Feb 24, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -६

Read Later
कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -६
कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -सहा.
मागील भागात :-

कॉलेज गॅदरिंगमध्ये योगायोगाने रागिणी आणि अजय डान्स पार्टनर असतात. ती त्याला तिच्या गाण्याबद्दल सांगते.

आता पुढे.


"तू होगा जरा पागल
तुने मुझको है चुना.."

जणू काही ती त्यालाच म्हणते आहे असे त्याला वाटत होते. ओठावर मंद हसू घेऊन तो तिचे सूर डोळ्यांनी पीत होता. आत्तापर्यंत ती जवळ नसल्याने होणारी त्याची चिडचिड थांबली होती. एका अद्भुत शांततेत तो भारावल्यासारखा उभा होता.


गाणे संपले. तिचे सूर थांबले. हॉलमध्ये टाचणीच्या आवाजाने सुद्धा भंग होईल इतकी शांतता पसरली होती. त्या शांततेत गाणे संपले हे ही कोणाच्या ध्यानात आले नाही. उलट तिचा जादुई आवाज सर्वांच्या कानातून थेट हृदयात झिरपत होता.

"माझं काही चुकलं का?" गाणे संपल्यावर डोळे उघडून समस्त श्रोतावर्गावरून नजर फिरवत रागिणीने त्या निरव शांततेचा भंग केला.


"अमेझिंग सिंगिंग! सुपर्ब, सुपर्ब. यू जस्ट नेल्ड इट."

समोरच्या रांगेत असलेले प्रिन्सिपल सर टाळ्या वाजवत उभे राहिले त्याबरोबर हॉलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून टाळ्यांचा गजर केला.


रागिणीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. गाणे म्हणजे तिच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता, पण इतक्या मोठया समूहाने पहिल्यांदा तिच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या होत्या. ती त्या कौतुकाने भारावून गेली. नकळत तिची नजर अजयला शोधत होती. त्या गर्दीत तिला तो कुठेच दिसला नाही. कदाचित त्या गर्दीत तो हरवून गेला होता.


त्याच्या न दिसण्याने ती जराशी खट्टू झाली होती. त्याच्या असण्या नसण्याचा का एवढा फरक पडतोय तिला कळत नव्हते. मात्र जेव्हा ती गाणे गात होती तेव्हा मिटल्या डोळ्यासमोर एकच प्रतिमा उभी होती. त्या प्रतिमेत तोच तर होता, तिचा डान्स पार्टनर.. मिस्टर अजय!


ते आठवून तिने परत एकदा डोळे मिटले. कदाचित मनात उमललेल्या भावनेला परत एकदा तोलून बघायचे असेल. अन या क्षणी देखील तिच्या बंद चक्षुसमोर तोच उभा होता. तिला अपेक्षित असलेला तो काळ्याभोर काजळी डोळ्यांचा तिचा अजय.


दुसऱ्या गायकाचे नाव घेतल्या गेले तसे धावतच ती स्टेजच्या खाली आली. तिची भिरभीरणारी नजर त्याला शोधत होती. त्याच्याबद्दल मनात काहीतरी वाटतंय हे एव्हाना तिच्या ध्यानात आले होते. तो नाहीच दिसला, शेवटी छोटुसा चेहरा करून ती कँटीनमध्ये जाऊन बसली.


"सो, मिस मोह मोह के धागे, आम्हाला एखादा ऑटोग्राफ मिळेल का?" तिच्यासमोरच्या टेबलवर एक पेन आणि हात समोर आला.

तिने हलकेच डोळे वर करून पाहिले. समोर मिश्किलपणे हसत अजय उभा होता.


"तू? तू आत्ता आलाहेस ना? कुठे होतास इतका वेळ? मी कालच तुला बोलले होते ना?" ती उठून उभी राहत म्हणाली.


"अगं हो, हो. किती प्रश्न? मी आलो होतो. तू गाणे गात होतीस तिथेचतर होतो. तुझे डोळे बंद असल्यामुळे मी तुला दिसलो नसेल आणि जेव्हा डोळे उघडलेस तेव्हा तुझ्यासाठी टाळ्या वाजवणाऱ्या गर्दीत हरवलो असेल."त्याने स्पष्टीकरण दिले.


"तुला आवडलं माझं गाणं?" त्याच्याकडे पाहत तिने विचारले.


"तू माझ्यासाठी गायले होतेस? " त्याने तिला प्रतिप्रश्न केला.

त्याच्या प्रश्नाने तिच्या चेहऱ्यावर असंख्य लाल गुलाब फुलल्यासारखे झाले. गाणे गाताना मिटल्या डोळ्यासमोर त्याचीच तर छबी उभी होती.


"मै हूं जरासा पागल
मैने तुझको है चुना.. "
तिच्याकडे सरकत तो म्हणाला. त्याचे असे वागणे तिला अनपेक्षित होते. धडधडत्या अंतःकरणाने ती मागे सरली.


मागे असलेल्या टेबलाला ती टेकून उभी होती. त्याची नजर तिच्यावर खिळली होती. अगदीच गोरीपान नसली तरी गोऱ्या रंगाच्या जवळपास फिरकणारा तिचा वर्ण, रेखीव भुवया, पाणीदार डोळे, जरासे बसके नाक, हलक्या गुलाबी रंगाचे शेड असलेल्या लिपस्टिकने रंगलेले तिचे ओठ..


इतके दिवस डान्स प्रॅक्टिससाठी सोबत असूनही तिच्या या नितळ सौंदर्याकडे त्याची कधी नजर गेली नव्हती. आज मात्र ती त्याला हवीहवीशी वाटत होती. तिच्या चेहऱ्यावरून त्याची नजर हटत नव्हती.


"अजु प्लीज, बाजूला हो ना. मला अवघडल्यासारखं होतंय." तिच्या बोलण्यात ते अवघडलेपण स्पष्टपणे जाणवत होते.


"काय म्हणालीस?" तिच्यावरची नजर पळभरही न हटवत त्याने विचारले.

"बाजूला हो." ती.


"त्यापूर्वी काहीतरी नाव घेतलेस. मला नीटस ऐकू आले नाही गं."


"माझ्या मनातलं नाव घेतले मी. तुला काही प्रॉब्लेम आहे का?" त्याच्या बोलण्याचा रोख उमजून हात बाजूला करत ती खुर्चीवर येऊन बसली.


"अहं, मला काय प्रॉब्लेम असेल? उलट तुझ्या तोंडून आयुष्यभर ऐकायला आवडेल मला." तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.

तिने लज्जेने नजर खाली केली.


"रागिणी.." तिच्या हातावर हात ठेवत त्याने अलवारपणे तिला साद घातली.

त्या स्पर्शाने ती शहारली. तो काय बोलेल याचा अंदाज न येऊन तिने त्याच्याकडे पाहिले.


"खूप सुंदर गातेस तू. तुझ्या स्वरात एक वेगळीच जादू आहे. हे गायचे कधीच सोडू नकोस." हळवे होत तो म्हणाला.


तो असे का बोलतोय ते त्याक्षणी तिला कळले नाही. पण गाण्याबाबतीत तिला तरी कुठे तडजोड करायची होती? गाणं म्हणजे तिच्यासाठी तिचा श्वासच जणू.


"नाही सोडणार रे. एक दिवस जरी गायले नाही तर घशाखाली घास उतरत नाही माझा." ती म्हणाली.


"यावेळी मात्र श्रेयाची वाट लागणार आहे." तो हसून.

"का रे?"

"तिची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तू घेऊन जाशील ना? मग तिचा इगो दुखावेल की नाही."


"खरं सांगू? स्पर्धेसाठी म्हणून मी नव्हते गात. ट्रॉफी काय, आज एखादा जिंकेल तर उद्या दुसरा. पण आपल्यातील कला दुसऱ्यांना डिवचून जिंकण्यापेक्षा त्या कलेचा योग्य सम्मान झालेला मला जास्त आवडेल. आपली कला आपणच फुलवावी. ती फुलवताना जर आपला अहंकार वाढीला लागत असेल तर मग त्याला काय महत्त्व उरेल?"


"चला,म्हणजे तुला तत्वज्ञान देखील शिकवता येते म्हणायचे. सर्वगुणसंपन्न आहेस तर तू." तिच्या डोक्यावर टपली मारून तो म्हणाला. त्यावर ती खळखळून हसली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
*****
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//