कोण होतीस तू

Koan Hotis Tu maza jivan pravas me ashi me tashi

"कोण होतीस तू!.. 
   हे आत्मचरित्र काय असतं हो?आत्मचरित्र का लिहावं ? आणि ते लिहिले तर कोण वाचणार ? हे माझ्या मनाला पडलेले प्रश्न. 

  मुख्य म्हणजे आपण आत्मचरित्र लिहावे एवढे आपण मोठे पण नाही  आहोत. हा एक मनाचा गोंधळ. 

  पण कधीतरी मनाला प्रबळ इच्छा होते. मग मनचं मनाला म्हणते, लिही तुझ्यावर तुझा प्रवास. काय हरकत आहे. 

   तू कुठे गेलीस की तेथील वातावरण एकदम बदलून टाकतेस. लोक तुला म्हणतात देखील तू एवढी आनंदी कशी राहतेस ? लोकांना हसवतेस, तुझ्या स्वभावावर लोकं भरभरून बोलतात. अग मग लोकांना आवडेल तुला जाणून घ्यायला. 

    कारण इतका माझ्या जिवनाचा प्रवास सरळ नव्हताचं. खुप कठीण वाटेवर मी प्रवास केला आहे. सुखात सगळे वाटेकरी असतात पण दु:खात मात्र आपलेच म्हणणारे अनोळखी होतात. जश्या मध असला की मधमाश्या घोंघावतात तद्वतच !.. 

 खरं सांगू मी कोणी मोठी लेखिका नाही, आवड होती म्हणून लिहित गेले.

   कॉलेजमध्ये असताना कधी पेपरमध्ये कधी कॉलेजच्या मासिकात छापून सुध्दा यायचे. का कोणास वाटू लागले आपण लिहू शकतो कारण लिखाणाला वाचक मिळत होते पण ते छंद शाळा, कॉलेज पुरतेचं  मर्यादित राहिले. त्याला पुढे प्रोत्साहन मिळालं नाही. एकंदरीत ते अडगळीतचं गेले होते म्हणायचे.

  कारण पितृछत्र हरवले की सगळ्या वाटा बंद होतात. कशाच्याही परवानगीसाठी इतरांपुढे हात पसरावे लागतात. कोणताचं हट्ट करता येत नाही. याची वेळोवेळी प्रचिती येत होती. 

   एक बंदीस्त आयुष्य माझ्या वाट्याला आले. मग त्याच जिवनशैलीचे वळण शरीराला पडले. 

 एक एक अनुभव गाठीशी आहेत. एकेकाळी साध्या लॅण्डलाईनवर कोणाशी संभाषण करायला घाबरणारी मी विश्वास नाही बसत ना पण सत्य आहे. 

  पण आज या सोशल मीडिया मी बिनधास्त हाताळते. वाचक आणि लेखकही धूरा मी सहज पेलते. 

 आता खरे सांगू ? या आभासी जगात ' ताई ' ' मॅडम ' हाक जेव्हा कानी पडते ना, तेंव्हा डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतात. वाटतं खरंच किती वाचक, मित्रमंडळी आपले चाहते आहेत. हेचं खरे आपले जवळचे आप्तेष्ट आहेत. 

कारण आजवर फक्त याच प्रेमाला मी भुकेली होते तेच मला कधी मिळत नव्हते. ते कधीच माझ्या वाट्याला आलेचं नव्हते. 

 कदाचित मी काहीही कमावले नाही पण माणसांची मनं मात्र कमावली.

  आज हीच संपत्ती खुप अफाट आहे. मला ही संपत्ती तिजोरीत लॉक करून ठेवावी लागत नाही. उलट सरळ चोरांच्या नजरेसमोर माझ्या ह्रदयाची चावी असते. 

   या निमित्ताने चोर  देखील माझ्या घरी आला तर तो चोरी करायचे सोडून माझ्या सहवासात राहून माझ्याशी गप्पा मारत बसेल आणि मी देखील त्याचा मस्त पाहूणचार करेन हे माझ्या स्वभावाचे मर्म आहे. 

  लोक आत्मचरित्र का लिहितात ? हा प्रश्न नेहमीच मला सतावतो हे मी सांगितलं आहेच. पण मी जेव्हा इतरांचे आत्मचरित्र वाचते तेंव्हा, आपण काय केले काय कमावले किती कठीण परिस्थितीतून आपण वर आलो हेचं त्यांचा लिखाणातून दिसते.

मग मी मोठमोठ्या दिग्गजांचे आत्मचरित्र वाचते किंवा त्यांचे चरित्र अभ्यासते जसे माननीय  प्रधानमंत्री मोदीजी चहावाले होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रिक्षा चालवत होते. 

  मग परत मला नेहमीचाच प्रश्न पडतो. हे जे सगळे मोठं मोठ्या पदावर स्थानापन्न लोक असतात. ते सगळे कठीण परिस्थितीतूनचं वर येतात का ? का तशी परिस्थिती असलेले लोकचं मोठ्या पदावर पोंहचतात ? शेवटी हे मला न उलगडणारे कोडे आहे.

 हा फाफटपसारा माझ्या लिखाणात नेहमीच असतो.मग मुळ मुद्दा बाजूलाच राहतो.
तर काय हं आत्मचरित्र ! हो माझं आत्मचरित्र वरती कळत नकळत माझ्या जिवनातील संघर्षाच्या घटनांबद्दल नमूद केले आहेच . 

  तर मी मध्यमवर्गीय घरात जन्मलेले एक शेंडेफळ ! माझ्या जन्माच्या वेळी मोठा भाऊ कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता आणि त्याच्या खालच्या सगळ्यांचे शिक्षण पुर्ण होत आलेले.

 बहिणीसाठी स्थळं बघत बघत आई वडीलांचे प्रेम उतू गेले आणि आमच्यारूपी ते उफाळून आले ही माझ्या जन्माची कहाणी. 

 त्यामुळे माझे लहानपणी खुप लाड झाले. मराठवाडय़ातील एका खेडेगावात माझा जन्म झाला. 

पण मोठे बहिणभाऊ उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला होते.घरात मीच लहान त्यामुळे मोठे ताई दादा औरंगाबादहून येताना सगळ्या नवनवीन वस्तू आणायचे. 

आमच्या गावी ब्रेड पण मिळायचा नाही. दादा येताना तो घेऊन यायचा. मग दादा येणार म्हटलं की मी दादा येणार यापेक्षा मिल्कब्रेड येणार म्हणून मी स्टॅण्डवर  बसची वाट पहात उभी रहायचे. मित्रमैत्रिणी माझा हेवा करायच्या कारण माझ्याकडे वेगवेगळ्या वस्तू असायच्या. 

  बापरे ! मैत्रिणीचं होत्या मला. काय बिशाद होती मित्र बनवायची. माझ्या आधीचे बंधुराज दंडुका घेऊन मागे असायचे हो माझ्या.

  छान, छान वस्तू कपडे, स्कूल बॅग,अरे हो ! तेंव्हा स्कूल बॅग नव्हती शाळेत वह्या पुस्तके घेऊन जायला छोटी पेटी नवीन बाजारात आली होती. 

  माझ्या मोठ्या भावाने ती मला ती आणून दिली होती.त्यावेळी डिलक्स वह्या मिळायच्या त्या वह्या, भारी भारी पेन घेऊन मिरवायचे म्हणजेचं शाळेत मजा करायला जायचे पण अभ्यास  पण करत होते बरका ! पण पहिल्या नंबरात नव्हते हे ही तेवढेचं खरे असो. 

 बालपणीचा काळ सुखाचा खुपचं लाडाकोडात गेला.दहावीपर्यंत गावी शिक्षण झाले. शालेय जीवनात आबंटगोड आठवणी बऱ्याचं होत्या. दहावीत चांगले मार्कस् होते.

   आता भावा बहिणींची लग्न झाली होती. दादा मुंबईला मोठ्या कॉलेजात प्रोफेसर होता. त्यांनी उच्चशिक्षणासाठी मला मुंबईत आणले.

  आवड होती शिक्षणाची पण काय सांगू इंग्रजीचा बागुलबुवा लई भ्या दाखवत होता मला मुंबई नगरात ! लय भ्या वाटायचं इंग्रजीचे कारण दहावी पर्यंतचे सगळे शिक्षण मराठी माध्यमातून आणि खेडेगावात झालेले. 

  एक वर्ष कसंबसं काढलं मुंबईत. कारण गाव मला हाक मारत होते. मुंबईतून पळाले मग मी गावाला. मग गावीचं वाणिज्य शाखेची पदवी घेतली. 

  पण ही बंबई माझी पिच्छा सोडणार नव्हती. शिक्षण पुर्ण झाले तर स्थळ मुंबईतीलच आले.

  पितृछत्र लवकर हरवलेले त्यामुळे लग्नाची जबाबदारी भावावरच आली. होकार नकार याचा प्रश्नच नव्हता. 

 तुम्हांला म्हणून सांगते लई आवडला हा पोरगा. पार्ले बिस्किटमध्ये इंजिनिअर होता.

 म्हटलं चला, कधीमधी पाव्हणे आल्यावर आपण पार्ले बिस्किटे खाणारी, आता रोज बिस्किटे खायला मिळणार. लगेच होकार आणि शुभमंगल सावधान झाले. 

पण सासरी आल्यावर खुपच सावधान झाले. इथे परत संघर्ष सुरू झाला. बालपण गळून पडले कारण मी पहिल्यापासून अल्लड आणि मोकळ्या वातावरणात वाढले होते. इथे आल्यावर गावाकडची हा ठप्पा सोबत घेऊन वावरु लागले. प्रत्येक गोष्टीत तुलना होऊ लागली. तक्रार करू शकत नव्हते. 

    लग्न भावाने लावून दिले होते. आई अशिक्षित तीही परावलंबी मग मी जाणार तरी कुठे होते. सासर अति सुशिक्षित मग सुशिक्षित सासुरवास ते करत होते. 

  इथे हसण्यावर बोलण्यावर बंधने आली. भाषेला हसत होती. मग माझ्यातल्या  विनोदी स्वभावाने गंभीरता धारण केली. 

   मुंबईतील ब्लॉक सिस्टीम माझ्या स्वभावातील मोकळ्यापणाला पण आतल्या आत कोंडून ठेवू लागले.

 दिवसभर घरकाम, येणाच्या जाणाऱ्यांची उठबस आणि टिव्हीवर लावलेली मालिका बघायचे. तो बंद झाला की आपण बंद .हे चॅनल लावा ते चॅनल लावा ही म्हणायची मुभा नव्हती. कारण रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात. अहोपण फारचं कमी वाट्याला यायचे. प्रायव्हसी अशी नसायची. एकत्र कुटुंब पध्दत. 

  लगेच दिवस गेले. मुलगी झाली. परत घरात नाराजीचा सूर पण नशीब तिचे आणि माझे बलवत्तर दिसायला अगदी बापावर गेली. मी सुटले एकदाची. कारण दिसायला मी सुंदर नव्हते आणि नाही. 

तिच्याशी बरीच नाती जोडली गेली. पण आई म्हणून मी कुठेचं नव्हते. यालाच सासूरवास म्हणतात बरका ! 

   आवड खुप होती. शाळा कॉलेज मध्ये 'टॉमबॉय' म्हणून वावरणारी मी स्त्री स्वातंत्र्यावर व्यासपीठावर मोठीमोठी भाषणे देणारी माझ्या बाबतीत आवाज उठवू शकले नाही.

 कारण व्यासपीठावरून व्याख्यानं देणे सहज सोपे असते. पण तशी वेळ स्वतःवर आली म्हणजे माणसाची मती खुंटते हे खरे. 

 लेक माझी मोठी होत होती. हे ही दिवस जातील म्हणत माझी छबी लेकीत बघत होते. 

   कधी कधी अनुभव हा विचित्र शिक्षक असतो. तो आधी परिक्षा घेतो आणि मगचं शिकवतो. याचा अनुभव मला पदोपदी येत होता.हे ही दिवस जातील या आशेवर मी होते. 

  खरंच आशा कधीच निराशा करत नाही. मी देवाला केलेली प्रार्थना फळाला आली. यजमानांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी नायजेरियात सांगून आली.
 
घरातून विरोध होता. मी तिथे कशी राहणार, तिला नको नेऊस एकटाच जा यावर सासूसासऱ्यांचे एकमत होते. 

    पण यजमानांनी मनावर घेतले. आम्ही मग परदेश गमन गेले. यावेळी मला घरी खूप संघर्ष करावा लागला. त्या आठवणी आता नकोश्या वाटतात. प्रकर्षाने मी त्याचा उल्लेख इथे टाळते. 

   या विमानाच्या पहिल्या प्रवासावर मी वेगळे लिहिले आहे.

   मी नायजेरियात गेले आणि जणू काही पिंजऱ्यातील पाखराला मोकळे आकाश मिळाले. हळूहळू तिकडे गेल्यावर माझ्यातील मी उमलत गेले. ते दिवस मस्तच होते. 

नायजेरियात मला विविध प्रांतातील मित्रमैत्रिणी मिळाल्या. अगदी जिवाभावाच्या झाल्या.
त्यांच्या सहवासात राहून माझ्या स्वभावातील बुजरेपणा कमी होत गेला. स्वभावात मोकळेपणा आला.

  मग तिथे  विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. मला माझ्या अंगिकृत कलागुण दाखवण्यास वाव मिळू लागला. मग मी प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागले. मस्त स्वच्छंदी पाखरू झाले. 

 नायजेरियात असताना परत एकदा गोड बातमीची चाहूल लागली. मग काही दिवसांसाठी मी परत भारतात आले.तेंव्हा मात्र सासू सासऱ्यांनी माझे दुसरे बाळंतपण खुपचं छान केले. पुत्ररत्न झाले.

  फॅमिली कंप्लींट झाली. काही दिवस परत सहकुटुंब आम्ही नायजेरियात,परत तिथून स्थलांतर केनियात, मुले लहान होती तोपर्यंत विंचवाचे बिह्राड पाठीवर घेऊन फिरत होतो.

 केनियात पण खुप छान मित्रपरिवार मिळाला कारण आता परदेशात राह्यची सवय मला अंगवळणी पडली होती. 

माझ्या स्वभावाला एक देणगी आहे मी कोणाशी पण मैत्री पटकन करते आणि निभावते देखील. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझ्या भोवती गोळा असलेला मित्रपरिवार. 

  मग मुलांच्या शिक्षणासाठी मी परत भारतात आले. यजमान मात्र देशो देशी फिरत होते. 

  मी मात्र भारतात बस्तान बसवले. मुलांचे भविष्य हे ध्येय समोर ठेऊन मी परत एकत्र कुटुंबात राहणे पसंत केले. शेवटी तडजोड करणे सगळ्यांच्याच हिताचे होते. 

त्यामुळे यजमान पण निर्धास्त होते कारण वयोवृद्ध आईबाबा आणि आपली फॅमिली एकत्र असल्यामुळे त्यांना पण आता कसलेच टेंशन नव्हते. 

 मुलं मोठी होत होती. त्यांचे शिक्षण, शाळा, सासूसासरे यांची सेवा यात मी परत अडकत गेले. 

मी कोण आहे हे परत विसरले. याकाळातच माझा अ‍ॅक्सीडेंट झाला. दोन महिने बेडवर. त्यावेळी समजले आपले कोण परकं कोण!लेक माझी दहावीत होती. तिने खुप सेवा केली. आज ते दिवस आठवले की डोळे भरून येतात. इथेही प्रकर्षाने मी काही गोष्टींचा उल्लेख टाळेन. 

  मुले मोठी झाली. शिक्षणाच्या एक एक पायऱ्या ते वर चढत होते.याच या काळात मुलांना माझी गरज होती तेंव्हा मला त्यांना वेळ देता आला नाही.

   कारण सासू सासरे यांची आजारपणे हे त्यावेळी मी माझे आद्य कर्तव्य समजत होते. आता याची सल कायम माझ्या मनाला टोचत राहते. 

 सासू सासऱ्यांचे वयोमानानुसार आजारपण सुरू झाले एकामागून एक दोघेही हळूहळू अंथरुणाला खिळले. त्यांच्या जवळच्या म्हणजे त्यांना खात्री होती त्यांनी हात वर केले. मग माझ्या यजमानांना नाईलाजाने परत येणे भाग पडले.

 नाही, नाही म्हणता आम्ही दोघांनी त्यांना चमच्याने भरण्यापासून डायपर बदलणे इथपर्यंत सगळी सेवा दहा वर्षे केली. 

 दोन महिने सासूबाईं कोमात होत्या. नळीतून लिक्विड देणे म्हणजेचं नाकातून आर टी टाकली होती. त्यांचे पथ्यपाणी करणे म्हणजे मला एक चॅलेंज होते ते मी स्विकारले आणि तडीस नेले. 

त्यांना समजत नव्हतं पण डोळे मात्र माझ्याशी बोलत होते.त्याचा आत्मा माझ्याशी बोलत होता. अपराधी पणा त्यांच्या डोळ्यात दिसत होता. 

 पण मी त्यांना प्रेमाची साथ दिली. समोरचा कसाही वागला तरी आपण सरळच वागावे ही माझ्या आईची शिकवण त्यांचे संस्कार त्यामुळे हा इंद्रधनुष्य मी पेलवू शकले. त्या दोघांना आम्ही लहान बाळांप्रमाणे सांभाळले.

 त्यांच्या आशीर्वादाचे फळ मला नक्कीच चांगलेच मिळाले. आता लेकीचेही  लग्न झाले. प्रेमविवाह केला तिने पण अभिमानाने ऊर भरून येतो लाखात एक जावई मला मिळाला. मुलगा पण सतत मेरीट मध्ये पहिल्या प्लेसमेंट चांगल्या कंपनीत लागला. हे आज्जी आजोबांचे आशीर्वादचं  नाहीत का? 

 पण जेव्हा मुलांना माझी गरज होती तेव्हा मी त्यांना वेळ देऊ शकले नाही. ही सल मात्र कायम माझ्या मनाला सलते. 

    आता सगळी दु:खे संपली आहेत. दोन्हीही मुले परदेशी स्थायिक आहेत. आई बाबा हयात नाहीत. आता सगळ्या जबाबदार्‍या संपल्या अगदी कर्तव्य म्हणून नाही प्रेमानं निभावल्या. ते सुध्दा जिथे आहेत तिथून मला आशीर्वादच देत असतील यात शंका नाही. 

आता तर आता नवीन संसाराची सुरुवात आहे. अजून नातवंड येणे बाकी आहे. सुनबाईं अजून यायच्या आहेत. पण मी जे भोगले ते मुळीच सुनेच्या वाटेला येणार नाही याची दक्षता मी जरूर घेईन. 

  आता खुप मोकळा वेळ मिळतो. पण कधी कधी हा मोकळा वेळ खायला देखील उठतो. मग भुतकाळ आठवतो आणि डोळ्यातून अश्रू ओघळतात. मग मुलं म्हणतात, ' विसर आता कशाला त्रास करून घेतेस ?तुला हवं तसं जग आता पण जे तुला मिळाले नाही ते आता मिळतंय त्याचा उपभोग घे.' 
   
 पण खरे सांगू आता काहीच नको वाटतं. एकांत हवासा वाटतो. 

  पण आता मात्र अंतर्मनाचा आवाज मी ऐकते. तेव्हा मला आत दडलेला हरवलेला माझा छंद आवाज देतो. नकळत हातात लेखणी येते. आजूबाजूचे अनुभव लेखणी मला लिहायला भाग पाडते. कधी कधी स्वानुभव देखील उतरतात लेखणीतून. 

  माझ्या स्वभावातील विनोदी स्वभाव देखील हळूच बाहेर डोकावतो आणि मग स्टॅण्डअप् कॉमेडी सारखे नाटुकली त्यातून जन्माला येते आणि मला सांगते ही खरी तू आहेस. 

  खरं सांगू ही तर आता सुरुवात आहे. अजून खुप मोठा पल्ला गाठायचा आहे. नक्कीच तो गाठेन यात तुमची साथ महत्वाची. काही चुकले तर समजून सांगा यात लहानमोठे कोणी नसते. कधी अनुभवाने खुप शिकायला मिळते. 

 मनातील घुसमट कागदावर उमटते. या जिवानं खुप सोसले आहे, अनुभवले आहे. कधी कधी सुखाची उजळणी करायची असते तर दु:खाची गाळणी. तरंच आयुष्याला नवीन दिशा मिळते. माझी कोणाविषयीही तक्रार नाही. 

आवड असली की सवड मिळतेचं. मग काय सुरूवात कधीही करता येते. 

  मी तर म्हणते, नियतीने माणसाच्या दैवात काही भोग लिहिलेले असतात आणि कितीही नाही म्हटले तरी माणसाला ते भोगावेच लागतात. टाळता येत नाहीत. 

  पण भोगाचा हा काळ काही अक्षय असत नाही. रात्री मागून दिवस येतोच ना ? उन्हानंतर पाऊस हा निसर्ग नियम आहे. मग आता मागे वळून नाही पहायचे. 

एक बरंय माणूस अंतर्मनातील विचार लपवू शकतो नाहीतर या जगात कितीतरी अनर्थ घडले असते बरोबर ना ? 

 पण शेवटी काय असते " झाले गेले विसरून जावे पुढे, पुढे चालावे." बऱ्याच प्रसंगाना मी आत्मचरित्रातून वगळलेले आहे कारण मला त्या कटू आठवणी माझ्या मनःपटलावरून संपूर्णतः पुसून टाकायच्या आहेत. त्यांची पुन्हा पुन्हा आठवण कशाला हवी ? 

शेवटी काय लिहू ? शब्द ते शब्दच. शब्दांना भावनांचे बांध थोडेच घालता येतात ? कारण कधी कधी ते बांध वाहून जातात आणि डोळ्यांतून आसवांच्या नद्या उसळतात. 
   
   या आत्मचरित्रात लिखाणावरून मला बहिणाबाई चौधरीची एक सुंदर कविता इथे नमूद करावीशी वाटते. बहिणाबाई म्हणतात, 
          नको नको ज्योतिषा
          माझ्या दारी नको येऊ, 
          माझे दैव मला कळे, 
          माझा हात नको पाहू 
          धनरेषांच्या चऱ्यांनी 
          तळहात रे फाटला, 
          देवा तुझ्याबी घरचा
          झरा धनाचा आटला |
           नशीबाचे नऊ ग्रह, 
         तळहाताच्या रेघोट्या |
         बापा नको मारू थापा, 
         उगाचच खऱ्या खोट्या! 

खरंय ना ? जाणून घेतले ना मला, तुम्हांलाही वाचायला मला आवडेल बरका ! कशी वाटली 'मी अशी मी तशी' कळवायला विसरू नका बरंका !

©️®️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे