कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग १०

कथा त्या तिघांची


कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग १०


मागील भागात आपण पाहिले की स्वानंदिला हिरा आणि बबल्याकडून सत्य समजते. ती मिहीरला याचा जाब विचारते. आता बघू पुढे काय होते ते.


" सूनबाई, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. जरा आमच्या स्टडीरूममध्ये येता का?" आबासाहेबांनी स्वानंदीला विचारले.


" आले बाबा.." स्वानंदी त्यांच्या खोलीत गेली. तिथे त्यांनी रणजीतलाही बोलावून घेतले होते. स्वानंदी काही न बोलता उभी राहिली.

" सूनबाई, बसा तुम्ही. मी असं ऐकलं आहे की तुमच्या वडिलांची खूप जास्त पत आहे राजकारणात." त्याचा अर्थ न समजल्याने स्वानंदीने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले.

" मला म्हणायचे होते, किती काळ आम्ही आमदार म्हणून रहायचे? जरा मंत्रीपद वगैरे मिळाले की पत वाढते ना.." स्वानंदी ऐकत होती. आबासाहेब बोलत होते.

" बघा म्हणजे आम्ही काही वरदक्षिणा घेतली नाही. आम्हाला ते आवडतही नाही. तुम्हीच जर तुमच्या वडिलांशी बोललात तर त्यांनाही दक्षिणेचे पुण्य लाभेल.."

" त्यांच्याशी बोलायची काय गरज आहे? तिचा मित्र आहे ना तो सतेज.. तो करेल की मदत." रणजीत कुत्सितपणे बोलला.

" रणजीत.. मर्यादेत रहा. या घरच्या सूनबाई आहेत त्या." आबासाहेब ओरडले.

" माफ करा आबासाहेब." खाली मान घालत रणजीत बोलला.

" माफी माझी नका मागू. सूनबाईंची मागा." रणजीत तयार नव्हता. पण आबासाहेबांकडे बघून त्याने स्वानंदीकडे बघत सॉरी म्हणण्याचा सोपस्कार उरकला.

" मी बोलते बाबांशी." स्वानंदी बाहेर पडली. समोरून वत्सलाताई आल्या. त्यांच्या हातात दुधाचा पेला होता.

" स्वानंदी, हे दूध फक्त यांना देशील का? मी तोपर्यंत उद्याचा बेत महाराजाशी बोलून ठरवते." स्वानंदीला त्यांना नाही म्हणता आले नाही. ती पाठी फिरली. ती स्टडीरूमचा दरवाजा उघडणार तोच तिला आबासाहेबांचा रागीट आवाज ऐकू आला.

" ही पद्धत आहे का तिच्याशी वागाबोलायची?" कुठेतरी हे तरी आपल्यासोबत आहेत याची जाणीव होऊन स्वानंदीला बरे वाटले तोच त्यांचे पुढचे शब्द कानावर पडले.

" आम्ही मुख्यमंत्री होईपर्यंत त्या जर या घरातून गेल्या ना, तर इस्टेटीतून बेदखल करीन तुम्हाला." स्वानंदीच्या हातातून पेला खाली पडणार होता. तिने स्वतःला सावरले. हलकेच रूमचा दरवाजा ठोठावला.

" आत येऊ का?" तिने विचारले. तिला बघून आबासाहेब थोडे भांबावले.

" ये ना, आत ये."

" आईंनी दूध पाठवले होते. आणि आबासाहेब मी उद्याच सतेजला भेटते. बघू काय करता येईल का?"

आबासाहेब आणि रणजीतला झालेला आनंद लपवायला त्यांना फार त्रास लागला. ठरल्याप्रमाणे स्वानंदी सतेजला भेटायला गेली. रणजीतही तिला कळू न देता तिच्यापाठी गेला. स्वानंदीच्या वागण्याचा त्याला अंदाज येत नव्हता. तो रात्री तिला जवळ घ्यायचा तेव्हा ती काहीच उत्साह दाखवायची नाही. आणि बोलणे वगैरे त्याला जमायचे नाही. त्याला या सगळ्याची सवय नव्हती. हसणारी स्वानंदी त्याला आवडली होती आणि इथे होती ती अबोल स्वानंदी. त्याला हे बंधन नको वाटत होते. पण आबासाहेबांच्या शब्दाबाहेर जायची त्याची हिंमत नव्हती. त्यामुळे काहीही झाले तरी त्याला निभावून न्यायचेच होते. आपल्याशी न बोलणारी स्वानंदी सतेजशी तरी बोलेल का, हेच त्याला बघायचे होते. म्हणून तो तिचा पाठलाग करत आला होता. अपेक्षेप्रमाणेच स्वानंदी सतेजशी हसून बोलत होती. ते बघून रणजीतच्या डोक्यात तिडीक गेली. तो स्वानंदीसमोर जाऊन उभा राहिला. सतेज आणि स्वानंदी दोघांनीही चमकून त्याच्याकडे बघितले.

" तू?" स्वानंदीने विचारले.

" हो.. एक मित्र भेटायला येणार होता म्हणून आलो होतो तर समोरच तुम्ही दिसलात. "

" हो.. तुझ्याच कामासाठी आले होते." खोचकपणे स्वानंदी बोलली. रणजीत वरमला.

" तुला बसा म्हणत नाही कारण मी निघतोच आहे." सतेज उठत म्हणाला.

" घरी भेटूच.." स्वानंदी सुद्धा उठली.

" अग तू याच्यासोबत नाही जात?" आश्चर्याने सतेजने विचारले.

" त्याचा मित्र येणार आहे ना? भेटू दे त्यांना."

" मग तू घरी कशी जाणार?"

" बघते ना.."

" चल मी तुला सोडतो." सतेज स्वानंदीला घेऊन गेला. रणजीत बघतच राहिला.


एवढं सगळं समजूनही स्वानंदी का करते आहे रणजीतला मदत.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all