कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग ८

कथा त्या तिघांची


कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग ८


मागील भागात आपण पाहिले की रणजीत स्वानंदीवर पहिल्याच रात्री जबरदस्ती करतो. आता बघू पुढे काय होते ते.


" हॅलो.."

" स्वानंदी.. कशी आहेस बेटा? मला तुझी खूप आठवण येत होती. कसाबसा रात्रभर धीर धरला. म्हटलं उगाच नव्या जोडप्याला त्रास नको द्यायला."

" बाबा.." स्वानंदीला रडू आवरत नव्हते.

" तुला खरं सांगू.. तुझं लग्न होईपर्यंत खूप दडपण होतं मनावर. हे सगळं तुझ्यासमोर बोलायला घाबरत होतो. पण खूप वाटायचं की तुझा संसार सुरू झाला की मी बाकीच्या उद्योगात गुंतायला बरा. मस्करी करतो आहे ग.. नेहमी वाटायचं माझ्या नंतर तुझे काय होईल? तुझे लग्नच झाले नाही तर? आता कसलंच टेन्शन नाही बघ.." श्रीधरराव आपलं मन मोकळं करत होते. स्वानंदीने तोंडात पदर कोंबला होता. त्यांना आपल्या रडण्याचा आवाज जाऊ नये म्हणून. तिने पलंगाकडे बघितले. रणजीत काहीच न झाल्यासारखा घोरत होता. तिला त्याची किळस वाटली. त्याहूनही जास्त स्वतःची. तिने डोळे पुसले. तोंडातला पदर काढला.

" बाबा, मी छान आहे. तुम्ही काळजी करू नका." ती बोलू लागली.

" बरं ऐक. त्या हिराने आणि बबल्याने तुमच्या लग्नाची बातमी टीव्हीमध्ये बघितली. ते लगेच भेटायला आले. त्यांना तुला भेटायचे आहे. तुझा पत्ता दिला आहे. पण यायच्या आधी ते तुला फोन करतील. तुम्ही बाहेर कुठे फिरायला जाणार असाल तर.." बाबा हसत होते.

" नाही बाबा. सध्यातरी मी कुठेच नाही जाणार. येऊ द्या त्यांना. मी बोलते त्यांच्याशी."

डोळे पुसत निर्धाराने स्वानंदी उठली. अंघोळ करून ती खाली गेली. मिहीर तिथे आधीच आला होता. तो वत्सलाबाईंशी बोलत होता. स्वानंदीचे डोळे बघून त्याला रात्री काय झाले असावे याचा अंदाज आला. त्याला वाईट वाटत होते. त्याहूनही जास्त वाईट त्याला स्वानंदी त्याच्याशी बोलली नाही या गोष्टीचे वाटले. स्वानंदी वत्सलाबाईंकडे गेली. तिने त्यांना नमस्कार केला.

" रात्री झोप झाली नाही का?" तिचे लाल डोळे बघून त्यांनी विचारले.

" लागली ना.." स्वानंदीने मिहीरकडे कटाक्ष टाकला.

" मग, एवढे लाल डोळे.. रडलीस का?"

" हो.. बाबांचा फोन आला होता."

" काकू.. मी निघतो." ते संभाषण असह्य झालेला मिहीर बोलला.

" नाही.. आज तू जेवूनच जायचे." वत्सलाताई हक्काने बोलल्या.

" मी तर घरचाच आहे. येईन परत कधीतरी."

" स्वानंदी हा काही माझं ऐकायचा नाही. तूच सांग ग."

" तू थांब.. मला तुझ्याशी बोलायचे आहे." वत्सलाताईंनी आश्चर्याने स्वानंदीकडे बघितले.

" हो.. म्हणजे रणजीतला काय आवडते, काय नाही.."

" बरं.. माझ्यापेक्षा जास्त त्यालाच माहित आहे. तोच असतो सतत त्याच्यासोबत सावलीसारखा. रणजीत उठला का ग? त्याला बाई बेड टी लागतो."

" नाही उठला. मी देते त्याला चहा." चहाचा ट्रे घेऊन निघालेल्या स्वानंदीला बघून मिहीरच्या काळजात कळ आली. पण...

स्वानंदी चहा घेऊन खोलीत गेली. रणजीत उठतच होता.

" हाय.." स्वानंदी काहीच बोलली नाही हे पाहून तो उठला.

" मी रात्री चुकीचा वागलो का?"

" तुला आठवत नाही का?"

" नाही.. ते जरा थोडी घेतली होती तर.."

" आपण काय वागतो हे जर आठवत नसेल तर ते घेणं थोडं असते?"

" सकाळी सकाळी लेक्चर नको. सॉरी बोललो ना. आणि चहासाठी थँक यू." स्वानंदी जायला वळली.

" स्वानंदी हनिमूनसाठी कुठे जायचे?" रणजीतने चहा पित विचारले.

" काय घाई आहे? कालच्या जखमा तर भरू देत.." स्वानंदी तिथून बाहेर पडली.


काय असेल स्वानंदीचे पुढचे पाऊल? रणजीतला समजेल का तिचे मन? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all