कितीदा नव्याने तुला आठवावे भाग -१४(अंतिम.)

वाचा एक हळवी प्रेमकथा.


कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -चौदा.(अंतिम भाग)

मागील भागात:-
रागिणी जानकीकाकू आणि तिच्या भेटीबद्दल आणि त्यांना दिलेल्या वचनाबद्दल सर्वांना सांगते.

आता पुढे.

"काकू दिले मी वचन. परीक्षा झाल्यावर मी त्याला शेवटचे भेटले की परत कधीच भेटणार नाही. हा माझा शब्द आहे. पण त्याबदल्यात तुम्हालाही वचन द्यावे लागेल. तुम्ही त्याला माझ्याबद्दल कधीच सांगणार नाही.

त्याचं लग्न सुद्धा अशा मुलीशी करून द्याल जीला संगीतातलं काहीही ज्ञान नसेल. नाहीतर तो मला विसरू शकणार नाही हो." जानकी काकू वळल्या तसे त्यांचा हात हातात घेत ती म्हणाली आणि उत्तराची वाट न बघता डोळ्यातील पाणी पुसत घराकडे निघाली.

*******

"त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेवटच्या फेरीतील माझे गाणे झाले. तेच गाणे जे आज स्वराने गायले होते. तुला पहिल्यांदा पाहिल्यापासून तर त्या दिवसापर्यंतचे सर्व क्षण डोळ्यासमोरून अलगद सरकत होते. गाता गाता खरंच डोळ्यातून पाणी वाहत होते, तुला वाटलं मी गाण्यात एकरूप झालेय म्हणून रडतेय."

डोळे पुसत रागिणी अजयकडे बघून म्हणाली. एव्हाना सगळ्यांच्याच डोळ्यांना धारा लागल्या होत्या.


"त्यानंतर आपण भेटलो.. शेवटचे. तुझी एक्झाम झाल्यावर. तू पुन्हा मला नेहमीसारखं लग्नासाठी विचारलंस. मी तेव्हा लग्न करू शकत नाही हे तुला सांगितलं. तू किती विचारलेस मला? कारण नाही रे देऊ शकले मी. तू चिडलास, ओरडलास. मात्र मी गाणे गायचे बंद करतेय हे ऐकून लगेच शांतही झालास.


गायचं सोडायचं नाही असं वचनच घेतलंस माझ्याकडून तू. त्याच वचनाचा फायदा घेऊन मी तुला वचन मागितले की यापुढे कधीही भेटायचं नाहीस, माझा शोध घ्यायचा नाहीस.

आणि वेड्या तूही ते वचन पाळलेस रे. मनात झालेल्या यातना बाजूला ठेवून माझ्या शब्दाखातर मला कधीच भेटला नाहीस." ती हळवी होत म्हणाली.


"आय एम सॉरी रागिणी. तुझ्याशी एवढं सगळं घडलं आणि मला काहीच माहिती नव्हतं. आय एम रिअली सॉरी. खरंच खूप खूप चुकलो गं मी. आईसुद्धा खूप चुकीची वागली गं तुझ्याशी." लहान मुलासारखे तो ओक्साबोक्शी रडू लागला.

"ए वेड्या, नको ना रे रडूस. स्वरा काय म्हणेल? ही रागिणी आँटी आली आणि घरात रडण्याचा राग सोडून गेली." त्याला रडताना बघून तीच हसून म्हणाली.


"आणि काकूंचा काहीच दोष नव्हता रे. त्यांनी फक्त घरातील परिस्थिती माझ्यासमोर मांडली. निर्णय देखील माझ्यावरच सोपवला होता. मीच त्यांच्या बोलण्याला साथ दिली कारण मलाही तुम्ही सगळे आनंदी हवे होतात. माझे निर्णय घ्यायला मी मोकळी होते.

आणि जो निर्णय घेतला तो योग्यच तर होता. माझ्याशी लग्न केले असतेस तर एवढी गोड मुलगी तुझ्या आयुष्यात असती का?" स्वराकडे नजर वळवून ती म्हणाली.

स्वराला काय वाटले कुणास ठाऊक? तिने बसल्या बसल्या रागिणीला घट्ट मिठी मारली.


"आणि तुझी आई? त्या कुठे आहेत आता?" मेघा विषय बदलवत म्हणाली.

"आई नाहीये आता. एक्झाम नंतर मुंबई सोडून आईला घेऊन मी गावाला गेले. पुढचे शिक्षण तिकडेच जवळच्या शहरात घेतले. माझ्याबाबतीत कदाचित अंदाज आला असावा तिला. बाबांच्या दुःखातून न सावरलेली ती हळूहळू आणखी खचत गेली आणि नंतर मला कायमची सोडून गेली.

दोन वर्षानंतर मलाही जॉब मिळाला. हळूहळू मी स्टेबल होत गेले." ती शून्यात बघत म्हणाली.


"खरंच स्टेबल झालीहेस तू? लग्नही केलेसं? आणि मघापासून मुलांबद्दल इतकी बोलत होतीस तर इतकी मुलंही झाली? खरंच तू तुझ्याच मुलांबद्दल बोलत होतीस ना? की आमच्यापासून सुटका करून घेण्यासाठी बहाणा शोधते आहेस?" तिच्या डोळ्यात बघत इतका वेळ छळणारा प्रश्न त्याने विचारला.


"अरे, बहाणा कसला? माझीच मुलं आहेत रे ती." ती मनापासून हसून म्हणाली. हास्यातील खळखळ तशीच.. पहिल्यांदा हसली तशी.


"म्हणजे तू खरंच लग्न केलेस?" डोळ्यात अविश्वासाचे भाव लेवून मेघा विचारती झाली.


"नाही अगं. लग्न करून मुलं थोडीच होणार होती? स्त्रीत्वच हरवलेल्या मुलीशी कोण लग्न करणार ना? आणि मुळात पुन्हा प्रेम, लग्न.. हा विषय डोक्यात कधी आलाच नाही." ती स्मित करून म्हणाली पण ते स्मित देखील काळजात टचकन काटा रुतावा तसे मेघाला वाटले.


"आय एम सॉरी. मला असे नव्हते म्हणायचे." तिच्या डोळ्यात अपराधीपणाचे भाव स्पष्ट दिसत होते.


"ए, काय अगं? तुम्हा दोघाही नवराबायकोंना सॉरी म्हणायची सवयच जडली आहे का? तू सॉरी नको म्हणूस. उलट मला तुला थँक्स म्हणू दे. तुला आणि स्वराला." दोघींचे हात हातात घेत रागिणी भावनिक झाली.


"आम्हाला थँक्स? का?" निरागसपणे स्वराने विचारले.


"पुण्यात मावशीकडे असताना तुम्ही मला भेटलात, त्यासाठी. तुला आठवते ना? तू लहान असताना तुझ्या मम्माला कॉल आला म्हणून तिला गाडी थांबवायला लावली होती?" स्वराकडे बघत रागिणी.


"हो. ते कसे विसरेन? तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटले आणि तुमच्या गाण्याच्या प्रेमातच पडले होते मी. मनोमन तुम्हाला माझी टीचर सुद्धा मानले होते." ती हसून म्हणाली.

"तुम्हाला आठवते? तुमच्या हातावर पेनाने मेहंदी काढून मी गाणं देखील म्हटलं होतं." तिच्या वेडेपणावर तिलाच हसू येत होते.


"हो, ते तर मी कधीच विसरले नाही." कातर स्वरात रागिणी म्हणाली.


"तू तुझ्या नाजूक हाताने माझ्या हातावर ते लाल वर्तुळ काढलेस आणि माझ्या आयुष्याचे वर्तुळ पुरे झाल्यासारखे वाटले. आजवर तो कोवळा स्पर्श, ते निरागस प्रेम माझ्या वाटयाला कधी आलेच नव्हते. लहान मूल बघून मनात कसंतरी व्हायचं. हे सुख देवाने माझ्यापासून का हिरावले या विचाराने नुसता त्रागा व्हायचा.

पण तुझा स्पर्श झाला आणि पुरती बदलले गं मी. अचानक मनात विचार आला की मला मूल होऊ शकत नाही म्हणून काय झाले? ज्यांना आई नाहीय त्या मुलांची आई तर होऊ शकते ना? जन्मदात्री ना सही पण तसेच प्रेम करणारी आई?

दुसऱ्या दिवशी तुम्ही मला भेटायला मावशीकडे आलात ते मला मावशीने सांगितले. तिला नाव जरी सांगितले नसले तरी तो मुलगा म्हणजे अजु आणि तू त्याचीच लेक आहेस हे मी ओळखले. त्यानंतर पुण्यात कधी आलेच नाही. कदाचित अजयला भेटेल ही भीती मनात होती.


खूप विचार करून मी नागपूरला स्थायिक व्हायचं ठरवलं. भरभक्कम पगाराची नोकरी होतीच, कोणाची जबाबदारीही नव्हती. मग एक मोठी जबाबदारी अंगावर घ्यायची ठरवले. जबाबदारी.. आईपणाची!"


"म्हणजे?" तिघांनीही एकाचवेळी प्रश्न केला.


"म्हणजे मी मूल दत्तक घ्यायचे ठरवले आणि मग खूप विचार करून तो निर्णय बदलला. एक मूल दत्तक घेण्यापेक्षा एका अनाथाश्रमाशी मी जुळले.

आधी वाटायचं या मुलावर मला प्रेम करता येईल की नाही? पण नंतर उमगलं, छोटी मुलं निरागस असतात. आपण थोडेही प्रेम दाखवले तर ते दसपटीने प्रेम करतात. एक पापी घेतली की ते चार घेतात." ती प्रसन्न हसून म्हणाली.


"माझ्या या मुलांसोबत मी खूप आनंदी आहे. दोन वर्षापासून तर सोळा वर्ष वय असलेली माझी मुलं माझ्यावर खूप प्रेम करतात, निर्व्याज्य प्रेम म्हणजे काय? ते त्यांच्याकडून मला कळले. ती सर्व आता माझी वाट बघत असतील म्हणून माझी जायची घाई सुरु होती." ती बोलायची थांबली.


"रागिणी, यू आर सिम्पली ग्रेट! म्हणजे काय बोलावं मला खरंच काही कळत नाहीये. मला मिठी मारायची आहे यार तुला? मारू?" डोळ्यात पाणी घेऊन अजयने विचारले.


"मला काय विचारतोस? तुझ्या बायकोला विचार. तिची परवानगी असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही." ती अश्रू लपवत म्हणाली.


"त्याचे सोड गं. त्याच्याआधी मला मिठी मारायची आहे." मेघा पुढे सरसावली.


"नाही, त्या माझ्या टीचर आहेत आणि माझ्यामुळे तुम्हाला भेटल्यात. तेव्हा मी पहिले मिठी मारणार." मेघाला बाजूला सारून स्वरा रागिणीच्या मिठीत विसावली. रागिणीने तिच्या माथ्यावर ओठ टेकवत तिला प्रेमाने कुरवाळले.

नंतर मेघाचा नंबर आला. दोघींनी अगदी जवळच्या मैत्रिणीप्रमाणे घट्ट मिठी मारली. अजयच्या मिठीत मात्र अलवारपणे ती विसावली. इतक्या वर्षांचे दोघांच्याही मनात साचलेले सारे मळभ रिते होत होते.


"आतातरी मनाच्या कोपऱ्यातून मला बाजूला कर. प्रेम करणारी प्रेयसी सहज मिळू शकते पण एवढं प्रेम करणारी बायको भाग्याने मिळते." त्याच्या मिठीतून बाहेर येत ती म्हणाली.


"नको. तो कोपरा तुझ्यासाठीच असू दे. आता तर माझ्याही हृदयात तू समावली आहेस." मेघा डोळे पुसत म्हणाली.


"सगळ्यांचे रडून झाले असेल तर आईस्क्रीम खाऊया? मम्मा आणि मी येताना घेऊन आलोय." फ्रिजमधून आईस्क्रीम कप बाहेर काढणाऱ्या स्वराचा आवाज आला.


"मला व्हॅनिला फ्लेवर." रागिणीने कप उचलले तसे अजयने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले.


"मला आवडायला लागला हा फ्लेवर." बटरस्कॉच खाणाऱ्या त्याच्याकडे बघून ती मंद हसली.

"मला निघायला हवे. तुम्हाला वेळ मिळेल तसे माझ्या मुलांना भेटायला या कधीतरी." तिच्या 'किलबिल' अनाथाश्रमाचा पत्ता देत ती निघाली.

*****

परतीच्या प्रवासात कार चालवतना तिला हलके हलके वाटत होते, मनावरचे खूप मोठे ओझे उतरल्यासारखे!

नेहमीप्रमाणे तिने एफएम सुरु केला. अचानक तिचे आवडीचे गाणे सुरु झाले होते..

'..अंबर से तोडा सूरज वो प्यारा
अम्मा के आँचल में
ढक डाला सारा, ढक डाला सारा.

अंबर से उतरी प्यारी कोयलईया
कू करके उसने है
जादू सा डाला, जादू सा डाला..'


नजरेआड होत आलेल्या अजयच्या घराकडे रागिणी कारच्या आरशातून बघू लागली. तिच्या दिशेने हलणारा स्वराचा हात आरशातून नजरेत उतरू लागला होता.

*समाप्त *
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
फोटो -गुगल साभार.

मनाला भावलेल्या गाण्याच्या ओळी आणि त्यातून सुचलेली ही एक हळवी प्रेमकथा, तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.

आणि आत्तापर्यंत अभिप्राय देणाऱ्या सर्व वाचकांचे खूप खूप आभार! हे प्रेम असेच राहू देत.
धन्यवाद!
******

🎭 Series Post

View all