कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -७

वाचा एक हळवी प्रेमकथा.
कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -सात.

मागील भागात :-

रागिणीचे गाणे ऐकून सर्व खूप प्रभावीत होतात. अजयला देखील तिचे गाणे खूप आवडते.
आता पुढे.


"खरं सांगू? स्पर्धेसाठी म्हणून मी नव्हते गात. ट्रॉफी काय, आज एखादा जिंकेल तर उद्या दुसरा. पण आपल्यातील कला दुसऱ्यांना डिवचून जिंकण्यापेक्षा त्या कलेचा योग्य सम्मान झालेला मला जास्त आवडेल. आपली कला आपणच फुलवावी. ती फुलवताना जर आपला अहंकार वाढीला लागत असेल तर मग त्याला काय महत्त्व उरेल?"


"चला, म्हणजे तुला तत्वज्ञान देखील शिकवता येते म्हणायचे. सर्वगुणसंपन्न आहेस तर तू." तिच्या डोक्यावर टपली मारून तो म्हणाला. त्यावर ती खळखळून हसली.


"तत्वज्ञान असं नाही पण केवळ बक्षीस मिळावं, नाव मिळावं म्हणून कधीच गाणार नाही मी. मला गायला आवडते म्हणून मी गाते."


"आय एम इम्प्रेस्ड." तिच्याकडे कौतुकाने बघत अजय म्हणाला.


"अजु, एक विचारू?" त्याच्या डोळ्यात बघत तिने
विचारले.


"एवढं गोड नावाने हाक दिल्यावर मी नाही थोडीच म्हणणार आहे?"


"हा हात असाच पकडून ठेवशील? कायम?" तिने डोळ्यात आर्जव घेऊन विचारले.

अलवारपणे विचारलेल्या प्रश्नाने त्याने चमकून हाताकडे पाहिले. मघापासूनचा त्याचा हात अजूनही तिच्या हातावर होता.

तिची नजर डायरेक्ट त्याच्या काळजात रुतून बसली होती. नकाराचा प्रश्नच नव्हता. ती आवडायला लागलीय, मनात अगदी घर करून बसलीय हे त्याला आजच तर कळले होते.

काहीसा गंभीर चेहरा करून त्याने तिच्याकडे पाहिले. तिचे आसूसलेले डोळे त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत होते.


"हा हात तर सोडायचा नाहीच आहे. पण त्यासाठी एक अट आहे."

"कसली?" तिचा प्रश्न.


"आत्ता जशी मला हाक दिलीस, तशी आयुष्यभर देशील? तुझ्या तोंडून 'अजु' ऐकायला खूप भारी वाटतं." तो हसून म्हणाला आणि त्यावर ती झकास लाजली.


"सांग ना."


"हम्म."


"हं? मला नीट ऐकू आलं नाही. नीट सांग ना?"


"हो. खूश? चला आजची डान्स प्रॅक्टिस राहिलीये." ती उठत म्हणाली.


"नो, आजची प्रॅक्टिस कॅन्सल. आपण बाहेर जाऊया? दोघेच?" तिचा हात न सोडता त्याने विचारले.


नको. ते कॉलेज, प्रॅक्टिस.." ती आढेवेढे घेत म्हणाली.


"तुला माझ्यासोबत यायला भीती वाटतेय?"


"ना. ज्याच्यासोबत अख्खे आयुष्य काढायचा विचार करतेय त्याची कसली भीती? पण प्रॅक्टिस बंक करून फिरायला गेलो आणि उद्या मी एखादी स्टेप विसरले तर तूच ओरडशील म्हणून नाही बोलले." ती स्पष्टीकरण देत म्हणाली.


"नाही ओरडणार, प्रॉमिस." त्याचा इवलासा चेहरा तिला हसू आले.

"जाऊयात, चल." ती म्हणाली आणि त्याची कळी खुलली.

त्याच्या बाईकवर ती बसली होती. खांद्यावर हात ठेवू की नको या संभ्रमात असतानाच त्याने ब्रेक मारला आणि तिने चटकन खांद्यावर हात ठेवला. तिच्या कृतीने त्याच्या ओठावर मिश्किल हसू उमटले होते.


"मी खूप आनंदी आहे. ज्यावर आपले प्रेम आहे तो या क्षणी आपल्यासोबत आहे ही फीलिंग किती भारी आहे ना?" वाळूत नाव कोरत ती म्हणाली.

"म्हणजे? तुझे आधीपासूनच माझ्यावर प्रेम होते?" तो चकित होऊन म्हणाला.

"हम्म. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून. तुला नसेल आठवत, मी पहिल्यांदा कॉलेजला आले तेव्हा तुला बाईकवरून उतरताना पाहिले. डोळ्यावरचा गॉगल काढला आणि तुझे काळेभोर डोळे माझ्या मनात कायमचे घर करून गेले.

मी त्या डोळ्यांच्या अक्षरश: प्रेमात पडले होते. तुझे नाव काय, कोणत्या इयरला वगैरे मला काहीच ठाऊक नव्हते. पण माझ्या मनाचा राजकुमार तूच आहेस हे मात्र पक्के झाले होते."


"मॅड, इतक्या दिवसापासून माझ्यावर प्रेम करत आहेस मग मला कधी बोलली का नाहीस?"

"तू सिंगल आहेस की नाही हे तेव्हा मला कुठे माहिती होते? मग कसे सांगणार ना? योगायोगाने डान्ससाठी आपण पार्टनर झालो आणि मला कळायला लागले की जेवढा तू हँडसम आहेस तेवढाच एक व्यक्ती म्हणून देखील चांगला आहेस. तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी काहीतरी दिसलं म्हणून तर आज मी हे बोलू शकले.

तुला माहितीये? मी आज गात असताना सुद्धा तुझाच चेहरा नजरेसमोर घेऊन गात होते." ती बोलता बोलता सांगून टाकले.


"हो, ते कळले बरं मला. तुझा आवाज ऐकला आणि सकाळपासून तुला न भेटल्यामुळे सैरभैर झालेले माझे मन एकदम शांत झाले. तेव्हाच मला पटले की मी तुझ्या प्रेमात पडलोय. आजवर ही भावना कधीच कुठल्या मुलीबद्दल जाणवली नव्हती. आत्ताचेच बघ ना तुला सरळ इथे बीचवर माझ्या आवडत्या ठिकाणी घेऊन आलो.

सकाळपर्यंत जर कोणी मला म्हटलं असतं की अजय कोणावर प्रेम करू शकतो तर मी विश्वास सुद्धा ठेवला नसता आणि आता माझ्या वागण्याचे मलाच आश्चर्य वाटत आहे.

रागिणी, लग्न करशील माझ्याशी?" त्याने तिचा हात हातात घेत विचारले.


"बापरे! थेट लग्नासाठी प्रपोजल? साधं मला आय लव्ह यू म्हटलं नाहीस नि लग्नाबद्दल विचारतोस?" ती लटक्या रागाने म्हणाली.


"माझं असंच आहे. ओठात एक आणि पोटात दुसरं असं नसतं. फक्त एक डान्स पार्टनरपेक्षा तुझा लाईफ पार्टनर बनून राहायला मला जास्त आवडेल." तो गंभीर होत म्हणाला.

"ते तर मला माहित आहे. तू किती लॉयल आहेस हे तुझे डोळेच मला सांगतात की. मला माहिती आहे की तुझ्या पार्टनरसोबत तू कधीच प्रतारणा करणार नाहीस." ती त्याच्याकडे पाहून म्हणाली.


"हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नव्हे. सांग ना लग्न करशील ना माझ्याशी?"

"अजु, गाणं म्हणजे माझा श्वास आहे तर तू म्हणजे सूर. श्वासाशिवाय जगणं जसं अशक्य तसं सुराशिवाय गाणं अशक्य. तुला मी माझ्यातून कधीच वेगळे करू शकणार नाही. तुझ्याशिवाय मी कधी दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकणार नाही."


"मला सरळ उत्तर देणार नाहीयेस का?"

"कसा रे तू? तुला माझ्या मनातील कळत नाहीये का? तुला गाणं आवडत नाही पण गाणारी मुलगी आवडते, तिच्याशी तुला लग्न करायचे आहे आणि तिच्याच मनातलं तुला ओळखता येत नाही?"


"नाही येत ओळखता. आतातरी सांगशील?" तो चिडून म्हणाला.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
*****


🎭 Series Post

View all