कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -२

परत नव्याने प्रेमात पाडणारी एक हळवी प्रेमकथा.


कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -दोन.

मागील भागात :-
गाणे गात असताना अचानक रागिणीला स्वरा भेटते. ओळख नसतानाही तिला भेटून रागिणी खूश होते.
आता पुढे.

रागिणी परत डोळे मिटून स्वराचा चेहरा आठवू लागली. बोटे हलवून तिने दिलेली दिलखुलास दाद, तिचा हसरा चेहरा अन गालावरची खळी तिला कुणाची तरी आठवण करून देत होती.

"तुझ्या आवाजात एक वेगळीच जादू आहे." तिच्या बोटात बोटे गुंफत तो म्हणाला होता.

"आवडलं तुला?"

"हो तर. तू म्हणशील तर तुझा हा आवाज आयुष्यभर ऐकायला मला आवडेल."

त्याच्या बोलण्यावर ती खिन्न हसली होती.


"रागिणी, तू माझ्या विचारण्यावर कधीच नीट उत्तर का देत नाहीस?"


"तुला काय ऐकायचं आहे?" वाळूवर रेघोटया ओढत तिने विचारले.


"आपण लग्न करूयात ना. तू आणि मी.. आपलं एक छोटुसं जग असेल. तू रोज माझ्यासाठी गाशील, मी रोज तुला कॉम्प्लिमेंट्स देत राहीन. प्लीज, होकार दे ना यार."


"अजु, जे शक्यच नाही तेच का परत परत बोलतोस?" वाळूत कोरलेले दोन हृदय मिटवत ती म्हणाली.


"का शक्य नाही?"


"नाहीये शक्य."


"तेच विचारतोय, का नाहीये शक्य? तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का? की विश्वास नाहीये?"


"स्वतःवर आहे त्याहून कितीतरी जास्त विश्वास तुझ्यावर आहे आणि प्रेमाचं म्हणशील तर आजवर इतकं प्रेम मी कधीच कुणावर केलं नाहीये, करुही शकणार नाही." डोळ्यातील पाणी पुसत ती म्हणाली.


"एवढं प्रेम करतेस तरीही का नकार देते आहेस?


"प्रत्येक गोष्टीला उत्तर नसतात रे अजु. ते सोड, हे बघ आकाशात किती सुंदर रंग भरले आहेत, ते बघूयात ना. पुढचा विचार करण्यापेक्षा आत्ताचे क्षण जगूया." त्याच्या खांद्यावर हलकेच डोके टेकवत ती म्हणाली.


"रागिणी, कॉफी." मावशीने कॉफीचा कप समोर ठेवला तशी ती तंद्रीतून जागी झाली.


"आम्ही निघतो. तू सुद्धा नीट जेवण करून घेशील. उगाच भलत्या विचारात गुंतून राहू नकोस." बाहेर जाताना मावशी तिला तंबी देऊन गेली.


मावशी आणि काका निघून गेल्यावर कॉफीचा मग घेऊन ती खिडकीत आली. कॉफीचा घोट घेताना तिची नजर हातावरच्या कोरलेल्या लाल वर्तुळाकडे गेले.


'स्वरा.. किती गोड नाव होते तिचे! तिचा तो मखमली स्पर्श अजूनही हातावर रेंगाळतो आहे. कोण असेल बरं ती गोडुली?' मनात प्रश्नांच्या सरी परत फेर धरायला लागल्या.

त्या एकाही प्रश्नांची उत्तरे तिला ठाऊक नव्हती.

'स्वरा अजुची लेक असेल का?' मनातील नव्या प्रश्नाने ती गोंधळली.

एव्हाना गार झालेली कॉफी तिने परत ओठाला लावली.

'तिला बघून तो का आठवतोय? तसेही आठवयला विसरले तरी कुठे होते? मनात आहेच तो. पण ती छोटी परी भेटल्यापासून आज जरा जास्तच आठवतोय.' तिचे मन आणखी तिच्या भोवती रेंगाळायला लागले.


******

"मम्मा, मला त्या आँटीकडून गाणं शिकायचं आहे." स्वरा मेघाला घट्ट पकडत म्हणाली.

"अगं, कुणाकडूनही काय शिकतेस? त्या सहज गुणगुणत असतील आणि तुला आवडलं असेल." ऍक्टिव्हाचा वेग वाढवत मेघा स्वराला समजावत म्हणाली.

"नाही मम्मा, त्या खरंच खूप छान गातात. तू ऐकायला हवे होतेस." स्वराची भुणभुण सुरूच होती.

"हं."

"हं नाही, खरंच."

"बघू."

"तू अशीच करतेस नेहमी." घर आले तशी पाय स्वरा तणतणत आत आली.


"अरे काय झालंय? परत भांडलात का दोघी?" नुकताच घरी परतलेला अजय तिच्याकडे पाहत म्हणाला.


"विचार तुझ्याच लेकीला. कसले कसले हट्ट सुरु असतात. एकतर मार्केटमध्ये त्या भाजीवालीशी घासाघिस करण्यात चिडचिड झालीये आणि आता हिचा हट्ट." मेघा.


"चिडू नकोस गं. मी बघतो, काय झाले ते. स्वरा.." तिला हाक देत तो सोफ्यावर गुरफटून बसलेल्या तिच्याजवळ गेला.


"पप्पा, मला गाणं शिकायचं आहे."

"हो शिकूयात ना."


"शिकूयात-  शिकूयात म्हणून हे वर्ष देखील असंच चाललंय. तू काही सिरीयसली घेतच नाहीस. आत्ता मी माझी टिचर देखील शोधलीय. खूप भारी गातात त्या. हवं तर मम्माला विचार."


"तू शोधलीहेस ना? मग भारीच असणार की. आपण जाऊया हं त्यांच्याकडे. आता आवरून घे. मी मस्तपैकी पास्ता केलाय."

"येऽऽह!" ती धावतच पळाली.


"आज काय जादू? ती गाणं शिकायचं म्हणतेय नि तू लगेच तयार झालास?"


"हम्म. आजचा दिवस खूप भारी गेलाय. प्रमोशनसाठी माझे नाव लिस्टमध्ये आहे. पुढच्या महिन्यात ते होईलच, पण आज जाम खूश आहे मी.

माझ्या मनासारखं झालं तर किती आनंदी आहे मी? मग लेकीच्याही मनासारखं होऊ दे."


"ओह! प्रमोशनची जादू म्हणायची. चल मग मीही स्वयंपाकात काहीतरी गोड करते." ती आत जात म्हणाली.

पास्ता खाल्यावर स्वरा आणि अजय मस्त्या करण्यात गुंग झाले.


"पप्पा उद्या आपण त्या टीचरला भेटायला जायचे आहे ना?" रात्री झोपताना स्वराने अजयला गळ घातली.
हो.

"प्रॉमिस?"

"पक्का प्रॉमिस!" तिच्या चिमण्या हातावर हात टेकवत तो म्हणाला.

******

अजयने होकार तर दिलाय पण खरंच स्वरा रागिणीकडे गाणं शिकू शकेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
*****

🎭 Series Post

View all