कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -५

वाचा एक हळवी प्रेमकथा.


कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -पाच.

मागील भागात.
अजय स्वरासोबत रागिणीला भेटायला जातो. तिथे ती भेटत नाही पण तिच्या आठवणी मात्र त्याच्या मनात पिंगा घालू लागतात.

आता पुढे.

"रागिणी, नको ना. मी देतो तुला वचन, यापुढे मी तुला कधीच भेटणार नाही. तुझा शोधही घेणार नाही." तिला शब्द देत तो म्हणाला.


"शेवटचे बटरस्कॉच खाऊया?" त्याच्या हातावरचा हात घट्ट करत रागिणीने त्याच्या डोळ्यात पाहिले.

'कितीदा झुरावे तुझ्याच साठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,
कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे.
कितीदा नव्याने..'

स्वराच्या चमच्यातील शेवटचा घास बघून त्याच्या डोळ्यात आपसूकच पाणी जमा झाले.

******

"..आणि हो रागिणी, ती छोटी मुलगी तुला भेटायला आली होती गं." रात्री रागिणीचा फोन आला तेव्हा गप्पा मारताना मावशीने तिला सांगितले.


"कोण? स्वरा?" रागिणीने चकित होऊन विचारले.


"हो आणि तिच्यासोबत तिचा बाबासुद्धा होता." मावशी.


"अच्छा." रागिणीच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले.


"तो ओळखतो म्हणाला तुला. कॉलेजमध्ये तुम्ही एकत्र होतात असं म्हणत होता."


"काही नाव वगैरे सांगितले असेल ना?" हाताची बोटे एकमेकात दुमडून तिने विचारले.


"हो अगं. त्याने सांगितले तर होते पण माझ्याच लक्षात नाहीये बघ. उंचसा, गव्हाळ वर्णाचा आणि काळ्याभोर डोळ्यांचा होता, हे तेवढे आठवते."


उंच, गव्हाळ, काळेभोर डोळे.. या वर्णनातच तो कोण असावा हे रागिणी समजून गेली होती. स्वराला भेटली तेव्हाच तर तो तिच्या डोळ्यातून हिच्या मनात डोकावला होता.


काळेभोर डोळे! या डोळ्यांनी प्रथमदर्शनी तिला भुरळ घातली होती. मुलींचे डोळे सुंदर असतात हे ऐकून तिला माहिती होते पण इतके सुंदर डोळे असलेला पुरुष तिने पहिल्यांदा पाहिला होता.


कॉलेजचे ते मंतरलेले दिवस. गॅदरिंगचे वारे.एका वर्षाने सिनिअर असलेला तो योगायोगाने तिचा डान्स पार्टनर झाला होता. डान्सची प्रॅक्टिस करता करता त्या काळ्या डोळ्यात ती केव्हा अडकली, तिला तरी कुठे कळले होते?

प्रेमात पडायचे वयच ते. नुसत्या त्याच्या दिसण्याने सुद्धा हृदयाची धडधड वाढीला लागायची.


"तू डोळ्यात काजळ घालतोस?" एकदा हिंमत करून तिने विचारले.


"वेडी आहेस का? मुलं कधी काजळ वापरतात का? माझे डोळे ओरिजनली असे आहेत."


"खरंच?" तिने परत हिंमत करून त्याच्या डोळ्याला हात लावून बघितले.


"ए, खरंच वेडी आहेस तू. आत्ता डोळ्यात बोट गेलं असतं ना." तो फिसकन अंगावर धावून गेला.


हिने मात्र गोड हसून त्याची विकेट पाडून टाकली. या थोडाश्या वेड्या असलेल्या मुलीत आपण गुंततोय हे जाणवायला अजयला बराच वेळ लागला. तोवर ती फक्त वेडी आहे एवढंच त्याला कळले होते.


"ए डान्स पार्टनर, उद्या माझं गाणं ऐकायला येशील ना?" डान्स प्रॅक्टिस नंतर रागिणीने त्याला विचारले.


"तुला गाता येतं? काहीही." तो हसून म्हणाला.


"खरंच मी गाते. तुला यायचे असेल ये नाहीतर नको येऊस, पण माझ्या गाण्याची टिंगल करू नकोस हं." त्याच्या हसण्याने ती दुखावली होती.


"बरं, बरं ठीक आहे. पण गाण्याच्या बाबतीत माझ्या वर्गातील श्रेयाला आजवर कोणी हरवलं नाही हं. टफची सिंगर आहे ती. कॉलेजची नंबर वन."


"मग यावेळची ट्रॉफी तर मीच जिंकेन."


"फायनलला तर पोहचून दाखव, मग मी तुला मानेन." त्याने तिला सरळसरळ चॅलेंज दिले.

"तुला वाटते तशी मी कच्ची खिलाडी नाहीये. गाणं माझे पॅशन आहे. माझे सूर, माझा श्वास आहे. मिस्टर अजय, तुम्ही फक्त एकदा ऐकाच." त्याचे चॅलेंज स्विकारून ती पुढे गेली.


"रागिणी, ऐक ना." तिच्या मागे जात तो म्हणाला.

"काय गं? कधी डान्स पार्टनर, कधी मिस्टर अजय वगैरे म्हणतेस. माझे नाव घेऊन तुला बोलता येत नाही का?" तो.



"फायनल राउंड मध्ये पोहचले ना की माझ्या मनातल्या नावाने तुला हाक देईन." गोड हसून ती जायला वळली.

तो मात्र तिचा अटीट्युड बघून विस्मयाने पाठमोरी तिला पाहत राहिला.


दुसऱ्या दिवशी गाण्याची स्पर्धा आहे हे अजय विसरूनच गेला होता. तसेही गाण्याशी फारसा कधी संबंध आला नव्हता. लहान असताना घरी एकदोनदा आईला तानपुरा घेऊन सूर छेडताना पाहिले होते आणि त्यानंतर आजीने तोडलेला तानपुरा देखील त्याने पाहिला होता. त्यानंतर गाणे त्या घरात कधी गायलेच गेले नाही.


त्याचा डान्स तरी कुठे कोणाला आवडत होता? मुलाने असे नाचू नये असे आजीने कित्येकदा त्याला सुनावले होते. आई मात्र त्याच्याबाजूने होती. तिची कला अस्ताला गेली पण आपल्या मुलाच्या बाबतीत असे काहीच घडू नये म्हणून ती नेहमी त्याला जपत आली होती.


अजय कॉलेज मध्ये डान्स प्रॅक्टिससाठी आला पण आज रागिणी त्याच्यासोबत नव्हती. ती नाहीये हे बघून त्याची चिडचिड होत होती. एक दिवस तिचे नसणेही त्याला त्रासदायक वाटत होते.


तिच्या नसण्याने का इतका त्रास होतोय? त्याला कळत नव्हते पण ती त्याला हवी होती एवढे मात्र खरे होते.

ऑडोटोरीयम हॉलमधून गाण्यांचे आवाज ऐकू येऊ लागले तसे त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आज तिचे गाणे आहे हे तो सपशेल विसरला होता.

कधी नव्हे ते त्याचे पाऊल ऑडोटोरीयमच्या दिशेने वळले.

श्रेयाचे गाणे नुकतेच संपले होते. 'वन्स मोअर, वन्स मोअर' म्हणून तिच्यासाठी सगळ्यांच्या जल्लोषात घोषणा सुरु होत्या. गर्वाने भरलेली नजर तिने सर्व श्रोत्यांवरून फिरवली आणि मग पुन्हा त्याच जोशात तिचे रॅप सुरु केले. तिच्या सुरावर तिथे उपस्थित असलेली संपूर्ण तरुणाई थिरकत होती.


तिच्या गाण्यानंतर पुढची दोन तीन गाणी झाली. पण सगळे श्रोते अजूनही श्रेयाच्या फिवरमध्ये झिंगत होते. त्यानंतर रागिणीच्या नावाची अनाउंसमेंट झाली. तिच्यापूर्वीच्या गायकांप्रमाणे हिच्याकडेही सगळ्यांचे दुर्लक्ष होणे अपरिहार्य होते. तसेही फर्स्ट इयरची ती, गाण्यासाठी तिला ओळखणारे तसे कुणीच नव्हते.

"मोह मोह के धागे
मोह मोह के धागे.."

रागिणीने सूर लावला तशी हॉल मध्ये एकदम स्तब्धता निर्माण झाली.

"ये मोह मोह के धागे
तेरी उंगलीयोसे जा उलझे.."

ती गायला लागली. तिच्या जादूई आवाजाची नजाकत सगळ्यांना सगळं विसरायला भाग पाडत होती. त्या आवाजाच्या जादूने ऑडोटोरीयममधून बाहेर पडू पाहणाऱ्या अजयचे पाय देखील तिथेच थांबले. खुर्चीवर बसण्याचे भान विसरून तो उभ्यानेच तिचा आवाज हृदयात साठवत होता.

"तू होगा जरा पागल
तुने मुझको है चुना.."

जणू काही ती त्यालाच म्हणते आहे असे त्याला वाटत होते. ओठावर मंद हसू घेऊन तो तिचे सूर डोळ्यांनी पीत होता. आत्तापर्यंत ती जवळ नसल्याने होणारी त्याची चिडचिड थांबली होती. एका अद्भुत शांततेत तो भारावल्यासारखा उभा होता.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
*****

🎭 Series Post

View all