कोनाडा

मनाचा कोनाडा उघडला गेला

कोनाडा

रंगबिरंगी दिव्यांच्या रोषणाईने घर अगदी नववधू सारखे नटले होते. समोर बागेत झाडा झाडांवर ही बारक्या दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. पार्टीची जंगी तयारी होती अनेक खाद्यपदार्थ सुंदर रीत्या मांडून ठेवले होते.

सकाळीच होम हवन झालं होतं. हवीचा सुवास अजून ही घरात घमघमत होता. मोठ्या हाॅलच्या मधोमध यज्ञकुंड दिसत होते. आज सविताच्या नवीन बंगल्याची वास्तूशांती होती. 

पाहुणे येऊ लागले. घर बघायची उत्सुकता प्रत्येकाला होती. जो जो बाहेरची सजावट पाहून तोंडात बोटं घालत होता. घरात गेल्यावर तर सगळे भानच विसरायचे. इतका सुंदर बंगला? बापरे केवढ्याला पडला असेल? पण… पण.. प्रत्येकाला एक प्रश्न पडायचा. इतक्या सुंदर बंगल्यात दर्शनी स्थानी एक अगदी जुन्या पद्धतीचा कोनाडा का बरं असेल? सगळे आपापसात कुजबुजत बाहेर पडायचे. 

शेवटी न राहवून सविताच्या आईनेच विचारलं
"सविता ! इतकं सुंदर घर बांधलंस मग‌ हा जुन्या पद्धतीचा कोनाडा का गं समोर? मला वाटतं ह्याने घराची सुंदरता कमी होते आहे."
 सविता म्हणाली
 "असू दे त्याने काही होत नाही. एका कोनाड्याने मी परकी झाले ही जाणीव करून दिली होती. ती जाणीव मिटविण्यासाठी हा कोनाडा."

"तुला आठवतंय ना आई आपली परिस्थिती हलाखीची. घरात कपाट हा प्रकार नव्हताच. घरातील एक कोनाडा माझा होता. त्यात मी माझं सामान ठेवायचे. चिंचा, चिंचोके, बाहुल्या, खडूचे तुकडे, सागरगोटे, शिंपल्या . नंतर मी मोठे झाल्यावर मला मिळालेल्या शील्ड आणि पदक सुद्धा. अगदी मोठे झाले तरी ही ते सामान आणि तो कोनाडा माझ्या हक्काचा होता. मी त्यात वर्तमान पत्राचे कागद कंगोरे कापून लावायचे आणि सगळ्या वस्तू परत नीट ठेवायचे. माझं त्याच्याशी हितगुज चालायचं‌ मनातलं सगळं मी त्याला सांगायचे. लग्न ठरल्याचा आनंद ही मी सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या समोर व्यक्त केला होता. तू मला वेडा बाई म्हणायची. आठवतंय का?"

"हो आठवतंय ना. म्हणून तर म्हणते आता देव कृपेने इतकं सुंदर घर, किती तरी कपाटं असताना हा जुना कोनाडा कशाला ?"
आई ने हे विचारल्यावर सविता म्हणाली
" आई ! माझं लग्न होऊन जेव्हा मी आठ दिवसाने माहेरपणाला आले होते तेव्हा त्या कोनाड्यातील वस्तू जाऊन तिथे दुसरंच काही ठेवलं गेलं होतं. मी जेव्हा विचारलं तेव्हा तू म्हणाली होतीस
अगं बाई आता तू परकी झाली आता ह्या कोनाड्याशी तुला काय करायचं.?

तू हे सहज आणि मायेने बोलली होती पण एका झटक्यात ‌मला माहेर पासून दूर करून, परक करून टाकलं होतं. जो कोनाडा माझ्या हृदयाचा भाग होता तो काढून घेतला होता. इतकी वर्ष परका झालेला कोनाडा आता परत माझा झाला आणि मी त्याची झाले. बस ."

आई आणि इतर मंडळी अवाक् होती.

राधा गर्दे