कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग ४

कथा त्या तिघांची


कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग ४


मागील भागात आपण पाहिले की स्वानंदीच्या घरात तेवत असणारा दिवा मिहीर विझवून येतो. आता बघू पुढे काय होते ते..


" हिरा, तुमच्या ताईसाहेब आज चिडल्या होत्या का?"


" नाही बा.. उलट आज पहिल्यांदाच मी त्यांना एवढं खुश पाहिलं."

" खुश??"

" मग काय? येऊन बघा, त्यांनी बंगला कसा सजवला आहे ते. काय त्या मोठ्यामोठ्या रांगोळ्या. काय ते हार."

" आज पण येऊ मी?" मिहीरने विचारले.

" या की दादा. तुम्ही काल आलात तर ताई एवढ्या खुश झाल्या. नक्की चला." मिहीर परत स्वानंदीच्या बंगल्याजवळ गेला. ती मंदिरात गेली होती. मिहीर स्वानंदीच्या खोलीत गेला. दिवा परत तेवत होता. तिथेच बाजूला दोन पात्र ठेवली होती. एकामध्ये गुलाबाची फुले होती तर दुसर्‍यामध्ये गुलाबाचे अत्तर होते. मिहीर हसला. त्याने अत्तराचे पात्र ढकलले आणि तिकडची गुलाबाची फुले उचलून घेतली. ती शर्टमध्ये लपवली आणि कोणालाच काहीच न सांगता तो तिथून निघाला. हॉटेलवर येताच त्याने रणजीतला फोन लावला.

" कुठपर्यंत आले काम?" रणजीतने विचारले.

" रणजीत तू खरंच सिरीयस आहेस?"

" मिहीर, मी तुला हो म्हणून सांगितले ना." त्याच्या आवाजातली अधिरता लपत नव्हती.

" रणजीत, मग तू लगेच निघून ये इथे.. तिला तुला भेटायचे असणार आहे लवकरच."

" तू एवढ्या खात्रीने कसे सांगू शकतोस?"

" आल्यावर समजेल तुला.." मिहीरने फोन ठेवला. खरेतर त्याला आनंद व्हायला हवा होता. पण नाही.. अगदी आतून एक खिन्नतेची भावना जाणवत होती. हाती घेतलेले काम पूर्ण करायलाच हवे या भावनेने त्याने एक प्रेमपत्र लिहायला घेतले. स्वानंदीचा फोटो बघितल्यापासून त्याच्या मनात उमटणार्‍या भावना त्याने कागदावर उतरवून काढल्या. पण ही आपल्या नशिबात नाही या विचाराने त्याच्या डोळ्यातून एक अश्रु घरंगळला आणि नेमका त्याने चुकून जिथे स्वतःचे नाव लिहिले होते त्यावर पडला. पाण्याने शाई पसरली गेली व त्याचे नाव पुसट झाले.

" मिहीर, कधी जायचे तिला भेटायला?" मिहीरच्या अंगावरचे पांघरूण काढत रणजीतने विचारले.

" तू? तू कधी आलास? खरंच आलास की मी झोपेत आहे?"

" तुझं नाटक थांबव.. आणि चल." रणजीत मिहीरला बाहेर ओढत म्हणाला.

" रणजीत शुद्धीवर ये. पहाटेचे चार वाजले आहेत. तू खोलीचा दरवाजा उघडलास तरी कसा?"

" हॉटेलच्या मालकाला धमकी देऊन चावी घेतली." रणजीत केसांत हात फिरवत म्हणाला.

" भावा, जिथे तिथे दादागिरी नाही चालत. हा तर प्रेमाचा मामला आहे. शांत हो. गाडी चालवून थकला असशील. आता झोप. उद्या सकाळी बोलू." मिहीर रणजीतला शांत करत बोलला. मिहीरचे बोलणे पटल्याने रणजीत त्याच्याच बेडवर झोपला. त्याला बघून मिहीरची मात्र झोप उडाली होती.

सकाळी उठल्यावर मिहीरने दिवा, फुले, अत्तर या बद्दल रणजीतला सांगायचा प्रयत्न केला.

" मला याच्याशी काही घेणंदेणं नाही.. मला फक्त तिला भेटायचं आहे.." रणजीतने विषय बंद केला.

" मी हे पत्र लिहिले आहे.. ते पत्र मिळाल्यावर ती नक्की भेटायला येईल."

" पण हे सगळं करण्यापेक्षा तिच्याशी डायरेक्ट बोलून घेतलं तर.. आजच्या जमान्यात हे सगळं?"

" जिथे सुरीने काम होते तिथे तलवार चालवणार का? मी तिच्या प्रश्नांची उत्तरे जवळजवळ दिली आहे. हे पत्र दिले की ती तुझीच व्हायला हरकत नाही.." बोलताना पण मिहीरला त्रास होत होता.

" तू म्हणतोस, फक्त म्हणून मी गप्प बसतो आहे.. ती नाही आली तर मग विसर आपली यारी." रणजीत धमकीच्या सुरात बोलला. काहीच न बोलता मिहीर बाहेर गेला आणि त्याने ते पत्र हिराच्या हाती देऊन ते पत्र स्वानंदीपर्यंत पोहोचवायला सांगितले.


स्वानंदी करेल का स्वीकार या पत्राचा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all