Dec 01, 2023
माहितीपूर्ण

कोजागिरी पौर्णिमा

Read Later
कोजागिरी पौर्णिमा
मंद प्रकाश चंद्राचा
त्यात स्वाद गोड दुधाचा
उत्साह असतो जागरणाचा
मेळा जमतो जीवलगांचा!

नवरात्र उत्सव संपून दसऱ्यानंतर येणारी पहिली पौर्णिमा आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी होते. यास \"माडी पौर्णिमा\" असेही म्हणतात. शरद ऋतूत येते म्हणून \"शरद पौर्णिमा\" ही म्हटले जाते.
या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत.बंगाली लोक \"लोख्खी पुजो\" म्हणतात तर कुणी \"कौमुदी पौर्णिमा\" म्हणतात.
पौर्णिमेची रात्र म्हणजे \" पूर्ण चंद्राची रात्र\" .पौर्णिमा दर महिन्याला येते.पण शरद ऋतूत येणारी ही पौर्णिमा खास असते.
या दिवशी आकाशात चंद्र आणि चांदण्यांची सुंदर आरास दिसते.त्यामुळे हिला \"रास पौर्णिमा\" म्हणत असावेत.
एका आख्यायिके नुसार या दिवशी श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत रासलीला केली म्हणून या पौर्णिमेला \"रास पौर्णिमा\" म्हणतात.
या दिवशीचा चंद्रप्रकाश हा जास्तच शीतल असतो.


असे मानले जाते की,
या दिवशी उत्तररात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व \"को जागर्ति\" म्हणजे \"कोण जागत आहे\" असे विचारते,म्हणून या दिवसाला \"कोजागिरी पौर्णिमा\" म्हणतात.
चांदण्यांच्या प्रकाशात \"अमृतकलश\" घेऊन प्रत्येकालाच विचारते की \" को जागर्ति...?\" म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? आणि तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. साद देणाऱ्या,जागरण करणाऱ्या सगळ्यांना ती अमृत म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते,धनधान्य, सुखसमृद्धी देते.

या दिवशी पाळावयाच्या व्रताला \"कोजागरव्रत\" म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करतात. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवैद्य दाखवतात.दूध आटवून त्यात साखर,केशर,पिस्ते, बदाम,चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालतात.
कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो.त्यामुळे चंद्राचे चांदणे पृथ्वीवर जास्त पडते.हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्त्विक असल्याचे सांगितले जाते.विविध आजारांवर हे चांदणे आणि चांदणे मिश्रित दूध गुणकारी ,फलदायी ठरते.
खगोलशास्त्रीय दृष्ट्या ही या दिवसाला महत्त्व दिले जाते.
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात. पावसाळा संपत असतो, हिवाळ्याची सुरुवात होते,ऑक्टोबर ची गरमी असते.दिवसा गरम व रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. बहुतेक याच कारणामुळे पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा असावी.
कोजागिरीचं शीतल चांदण अंगावर घेतल की,मनशांती, मनशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला मोठे महत्त्व आहे.सर्वत्र कोजागिरी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते.रास,गरबा,गाणे,भजन आणि मस्त मसाला दुधाचा स्वाद!
महाराष्ट्रात विदर्भ प्रांतात \"भुलाबाई\" आणि खानदेश भागात \"गुलाबाई\" या नावाने देवी पार्वती आणि शंकराच्या मूर्तीची भाद्रपद पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा एक महिना पूजा केली जाते.मुली संपूर्ण महिना रोज प्रत्येक मुलीच्या घरी जातात.मूर्ती समोर गाणी म्हणतात, टिपऱ्या खेळतात,प्रसाद वाटतात. आणि कोजागिरी च्या दिवशी जागरण करून सांगता करतात.

कोजागिरीचा उत्सव,जागरण हे चं सांगते की,जीवनात सकारात्मकता, सौम्यता,सौंदर्य ता,शीतलता असावी.कर्तव्यात सजगता, जागरूकता असावी आणि नात्यांमध्ये उत्साह,आनंद असावा...


आरोग्य आणि उल्हासदायी कोजागिरी
सर्व मिळूनी आनंदाने करू साजरी...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//