कितीदा नव्याने तुला आठवावे भाग -१

वाचा एक हळवी प्रेमकथा.


कितीदा नव्याने तुला आठवावे
भाग -१


"कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे.." डोळे मिटून रागिणी आलाप घेत होती.

"कित्ती गोड गाताय तुम्ही!" कानावर आलेला नाजूक आवाज आणि सोबतच चिमण्या टाळ्यांचा साज ऐकून आपल्याच तंद्रित असलेल्या रागिणीने अलगद डोळे उघडले.

"तुला आवडलं माझं गाणं?" त्या अनोळखी परंतु लगेच मनात भराव्या अशा चेहऱ्यावर नजर खिळवून मंद स्मित करत रागिणीने विचारले.

"हो. खूऽऽप गोड गाता तुम्ही." उजव्या हाताच्या तर्जनीवर अंगठा टेकवत बोटांनी खूण करून ती म्हणाली.

'खूप छान गातेस.' कित्येकदा कॉम्प्लिमेंट ऐकलेली, कित्येकांकडून. पण त्या छोटीचे असे मनापासून केलेले कौतुक तिला जरा जास्तच भावले.

"तुला कळतं गाण्यातलं?" तिच्या चेहऱ्यावरचा तो निरागस भाव बघून तिच्याशी बोलण्याचा मोह रागिणी आवरू शकली नाही.

ती कोण? इथे कशी आलीय? असे एकही प्रश्न त्या क्षणी तिला पडले नव्हते.

"हम्म." ती छोकरी मान डोलावून म्हणाली.

तिची बोलण्याची तऱ्हा, तिचे गोड हावभाव.. काहीतरी खास होतं तिच्यात की रागिणी आपसूकच तिच्याकडे खेचल्या जात होती.


"मी गाऊन दाखवू?"

"हो. गा ना."

"तुमच्याकडे रेड पेन आहे?"

"का गं?"

"मला मेहंदी काढायची आहे ना, पण कोन नाहीये म्हणून पेन."

"मेहंदी?"

"हम्म, त्या मुव्हीमध्ये नाही का ती मुलगी मेहंदी काढून देताना गाते? मलाही तसंच गायचं आहे." ती छोटुसा चेहरा करत म्हणाली.

रागिणीने लागलीच बाजूच्या ड्रॉवरमधून पेन काढला आणि तिच्या हाती दिला तशी तिची कोमेजलेली कळी चटकन खुलली.

"अंबर से तोडा सूरज वो प्यारा
अम्मा के आँचल में
ढक डाला सारा, ढक डाला सारा.

अंबर से उतरी प्यारी कोयलईया
कू करके उसने है
जादू सा डाला, जादू सा डाला.."

हातात पेन घेऊन रागिणीच्या हातावर एक मोठा गोल काढत, त्याला आणखी गर्द करत ती गाऊ लागली.


तिच्या हाताचा मखमली स्पर्श आणि पेनामुळे हाताला होणाऱ्या गुदगुल्या.. रागिणीला दोन्ही हवेसे वाटत होते.


"स्वराऽऽ, मी एका कॉलवर थोडे बोलायला काय लागले, तू आत आलीस देखील?" मोबाईल बंद करून मेघा स्वराची मम्मा आत आली.


"स्वरा.. वॉव! भारीच नाव आहे गं तुझं आणि गाणं तर त्याहून भारी." तिच्याकडे बघून रागिणी म्हणाली.


"थँक यू."

स्वराच्या ओठावर कसलं भारी हसू होते. आणि त्या गोड हास्याने गालावर पडलेली ती खळी? त्या खळीने तर रागिणी आणखीच तिच्याकडे आकर्षित झाली.


"सॉरी, तुम्हाला हिने त्रास तर नाही ना दिला? माझा एक महत्त्वाचा फोन होता, तर मला गाडी थांबवून बोलायला लावलं आणि पठ्ठी इकडे सटकली." मेघा दिलगिरी व्यक्त करत म्हणाली.


"अहो, नाही.."


"मम्मा, या आँटी खूप सुंदर गातात." रागिणी काही सांगत होती की तिचे बोलणे पुरे व्हायच्या आत स्वरा मेघाकडे बघून म्हणाली.


"ओह! म्हणून इकडे आलीस होय?" तिच्या कुरळ्या केसातून हात फिरवत मेघा हसली.


"गाण्यासाठी पार वेडी आहे पोर. आवडतात तिला गाणी. बरं निघतो आम्ही आणि ते सॉरी हं, ओळख नसतानाही ही आत आली."


स्वराचा हात पकडून मेघा तिला घेऊन गेली. जाताना एकवार वळून बघायला आणि आपला चिमणा हात हलवायला ती विसरली नाही.

तो हलणारा चिमणा हात बघून हिचेही हात आपसूकच हलायला लागले.

कदाचित सात -आठ वर्षाचे वय असलेली ती पोर, रागिणीला मात्र वेड लावून गेली. तिच्या हाताचा स्पर्श आठवत हातावरचा तो लाल गोल ती आणखीनच लाल करत बसली.

******

"रागिणी, कोणी आले होते का? आणि हे काय? हातावर हे काय रेखाटते आहेस?" बाहेरून एक पन्नाशीची स्त्री आत येत म्हणाली. तिला यायला आणि मेघा तिची ऍक्टिव्हा सुरु करायला एकच गाठ पडली होती.


"हं. खूप दिवसांनी माझ्या गाण्याला दाद द्यायला कुणीतरी आलं होतं."

"कोण?"


"मावशी, अगं एक छोटी मुलगी होती. तिनेच माझ्या हातावर ही मेहंदी काढली बघ." हातावरचे लाल वर्तुळ दाखवत ती म्हणाली.


"ही मेहंदी आहे?" तिची मावशी खळखळून हसली.


"बरं ते राहू देत. आज तुझ्या काकांच्या मित्राकडे त्यांच्या नातवंडाच्या नामकरणाचा कार्यक्रम आहे, छानशी तयार हो. आपल्याला जायचं आहे."


"ए, मावशी नको गं. मला हे असले कार्यक्रम आवडत नाही. तुम्ही दोघं जा, मी माझ्यासाठी करेन काहीतरी."


"अगं जावं चार लोकात. तेवढ्याच ओळखी वाढतात." काका मावशीची साथ देत म्हणाले.


"नको हो काका. या ओळखीचा काही फायदा नाही, झाला तर मला मनस्तापच होतो. त्यापेक्षा मी उद्याच्या कॉन्फर्न्सची तयारी करते."


"बरं तुला ठीक वाटेल तसं." मावशी आत जात म्हणाली. काकादेखील तिच्या मागोमाग आत गेले.


रागिणी परत डोळे मिटून स्वराचा चेहरा आठवू लागली. बोटे हलवून तिने दिलेली दिलखुलास दाद, तिचा हसरा चेहरा अन गालावरची खळी तिला कुणाची तरी आठवण करून देत होती.

कोण आहे ही स्वरा? आणि तिला बघून रागिणीला कोणाची आठवण येतेय? वाचा पुढील भागात.

:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all