कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग २

कथा त्या तिघांची


कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग २

मागील भागात आपण पाहिले की रणजीतला एक मुलगी आवडते आणि तो मिहीरला त्यासाठी प्रयत्न करायला सांगतो. आता बघू पुढे काय होते ते.


" शुभ प्रभात सर.. तुमचं डोकं दुखत असेल तर हे लिंबूपाणी घेणार का?" मिहीरने डोळे चोळत असलेल्या रणजीतला विचारले.

" सकाळी सकाळी ही काय नाटके लावली आहेस रे? एकतर रात्रीची ती दारू आणि आताची ही डोकेदुखी." रणजीत डोक्यावर हात मारत म्हणाला.

" नाटक नाही सर. काल रात्री तुम्हीच म्हणालात की नोकराने नोकरासारखे रहावे." मिहीरचा आवाज दुखावलेला होता.

" मिहीर सॉरी ना.. एकतर ती मुलगी निघून गेली, तू ही नव्हतास.. तुझा, अख्ख्या जगाचा राग आला होता. त्यात ही दारूची नशा.. आता पाया पडू का तुझ्या? म्हणजे तुझा राग जाईल." रणजीत पुढे होत बोलला.

"आता कोण नाटक करतंय?" मिहीर हसत म्हणाला.

" तू हसलास म्हणजे तुझा राग गेला.. तू हसलास ना की तुझ्या गालावर खळ्या पडतात. मी जर मुलगी असतो ना तर नक्की तुझ्या प्रेमात पडलो असतो."

" खूप मस्का मारून झाला. आता कामाचे बोलूयात का?"

" मिहीर तुझी वहिनी ठरली.."

" ही कितवी?"

" मिहीर मी सिरियस आहे यावेळेस."

" ते तू नेहमीच असतोस."

" आईची..."

" रणजीत प्लिज.. काकूंना मध्ये नको घेऊस.. आणि अजून एक ही मुलगी तुझ्या इतर मैत्रिणींसारखी नाहीये."

" तुला काय माहित?" रणजीतने संशयाने विचारले.

" सध्या माझ्याकडे तिचा पूर्ण इतिहास आहे.. तिचे नाव स्वानंदी.. इकडच्या प्रसिद्ध उद्योजकांची एकुलती एक मुलगी. पोस्ट ग्रॅज्युएट आहे. पी.एच.डी. ची तयारी सुरू आहे. आई नाही. वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली. अतिशय सालस, गुणी. एक आहे, आजवर एकही अफेअर नाही. इतक्या जणांनी तिला मागणी घातली पण कोणीही तिचा होकार मिळवू शकला नाही."

" मी कोणाही मध्ये येतो का?" रणजीत गुर्मीत बोलला. " माझे बाबा आमदार आहेत."

" तिच्या बाबांच्या ओळखी थेट दिल्लीतल्या मंत्र्यांपर्यंत आहेत. मूळ गावावरच्या प्रेमामुळे इथे येऊन राहिले आहेत." मिहीर तटस्थतेने बोलत होता.

" म्हणजे आपली डाळ इथे शिजायची नाही का ?" रणजीत निराश झाला होता.

" तुला जर ती मनापासून आवडली असेल, तर तूच प्रयत्न कर की."

" मिहीर, मी आहे रांगडा माणूस. तूच प्रयत्न कर ना.."

" मी काय प्रयत्न करणार? रणजीत हा कोणाच्यातरी आयुष्याचा प्रश्न आहे. मी मध्ये पडून काय करू?"

" ते मला माहित नाही. तू नेहमी आईला बोलतोस ना, तुमचे उपकार कसे फेडू? मग माझे हिच्याशी लग्न जमवून दे. तुझे सगळेच उपकार फिटतील. उलट माझ्यावरच तुझे उपकार होतील." रणजीतने मिहीरला भावनेत अडकवायचे ठरवले. मिहीर विचारात पडला.

" मग मी निघतो. या हॉटेलमधली ही खोली तुझ्याच नावाने ठेवतो. बिलाची काळजी करू नकोस. फक्त काम झाले पाहिजे."

" निघतो म्हणजे कुठे निघतोस?"

" कुठे म्हणजे? मी जातो घरी.."

" अरे पण.." मिहीरने बोलायचा प्रयत्न केला.

" पण नाही परंतु नाही.. तुला माहित आहे, मला आवडलेली गोष्ट मी कशीही मिळवतोच. हे प्रकरण वेगळच आहे. मला ती आवडली आहे आणि मला ती हवी आहे. बस.." रणजीत एवढे बोलून तिथून निघून गेला.


त्या स्वांनंदीने अजून कोणालाच होकार का दिला नाही? इतरांना दिला नाही मग या रणजीतला तरी का देईल? या विचारात मिहीर गढून गेला.


होईल का यशस्वी मिहीर , स्वानंदीचा रणजीतसाठी होकार मिळविण्यात? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all