कोकणातील भयकथा १

ही एक काल्पनिक कथा आहे...!

        1965 च्या सुमारास घडलेली घटना आहे. तेव्हा मी BSF ला होतो. BSF ला रुजू झाल्यापासून मी पहिल्यांदाच सुट्टी मिळल्यामूळे कोकणात गावी जात होतो. तेव्हा काही फोनच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे घरी आधी कळवणे वैगरे असे प्रकारचं नव्हते. सरळ जाऊन घरी धडकायचं.
आमचं गाव खूप आत होत. बस पण घरापर्यंत जात नव्हती. बसमधून उतरल्यावर चार किलोमीटर पायी चालत जावं लागतं होतं. मी बस मधून उतरलो तेव्हा आजूबाजूला शांतता होती. थोडीफार जी काही दुकानं होती ती बंद होती. किती वाजले तेही कळतं नव्हतं. त्यावेळी माझ्याकडे घड्याळ वैगरे असण्याचा प्रश्नच नव्हता. रस्ता तसा ओळखीचा होता. पण नेमकी बॅटरी बंद पडली..आणि चांदणही नव्हतं..अमावस्याजवळ आली असावी..पण वाट पायाखालची होती..शाळा आणि कॉलेजला असताना ही वाट तुडवली होती. तरी रात्रीची जाण्याची आणि तीही एकट्याने पहिलीच वेळ ही..त्यात रातकिड्यांचे आवाज, मध्येच एखादा पक्षी आणि काळोख..वातावरणात भीती दाटून आली होती.
तरी मी झपाझप पावलं टाकत वाट तुडवत होतो...आणि नदीजवळ आलो...पाण्याचा खळखळाट त्या निरव शांततेत अजून जीव घेत होता...इतक्यात मागून आवाज आला..
" मधू कधी इलस रे...आनी तो इतक्या रात्रौचो..?"

माझ्या अंदाजानुसार अकरा नक्की वाजले होते. आता कुठल्या मुलीने हाक मारावी.? आई सांगायची अस रात्री अपरात्री कुणी मागून हाक मारली तरी माग वळून पाहू नये..मी संयमाने तसाच चालत राहिलो. तोच दहा पावलं चाललो आणि परत हाक आली.
" अरे मी आपांचा शालू...असो काय करत थांब वांगडाक ( सोबतीला ) .."

आवाज ओळखीचा होता. मी मागे वळून पाहिलं. अरेच्चा ही तर शालिनी. आमच्या दोन घर सोडून पुढे राहते. माझ्या मागच्या वर्गात होती. गेल्यावर्षीच शालूच लग्न झालं. तेव्हा माझं ट्रेनिंग चालू होणार होत त्यामुळे लग्न दोन दिवसावर असताना मी दिल्लीला गेलो होतो. जाण्याआधी खूप रागावली होती ती माझ्यावर लग्नाला मी नसणार म्हणून. त्यानंतर आज प्रत्यक्ष ही अशी रात्रीची भेट.

" अगो शालग्या इतक्या रात्री खय फिरत तु ?"

" अरे रात्र खय नुकतेच धा ( दहा) वाजलेत..अमावस असा म्हणान असा वाटत तुका..आमची ढोरा(गुरे) चुकलीत संध्याकाळपासून ती शोधूक भायर( बाहेर) पडलंय..जरा उशीर झालो..आणि काय रे एक बॅटरी नाय तुझ्याकडे? इतको नोकरेक लागलं पण बॅटरी नाय घेवक जमली? आता चल... माझ्याकडे आसा कंदिल.."

आम्ही दोघे अगदी गप्पा मारत-मारत शाळेच्या, लहानपणीच्या, गावातल्या आठवणी काढत चाललो होतो.
" आपण सगळे ह्याच वाटेने शाळेत जावं..किती मज्जा करु ना...ह्या नदीच्या पाण्यात दगड टाकू..पाणी उडव एकमेकांवर.."

" आणि नदीक पूर इलों काय शाळेक दांडये मारू.."

मधेच शालू थांबली..

"मधू तुका लहान पोराग्याचो आवाज येता..? रडाचो..?"

मी कानोसा घेतला.

"नाय गो...तुका भास झालो आसात..चल.."

मी परत जुन्या आठवणी आणि गप्पामध्ये रमलो..

" खूप आठवणी असत ह्या वाटेर..पण आता माका येताना भीती वाटा होती गो शालू..नदीच्या बाजुक स्मशान असा..कधी जावक नाय ना असा रात्रीचा...खयच्या भूता-खेतांन झपाटला तर.."

" आता मी असाय ना मधू तुझ्याबरोबर ..भिया नको..भूतजवळ सुद्धा येवचा नाय.."

बोलत बोलत घरी कधी आलो कळलच नाही..!

तिने अगदी घरापर्यंत बॅटरी दाखवून मला घराच्या मागच्या बाजूला सोडले.

" चल रे उद्या भेटया सुशेगात..चाय पिवक ये..."

" होय होय येतंय मी उद्या घराकडे.."

आणि शालू तिच्या घराकडे गेली...!

माझ्या आवाजाने पडवीत झोपलेले बाबा जागे झाले..

"कोण रे ...मधू..?"

" होय मियाच तो.."

" कोणाबरोबर बोला होत..? इतक्या रातीचो इलस तु पुलावरसून..पत्र पाठवन कळवलं नाय..मी इल असतय ना न्हेवक तुका "

" कोण नाय ओ..माका आधी घरात घेतात काय? लय झोप येता..काय सगळा खळ्यातच (अंगण) बोलया..चला भुतूत( आतमध्ये)..!

आमच्या बोलण्याने आई आणि बहीणपण जागे झाले..आईने दार उघडून घरात घेतले. आणि मी हात- पाय धुवून आईने साखर आणि पाणी शास्त्र म्हणून दिले ते पिऊन डाराडूर झोपलो. भूक अशी नव्हतीच. पण खूप दमलो होतो आणि गावाच्या हवेत आपल्या घरात झोप लागते ती खरी झोप..!

दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा बारा वाजले होते. त्यामुळे सगळे प्रातर्विधी आणि अंघोळ दुपारी उरकले. मग खूप दिवसांनी देवाची पूजा करेपर्यंत सव्वा वाजला होता. आईने सरळ जेवायला वाढले.

" चल रे मधू जेवक चल..."

आम्ही सगळे एकत्र बसून जेवलो..छान बेत होता..फणसाची भाजी, उकड्या तांदळाचा भात आणि कैरीची आमटी..मी ताव मारला. जेवून झाल्यावर झोपायचा प्रश्न नव्हता. नुकताच तर झोपून उठलो होतो आम्ही गप्पा मारत बसलो.

" आई सकाळी उठवायचा ना लौकर माका..."

आईला बोलू न देता माझी बहिण नीता मधेच बोलली..

" अरे दादा मिया उठवी होतय पण आईन म्हटलेंन नको.."

" अरे मधू रात्री इलस तेव्हा चार वाजान गेल्ले..म्हनान म्हंटला झोपानेत..दमान( दमून) इलेलस ना.."

"काय तीन वाजान गेल्ले..कायतरी काय आये..मी उतरलाय तेव्हा फार तर बारा वाजले असतील..चार किलोमीटर रात्रीच्या काळोखात चलत येवक खूप खूप म्हणजे दोन तास लागतत..आणि शालू होता ना वांगडाक..तेचि बॅटरी होती..इलों गजाली मारीत..संध्याकाळी चाय पिवक बोलावल्यानं...!"

आई आणि निताचा चेहरा पांढरा-फटक पडला होता.

" कोण गावला(भेटणे) तुका..?" आईने परत विचारलं

मी सगळं घडलेला वृत्तांत सांगितलं....आता तर आई आणि निताची बोबडीच वळली. आई सरळ देवघरातला
अंगारा मला लावायला लागली..

" काय करत तिया(तु)..अंगारे कित्या लावत...?

" अरे शालग्या बाळतपणात वारला... आज बारा दिस जातले.. सोन्यासारख्या चडू असा रे पाठी....रडत असता बिचारा भुकेनं..वरचा दूध काय आवशीच्या दुधाची कमी भरून काढना नाय "

" काय...?" मी जवळपास किंचाळलो.

कसं घडलं हे ? अस काही विचारण्याचे आता माझ्यात त्राण नव्हते. त्यानंतर जो काही फणफणून ताप आला..आईने बरेच अंगारे- धुपारे केले गंडे-दोरे बांधले..मनावरचा ताण कमी झाला तसा मी बरा झालो..!
परत कैकदा ती वाट रात्री-अपरात्री तुडवली..पण शालुची ती भेट अगम्यच राहिली..!

 समाप्त

ही कथा पुर्णतः काल्पनिक आहे..मनोरंजन म्हणूनच वाचवी..