कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -८

वाचा एक हळवी प्रेमकथा.


कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -आठ

मागील भागात :-

अजय आणि रागिणी एकमेकांना प्रेमाची कबुली देतात. तो तिला लग्नाबद्दल विचारतो.

आता पुढे.


"मला सरळ उत्तर देणार नाहीयेस का?"

"कसा रे तू? तुला माझ्या मनातील कळत नाहीये का? तुला गाणं आवडत नाही पण गाणारी मुलगी आवडते. तिच्याशी तुला लग्न करायचे आहे आणि तिच्याच मनातलं तुला ओळखता येत नाही?"


"नाही येत ओळखता. आतातरी सांगशील?" तो चिडून म्हणाला.


"ए, चिडू नकोस ना रे. आजचा दिवस किती चांगला आहे? आजच आपल्याला आपल्या प्रेमाची अनुभूती झाली, तू माझ्यावर प्रेम करतोस हे तुला पटले. तू मला लग्नासाठी विचारलंस आणि आत्ता चिडत देखील आहेस.

अजु, सर्वच्या सर्व गोष्टी एकाच दिवशी नको ना. आपलं नातं आपण हळूवार फुलवूयात ना." ती त्याच्याशेजारी सरकत म्हणाली.


"सॉरी. चिडत असा नाहीये गं. मला ते टिपिकल गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड सारखं नाही वागायचं आहे. काही दिवस रिलेशन, नंतर मग ब्रेकअप. मला तुझ्याशी जोडलेले नाते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत निभवायचे आहे म्हणून तसा रिॲक्ट झालो." तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला.


"हम्म. मला हवा आहेस तू. आयुष्यभर, माझा म्हणून. याचा अर्थ कळतोय तुला? मला माझं आयुष्य तुझ्याचसोबत घालवायचं आहे. प्रेम तर आहेच, पण इतक्यात लग्नाचा विचार करायला आपण अजून लहान आहोत असं नाही का वाटत तुला?" त्याच्या खांद्यावर डोके टेकवत ती म्हणाली.


"वेडाबाई, तुला आत्ताच लग्न करूया असं कुठे म्हणालो मी? फक्त आपलं आपण फिक्स करून ठेवूया. ग्रॅज्युएशन झाल्यावर मी नोकरी शोधेन, त्यानंतर आपल्या संसारासाठी काही पैसे जमवेन, नंतर लग्नासाठी तुला मागणी घालायला तुझ्या घरी येईन." तिच्या डोक्याला डोके लावत तो म्हणाला.


"वॉव! किती भारी ना. तू मला मागणी घालायला येशील. मी तुझ्यासाठी कांदेपोहे आणि चहा घेऊन येईन. मग तू हळूच माझ्याकडे बघशील आणि मी लाजून खाली मान घालेल. इमॅजिन करूनच सगळं कसं मस्त वाटतंय. एकदम फिल्मी!" ती बाजूला होऊन त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली.


"खरंच अगदी फिल्मीच आहेस तू. सिनेमाची गाणी गाऊन गाऊन त्याच जगात जगतेस की काय असं वाटतेय मला. डान्स करताना सुद्धा अगदी देहभान विसरून जातेस. जणू काही त्यावेळी स्वतःला तिथली हिरोईनच समजतेस." त्याने डोक्याला हात लावला.


"हो, मला आवडतं सिनेमाच्या जगात रमायला." ती गोड हसून म्हणाली.


"आणि तसेही अजु, आपली लव्हस्टोरी सुद्धा फिल्मीच आहे ना रे. सगळं कसं फटाफट झालंय, तीन तासाच्या सिनेमासारखं. माझं गाणं होईपर्यंत आपण फक्त एकमेकांच्या मनात होतो आणि आता तू मला चक्क लग्नाबद्दल विचारलेस. आहे की नाही आपली फिल्मी स्टोरी?"


"हं. त्या दुनियेतून बाहेर येऊया आणि घरी जाऊयात. तूही तुझा रियाज व्यवस्थित कर. फायनल राऊंडला पोहचायचे आहे ना?" तो.


"तुला एक सांगू? फायनल राऊंडला पोहचले की तुला मी माझ्या घरी घेऊन जाईन. येशील ना?" रागिणीने उठत विचारले.


"हो, येईन की. पण आता मात्र आपण आपापल्या घरी जाऊयात." तिचा हात पकडून चालत तो म्हणाला.

*******


"मग तू गेला असशील ना तिच्या घरी? म्हणजे तुला रागिणीचे पूर्वीचे घर माहिती आहे. अजय एकदा तिथे जाऊन चौकशी करून येऊयात ना रे. तुला तिच्यासाठी असे तीळतीळ तुटताना मी नाही बघू शकत." रात्री गॅलरीत बसून चांदणे न्याहाळताना मेघा त्याला विचारत होती.

रागिणीच्या मावशीकडून परतल्यावर स्वराने ती आँटी म्हणजे रागिणी असल्याचे तिला सांगितले होते.


"भेटल्या का तुझ्या टीचर?" मेघाने हसून स्वराला विचारले.


"नाही गं. त्या आँटी तिथल्या आजीच्या गेस्ट होत्या. त्या इथे राहत नाही. पण तुला माहिती आहे?"


"काय?"


"अगं त्या रागिणी आँटी पप्पाच्या फ्रेंड आहेत. पण पप्पाने त्यांचा नंबर सुद्धा घेतला नाही. एक नंबर खडूस फ्रेंड आहे हा."


"स्वरा?"


"सॉरी मम्मा." तिने जीभ चावत कानाला हात लावला.

"बट मम्मा आय एम सो हॅपी. पप्पाने माझी एका फेमस म्युझिक क्लास मध्ये ऍडमिशन केली. त्या आधी आम्ही आईस्क्रीम पण खाल्लं आणि हे तुझ्यासाठी आणलंय."

मेघाच्या हातात आईस्क्रीमचे कप देत स्वरा आत पळाली. स्वारी भलतीच खूश होती.


आईस्क्रीम हातात घेत मेघाने अजयकडे पाहिले. तो तिची नजर टाळत बेडरूममध्ये गेला. जेवण होईपर्यंत तीही त्याला काही बोलली नाही. स्वराची तेवढी बडबड सुरु होती. स्वरा झोपली तेव्हा तीच त्याला घेऊन गॅलरीत आली.


तिला काय विचारायचे आहे हे त्याला ठाऊक होते. तसे लग्नाआधी रागिणीबद्दल थोडेफार त्याने सांगितले होते आणि याच त्याच्या प्रामाणिकपणावर भाळून मेघाने त्याला होकार दिला होता.


आज मात्र त्याला हातचे काहीच राखून ठेवायचे नव्हते. गॅदरिंगच्या डान्ससाठी असलेली दोघांची पार्टनरशिप, रागिणीचे गाणे, तिच्याबद्दलच्या त्याच्या भावना, त्याने मांडलेले लग्नाचे प्रपोजल.. सारे काही सांगत तो मेघासमोर रिता होत होता.


"आपण जाऊयात का रे? किंवा तिच्या मावशीकडून काही माहिती मिळते का ते विचारूया. नाहीतर मीच असं करते त्यांच्याकडून रागिणीचा नंबर घेते म्हणजे थेट तिच्याशी बोलणे तरी होईल." मेघाने पुन्हा विषय तिथेच आणला.


"नाही, तू असं काहीच करणार नाहीस. माझी शपथ!" तिच्या ओठावर बोट ठेवत तो म्हणाला.


"मग काय करू? माझ्या नवऱ्याला असं मनातल्या मनात झुरतांना केवळ बघत बसू? अजय, तुझा त्रास मला नाही रे सहन होत." तिच्या डोळ्यातील पाणी टचकन गालावर आले.


"मेघा, का इतकी चांगली आहेस तू? तू जर माझ्या आयुष्यात नसतीस तर माझं काय झालं असतं?" तिला कुशीत घेत तो म्हणाला.

"या जर- तर च्या शब्दात गुंतवून मला गंडवू नकोस रे. सांग ना, का रागिणीला शोधायचे नाही म्हणतोस? तेसुद्धा आपल्याजवळ पर्याय असताना?" त्याच्या खांद्यावर डोके ठेवत तिने अलवारपणे विचारले.


"कारण तिला दिलेल्या वचनात मी बांधल्या गेलोय गं. शेवटच्या भेटीत तिने माझ्याकडून कधीच न भेटण्याचे किंवा तिचा शोध न घेण्याचे वचन घेतले होते.

तेव्हा माझी फायनलची एक्झाम झाली होती आणि ती सेकंड इयरला होती. तिची परीक्षा आटोपली आणि ती ते शहर सोडून दुसरीकडे निघून गेली. आम्ही शेवटचे भेटलो त्याच्या दुसऱ्या दिवशी. ती कुठे गेली हे मला कधी कळलेच नाही.

इतके दिवस ती मनात आहेच पण आज तिच्याबद्दल ऐकून अपराधीपणाचे शल्य हृदयात टोचायला लागले. का माहितीये?"

"का?" त्याच्या बोटात बोटे गुंफत मेघा विचारती झाली.

उत्तर वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
*****

🎭 Series Post

View all