कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग ५

कथा त्या तिघांची..


कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग ५


मागील भागात आपण पाहिले की मिहीर स्वानंदीसाठी एक प्रेमपत्र लिहितो आणि रणजीतला बोलावून घेतो. आता बघू पुढे काय होते ते.


" हिरा, काय झाले? पत्र दिलेस का? काय बोलल्या तुमच्या ताईसाहेब?" रणजीत खूपच अधीर झाला होता.

" त्या काहीच बोलल्या नाहीत." हिरा गाल चोळत म्हणाली.

" काय?" मिहीरला आश्चर्य वाटले होते. "काहीच निरोप दिला नाही?"

" नाही ना. त्यांनी पत्र हातातून घेतले. वाचले आणि माझ्या गालावर एक गोल काढला. रस्त्याने येताना चेहरा कसा दिसेल, म्हणून मी पुसून टाकला." मिहीरचा चेहरा उजळला. त्याने पटकन कॅलेंडर बघितले. हिराला पैसे दिले.

" हिरा, तू आणि बबल्या गावी जाऊन या. तुला गावच्या घराची दुरूस्ती करायची होती ना?" ते पैसे बघून हिराचे डोळे विस्फारले

" एवढे पैसे? फक्त पत्र द्यायचे?"

" नाही ग.. तू जी मदत केलीस त्याचे. पण हे पैसे तू लगेच गेलीस तरच मिळतील." मिहीरने अट ठेवली.

" दादा, काय हे? पण मी बोलते मालकांशी. पावसाळा सुरू व्हायच्या आधी काम झालेलं बरं." हिरा तिथून निघाली. रणजीत हे सगळं बघून वैतागला होता.

" हे सगळं करण्यापेक्षा तिला त्याच दिवशी उचलले असते ना तर बरे झाले असते. पडल्या असत्या आबांच्या शिव्या.. पण ती हातात तरी आली असती."


" रणजीत, संयम ठेव. स्वानंदी सारख्या मुलीसाठी तरी असं बोलू नकोस. तशीही ती तुला उद्या समुद्रकिनारी भेटणार आहे." मिहीरचा आवाज परत खिन्न झाला होता.

" तुला काय माहित? मला तर त्या स्वानंदीवरच शंका यायला लागली आहे. सुंदर आणि श्रीमंत आहे बस एवढंच. पण तो दिवा, फुले , अत्तर आणि आता हा गोल.. आई शप्पथ कुठे हिला बघितलं आणि तुला तिची चौकशी करायला सांगितलं असं वाटायला लागलं आहे."

" मग परत एकदा विचार कर. तिच्यासारख्या मुलीच्या आयुष्याशी नको खेळूस.." मिहीर रणजीतला विनवत होता.

"खेळायचं की अजून काय करायचं ते मी बघीन.. तू मध्ये पडू नकोस. ती उद्या येणार असं तुला वाटतंय ना. मग तूच जा उद्या तिला घेऊन यायला. मग मी पुढे बघतो तिचं काय करायचे ते." रणजीत विचित्र हसत बोलला. हिरा आणि बबल्या रातोरात गावाला निघून गेले. मिहीर उद्याचा दिवस उजाडू नये अशी प्रार्थना करत होता. पण दिवस उजाडलाच. रणजीतने दिवसभर दारू पिऊ नये यासाठी मिहीरने खूप काळजी घेतली. संध्याकाळ होताच परत एकदा रणजीतला सांगून मिहीर निघाला.

स्वानंदीला बघण्याची उत्सुकता त्यालाही होती. झपाझप पावले उचलत तो समुद्रकिनारी पोहोचला. सूर्यास्त होत असतानाच एक गाडी तिथे येऊन थांबली. गाडी पार्क करून त्यातून स्वानंदी उतरली. मिहीरने तिला बघितले आणि बघतच राहिला. फोटोपेक्षाही कितीतरी पटींनी ती सुंदर होती. त्याला बघून ती हसली. तिच्या पांढर्‍या शुभ्र दंतपंक्ती बघून त्याच्या काळजाचा ठोका चुकला.

" हाय.. मी स्वानंदी." किती तो मंजुळ आवाज.. कितीही ऐकला तरी समाधान न होण्यासारखा.

" हॅलो.. मी मिहीर."

" तूच?"

" नाही.. माझा मित्र.." मिहीर बोलला. तिची निराशा झाली का?

" तो का नाही आला?"

" त्याला थोडी भिती वाटली.." बोलताना मिहीरची जीभ चाचरली.

"ओह्ह.. त्याला मी वेडी नाही ना वाटले?" स्वानंदीने विचारले.

" का?"

"म्हणजे त्या माझ्या विचित्र अटी.." स्वानंदी मान खाली घालत म्हणाली.

" विचित्र कसल्या? सतत तेवत असलेल्या दिव्यातून तुम्ही दाखवून दिले की तुम्ही अजूनही तुमच्या सख्याची वाट बघत आहात. फुले आणि अत्तर.. तुम्हाला बघायचे होते कृत्रिम की नैसर्गिक सौंदर्य? नैसर्गिक सौंदर्याचा स्विकार केल्यानंतरच तुम्ही गोल म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी भेटायचा निरोप दिलात.. बरोबर?" मिहीर बोलून गेला.

" अगदी माझ्या मनातलं. मला ना आधीपासूनच बुद्धिमान आणि रसिक जोडीदार हवा होता. मला रूपाने काही फरक पडत नाही. पैसा, सत्ता बाबांकडे भरपूर आहे.. मला असा कोणी हवा होता ज्याला माझे मन समजेल.. तुम्हाला माहीत आहे कितीजणांनी मला लग्नाची मागणी घातली. त्यातल्या काहीजणांना माझ्या रूपाची भुरळ होती तर काहींना पैशाची.. माझे एक स्वप्न होते माझा जोडीदार गरीब असो, कुरूप असो पण तो हुशार आणि रसिक असलाच पाहिजे.. ते प्रेमपत्र तर दोन्हींचा छान मिलाफ होता. खूप खूप खुश आहे मी आता. मला असं झाले आहे की कधी एकदाची तुमच्या मित्राला मी भेटते. मी तुम्हाला कंटाळा नाही ना आणला?" स्वानंदी बोलत होती. तिच्या एका एका शब्दाने मिहीरच्या ह्रदयाला घरे पडत होती. कदाचित माझाही एकटेपणा हिच्यासोबत दूर झाला असता.. उपकाराच्या ओझ्याखाली मी रणजीतला मदत केली खरी.. पण जेव्हा हिला समजेल की ते सगळे त्याने नाही केले तेव्हा काय होईल? मिहीरचा घसा कोरडा पडला. त्याच्या हातापायातले बळ गेले. तो तिथेच थांबला. तो थांबलेला बघून स्वानंदी पण थांबली.

" काय झाले?" तिने विचारले. काहीच न बोलता मिहीरने समोर बोट दाखवले. स्वानंदीला भेटण्यासाठी आतुर रणजीत हात पसरून समोर उभा होता. हाच आपला हुशार, रसिक प्रियकर आहे असे समजून स्वानंदीही त्याच्या मिठीत जायला उत्सुक होती. तिला तिथेच रणजीतसोबत सोडून मिहीर वळला. समुद्राकडे जायला.


स्वानंदी आणि रणजीतचे लग्न होईल का? काय होईल जेव्हा स्वानंदीला रणजीतचे सत्य समजेल तेव्हा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


कथेत पुढे जायच्या आधी दोन शब्द. आपण अनेक कथा वाचतो. काही आवडतात काही नाही आवडत. द.मा. मिरासदार यांची कोणे एके काळी ही कथा अशीच एक..ज्यांनी ती कथा वाचली आहे त्यांना समजून येईलच.. तर ही कथा मला मनापासून आवडलेली.. पण शेवट न पटलेला. त्या कथेतल्या नायिकेचे नायकाशी लग्न होत नाही. एवढ्या हुशार स्त्रीची फसवणूक झाली तर ती पुढे काय करेल हा विचार पिछा सोडत नव्हता. विस्मरणात गेलेली ही कथा एका प्रसंगाने परत वर आली.. आणि सुरूवात केली या कथेला. या पुढची कथा ही माझ्या दृष्टीकोनातून लिहिलेली आहे. कशी वाटली हे सांगितले तर ऐकायला नक्की आवडेल. अभिप्रायाच्या प्रतिक्षेत..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all