कोल्हाट्याची पोर

She Got Her Own Identity.

सौ.प्राजक्ता पाटील 

राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा 

विषय: स्त्री आणि परावलंबित्व

उपविषय: कोल्हाट्याची पोर..

टीम सोलापूर..



"काय झाले कुसुम तुला ? तू शाळेतून आल्यापासून माझ्याशी बोलत का नाहीस?" लक्ष्मी आपल्या लेकीला म्हणाली.


"आई, तुला खरं सांगू का ? मला या सगळ्या गोष्टींचा खूप राग येतोय. का करतेस तू असे? जे मला अजिबात आवडत नाही." कुसुम डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली.


"तू मला सांगणार आहेस का काय झाले ते ?" लक्ष्मी विचारात पडली होती.


"तू असं नाचलेले मला अजिबात आवडत नाही. शाळेतही सगळेजण मला कोल्हाट्याची पोर म्हणतात ते मला नाही आवडत. तू माझं एवढं छान नाव ठेवले ना कुसुम. मग कोणी का घेत नाही माझं नाव? आपण कोल्हाटी आहोत म्हणून तू नाचतेस. आजीही नाचायची, पण मला नाही नाचायचं.  मला शिकायचंय. माझ्या नावाची ओळख हवीय मला. " कुसुम लहान असूनही तिचे विचार मात्र खूप मोठे होते.


"आली मोठी शहाणी. तुला काय करायचे?आई नाचते म्हणून. तिच्याच पैशावर तुला शिकता येते आणि आपण याच पैशावर जगू शकतोय हे लक्षात ठेव." भिमाबाई रागाने कुसुमला म्हणाल्या. 


"आई तू जरा शांत होशील का ?" लक्ष्मी आपल्या आईला म्हणाली. 


"तू मलाच शांत कर. या आधीही तुला सांगत होते पोरीला जास्त शिकवायच्या भानगडीत पडू नकोस म्हणून. कोल्हाट्याची पोर हाय ती तिच्या पायात घुंगरू शोभतात. हातात पेन नाही." भिमाबाई म्हणाल्या. 


"असं कोण म्हणतं? मी शिकवीन माझ्या पोरीला. शोभेल तिच्याही हातात पेन. उद्याच मी कुसुमला बोर्डिंगमध्ये पाठवेन. तिथे तू तुला हवं तसं जगू शकतेस. तुला ही तुझ्या आईच्या पायातली घुंगरं तिथं नाही दिसणार. मन लावून शिक." लक्ष्मी आपल्या लेकीला जवळ घेत म्हणाली.


"नाही आई,  मला हे असं बोर्डिंगमध्ये शिकायचं नाही . मला तू ही माझ्यासोबत हवी आहेस. आणि हे घुंगरू नकोयत मला तुझ्यासोबत. माझ्या आईने नाचलेलं मला नाही आवडत. किती वेळा सांगितलं तुला?" सातवीत असलेली लक्ष्मी आपल्या आईला आपल्या मनातील भाव व्यक्त करत म्हणाली. 


कुसुमला जवळ घेत आई डोळ्यातून अश्रू ढाळू लागली. "कुसुम तुला कसं सांगू ग ? हीच आपली लक्ष्मी. याच्यावरच आपण आपलं पोट भरतो." 


"आई आपण दुसरंही काही करू शकतो ना ? आमचे सर म्हणतात, कष्ट करणाऱ्याला कितीही कामे मिळतात. आपल्याला हात पाय देवाने धडधाकट दिलेत ना, मग का म्हणून आपण असे नाचून पैसे कमवायचे तूच सांग ? कुसुम हट्टाला पेटली होती.



\"ही एक कला आहे ग. मी या कलेची पुजारी आहे.पण तू अजून लहान आहेस. तुला ते नाही कळायचं.पण मला माझ्या लेकीचंही मन नाही दुखवायचं.आई जगदंबे तूच सांग मी काय करू?\" मनात विचार करून 


"चल झोपायला जाऊया." म्हणून लक्ष्मी कुसुमला झोपायला घेऊन गेली. रात्रभर लक्ष्मीच्या डोळ्याला डोळ्याला लागला नाही. तिला वाटलं, \"कुसुम बोलते तेही खरंच आहे. आपल्या नावाने आपल्याला किती जण ओळखतात? आपल्या मुलीला स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करायची असेल तर मी का बर तिच्या मागे उभे असू नये ? जी चूक माझ्या आईने केली ती मी करणार नाही. मी काहीही करीन पण आता माझ्या पायात घुंगरू बांधणार नाही." रात्रभर शांत डोक्याने विचार करून लक्ष्मीने शहरात जायचा निर्णय घेतला. 


\"कधी शाळेचं तोंड न पाहिलेली लक्ष्मी शहरात कशी पोट भरणार? दोन दिवस राहून येईल परत.\" असंच भिमाबाईंना वाटलं. म्हणूनच सकाळी उठून बॅग भरणाऱ्या लक्ष्मीला त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही. लक्ष्मीने कुसुमचे आणि आपले कपडे बॅगेत भरले. बाकी सर्वांनी अडवले परंतु लक्ष्मीने कोणाचेही ऐकले नाही. 


शहरातल्या शाळेत आपल्याजवळ असलेल्या पैशाने कुसुमनचे लक्ष्मीने ऍडमिशन केले. \"पण आता पुढे काय ?\" हा मोठा यक्षप्रश्न लक्ष्मीपुढे उभा राहिला. पण आपल्या लाडक्या लेकीला पैशाची अडचण सांगून तिला अपराधीपणाची भावना वाटून द्यायची नव्हती म्हणूनच कुसुमने काम शोधायला सुरुवात केली. कुसुम एका घरी धुणी भांडी करायला गेली पण बोलता बोलता तिची खरी ओळख समजली आणि त्या बाईने लक्ष्मीला कामावरून हाकलून दिले. रात्रभर लक्ष्मी विचारात पडली. उद्या काहीतरी काम शोधायचं एवढेच तिच्या डोक्यात होतं. आणि काम शोधत शोधत ती रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तिथे काही काम मिळते का? हा शोध घेत असतानाच तिला स्टेशनवर एका सफाई कामगाराची गरज आहे असे समजले. आणि तिने कसलाही विचार न करता आपल्या मुलीला जिद्दीने शिकवण्यासाठी रेल्वे स्थानकावर झाडू मारण्याचं काम स्वीकारलं. तिचा रोजचा नित्यक्रम सुरू झाला. घरचं काम आवरलं की ती रेल्वे स्थानकावर झाडू मारू लागली. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ती आपल्या लेकीला हवे ते उपलब्ध करून देत होती. 


एक दिवस अचानक कुसुमच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन रेल्वेस्थानकला भेट द्यायला आले होते. तिथे सर्व मुले रेल्वे स्थानकावरील दृश्य पहात होती. शिक्षक शिक्षिकाही मुलांना रेल्वे स्थानकाची माहिती करून देत होत्या. मुले फार आनंदात होती. तेवढ्यात एका मुलाने एक कागद खाली फेकला. तो उचलण्यासाठी कोणीतरी लक्ष्मीला आवाज दिला. "कसला झाडू मारला आहे हा? सगळा कचरा तर इथे तसाच आहे." तो व्यक्ती म्हणाला. त्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. लक्ष्मी काही न बोलता आली सहज तिची नजर समोर गेली. तिची कुसुम सर्व मित्र-मैत्रिणींसोबत उभी आहे हे तिने पाहिले. आपल्या मुलीला आपल्या कामाची लाज वाटू नये म्हणून लक्ष्मीने आपला चेहरा लपवला. पण चाणाक्ष कुसुमच्या नजरेतून आपली आई निसटली नाही. 


कुसुमने तो कागद उचलला आणि डस्टबिनमध्ये टाकला सर्व मुले हसू लागली. 


"काय गरज होती ग तुला त्या झाडूवालीची मदत करायची?" एक मुलगी म्हणाली.


आईला फार वाईट वाटले. \"आता माझी मुलगी माझी ओळख कधीच सांगणार नाही. ती का स्वतःचा कमीपणा करून घेईल ?\" असा विचार करून लक्ष्मी मागे फिरली.  कुसुमने चटकन आपल्या आईचा हात हातात घेतला आणि ती म्हणाली, "ही झाडूवाली जरी असली तरी माझी आई आहे. ती कष्ट करून जगते. याचा मला खूप अभिमान आहे." 


शिक्षकांनी टाळ्या वाजवल्या. खरंच मुलांना त्यांची चूक समजली. 


"काम लहान किंवा मोठे नसते. कष्ट करण्याची तयारी असेल तर देवही मदत करतो. म्हणूनच कोणत्याही सोयी सुविधा नसूनही कुसुम परीक्षेतील गुणांमध्ये किंवा इतर नितीमूल्यांच्या बाबतीतही नेहमी पुढे आहे.कारण तिच्या आईने तिच्यावर केलेले संस्कार तिच्या प्रत्येक कृतीत दिसतात." मॅडम कौतुकाने म्हणाल्या.


"मी कसले संस्कार करणार ? माझ्या लेकीने लहान असून माझ्यावर संस्कार केले. घुंगरे बांधून नाचणारी मी आज एक आदर्श आई आणि एक मेहनती स्त्री झाले ते केवळ माझ्या लेकीच्या हट्टामुळे." लक्ष्मी आपल्या लाडक्या लेकीला जवळ घेत म्हणाली.


"म्हणजे ?" मॅडम आश्चर्याने म्हणाल्या. 


लक्ष्मीने सगळी कहाणी मॅडमना सांगितली. आता तर मॅडमना कुसुम एवढी लहान असूनही इतकी समंजस आहे याचं फार कौतुक वाटलं. मॅडमनी आपल्याच शाळेत लक्ष्मीच्या आईला कॅन्टीनमध्ये काम मिळवून दिलं. जेणेकरून लक्ष्मीच्या हातालाही काम मिळेल आणि कुसुमवरही तिचं लक्ष राहील.


कुसुम आणि लक्ष्मीने एकमेकींना मिठी मारली. खरोखर आज लेकीमुळे लक्ष्मी परावलंबित्व झुगारून स्वावलंबी बनली होती.


सौ. प्राजक्ता पाटील