराज होईल, तिला वाईट वाटेल.. याचं सखीला आधीच वाईट वाटलं.

सखीला खाटेजवळ स्वतःत हरवलेली पाहून सोनाईनेच विचारलं, "काय गं म्हाळसा ऽ, कसला इचार करत्यास?"

"आता तुझा बी म्हैना भरलाच आसंल, तं  उद्यापरेंत भायरची झालीस तर सांग."
कलाईचं बोलणं कानांत घुमत असल्याने सखी थोडीशी अवघडून बोलली,
"आई ऽ, उद्या मला सुवासिनी नाही राहता येणार."

सोनाईने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं,
"का गं?"

-आणि तिचं अंदाज लावत बोलली,
"भायरची बिरची झालीय व्हयं गं?"

सखीने अवघडून मान हलवली,
"हम्म ऽ."

तिच्या एका हुंकाराने सोनाईच्या चेहऱ्यावरचा आनंद उतरल्याच्या खुणा सखीला लगेच दिसल्या. सखी नाराजीनेच खाटेवर बसणार एवढ्यात सोनाई गडबडीत बोलली,
"आगं उठ उठ उठ.. हित नगं बसू."

सखी पण घाबरून लगेच उत्तरली,
"काय झालं आई?"

सोनाई सखीला समजावत बोलली,
"आगं ऽ भायरची झालीस ना.. मं भायर बसाया नगं व्हयं?"

सखी आश्चर्याने बोलली,
"बाहेर म्हणजे? घराबाहेर?"

सोनाई थोडीशी हसली,
"आगं ऽ, म्हंजी घरातच बसायचं पन यका बाजूला बसायचं."

लहानाची मोठी मुंबईला झालेली सखी.. तिच्या माहेरी असली पाळणूक कधीच नव्हती. सुलभाताईंनी कधीच असल्या गोष्टी केल्या नाहीत आणि सारिका ही करायला सांगितल्या नाहीत. कधीतरी गावी आल्यावर तिने दुरूनच हा प्रकार पाहिलेला तेव्हा तिला त्या एका बाजूला बसलेल्या बाईला बघून विचित्र वाटायचं पण आज ती स्वतःच त्याचा भाग झालेली. ती खूप अवघडली.

तिने नकार देण्यासाठी ही प्रयत्न केला,
"आई ऽ, नाही बसलं तरं नाही का चालणार?"

सोनाई लगेच गंभीर झाली,
"आगं ऽ, आपल्या गावची रीतच हाये ती. आपली दिवी लै कडक.. तिला शिवताशिवत आजिब्बात खपत न्हायं. यक बाय तुला घरात बसल्याली दिसनार न्हायं."

सोनाईने तिथूनच कलाईला आवाज दिला,
"ए ऽ कले ऽ…"

"काय वं किशनाची आय?"
खालच्या चाळीला गेलेल्या कलाईने खालून सूर धरला.

.. आणि त्याच सुरात सोनाईने सांगितलं,
"आगं ऽ, दुसरी बग सवाशीन."

"झाली व्हयं भायरची?"
कलाईने खालच्या आळीतूनच विचारलं आणि सखीला खूप विचित्र वाटलं.

तिला पिरेड आले हा काय ओरडून सांगण्याचा विषय होता का? हे कमी म्हणून लगेच सुरेखा हातात उडीद निवडण्याची परात घेऊनच बाहेर आली आणि उत्साहात बोलली,
"सखूआक्का, तुम्ही बी माज्यावानी म्हैन्याला व्हताव ना?"

स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा सांगताना अवघडणारी गोष्ट अशी सामाजिक असल्यासारखी चघळताना पाहून सखी खूपच अवघडली. लग्न झाल्यापासून ची ही पहिली प्रथा होती जी सखीला रुचली नव्हती.

सखीचा उतरलेला चेहरा बघून सोनाईला आरतीची आठवण आली. ती सुद्धा तेव्हा असाच चेहरा पाडून बसलेली. सोनाई सखीला समजावत बोलली,
"म्हाळसा ऽ, नवं नवं आसल्याव जड वाटंल तुला पन नंतर सवय व्हैल पन तू सोनीवानी करू नगं."

"का? आरतीताईंनी काय केलेलं?"

"तिला बी मी, कलीनं, धुरपीनं किती समजावलं पन न्हायं समाजली ती.  तिनं किशनाला फोन केला मं त्यो कामदार आला."

"मग.. ?"
सखीने कुतूहलाने विचारलं.

"मं काय? त्यो आईकतो व्हयं कुणाचं? आख्ख्या भावकीला नडला आणि सोनीच्या हाताला धरून बोलला,
माझी बायकू आसंल काय पाळनार न्हायं आणि हाताला धरूनच घरात घिवून गेला तिला."

मग सोनाई बोलता बोलता गंभीर झाली,
"म्हाळसा ऽ, सोनी गेल्याव बायका बोलत व्हत्या तिनं देवा धर्माचं काय पाळलं न्हायं म्हनून दिवीचा कोप झाला. आगं ऽ देवाधर्माला नडू न्हायं."

सोनाई भाऊक झाली. ती डोळ्याला पदर लावत बोलली,
"म्हाळसा ऽ, ह्या डोळ्यांसमूर नवरा ग्येला.. सून ग्येली आता आजून काय वंगाळ बघायच्या आत डोळं मिटावं वाटत्यात."

"आई ऽ, असं नका बोलू प्लीज." सखी ही भाऊकपणे बोलली.

"म्हाळसा ऽ, आरती त्याजी व्हती म्हनून किशना तिज्यासाठी भांडला. तू काय बुलली न्हायंस तं त्यो काय बी बोलायचा न्हायं बग. तू न्हायं ना काय बोलनार त्याला?"

सोनाई तिच्याकडे आशेने बघत होती.
सखी उगाचच हसली,
"नाही."

सोनाई समाधानाने हसली आणि उडदाचा पसारा आवरून घरात गेली. सखी मात्र तिथेच सावलीला बसून राहिली.

सोनाईचं बोलणं नाही म्हणलं तरी सखीच्या मनाला लागलं. हलकसं डोळ्यांत पाणी तरळल आणि ती स्वतःशीच बोलली,
"कृष्णा, खूप लाजिरवाणी प्रथा आहे ही.. आरतीताईंनी त्यांच्या नवऱ्याला सांगितलं
पण मी कोणाला सांगू?
आई काय बोलल्या तू ऐकलंस ना? ती त्याजी व्हती म्हनून किशना तिज्यासाठी भावकीशी भांडला. माझ्यासाठी कोण बोलणार रे? कोणी असो किंवा नसो पण तू असं रे माझ्यासोबत!

उर्वरित भाग पुढे...

© प्रियांका सुभा कस्तुरी
२३/०२/२०२४

............

(एखादी ग्रामीण जीवनावर आधारित कादंबरी असेल आणि त्यामध्ये हा विषय नसेल तर ती कादंबरी अपूर्ण असेल. कारण आजही महाराष्ट्रातील कित्येक ग्रामीण भागात पाळी हा अतिशय संवेदनशील विषय आहे.

बाकी मी काही बोलत नाही पुढचा भाग उद्याच येईल.. आणि डोन्ट वरी कथा ट्रॅकवरच आहे.

या भागाबद्दल तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रिया हवेत.)

🎭 Series Post

View all