कोकणातील गूढकथा ३

ही एक काल्पनिक कथा असून मनोरंजनाच्या हेतूने लिहिली असून अंधश्रद्धा पसरविण्याचा लेखिकेचा हेत?

पावसाचे दिवस होते. मी माझ्या गाडीने नृसिंहवाडीला गेलो होतो. वाडीला दर्शन, अभिषेक, महापूजा करून, रात्रीच्या पालखीसाठी थांबलो. सोबत बायको पण होती.. पण तिला पुढे पुण्याला कामाला जायचं असल्याने तिला पुण्याच्या बस मध्ये बसवलं आणि रात्री १० वाजता वाडीतून निघालो.

मी तेव्हा कुडाळ, सिंधुदुर्गला राहत होतो. पोहचायला किमान ५ तास तरी लागणार होते.

गगनबावडा मार्गे रस्ता खराब असल्याने परतीचा प्रवास आंबोलीमार्गे करु असा विचार करून मी निघालो.

सुरुवातीचा प्रवास अगदी मस्त चालू होता. रात्रीचा रिकामा रस्ता.. आणि होम मिनिस्टरचा अंकुश नसल्याने मी थोडा सुसाट वेगानेच सुटलो होतो.

साधारण १२.३०-१ वाजला असेल आणि खुप जोराने पाऊस सुरू झाला. रस्त्याचा अंदाज घेऊन गाडी हळूहळू चालवत होतो. काचेवर सारखी वाफ धरत होती.. आणि थोडं धुकं ही होतं.. एका फुटाच्या पुढचं काहीच दिसत नव्हतं. शिवाय पुढे-मागे एकही गाडी नव्हती की ट्रक नव्हता. अशावेळी पुढे गाडी असली की पुढच्या गाडीचा अंदाज घेऊन गाडी चालवता येते. त्यामुळे खुप जपून हळू गाडी चालवत मी चाललो होतो.

बाकी काळोख असला तरी धुक्यामूळे आणि पावसामुळे वातावरण अगदी धुंद झालं होतं. टेप वर किशोर कुमारची सुरेल साथ ही होतीच..

अशावेळी सोबत आपल्याला आवडणारी व्यक्ती असली तर प्रवास अजून रंगतो. आणि त्यात कॉफी किंवा चहा असेल तर लाजबाब.

आम्ही कॉलेजमध्ये असताना खुपवेळा असे पावसाळ्यात आंबोली घाटात येत असु. पावसाळ्यातलं आंबोलीचं सौंदर्य सगळ्यांनाच भुरळ घालणारं असतं.

बाजुच्या परिसराचा अंदाज घेतला.. कावळेसाद तिठ्यापाशी पोचलो होतो.. इथे सेल्फीच्या नादात भान विसरून लोकांनी प्राणही गमावले आहेत. सेल्फी आणि सेफ्टी चा मेळ साधता आला पाहिजे.

असाच विचारात चाललो होतो आणि अचानक गाडी बंद पडली.

'आता इतक्या पावसात आणि धुक्यात गाडीक काय झाला...??' मी स्वतःशीच पुटपुटत खाली उतरलो. आता इथे आजूबाजूला कुणी दिसतही नव्हतं. मी गाडीत तसाच बसलो. देवाचं नाव घेतलं आणि थोड्यावेळाने परत गाडी स्टार्ट करून पाहिली तर गाडी चालू झाली. मी सुटकेचा निःश्वास सोडला.

'सुटलंय बाबा एकदाचो...'

जोराचा पाऊस थोडा कमी झाला होता. तरी रिपरिप चालुच होती.. आणि त्यामुळेच पसरलेलं धुकं आता दाट झालेलं.. निघालो..

पन्नास एक मीटर पुढे आलो असेन इतक्यात कुणीतरी गाडी थांबण्यासाठी हात दाखवताना दिसलं. पण दाट धुक्यात काही नीटसं कळत नव्हतं. भास तर नव्हता?? तसंही कावळेसाद, आंबोली घाटातल्या भासांचे किस्से बरेच ऐकले होते.. नीट अंदाज घेऊन बघितलं तर एक माणुस गाडी थांबवायला हात दाखवत होता.

त्याच्यासमोर मी गाडी थांबवून काच खाली केली तर एक वयोवृद्ध काका होते. म्हणजे हा भास नव्हता.

"काय ओ काका?? काय झाला?? मी काकांना विचारलं..

"खूप गाडिये गेले हयसून रे पण कोणिएक गाडी नाय थांबवाना.. तु देवा सारो इलंस.." ते काका बोलले..

"अरे झिला.. हैसर १० वाजल्यापासना उभो आसय.. नात्यातला मयत झालला.. त्येका इलंलय.. माका जरा क्रॉस पाशी सोडशीत काय??"

आंबोलीचा घाट जिथे संपत येतो तिथे ख्रिश्चन वस्ती आहे.. आणि तिथेच हा क्रॉस आहे.. मनात म्हटलं आपल्याला कुठे वाट वाकडी करायचीय??

"होय काका.. येवा बसा..." असं म्हणत सेन्ट्रल लॉक उघडून दार उघडलं.. बाजुच्या सीट वर ठेवलेली बॅग मागच्या सीट वर ठेवली..

काका गाडीत बसले. त्यांच्याकडे फक्त एक पिशवी दिसत होती.. बाकी काहीच नाही.. आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढ्या पावसात छत्री नव्हती.. पण तरी काका मात्र कोरडे होते.. फक्त पायांनी फ्लोर मॅट वर आलेली ओल दिसली..

काका गाडीत बसले तेव्हा जवळजवळ २ वाजले होते.. १० वाजल्यापासुन म्हणजे जवळपास ३.३० तास ते तिथे उभे होते.. कावळेसाद पासुन तो क्रॉस जवळपास १३-१४ किमी असेल.. म्हणजेच काका अगदी चालत निघाले असते तरी २ वाजेपर्यंत ते घरी पोचले असते.. अर्थात हे माझ्या नंतर लक्षात आलं..

पण त्या क्षणाला ते एकटेच तिथे का उभे होते?? त्यांना आपण गाडीत का घेतोय?? असे कुठलेही प्रश्न डोक्यात आलेच नाहीत माझ्या..!!! म्हणतात ना.. एक एक वेळ असते..

गाडीत काकाही स्वतःहून काही बोलले नाहीत. कदाचित ते कोणा त्या नातेवाईकाच्या दुःखात असतील.. म्हणुन मी ही काही बोललो नाही.. पावसाची रिपरिप सुरुच होती.. मागुन एक दुचाकीवाला येत होता.. पण मधेच बहुतेक तो पुढे निघून गेला..

मी हायवे सोडून आंबोलीच्या रस्त्याला लागुन जवळपास आता १.३० तास झाला होता.. एवढ्या वेळात मात्र माझ्यापुढे मला एक ही गाडी दिसली नव्हती.. मात्र आता पुढे अचानक एक चारचाकी दिसली.. मला मनातल्या मनात थोडा आनंद झाला.. धुकं असल्यामुळे तिच्या मागून मी वाट काढत चाललो होतो.. घाट आता संपत आला होता..

क्रॉस आला.. तास मी गाडी थांबवली. काका गाडीतून उतरले.

"नीट जावा हा पुढे..." असं म्हणत काका वळले.

"होय होय.. तुम्ही पण सावकाश जावा.. काळोख असा.."

असं म्हणत मी काच वर घेताना बाहेर बघितलं.. तर...

तर काका नव्हतेच..

मी परत काच पूर्ण खाली घेतली. आजूबाजूला पाहिलं. कुणीच नव्हतं..

बाहेर आलो.. गाडीला पुर्ण फेरा मारुन पाहिलं.. काका गेले कुठे?? की काका नव्हतेच?? काहीच सुधरत नव्हतं.. गाडीत येऊन बसलो आणि निघालो..

धुकं थोडं विरळ झालं होतं.. त्यामुळे थोडा वेग घेतला.. दाणोली पर्यंत आलो.. पण इतका वेळ पुढे असलेली गाडी दिसली नाही..

बाजुला डोकावुन बघितलं.. फ्लोर मॅट वर चिखलाचे कुठले डाग ही नव्हते..

काका बसले गाडीत की नाही?? या विचारातच घरी पोचलो..!!!