कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -९

वाचा एक हळवी प्रेमकथा.
कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -नऊ.

मागील भागात :-
अजय मेघाला त्याच्या आणि रागिणीच्या नात्याबद्दल सांगतो. ती तिला भेटायचे म्हणते परंतु तो नकार देतो.

आता पुढे.


"तेव्हा माझी फायनलची एक्झाम झाली होती आणि ती सेकंड इयरला होती. तिची परीक्षा आटोपली आणि ती ते शहर सोडून दुसरीकडे निघून गेली. आम्ही शेवटचे भेटलो त्याच्या दुसऱ्या दिवशी. ती कुठे गेली हे मला कधी कळलेच नाही.

इतके दिवस ती मनात आहेच पण आज तिच्याबद्दल ऐकून अपराधीपणाचे शल्य हृदयात टोचायला लागले. का माहितीये?"

"का?" त्याच्या बोटात बोटे गुंफत मेघा विचारती झाली.


"इतकी वर्ष तिने मला नकार दिले एवढंच मला ठाऊक होतं. तिच्याशिवाय मी जगू शकणार नाही असे वाटत असताना आईने मला त्यातून बाहेर काढले. कोणामुळे कोणाचं काहीही अडत नाही असे ती म्हणाली. तुझ्याशी लग्न झाल्यावर मी फक्त तुझा होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

मला वाटलं मी जसा पुढे निघून गेलो तसे रागिणी सुद्धा पुढे गेली असेल. तिनेही लग्न करून संसार थाटला असेल. पण मेघा, ती तिथेच अडकली आहे. माझ्या गुंत्यातून कधी बाहेर आलीच नाही गं. म्हणून तर तिने लग्न केले नाही. माझ्यामुळे तिची ही अवस्था झालीये त्याचे दुःख बोचतेय मला.

असं वाटतं तिला भेटून तिच्या कानाखाली सनकण एक हाणून द्यावी आणि विचारावं की का वागलीस असं? कसली शिक्षा स्वतःला देते आहेस? का मला स्वतःचा गुन्हेगार केलेस?

पण वचनाच्या बंधनात तिनेच मला अडकवून ठेवले आहे. त्यामुळे मनात असूनही मी भेटू सुद्धा शकत नाही." त्याचे डोळे भिजले होते.


"अजय, तुझी वेदना मी समजू शकते. म्हणून तर मी म्हणतेय की मी रागिणीशी बोलते. इतकं भरभरून प्रेम करत असताना ती असं का वागली? त्याचे कारण तरी कळायला हवे."


"नको माझ्यामुळे तुला आणखी त्रास नको. मी तुला शपथ घातलीय हे विसरलीस का तू?"

"अजय.."

"मेघा, नको ना गं हट्ट करू. तुला कळतेय का तू काय करायचं म्हणतेस? स्वतःच्या नवऱ्याच्या एक्स गर्लफ्रेंडला भेटायचं म्हणतेस. वेडीच आहेस तू. वेडी म्हणण्यापेक्षा भोळी आहेस तू. असे काही केल्याने स्वतःच्या नवऱ्याला हरवण्याची भीती नाही का गं वाटत तुला?"


"अहं. तुला हरवण्याची भीती का वाटावी? तू केवळ माझा आहे हे कळतंय की मला. तुझ्या डोळ्यात दिसतेय ते. आपल्या नात्याबद्दलची पारदर्शकता अगदी स्पष्ट दिसते. रागिणी तुझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात आहे. तो हळवा कोपरा असू दे तिला. बाकी तू संपूर्ण माझाच आहेस की. मग मला कसली भीती?"
त्याच्या काळ्याभोर डोळ्यात बघत ती म्हणाली.


"मेघा, अशी कायमच माझ्या सोबत असशील ना? रागिणीप्रमाणे मध्येच सोडून तर नाही ना जाणार? तिच्या जाण्याने मी कसाबसा सावरलोय. पण तू जर मला सोडून गेलीस तर नाही गं परत सावरू शकणार. पार कोलमडून जाईन मी." तिला मिठी मारून हुंदके देत तो म्हणाला.


"वेडा आहेस का? देवा ब्राम्हणाच्या साक्षीने तुझ्याशी माझी गाठ बांधली आहे. आता कोणी काहीही केले तरी शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ सोडणार नाही बरं." त्याच्या पाठीवरून हात फिरवत ती म्हणाली.


"आणि रागिणीचा विषय यापुढे नकोच. त्या विषयामुळे आपल्या दोघांनाही त्रास होत असेल तर ते तसेच मागे सोडलेले बरे." तिच्या माथ्यावर ओठ टेकवत तो म्हणाला.

*******

"असा रे कसा सोडायचा हा विषय? कितीही प्रयत्न केला तरी मी तुला कुठे सोडू शकते? अजु, माझ्या गाण्याचे सूर आहेस तू. काहीही झाले तरी गाणं सोडायचे नाही असे वचन घेतले होतेस तू. मग त्याच गाण्यातून सुराला कसे वेगळे काढू शकते?"

टेबलवरचा फ्रेम केलेला त्याचा फोटो हातात घेत रागिणी त्याच्याशी बोलत होती.


त्याचा तो फोटो.. कॉलेजमध्ये असतानाचा. डान्स कॉम्पिटिशन मध्ये त्यांच्या जोडीने पहिला क्रमांक पटकावला होता, तेव्हाचा तो फोटो. तिने मुद्दाम त्याच्या एकट्याचा फोटो डेव्हलप करून फ्रेम केला होता.


ती गाण्याच्या फायनल राऊंडला पोहचली तेव्हा त्याला किती आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात तिने त्याला दिलेली आईस्क्रीम पार्टी. एकच आईस्क्रीम दोघांनी मिळून खाल्ले होते. त्यात त्याचा न आवडता फ्लेवर. पण तिने त्याला ते खायला भाग पाडले आणि त्यानंतर दरवेळी तो तेच आईस्क्रीम खाऊ लागला होता.


"आईला भेटायला येणार आहेस ना?" शेवटचा घास त्याला भरवत तिने विचारले होते.


"हो. आपलं ठरलं होतं ना? मग येतो की. पण काय गं तुझी आई आपल्या लग्नाला परमिशन देईल ना?" बाईक सुरु करत त्याने विचारले तशी ती खळखळून हसली होती.


"काय रे अजु? पुन्हा तोच विषय? दोन दिवसांपूर्वीच तर यावर आपलं बोलणं झालं होतं." त्याला टपली मारत ती म्हणाली.


"तुझ्याबद्दल नाही, तुझ्या आईबद्दल मी बोलतोय. त्या होकार देतील ना?" विस्कटलेले केस नीट करत तो म्हणाला.


"अजु, मी एक स्वच्छंदी पक्षी आहे. माझे निर्णय घ्यायला एकदम मोकळी. त्यामुळे नकाराचा प्रश्नच येत नाही. पण तू आत्ताच आईजवळ हा विषय छेडू नकोस हं. नाहीतर तिला वाटायचं तिची मुलगी एवढ्यासाठीच कॉलेजला जाते." त्याच्या कानात ती म्हणाली.


घरी गेल्यावर तिने आईला त्याची मित्र म्हणून ओळख करून दिली. तो तिचा डान्स पार्टनर होता हेही सांगितले. थोडया गप्पा टप्पा झाल्यावर तो जायला निघाला तशी रागिणीदेखील त्याला सोडायला बाहेर आली.


"आय एम सॉरी. काकू आजारी आहेत हे माहित नव्हतं मला." त्याच्या डोळ्यात कणव दाटून आली होती.


"ए, आई आजारी नाहीये हं. फक्त व्हीलचेअरवर तेवढी आहे. तीन वर्षांपूर्वी एका अपघातात तिचे पाय गेले, बस एवढंच. बाकी ती तिचे पूर्ण काम करू शकते. स्वयंपाक तर एवढा भारी करते ना की तू नुसती हाताची बोटे चाटत राहशील. आता उशीर होईल म्हणून तुला जेवायला थांबवले नाही, पण.."


"एवढया मोठया घरात तुम्ही दोघीच असता? म्हणजे आणखी कोणी दिसलं नाही म्हणून विचारतोय." तिची बडबड थांबवत त्याने विचारले.


"हम्म. सध्या दोघीच असतो. तीन वर्षांपूर्वीच्या अपघातात बाबा आम्हाला सोडून गेले. त्यानंतर आम्ही दोघीच उरलो.. एकमेकींसाठी." ती क्षीण हसत म्हणाली.


"आय एम सॉरी अगं. मला नव्हतं माहिती." तिच्या डोळ्यातील ओल बघून त्याच्या काळजात चर्रर्र झाले.


"ए, तू नको ना वाईट वाटून घेऊस. आम्ही सावरलोय यातून. बाबांची पेन्शन, गावाला असलेली शेतीवाडी.. बरं चाललंय आमचं. आईसाठी मी तिचे सर्वस्व आहे आता आणि आईच्या पायाचे ऑपरेशन झाल्याशिवाय मला दुसरा कसला विचार करायचा नाहीये."


"होईल गं सगळं ठीक. आता तू एकटी नाहीयेस. मी आहे ना सोबतीला? तुझ्या प्रत्येक निर्णयात मी नेहमी साथ देईन." तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला.

त्याचा विश्वासपूर्ण स्पर्श आठवून रागिणीच्या डोळ्यातील थेंब हातातील फोटो फ्रेमवर पडले.

किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला?
कितीदा रडूनी जीवाने हसावे.
कितीदा नव्याने..
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
*****

🎭 Series Post

View all