कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -४

वाचा एक हळवी प्रेमकथा!


कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -चार.
मागील भागात :-

स्वराला हव्या असलेल्या टीचरला भेटण्यासाठी अजय तिच्यासोबत जातो. तिथे गेल्यानंतर ती त्यांना भेटत नाही. त्याला कळते की व्यक्ती म्हणजे रागिणी असते. तो तिच्याबद्दल मावशीकडे चौकशी करतो.

आता पुढे.

मावशीचे उत्तर ऐकून तो स्तब्ध झाला. ती अजूनही अविवाहीत आहे हे ऐकून त्याच्या मनाला अपराधी असल्यासारखे वाटू लागले.


"बरं, उशीर होतोय. आम्ही निघतो." स्वराचा हात पकडून तो बाहेर आला.


"अहो, रागिणीचे मित्र म्हणता ना? मग चहा तरी घेऊन जा ना." मावशी बाहेर येत म्हणाली.

तिचा आवाज ऐकायला अजय होताच कुठे? स्वराला घेऊन त्याची कार केव्हाच निघाली होती.


"काय रे पप्पा, रागिणी आँटीचा नंबर तरी घ्यायचा होतास ना?" कारमध्ये स्वराची बडबड सुरु होती.


"हूं." त्याला काय बोलावे हेच कळत नव्हते. डोक्यात विचारांचे काहूर दाटले होते.


"हूं काय? त्या तुझ्या फ्रेंड आहेत ना? मग त्यांच्याशी तुला बोलावंसं वाटलं नाही का? आमचं असं नाही ब्वॉ. श्रुती आणि मी तर शाळेत भेटतो तरी रोज फोनवर सुद्धा बोलतो. तू कसा रे फ्रेंड?"

तिची बडबड थांबायची काही नाव घेत नव्हती. मुळात इतक्या वर्षांनी आपली मैत्रीणीबद्दल काही माहिती मिळतेय आणि आपल्या पप्पाने तिचा नंबर देखील मागू नये हेच तिला रुचत नव्हते.


तो तिला काहीच उत्तर न देता शांतपणे कार चालवत होता. वरवर दिसायला शांत असला तरी मनात विचारांनी नुसता कोलाहल माजवला होता.


'माहेर तर केव्हाच सोडलेय तिने. तिथल्या आठवणी छळतात म्हणे तिला आणि सासर म्हणायला त्यासाठी आधी लग्न करायला हवे ना? पोरीने तो विचार डोक्यातून केव्हाच काढून टाकलाय.' मावशीचे बोलणे डोक्यात गोलगोल फिरत होते.


'रागिणीने लग्नच केले नाही. पण का? ती माझी वाट पाहत थांबली असेल का? पण नकार तर तिचाच होता. अट्टहासही तिचा होता. मग तरीही ती एकटीच? माझ्यासाठी?'
त्याच्या डोक्यातील प्रश्न सरता सरत नव्हते. एक प्रश्न मागे पडला की दुसरा दत्त म्हणून लगेच पुढे येत होता.


"पप्पा, आईस्क्रीम खाऊया?" स्वराच्या प्रश्नाकडे त्याचे लक्ष नव्हते.


"पप्पा, आईस्क्रीम." तिने त्याला दुसऱ्यांदा हात लावून म्हटले तसा तो तंद्रीतून जागा झाला.

"टू बटरस्कॉच." त्याच्याआधी तिनेच ऑर्डर केले.

"अगं पण तुला व्हॅनिला आवडतो ना?"

"हम्म, पण आज तुझ्या आवडीचं. तुझा मुड ऑफ ऑफ आहे ना?"

ती सात वर्षांची चिमूरडी असं काही बोलली की तो खुदकन हसला. बापाचा मुड 'ऑफ' आहे हे लगेच तिला कळलं होतं आणि त्यावर उपाय म्हणून त्याच्या आवडीचे आईस्क्रीम त्याला खाऊ घालत होती.

त्याला या क्षणी त्याची लेक खूप मोठी झाल्यासारखी वाटली. आणि सोबतच रागिणी पुन्हा मनात फेर धरू लागली.


"अजु, आज मी खूप खूश आहे. आईस्क्रीम पार्टी करायची?"

"चालेल. मला व्हॅनिला, तुझ्यासाठी काय ऑर्डर करू?"


"खूश मी आहे ना? मग मी ऑर्डर करणार." असे म्हणून उठत ती बटरस्कॉच फ्लेवरचे एकच आईस्क्रीम कप घेऊन आली.


"ए, माझ्यासाठी नाही गं आणलंस?"


"हेच दोघांसाठी आहे. सध्या एवढंच बजेट आहे." ती हसून म्हणाली.


"पण मला हा फ्लेवर नाही आवडत. मी माझ्यासाठी दुसरं घेतो ना." तो उठत म्हणाला.


"आजपासून आवडेल." हातातील चमच्यावरील अर्धे आईस्क्रीम चाखून तिने तोच चमचा त्याच्यापुढे धरला.

तिच्या कृतीने तो डोळे विस्फारून तिच्याकडे बघतच राहिला.

"खा रे, तू पण काय लक्षात ठेवशील." तिने त्याच्याकडे बघून डोळा मारला. हा तर त्याच्यासाठी दुसरा धक्का होता.


"तुझं गाणं फायनल राऊंड मध्ये सिलेक्ट झालं म्हणून हे खातोय. पण यानंतर नाही हं." तिच्याकडे डोळ्याच्या कोनातून बघत त्याने ते आईस्क्रीम जिभेवर ठेवले.

"बरं." मान हलवून ती मिश्किल हसत होती.

पहिल्यांदा खाल्लेला तो बटरस्कॉच फ्लेवर! त्यानंतर तो त्याचा आवडता कधी होऊन गेला कळलेच नाही.


"पप्पा, मी आता कधीच गाण्याचा क्लास लावणार नाही." आईस्क्रीम खात खात स्वरा म्हणाली तसे त्याने तिच्याकडे पाहिले.

"एकतर या आँटी गाणं शिकवत नाही आणि मुळात त्या इथे राहतसुद्धा नाही. मम्मादेखील गाणं शिकायला नको म्हणते." ती काहीसा विचार करत म्हणाली.


"ए, नाही हं. गाणं अजिबात थांबवायचं नाही. तो विचार सुद्धा मनात आणू नकोस." अजय एकदम कळवळून म्हणाला.

"पप्पा.." त्याचा तो अंदाज बघून स्वरा भांबावली.

"अगं म्हणजे तू गाणं शिक, असं म्हणायचं होतं मला." त्याच्या स्वरातील धार त्याला जाणवली आणि लगेच तो नरमाईच्या सुरात म्हणाला.


"अजु, तुला खरंच वाटतं, मी गाणे सोडू नये?" रागिणी त्याला ओल्या डोळ्याने विचारत होती.


"हो. शंभर टक्के. तू अचानक माझी साथ सोडण्याचा विचार का केलास, ते मला माहित नाही. पण प्लीज, या सुरांची सोबत मात्र कधीच सोडू नकोस."

"अजु.."

"रागिणी, मला माहितीये, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्या प्रेमाची शपथ, तू गाणं सोडू नकोस यार. एकदाची तू माझ्याशिवाय जगू शकशील पण गाण्याशिवाय नाही. गाणं म्हणजे श्वास आहे तुझा." तो हळवे होत बोलत होता.

तिच्या डोळ्यातील पाणी गालावर ओघळत होते.


"तू जर गात राहिलीस तर मी समजेन तुझं माझ्यावरचं प्रेम कायम आहे, शेवटच्या श्वासापर्यंत. दे मला वचन, तू गाणं कधीच सोडणार नाहीसं." त्याने तिच्यासमोर हात केला.


"दिलं वचन. आता तूही वचन दे, ही आपली शेवटची भेट. यापुढे आपण कधीच भेटायचं नाही. मी कुठे आहे? काय करतेय? याचा शोध घेण्याचा प्रयत्न तू कधीच करणार नाहीस." त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली.


"रागिणी, हे नाही जमणार मला. एवढी मोठी शिक्षा नको ना देऊ."


"मग माझेही वचन तू विसरून जा. मी यापुढे गाणं म्हणणार नाही म्हणजे नाही." त्याच्या हातून ती हात सोडवायला लागली.


"रागिणी, नको ना. मी देतो तुला वचन, यापुढे मी तुला कधीच भेटणार नाही. तुझा शोधही घेणार नाही." तिला शब्द देत तो म्हणाला.


"शेवटचे बटरस्कॉच खाऊया?" त्याच्या हातावरचा हात घट्ट करत रागिणीने त्याच्या डोळ्यात पाहिले.

'कितीदा झुरावे तुझ्याच साठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,
कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे.
कितीदा नव्याने..'

स्वराच्या चमच्यातील शेवटचा घास बघून त्याच्या डोळ्यात आपसूकच पाणी जमा झाले.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
*****

🎭 Series Post

View all