कोड

Koad

#कोड

विकास आणि आशना, जवळजवळ दोन वर्ष अफेअर चालू होतं त्यांचं. आशनाच्या घरी आशनाच्या पप्पांना विकास तितकासा पसंत नव्हता. पण आशनापुढे त्यांनी हार पत्करली. विकासच्या आईवडिलांना आशनाचे आईवडील जाऊन भेटले. 

विकासच्या आईवडिलांचा वनबीएचकेचा ब्लॉक होता. तिघंही अगदी साधीसुधी माणसं,एका पठडीतून चालणारी..शाळा,नोकरी,सेवानिव्रुत्ती..वगैरे. आशनाचे वडील मात्र उद्योगी होते. आपली रेल्वेतली नोकरी सांभाळून त्यांनी एक खेळण्याचं दुकानही घातलं होतं. रिक्षा घेऊन ती भाड्याला लावली होती. आशना बीए पास होती व एका टायपिंग इन्स्टिट्यूटमधे पार्टटाइम नोकरी करत होती शिवाय तिने बीएडलाही प्रवेश घेतला होता. 

कार्य लवकर उरकून घेऊ असा विकासच्या आईचा आग्रह आशनाच्या आईवडिलांनी मान्य केला. खरंतर एकुलती एक लेक सासरी जाणार ही कल्पनाच आशनाच्या आईवडिलांना करवत नव्हती. दोन महिन्यानंतरच्या एका शुभमुहुर्तादिवशी लग्नाची तारीख पक्की केली.

 दोन्हीकडची मंडळी पत्रिका छापण्यात,दागिने,कपडे घेण्यात व्यस्त झाली. आशनाच्या आईने लग्नात नेसण्यासाठी गुलबक्षी रंगाची पैठणी घेतली. आशनाच्या वडिलांनीही कधी नव्हे तो कोट शिवायला टाकला. ते शिक्षक होते असल्याने त्यांच्या शिक्षक मित्रमंडळींना जोडीने जाऊन आमंत्रणं दिली. लग्नात सरबराई करण्यात दिरंगाई होईल म्हणून प्रत्येकाच्या घरी एडव्हान्समधे मानपानाची कापडं पोहोच केली. अगदी प्रत्येकीच्या आवडीच्या रंगाच्या साड्या दिल्या. कुठेही हात तोकडा घेतला नाही. 

आशना खूप खूष होती. विकास व ती ऑफिस सुटल्यावर खूप दूरवर भटकायची. चौपाटीवर भेळपुरी खायची,नारळपाणी प्यायची. मावळत्या सुर्याच्या साक्षीने भविष्याची सोनेरी स्वप्नं रंगवायची. लग्नाला फक्त महिना शिल्लक राहिला होता नि एके रात्री आशना कपडे बदलत असताना तिला मामीचा केळवणाचा निरोप सांगण्यासाठी म्हणून आलेल्या आशनाच्या आईला तिच्या पाठीवर पांढुरका डाग दिसला,अगदी कुत्र्याच्या पंज्याच्या ठशाएवढा. आशना म्हणाली,"काय गं आई,कायतरी सांगत होतीस ना. मधेच अशी गप्प का झालीस."

आई उत्तरली,"आशना,तुझ्या पाठीवर गं."

"काय आहे पाठीवर? हा तो मानेच्या जरा खाली तीळ आहे तो का तुला ठाऊक नाही! मावशीसारखाच आहे म्हणतेस नं अगदी मावशीच्या पाठीवर आहे त्याच जागी."

"नाही गं बाळा. त्या तीळाचं नाही सांगतय मी. सायीसारखा डाग उमटलाय गं तुझ्या पाठीवर."

"आई,मला कसा गं दिसेल पाठीवरचा डाग!"

"तेही बरोबरच आहे तुझं पण आपण डॉक्टरांना दाखवुयाच."

"बरं,या शनिवारी जाऊ आपण. मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवते."

"नको गं उशीर. चल आत्ताच."

"अगं एवढं काय नडलय. जाऊ ना सावकाश. तुला का कमी कामं आहेत घरात! स्वैंपाकही व्हायचा असेल. चल भरभर करुया. आज आपण सोलकढी करुया आई नि कुरडयाही तळुया. मी देते नारळ खवून."

"तू आधी डॉक्टरकडे चल बघू."

दोघी मिळून फेमिली डॉक्टरकडे गेल्या. त्यांनी चिठ्ठी दिली स्कीन स्पेशालिस्टची. लगेच स्कुटी त्या दवाखान्याच्या दिशेने फिरवली गेली. डॉक्टरांनी खोलीत अंधार करुन  वुड लँपखाली तो डाग तपासला. आशनाच्या आईची शंका खरी ठरली. तो पांढरा डाग चमकत होता अगदी कोडाचा असतो तसा. आशनाची आई काकुळतीला येऊन म्हणाली,"डॉक्टर लवकरात लवकर मिटवा हा डाग. माझ्या लेकीचं लग्न ठरलय ओ." डॉक्टरांनी त्यांना पोटातून घ्यायला काही औषधं लिहून दिली,मलम दिलं व काही पथ्य सांगितली.

 डॉक्टर म्हणाले,"हा डाग कधी जाईल आय मिन तो जाण्यासाठी किती दिवस,महिने लागतील हे निश्चित सांगता येणार नाही. एकदा गेला की पुन्हा उगवणार नाही अशीही खात्री देता येत नाही मात्र औषध सातत्याने घेत जा. अन्यथा वेगाने पसरु शकतं. लग्नाचं म्हणाल तर हा काही संसर्गजन्य आजार नाही. रक्तदाब,मधुमेह यासारखाच हाही एक विकार आहे. बरं हा अनुवंशिक असण्याचे प्रमाणही वीस ते तीस टक्के म्हणजे अगदी अल्प आहे. तुम्ही वाटल्यास त्या मंडळींना घेऊन या. मी समजावतो त्यांना."

शनिवारी विकासच्या आईने लग्नाची खरेदी करण्यासाठी आशनाच्या कुटुंबाला बोलवावं म्हणून फोन केला तेंव्हा म्हणाल्या की त्या परवा रात्री त्यांच्या लँडलाइनवर फोन लावत होत्या पण कुणी उचलला नाही. आशनाच्या आईने विकासच्या आईला आशनाच्या पाठीवरच्या डागाविषयी सांगितलं व त्यासाठीच डॉक्टरकडे गेल्याचं सांगितलं. आशनाच्या आईचं बोलणं ऐकून विकासची आई क्षणभर गप्पच राहिली नि न बोलता तिने फोनही ठेवून दिला. 

भिंतीवरची पाल चुकचुकली. आशनाच्या आईच्या काळजात धस्स झालं. त्या रविवारी आशनाचा वाढदिवस होता. खरंतर रात्री बारा वाजता विकासचा फोन यायचा पण तो आलाच नाही. आशनाला वाटलं,विसरल्याचं ढोंग करत असेल. सकाळी ती आन्हिकं आवरुन आईबाबांसोबत देवळात जाऊन आली. आईने तिच्यासाठी खास सिताफळ रबडी व पुऱ्या,पुलाव बनवल्या. बऱ्याच मित्रमैत्रिणींचे फोन येऊन गेले, पण जेवणं झाली तरी विकासचा फोन आलाच नाही.

 आशनाच्या आईवडिलांच्याही चेहऱ्यावर चिंतेचं सावट आलं. शेवटी न राहून आशनाने विकासला फोन केला पण त्याने तिला अगदी कोरडं विश केलं व दूरची मावशी आली असल्याने येऊ शकणार नसल्याचं सांगितलं. तिला त्याचा तुटकपणा लांबूनही जाणवला. टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या हळव्या लेकीच्या नशिबी असे भोग का यावेत असं वाटून आशनाच्या आईवडिलांचं मन आक्रंदलं. 

विकासने आशनासाठी हँडसेट घेतला होता. दरवर्षीप्रमाणे ते लाँग ड्राईव्हला जाणार होते. आशना विकासच्या खांद्यावर रेलून रफीची गाणी ऐकणार होती पण तो एक डाग ज्याने होत्याचं नव्हतं झालं होतं.

 विकासच्या आईने या लग्नाला ठाम नकार दिला होता. ते कोड औषधाने बरं होईल या विकासच्या म्हणण्यावर तिने काही वर्षांत तिच्या अंगभर हातापायांच्या बोटांच्या बेचक्यांत,पाठीवर,पोटावर,नाजूक भागांवर ते डाग पसरले कि काय करणारेस तू विकास असं विचारलं होतं आणि विकास त्यावर सुन्न राहिला होता,डोकं गच्च धरून. शेवटी नाइलाजाने त्याने आशनाचा विषय मनातून काढून टाकायचं ठरवलं. 

विकासच्या आईवडिलांनी एकदा दुपारी आशनाच्या घरी जाऊन त्यांना हे लग्न मान्य नसल्याचं सांगितलं. आशनाचे वडील त्यांना समजावून सांगत होते,"अहो,एकदा तुम्ही डॉक्टरकडे या आमच्यासोबत. डॉक्टर तुम्हाला पटवून देतील की हा आजार संसर्गजन्य नाही. यातही बरेच प्रकार असतात. काही कोड हे ठराविक जागांपुरतेच मर्यादित रहातात. शरीरभर पसरत नाहीत. शिवाय यावर लोशन,औषध,गोळ्या,पथ्य आहेत."
विकासच्या आईबाबांनी आशनाच्या आईने आणलेला चहाही घेतला नाही. ती दोघं एखादं झुरळ अंगावरून झटकावं तसं आशनाच्या आईबाबांना झटकून निघून गेली. 

झाल्या प्रकाराने आशनाचे बाबा अस्वस्थ झाले.  त्या रात्री आशनाच्या बाबांचं बीपी शुट झालं. घराचं छत गरागरा फिरतय की काय असं त्यांना वाटू लागलं. ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यात आलं. रात्रभर आशना व तिची आई त्यांच्याजवळ बसून होत्या. त्या रात्री आशनाने निश्चय केला,असली संकुचित मनाची माणसं नकोच आयुष्यात. अगदी कुमारिका म्हणून आयुष्यभर जगावं लागलं तरी चालेल. 

दोन वर्ष अशीच गेली. आशनाचे आईवडिल आशनासाठी वरसंशोधन करतच होते आणि एके दिवशी सबनीस दाम्पत्य घरी आलं त्यांच्या. आशनाच्या आईने आधीच त्यांना कोडाविषयी सांगून टाकलं. खरंतर तो लोकलाइज्ड विटिलिगो होता,तेवढ्याच भागापुरता मर्यादित तरीही आदल्या वेळसारखा घोळ नको म्हणून. आशनाच्या आईचं ते बोलणं ऐकताच  सौ.सबनीसांनी त्यांना बेडरुममधे न्हेलं. आशनाही होती तिथे. सौ.सबनीसांनी आशनाला त्यांच्या पदराचा पीन काढायला सांगितलं. आशनाने पीन काढून टेबलवर ठेवताच त्यांनी अंगावरचा पदर बाजुला केला व छातीवरचे कोडाचे डाग दाखवले,म्हणाल्या,"आशना बेटा, याच छातीचं दूध प्यायलाय बरं माझा नीरज. त्याला या डागांची घ्रुणा वाटणार नाही. हां आत्ता तुला मी सासू म्हणून पसंत असेल तर ये माझ्या कवेत आणि सौ. सबनीसांनी त्यांचे दोन्ही हात पुढे केले. आशना एखादं वासरु गायीकडे धावत जावं तशी त्यांना जाऊन बिलगली." आशनाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाच्या पाऊसधारा वाहू लागल्या. 

आशनाला सासर छान मिळालं. निरजसारखा समजून घेणारा पती मिळाला. सबनीसांच्या ओळखीवर ती जवळच्याच एका शाळेत गणिताची शिक्षिका म्हणून रुजू झाली. 

******

निरज व आशनाच्या लग्नाला सातेक वर्ष झाली. त्यांना एक गोंडस मुलगाही होता वरद नावाचा.

 निरज व आशना पालकसभेला गेले असता वरद त्यांना म्हणाला आईबाबा,आज मी तुम्हांला माझी न्यू फ्रेंड दाखवतो आणि दोघांचीही बोटं धरून तो जवळजवळ ओढतच त्यांना विणाच्या जवळ घेऊन गेला. विणा तिच्या आईबाबांसोबत बसली होती. विणाच्या हातापायांच्या बेचक्यांत,ओठाच्या बाजूला पांढरे गुलाबीसर डाग होते व वीणाचा हात हातात घेऊन बसलेला तिचा बाबा दुसरातिसरा कुणी नसून विकास होता ज्याने कोडाच्या भितीने आशनाला नाकारलं होतं तोच विकास आपल्या लेकीच्या कोड फुटलेल्या बोटांत बोटं गुंफून बसला होता.

------सौ.गीता गजानन गरुड.