कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -३

वाचा एक हळवी प्रेमकथा.


*****
कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -तीन.

मागील भागात :-

स्वरा रागिणीकडे गाणे शिकण्याचा हट्ट धरते त्यावर अजय होकार देतो. दुसऱ्या दिवशी दोघे तिला भेटायला जातात पण त्यांची भेट होईल का? वाचा आजच्या भागात.


पप्पा उद्या आपल्याला त्या टीचरला भेटायला जायचे आहे ना?" रात्री झोपताना स्वराने अजयला गळ घातली.
हो.


"प्रॉमिस?"


"पक्का प्रॉमिस!" तिच्या चिमण्या हातावर हात टेकवत तो म्हणाला.


"तुला खरंच वाटतं, स्वराने गाणं शिकावं?" ती झोपल्यावर मेघा अजयजवळ सरकत म्हणाली.


"हो तर बोललोय." तो.


"पण आई?"


"आई नाहीये ना आता? मग काय प्रॉब्लेम आहे?"


"पण आजवर तुझाही विरोध होताच की."


"विरोध का होता, कोणाला होता? माहिती नाही. पण आत्ता वाटतंय की तिने शिकावं. तेही तिला वाटतंय म्हणून, माझ्यासाठी नाही."


"तुला आठवण येतेय ना?"


"हं?" त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले.


"रागिणीची आठवण येत आहे ना?" त्याच्या तशा बघण्याने ती हळव्या स्वरात म्हणाली.

"हम्म." तो नजर वळवत म्हणाला.


"अजय, आपलं ठरलं होतं ना, भूतकाळाचा आपल्या वर्तमानावर परिणाम नाही होऊ द्यायचा. तू नको ना इतका विचार करू."


"विचार असा नाही गं. पण कधी कधी वाटतं की माझ्या आयुष्यातून निघून जाण्यापूर्वी किमान एक स्पेसिफिक कारण तरी देऊन हवे होते. खूप हळवी होती गं ती मग अशी अचानक रुक्ष होऊन का निघून गेली असावी? "


मग एकदा भेटून सॉर्ट आऊट करून घ्यायचं ना." त्याच्या केसातून हात फिरवत ती.


"ती कुठे आहे मला ठाऊक नाहीय आणि तसेही आता नकोच पुन्हा भेटणे. "


"फक्त मनातल्या मनात झुरणे." मेघा.


"झुरणे असे नाही गं." स्वतःला सावरत ती म्हणाला.


"असू दे असू दे. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती आहे हे माहितीये मला. आफ्टरऑल पहिलं प्रेम असेच थोडे विसरणार आहे?" ती.


"तुला जेलसी नाही का गं होत? माझा खूप राग येत असेल ना?"

"छे! तुझा का राग यावा? तू माझ्यापासून थोडेच काही लपवले होतेस? उलट मला तिला 'थँक्स' म्हणावेसे वाटते. ती तुला सोडून गेली म्हणून मला एवढा चांगला नवरा मिळाला." त्याच्या छातीवर डोके ठेवत ती म्हणाली.


"एक विचारू?आईंचा गाण्याला विरोध का होता?"

"मला जेवढं आठवतं ना, त्यानुसार आईला आवडायचं गाणं. बाबांनी आणि आजीने मात्र तिला कधीच सपोर्ट केला नाही.

आईकडे एक जुना तानपुरा होता. आजीने एकदा रागाने तो तानपुरा जोरात फेकला. त्याचे तुकडे झाले आणि त्याबरोबर आईच्या इच्छेचा ही चुराडा झाला. त्यानंतर तिला सूर छेडताना मी कधीच पाहिले नाही की ऐकलेही नाही."
त्याच्या डोळ्यात पाणी होते."ओह, म्हणून स्वराला परवानगी दिलीस. मुलीत आई दिसतेय होय?"


"करेक्ट."

"आणि बायकोत?"

"तू तर सहचारिणी आहेस माझी. माझी मैत्रीण आहेस तू." तिला मिठीत घेत तो म्हणाला.

******
"पप्पा, थांब, थांब. हेच त्या टीचरचे घर."

आज सायंकाळी स्वरा तिच्या लाडक्या पप्पाला घेऊन तिच्या मानस टीचरला भेटवायला घेऊन आली. हो,मानस टीचरच. तिने मनोमन रागिणीला तिची संगीत शिक्षिका मानून टाकले होते.


"अगं पण इथे म्युझिक शिकवण्याचा बोर्ड वगैरे काहीच दिसत नाहीये. त्या खरंच टीचर आहेत ना?"


"मला काय माहित? पण त्या खूप सुंदर गातात, तू ऐकशील तर तुलाही पटेल." ती दारावरची बेल वाजवत म्हणाली.

ही पोरगी कुठे फसवतेय हा विचार मनात घेऊन अजय दार उघडण्याची वाट पाहू लागला.

दोन तीनदा बेल वाजवल्यावर रागिणीच्या मावशीने दरवाजा उघडला.


"कोण हवंय?" अनोळखी चेहरे बघून तिने विचारले.


"नमस्कार, मी अजय.."


"आणि मी स्वरा. मला टीचरना भेटायचे आहे." तिच्या हाताखालून आत प्रवेश करत ती म्हणाली.


"अगं थांब, थांब. कोण स्वरा? आणि कोण टीचर? तुम्ही बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आला आहात."


"नाही हो आजी. हाच पत्ता आहे. त्या आँटी इथेच या चेअरवर बसून गात होत्या. मी काल स्वतः त्यांना भेटलेय."

स्वरा बोलली आणि मावशीच्या डोक्यात प्रकाश पडला. काल रागिणीने एका छोट्या मुलीबद्दल सांगितले तीच ही असावी हे तिला पटले.


"अच्छा! हातावर मेहंदी काढून देणारी ती तूच का?" तिच्याकडे कौतुकाने बघून हसत ती म्हणाली.


"हो. कुठे आहेत त्या? मला त्यांना भेटायचे आहे. त्यांच्याकडून मलाही गाणे शिकायचे आहे."


"खरं म्हणजे रागिणी गाणं वगैरे शिकवत नाही. हं, कधीतरी गुणगुणत असते."

"पण मला त्यांच्याकडून शिकायचं आहे ना." स्वरा आपल्याच हट्टावर अडून होती.


"काय नाव म्हणालात?" इतकावेळ गप्प असलेला अजयने कुतूहलाने विचारले.


"रागिणी. भाची माझी. आज इथे एक कॉन्फरन्स होती म्हणून ती आली होती. दुपारी ती परत देखील गेली."


"पप्पा, ह्या बघ. ह्याच त्या." मावशी सांगत होती तितक्यात स्वराचे लक्ष शोकेसमध्ये असलेल्या रागिणीच्या फोटोवर पडली.


"रागिणी? रागिणी दातार? ही तुमची भाची आहे?"
एकवार फोटोकडे अन एकदा मावशीकडे पाहत अजय आनंदमिश्रित आश्चर्याने म्हणाला.


"हो. तुम्ही ओळखता हिला?" आता आश्चर्याची पाळी मावशीवर आली.


"हो. कॉलेजमध्ये असताना एकत्र होतो आम्ही. माझी मैत्रीण होती ती, म्हणजे.. ते जाऊ द्या, आता कुठे असते ती?" त्याने अधीरतेने विचारले.


"एका जागेवर थांबायला पाय तर जमिनीवर टेकायला हवेत ना. कधी नागपूर, कधी, मुंबई, कधी बंगलोर.. सारखी फिरत असते. आत्ताच बघा ना, काल सकाळी इथे आली आणि आज दुपारी गेलीसुद्धा."


"हो, पण सासर, माहेर वगैरे?" त्याने चटकन विचारले तर खरे, त्यानंतर जरा जास्तच चौकशी करतोय की काय असे त्याला वाटून गेले.

"माहेर तर केव्हाच सोडलेय तिने. तिथल्या आठवणी छळतात म्हणे तिला आणि सासर म्हणायला त्यासाठी आधी लग्न करायला हवे ना? पोरीने तो विचार डोक्यातून केव्हाच काढून टाकलाय."


मावशीचे उत्तर ऐकून तो स्तब्ध झाला. ती अजूनही अविवाहीत आहे हे ऐकून त्याच्या मनाला अपराधी असल्यासारखे वाटू लागले.

"बरं, उशीर होतोय. आम्ही निघतो." स्वराचा हात पकडून तो बाहेर आला.


"अहो, रागिणीचे मित्र म्हणता ना? मग चहा तरी घेऊन जा ना." मावशी बाहेर येत म्हणाली.

तिचा आवाज ऐकायला अजय होताच कुठे? स्वराला घेऊन त्याची कार केव्हाच निघाली होती.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all