कोजागिरी पोर्णिमा

The Importance Of Sharad Or Kojagiri Pornima



चारुचंद्र की चंचल किरणे
खेल रही है जलथल मे
स्वच्छ चांदनी बिछी हुई है
अवनी और अंबरतलमे
पुलक प्रकट करती है धरती
हरित तृणों की नोकोंसे
मानो झूम रही है तरु भी
मंद पवन के झोकों से

हे वर्णन आहे शरद पौर्णिमेचे अर्थात कोजागिरी पौर्णिमेचे.


अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हटले जाते. या पौर्णिमेला माणिकेथारी म्हणजेच मोती तयार करणारी असेही संबोधलं जातं. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरण समस्त जीवसृष्टी करिता लाभदायक असल्याचे मानले जाते. या रात्री औषधींचे सेवन केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं असे सांगितले जाते.


कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री बारा वाजेनंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले गेले आहे.

मान्यता नुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्रमंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली. साक्षात लक्ष्मीदेवी या रात्री चंद्र मंडळातून येऊन पृथ्वीवर अवतरते आणि मध्यरात्री \"को जागर्ती\" म्हणजेच \"कोण जागे आहे?\" अर्थात \"कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे\" असे देवी विचारते आणि जागरण करणाऱ्यांवर प्रसन्न होते.

कोजागिरी पौर्णिमेस होणाऱ्या प्राचीन लोकोत्सवास वात्सायनाने \"कौमुदी जागर\" व वामन पुरणाने \"दीपदान जागर\" म्हटले आहे.

श्री कृष्णाला 16 कलांचे अवतार मानले जाते. द्वापार युगात वृंदावनामध्ये श्रीकृष्णाने गोपिकांसोबत याच रात्री रास लिला केली होती. वृंदावनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे.

या दिवशी चंद्र प्रकाशात मसाला दूध किंवा खीर ठेवतात. हे मसाला दूध केशर, पिस्ते, बादाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे वस्तू घालून तयार केले जाते, आणि लक्ष्मी देवीला त्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. हे दूध आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असल्याचे मानले जाते. अस्थमा दमा असणाऱ्यांकरिता हि रात्र अत्यंत उपयोगी समजली जाते. या रात्री दम्याचे औषध खिरीत मिसळून चंद्राच्या प्रकाशित ठेवतात. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्यांचे गुणधर्म बदलतात आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.

शरद पौर्णिमेच्या दिवशी करावयाच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तिन्ही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात मग त्यांना पुष्पांजली समर्पित करतात चंद्राला अटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात.

निसर्ग बद्दल वाटणाऱ्या कृतज्ञते पोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची पूजा करण्याचा दिवस म्हणजे नावान्न पौर्णिमा. घरासमोर लावलेल्या हरतर्हेच्या भाज्या नव्यान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या असतात. नवीन धान्य भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. तिची पुजा या  दिवशी केली जाते.

मराठी  संस्कृतीला जपणारा मराठमोळा खेळ म्हणजे भोंडला. नवरात्रीच्या दिवसात घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत खेळला जाणारा भोंनडला किंवा हादगा.


पाटावर मधोमध हत्तीचे चित्र किंवा मूर्ती ठेवून त्याच्याभोवती फेर धरतात आणि गाणं म्हणतात. स्त्रिया आणि मुलींसाठी साजरा केला जाणारा हा खेळ आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात या दिवशी भुलाबाई म्हणजेच शंकर-पार्वती यांची पूजा करून पारंपारिक गाणी म्हटली जातात. भाद्रपदेच्या पौर्णिमेपासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत ही गाणी घरोघरी जाऊन लहान मुली म्हणत असतात.

पूर्वीच्या काळी मुलींची लग्न लवकर व्हायची त्यांना सासरी लहान वयातच अनेक जबाबदाऱ्या त्याना पूर्ण कराव्या लागत म्हणून मग माहेरी आल्यावर या मुली आपल्या मैत्रिणींना सासरची वर्णन सांगायची असा काही स्वभाव या गाण्यांमध्ये असतो.

\"पहिली ग पूजा बाई देवा देवा साss दे\" असं म्हणून ही भुलाबाईची गाणी सुरू होतात. मग \"अक्कण माती चिकन माती\" म्हणून जात तयार करून करंज्या कशा बनवायच्या, त्याशिवाय नणंद भावजयीच्या नात्यातली आंबट गोड नोकझोक नंदा भावजय या दोघीजणी या गाण्यातून सांगितली आहे. भुलाबाईच्या सर्व दागिन्यांचे वर्णन \"इथून दाना पेरत जाऊ मैयाच्या दारी\" या गाण्यात केल आहे.

\"नदीच्या काठी वाळा पेरला बाई\" या गाण्यांमध्ये सासरच्या वैद्याची अगदी दीनवाणी अवस्था वर्णन केली आहे. तर माहेरचं वैद्य कसा हुशार आणि सर्वगुणसंपन्न आणि श्रीमंत आहे याचा रसभरीत वर्णन आहे. काही काही ठिकाणी मुलीच्या हातून किंवा सुनेच्या हातून दागिना हरवला आणि तिची सासू तिला विचारते आहे की तो दागिना तू कुठे ठेवला तर ती म्हणते \"हरवला तर हरवला तो माझ्याच वडिलांनी मला घेऊन दिला आहे. चांदण्या रात्री भुलाबाई जागवल्या सासू पुसे सुनेला\" या गाण्यातून ही सासू सुनेची मजेदार वादावादी सांगितली आहे.

माहेरी जायला आसुसलेल्या सुनेला कारल्याचं बी पेरून आडकाठी करणारी सासू, कारल्याची भाजी करून, भांडे घासून मग घरातील सर्व ज्येष्ठांना अनुमती मागायला लावते.

भुलाबाईंच्या बाळांची गाणी पण मजेदार ठेवली जातात. \"अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होती टिपरी भुलोजीला लेक झाली नाव ठेवा झिपरी\" या आणि असे यमक जुळवून अनेक नाव भुलाबाईच्या बाळांना ठेवली जायची.दत्ता-बत्ता, लुना-विना, सिलेंडर-अलेक्झांडर, घंटी-बंटी आणि अनेक.

शेवटी \"एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू\" म्हणून भुलाबाईच्या बाळासाठी पाळणा केला जातो. भुलाबाईची गाणी म्हणायला आलेल्या सगळ्या मैत्रिणींना खिरापत दिली जाते.खिरापत म्हणजे काहीतरी नाविन्यपूर्ण खाऊ किंवा एखादा पदार्थ. ही खिरापत ओळखताना कधी कधी खूपच दमछाक होते, पण एकंदरीतच ही भुलाबाईची गाणी किंवा भोंडला किंवा हादगा म्हणजे त्या काळातील स्त्री मनाच्या काव्यत्वाचा मुक्त आविष्कारच म्हणावा.

आमच्या लहानपणी भुलाबाईची गाणी म्हणून झाली की, ज्या मैत्रिणीच्या घरी गाणे म्हटली आहे तिची आई तिला औक्षण करत असे.



©® राखी भावसार भांडेकर.


*********************************************

संदर्भ

माहिती व फोटो साभार गुगल.