कोकणचा पाऊस

Article

कोकणचो पाऊस

उन्हाच्या तीव्र झळांनी होणारी जिवाची काहिली मे महिन्याचे शेवटचे दिवस जवळ येऊ लागतात तशी असह्य होते. अवघी सृष्टी व्याकुळतेनं वाट पाहत असते त्या जिवलग सख्याची. तो येईल अन भुईची  सारी मरगळ झटकेल एका क्षणात. मलून झाडवेली पुन्हा एकदा वर्षासरींनी टवटवीत होतील. सारी सृष्टी हसेल सजेल अगदी नववधूच जणू! आणि त्याची प्रतिक्षा अखेर संपते. आभाळात आनंदघन दाटून येतात आणि क्षणा दोन क्षणांत ऋतू पालटतो. बरं या वरुणराजाचा प्रदेशागणिक वेगळा थाट! विदर्भ - मराठवाड्यातल्या हलक्या सरी कधी रौद्र रुप अवचित धारण करतात तर पुण्या- मुंबईतला रिपरिपणारा पाऊस कधी हवाहवासा वाटतो तर कधी नकोसा होतो. असा हा लहरी तर कधी मल्लासारखा आडदांग तर कधी लहान मुलासारखा बागडणारा पाऊस जेव्हा कोकणात बरसतो तेव्हा त्याचा थाट अजूनच न्यारा! 
           मे महिन्याचा पंधरवडा सरतो तोच कोकणातील शेतीच्या कामांना वेग येतो. यंदा पाऊस कसा होईल याच्या चर्चा गावातल्या पारापासून ते चहाच्या टपरीपर्यंत रंगू लागतात. पावसाळ्याचे दिवस जवळ येऊ लागले कि कोकणातल्या लोकांच्या गप्पांचा हा एक विषयच असतोच म्हणा ना. त्यात उत्कंठा असते ती गणराजाच्या आगमनाची! बाप्पाच्या स्वागताला वरुणराजा बरसावा  हि प्रत्येक कोकणी माणसाची इच्छा असते. याच दरम्याने छोटा खंड्या, महाधनेश, पावश्या असे पक्षी आभाळभर भिरभिरताना दिसले की कोकणात पावसाचे वेध लागतात. मग सुरु होते आठवडा बाजारातून घरात सामानसुमान भरुन ठेवण्याची लगबग कारण पुढचे पावसाचे तीन चार महिने उत्साहात भरणार्‍या आठवडा बाजारांना सुट्टी मिळते त्यामुळे पावसाचे महिने पुरेल इतके मसाले, कांदे बटाटे, धान्य असा सारा लवाजमा घरात भरुन ठेवण्यासाठी लगबग सुरु होते. 
     रोहिणी नक्षत्राचं आगमन पावसाच्या हलक्या सरी सोबत आणतं आणि व्याकुळली धरती त्या सरींच्या शिडकाव्याने शांत होते. कोकणी माणूस वाट पाहतो असतो ती मृग नक्षत्राची ज्याला मिरग म्हणतात. मिरगात पाऊस पडला तर शेती पिकणार नाहीतर पुढची नक्षत्र भुईला कोरड पाडणार हे पुर्वापार चालत आलेलं इथल्या शेतीचं तत्व. मिरग, पोरगा, म्हातारा, आसलका, मंगा अशा पंधरा दिवसांनी बदलणार्‍या नक्षत्रांनुसार पावसाचा अंदाज जुनीजाणती माणसं सांगतात.             
         जसाजसा पाऊस धिंगाणा घालू लागतो तसे कोकणातले ओढे, कोरड्याठक्क नद्या - नाले पुन्हा खळखळु लागतात. डोंगरकपारीतून धवल प्रपात उड्या मारु लागतात. सह्याद्रीच्या डोंगररांगातून दिसणारे हे अक्राळविक्राळ जलप्रपात पाहताना दुरुन भिती वाटते पण त्यात चिंब भिजायला मन आतूर होतं. मग कुठे ट्रेकिंग, छोट्या सहली तर कुठे दोस्तांसोबत बाईकवरुन फेरफटका हे इथल्या कोकणीतरुणांचे नेहमीचे उद्योग. नदीओढ्यांवरचे साकव ओलांडताही येत नाहीत इतका पाऊस धुमाकूळ घालतो अन ओढ्याच्या, झर्‍याच्या पाण्यातून छोटे मासे, खेकडे उड्या मारू लागतात. दुपारी नदीवर जाऊन गळ टाकून बसायचे नाहीतर रात्री चार- पाच जणांनी मिळून गॅसबत्तीच्या उजेडात मासे पकडायचे आणि गरमागरम चुलीवरचं माश्याचं कालवण आणि भात हा बेत ठरलेला असतो. याशिवाय ओल्या मातीत उगवून येणारी अळंबी, टाकळा, अळु अश्या रानभाज्यांची चवही औरच या दिवसांत. धो धो पावसात हायवेवरून सुसाट गाड्या पळवताना क्षणभर थांबून पावसाळी निसर्ग न्याळाहत एखाद्या टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरमागरम वडापाव खायची इच्छा पर्यटकांना नाही झाली तरच नवल! 
           ओलेचिंब डांबरी रस्ते, दुतर्फा हिरव्या डोंगररांगा आणि रस्त्यावरून डुलत डुलत चालणार्‍या गाईगुरांचा तो घंटानाद, मागून गवताचे भारे डोक्यावर घेऊन चालणारा बळीराजा पाहिला कि वाटतं, शेतीसारख कष्टाचं आणि चेहर्‍यावर तृप्तीचा आनंद देणार कुठल दुसरं काम नाही.  निसरड्या पायवाटा, रस्त्यालगत उगवलेलं हिरवगार गवत, लाजाळू, दूर्वा सारख्या वनस्पती, भुईलाही भार वाटावा इतकी नाजूकशी रानफुलं पाहताना हळुच एखादं फुलपाखरु हिरव्या गवतावर येऊन पंख पसरतं. दुरवरुन डोंगरातून येणारा पाण्याचा खळाळता आवाज ऐकत रहावा वाटतो. कधी गवतातून सरकन एखादं जनावर बाहेर डोकावत अन भितीने थरकाप उडवतं. पंखांवरचं पाणी उडवीत स्वस्थपणे हिरवाई पाहणारे पक्षी आणि रानात अचानक दिसणारी मयुराच्या नृत्याची झलक म्हणजे अविस्मरणीय आनंद! पावसाळ्याच्या दिवसात निसर्ग मुक्तहस्तानं रंगांची, गंधाची उधळण करित असतो आणि आपण कोकणातल्या निसर्गाच्या आणखी प्रेमात पडतो. कोकणातला पाऊस अन पावसात चिंब न्हालेलं कोकण पुन्हापुन्हा डोळ्यात साठवावसं वाटतं आणि म्हणूनच असेल कदाचित कोकणातील माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याच्या हृदयात कोकण जपलेलं असतं आणि इथला पाऊससुद्धा.

स्नेहा डोंगरे
पूर्वप्रकाशित - मोडीदर्पण दिवाळी अंक 2020