कोण होती ती...? भाग 5

Aditya Can See That Girl. But Unfortunately He Don't Know She Is Alive Or Not. He Can Go To Police Station And He Find The Name Of That Girl, The Name Of Girl Is 'Abhidnya '. And Now He Wants To Be Find Out What Happened With Abhidnya.


कोण होती ती...?भाग 5.


©रेश्मा आणि साक्षी.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)

*******************************************


थोडा नाष्टा आणि आराम करून तिघेही संध्याकाळी सहा च्या आसपास त्या जागेचा शोध घेण्यास निघाले...

आज भंडारदऱ्यातील वातावरण जरा वेगळंच होतं... नेहमीपेक्षा आज जरा जास्तच गर्दी दिसत होती...

" waw.... किती छान वाटतंय ना..! आम्ही त्यावेळी जेव्हा आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती आणि आज बघ..!"नेहा उत्साहात म्हणाली...

"मे महिन्याच्या किंवा जून महिन्याच्या अखेरीस इथे हा \"काजवा महोत्सव\" सुरू होतो.. तोच पाहायला अनेक पर्यटक येथे येतात... या महोत्सवात काजवे स्वतःच्या आतील नैसर्गिक ऊर्जा उत्सर्जित करतात...हे पाहण्यासाठी जवळजवळ 10 मिनिटं आपलं लक्ष एकाच झाडावर केंद्रित करून पाहावं लागतं, तरच ते दिसतं....." मोहित आणि नेहा दोघांचं बोलणं चालूच होतं....

"अरे मोहित, तुला कसं एवढं माहिती रे?" नेहाने मोहितला विचारलं...

"आज आपण इथे येणार होतो.. मला या जागेचं जास्त काही माहिती नाहीये, म्हणून मी याबद्दल ऑनलाईन सर्च केलं तेव्हा मला ही माहिती मिळाली.."मोहित आणि नेहा दोघेही त्यांच्याच गप्पांमध्ये रंगले होते....

पण आदीत्यचं मात्र कोणत्याच गोष्टीत लक्ष नव्हतं....
"आदित्यला त्या मुलीचा भास होतं होता...ती इथेच कुठेतरी आहे आणि त्याला बोलावतेय असं त्याला वाटू लागलं होतं..."

नेहा आणि मोहित त्या महोत्सवातील काजवे पाहण्यासाठी एका ठिकाणी लक्ष केंद्रित करून उभे राहिले....आदित्य सुद्धा त्यांच्याबरोबर उभा होता...

आणि अचानक ह्या दोघांचंही लक्ष नसतांना आदित्य त्याच्याही नकळतपणे त्या डोंगराळ वाटेने चालू लागला....त्याच्या डोक्यात, कोण होती ती..? हेच चक्र सुरू होतं.... आणि तो विचार करत होता, "कोण असेल ती मुलगी? ती जर मला परत भेटली तर मी तिची मदत करू शकेन का?...

मला असं का वाटतंय की मला कोणीतरी ओढून या दिशेने घेऊन जातंय...पण हा रस्ता तर माझ्या ओळखीचाच आहे मी आधी कधी इथे आलो आहे का?
मी चालत चालत त्या डोंगराजवळ आलो...सगळीकडे लख्ख अंधार, लुकलूक करणारे चांदणे आणि काजव्यांचा प्रकाश यात अचानक ती माझ्या समोर थोड्या अंतरावर येऊन उभीच राहिली.....

तोच निरागस चेहरा, तेच बोलके डोळे.....अगदी माझ्या स्वप्नातील \"ती\" माझ्या समोर काही अंतरावरच आहे ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता...

मी पुढे जाऊन तिला तू कोण आहेस? तुझा माझ्याशी काय संबंध? तुला मी काय मदत करू शकतो? असे प्रश्न विचारणार... तेवढ्यात ती दरीत कोसळली, जणू तिला कोणीतरी ढकलून दिलं..... मी जोरात ओरडलो, अरे तिला वाचवा कोणीतरी....!"

एवढं बोलून आदित्य धपकन खाली बसला आणि बेशुद्ध झाला...

इकडे नेहा आणि मोहितला याचा ठावठिकाणा ही नव्हता.... आदित्यचा आवाज दोघांना जसा ऐकू आला, तसे ते दोघे शोधाशोध करू लागले....

एके ठिकाणी खूप गर्दी त्यांना दिसली... दोघांनी समोर येऊन पाहिलं तर आदित्य बेशुद्ध पडलेला दिसला...

"अरे आदि उठ ना...! काय झालं? तुला काय होतंय?... आदित्य....बोल ना काहीतरी..."आदित्यला बेशुद्ध पाहून नेहाला पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटत होतं....

"नेहा शांत हो...आपण आदित्यला रूमवर घेऊन जाऊ..." मोहितने नेहाला शांत केलं...

तिथेच असलेल्या काही लोकांच्या मदतीने मोहित आणि नेहाने आदित्यला रूमवर आणले.....

"तुमच्या ओळखीचे कोणी डॉक्टर असतील तर urgent रूम नंबर 202 मध्ये पाठवा... emergency आहे...." मोहितने रूमच्या इंटरकॉम वरून रिसेप्शनवर कळवले.....पुढच्या काही मिनिटांत रूम च्या दारावरची बेल वाजली...

"hello... मी डॉक्टर विक्रम....पेशंट कुठे आहे..."डॉ. विक्रमनी विचारले....

"ओ....यांचं बीपी शूट झालंय...यांना कोणत्यातरी गोष्टीचा फार मोठा धक्का बसलाय असं दिसतंय..." असं डॉ.विक्रमनी सांगितलं असता, नेहाने लगेच रजनीला फोन लावला आणि डॉ. विक्रमशी डॉ.रजनीचं बोलणं करून दिलं....

"डॉक्टर मला डॉ.रजनीने एक इंजेक्शन लिहून दिलंय..." नेहाने डॉक्टर विक्रम ना सांगितलं....

डॉक्टर विक्रमनी लगेचच ते इंजेक्शन मागवून आदित्यला दिलं.....सकाळपर्यंत येईल आदित्य शुद्धीवर....एवढं बोलून डॉक्टर निघून गेले....

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाने रूमचं दार नॉक केलं.....मोहित गाढ झोपला होता, तर आदित्य अगदी स्तब्धपणे बेडवर उठून बसला होता...

नेहाने पुन्हा एकदा मोहितला हाक मारली आणि दार नॉक केलं....
"आदित्य यार दार उघड ना...!ही नेहा झोपू पण देत नाही यार...!"मोहित झोपेतच आदित्यला सांगत होता....

आता मात्र नेहाने मोहितला फोन केला, फोनची रिंग ऐकून मोहित उठला आणि दार उघडलं....

"काय रे कुंभकर्णा...! कधीची हाका मारतेय, दार वाजवतेय काय बहिरा झालंयस का? आणि काय रे आदि तुला सुद्धा ऐकायला येत नाही का?" असं म्हणत नेहा आदित्यजवळ गेली...

"आदित्य काय झालं? परत स्वप्न पडलंय का? की काही त्रास होतोय.. मी रजनीला फोन करू का?"नेहा आदित्यला स्तब्ध बसलेलं पाहून विचारत होती, पण आदित्यच्या डोळ्याची पापणीसुद्धा अजून लवत नव्हती....
म्हणून नेहाने त्याला हाताने हलवलं... आदि काय विचारतेय मी?...असं ओरडून म्हणाली...

"अं..... अगं नेहा ती होती.....तू पाहिलस का तिला? ती प्रत्येक्ष माझ्या समोर उभी होती...आणि माझ्या डोळ्यांदेखत दरीत पडली..आणि मी काहीच करू शकलो नाही...."आदित्यला तो त्याचा भास नव्हता हे कळल्याने तो नेहाला ठामपणे सांगत होता...

नेहा क्षणभर आदित्यची अवस्था बघून घाबरली....मोहितने तिला सावरलं आणि आदित्यला विचारलं,"तू नीट पाहिलंस का तिला? कशी दिसत होती ती ते सांगू शकशील का? म्हणजे मी तिचं स्केच काढतो....

पण तू आधी शांत हो, आणि विचार करून सांग...म्हणजे आपल्याला तिला शोधायला मदत होईल..."मोहितने असं सांगितल्यावर आदित्य थोडा रिलॅक्स झाला.....

आदित्यने तिचं वर्णन करायला सुरुवात केली....थोड्याच वेळात मोहितचं स्केच काढून झालं, त्याने अगदी हुबेहूब स्केच काढलं होतं....

"अरे, हीच आहे ती मुलगी....!" आदित्यला पूर्णपणे याची खात्री झाली की ही तीच मुलगी आहे....

"आपण हे स्केच आजूबाजूला दाखवून चौकशी करून तिला शोधण्याचा प्रयत्न करूच शकतो..."नेहा अगदी उत्साहात येऊन म्हणाली....

"अरे बाबांनो, पडली ना ती, तेही 4-5 वर्षांपूर्वी.....! मग जिवंत आहे की नाही हे कोणाला माहिती...."मोहितच्या असं बोलण्याने आदित्य आणि नेहा हिरमुसले....

"त्यापेक्षा आपण एक काम करूयात, आपण पोलीस स्टेशनला जाऊ... तिथून माहिती घेऊ....
आताच काही महिन्यांपूर्वी माझ्या मुंबईच्या काकांची इथे जवळपासच्या गावात ट्रान्सफर झाली आहे...ते सब इन्स्पेक्टर आहेत....मी त्यांच्याशी बोलतो आपण त्यांना भेटायला जाऊ...." मोहितने दिलेली आयडिया दोघांना आवडली....

मोहितनेही लगेचच काकांना फोन लावला, "काका मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय, मी आणि माझे मित्र तुम्हाला भेटायला येतोय urgent काम आहे...." एवढं बोलून मोहितने फोन ठेवला...

तिघेही तयार होऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले...
"काका कसे आहात?" असं म्हणत मोहित काकांच्या पाया पडला...हे माझे मित्र नेहा आणि आदित्य...मोहितने दोघांची काकांशी ओळख करून दिली.....

"हॅलो...मी सब इन्स्पेक्टर अरविंद कुलकर्णी..."अरविंद काकांनी स्वतः आनंदाने दोघांशी ओळख करून घेतली....

मोहितने सर्व घडलेला प्रकार सविस्तर काकांना सांगितला आणि स्वतः काढलेलं स्केच सुद्धा दाखवलं...

"ठीक आहे... काळजी करू नका... मी आहे तुमच्यासोबत...आपण तिची काही माहिती मिळते का ते बघू..."काका म्हणाले....

"हो पण..... आपण तिची माहिती कशी मिळवणार?,
म्हणजे, ती कुठे राहायची किंवा राहते हे सुद्धा आपल्याला माहिती नाही?..."आदित्यने काकांना प्रश्न विचारला....

"मोरे....!आपल्या जुन्या 4-5 वर्षांपूर्वीच्या मिसिंग केस रेकॉर्डस् च्या फाईल्स मध्ये अश्या दिसणाऱ्या किंवा या मुलीची मिसिंग केस आहे का ते बघा...
आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मध्ये ह्या स्केच चे फोटो पाठवून द्या...काही माहिती मिळते का ते बघा..."इन्स्पेक्टर अरविंद नी कॉन्स्टेबल मोरेंना सांगितलं....

सगळेजण रेकॉर्डस् रूम मध्ये फाईल शोधण्यासाठी गेले.....थोड्या वेळात फाईल्स शोधत असताना हेड कॉन्स्टेबल सावंत यांना एक अर्धवट जळलेली फाईल सापडली....

"सर, ह्या फाईल मधली मुलगी आणि तुम्ही जे स्केच दाखवलं ती मुलगी सारखीच वाटतेय...."सावंत इन्स्पेक्टर अरविंद ना म्हणाले.....

"अरे ही फाईल जळाली कशी?" इन्स्पेक्टर अरविंद नी विचारलं....

"सर, मी जेव्हा इठे नवीन जॉईन झालो होतो तेव्हा या रेकॉर्ड रूमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती,सगळं काही जळून राख झालं....

तेव्हा एका कॉन्स्टेबलने स्वतः चा जीव धोक्यात घालून काही फाईल्स वाचवल्या होत्या.... त्याचा जीव गेला, आणि नंतर काही दिवसांनी ए.सी.पी साहेबांनी स्वतः ही केस closed केली..."सावंत यांनी त्यांच्या जवळ असलेली माहिती दिली....

"या फाईल मध्ये फक्त मुलीचा अर्धवट चेहरा, नाव आणि गाव दिसतंय बाकी काहीच माहिती फाईल जळाल्याने स्पष्ट दिसत नाही...
नाव:- अभिज्ञा
राहणार:- पेंडशेत
यावरून आपल्याला तिचा पत्ता शोधावा लागेल..."असं इन्स्पेक्टर अरविंद नी म्हंटल्यावर आदित्य, नेहा आणि मोहितही "आम्ही तुमच्याबरोबर येणार" असं बोलून मोकळे झाले....

"ठीक आहे चला...!शिंदे गाडी काढा, मोरे हे सगळं आवरून घ्या आणि सावंत तुम्ही आमच्याबरोबर चला...."असं म्हणून सगळे चौकशी करण्यासाठी त्या गावाकडे निघाले....

गावात पोहोचल्यावर शिंदेंनी गाडी बाजूला लावली....पारावर बसलेल्या लोकांना इन्स्पेक्टर अरविंद नी स्केच दाखवले असता,

"आम्हाला नाही माहिती...."

"ही अभिज्ञा आहे...पण ही तर कोणाबरोबर तरी पळून गेली ना... मग आता हीची चौकशी का करताय?"

"ह्या तर त्या डॉक्टर आहेत ना...!देवमाणूस होत्या त्या....आमच्या गावतल्यांची फार मदत करायच्या...पण अचानक एक दिवस बेपत्ता झाल्या..."

अशी वेगवेगळी उत्तरं प्रत्येकाने सांगितल्याने सगळेच गोंधळले.....

थोड्या पुढे जाऊन आजूबाजूला चौकशी करण्याचा निर्णय इन्स्पेक्टर अरविंद नी घेतला....

रस्त्यातील येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना तिचं स्केच दाखवून चौकशी करत असताना सावंत नी समोरून येणाऱ्या दोन व्यक्तींना थांबवून अभिज्ञा चं स्केच दाखवलं....आणि

"तुम्ही ही कुठे राहते हे सांगू शकता का?" सावंत नी विचारलं.....

"ती तर केव्हाच पळून गेली....तिचे आई-बाप सुद्धा केव्हाच गेले...वर...! आता तुम्ही हिची चौकशी का करताय? ही केस तर बंद झालीये ना?"एवढं बोलून ते दोघेही निघून गेले....

हे बोलणं ऐकून सावंत आणि अरविंद यांना धक्काच बसला....

"म्हणजे ही केस दिसते तेवढी सोप्पी नाहीये....नक्कीच अभिज्ञा बरोबर काहीतरी घडलं असणार, जे गावतल्यांना माहिती आहे पण कोणी सांगत नाहीये...पण का?....याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल..."इन्स्पेक्टर अरविंद सगळ्यांना म्हणाले.....

"आपण अजून गावात आत जाऊन चौकशी करू... कदाचित अभिज्ञा बद्दल आणखी काही माहिती मिळेल..."आदित्यने कल्पना सुचवली...

गावात आत गेल्यावर डाव्याहाताला जाणाऱ्या सरळ रस्त्याकडून येणाऱ्या एका व्यक्तीला स्केच दाखवून इन्स्पेक्टर अरविंद नी विचारलं, "ही मुलगी कुठे राहते माहिती आहे का?"

"हो.." व्यक्तीने उत्तर दिलं...

"तुम्ही हिला ओळखता का ??"इन्स्पेक्टर अरविंद नी विचारलं....

"हो...मी अभिज्ञाचा मामा आहे...."हे ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला......


*******************************************

आदित्यच्या \"कोण होती ती\" च उत्तर आदित्यला मिळालं.....

अभिज्ञा च्या बाबतीत असं काय घडलं असेल?

कोण होती ही अभिज्ञा???

या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन भेटूया पुढच्या भागात....

क्रमशः

🎭 Series Post

View all