Login

कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -१३

वाचा एक हळवी प्रेमकथा.


कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -तेरा.

मागील भागात :-
रागिणी अजयला त्याला नाकारण्याचे कारण सांगते. त्याबरोबरच त्याच्या आईच्या वचनात अडकल्याचे सांगते.

आता पुढे.

"अजु, तुला आठवते? मी सेकंड इयरला असताना तू मला तुझ्या आईशी भेटवले होतेस. त्यावेळी बहुधा आजी आणि बाबा बाहेरगावी गेले होते. मला काकूंचा स्वभाव आवडला होता. त्यांनाही माझ्या गाण्याचे कौतुक होते. कदाचित तुझी आवड त्यांना आवडली होती.

मला वाटलं की त्या मला समजून घेतील. म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा भेटून सत्य सांगण्याचे ठरवले." ती बोलायची थांबली.


"तू आईला पुन्हा भेटली होतीस? केव्हा?" अजयचा प्रश्न.

"सेकंड इयरला असतानाच. तेच गॅदरिंगचे वारे.. तोच गाण्याचा उत्साह! यावेळेस आपण डान्स बसवला नव्हता. तुझ्या बाबांना तुझ्या डान्सबद्दल कळलं होतं आणि त्यामुळे तुला खूप बोलणी खावी लागली होती.

आपला डान्स नसला तरी मी गावे म्हणून तू आग्रही होतास. त्यावेळी देखील मी फायनल राउंडला पोहचले होते. आदल्यावर्षीप्रमाणे आपली आईस्क्रीम पार्टी सुद्धा झाली होती." ती किंचित हसून म्हणाली.


"सोमवारी शेवटची फेरी होती. रविवारी नेहमीप्रमाणे मी देवीच्या मंदिरात गेले. पूजा आटोपून येताना मला पायऱ्या उतरताना जानकी काकू भेटल्या. त्यांचीही पूजा आटोपली होती." बोलता बोलता ती भूतकाळात पोहचली.


"रागिणी? तू नेहमी मंदिरात येतेस?" त्यांनी कौतुकाने विचारले.


"नेहमी असं नाही, पण बरेचदा येत असते." ती हसून उत्तरली.


"गोड आहेस गं. माझा अजु आवडतो ना तुला?" तिच्या चेहऱ्यावरून त्यांनी हात फिरवला. तसे रागिणीने लाजून खाली मान घातली.


"त्यालाही आवडतेस तू. मला बोलला नसला तरी तू घरी आलीस तेव्हाच कळलं होतं. छान जोडी शोभेल तुमची. फक्त सासूबाईंचा होकार मिळवावा लागेल." जानकी काकू मनापासून बोलत होत्या.

त्या तशा बोलल्या आणि रागिणीला एकदम आईचे बोलणे आठवले. लग्न हे केवळ दोन व्यक्तींचे नाते नाही, तर दोन घरांचे जुळणे असते.

"काकू, मला जरा बोलायचे आहे तुमच्याशी." कुठून सुरावत करावी तिला कळत नव्हते, तरी बोलणे भाग होते.


"चल, तिथल्या बाकड्यावर बसून बोलूयात." त्या तिला घेऊन गेल्या.

"बोल."

"मला अजुशी लग्न करायचे आहे. म्हणजे त्यानेच मला विचारलं होतं." प्रस्तावना मांडत ती.


"तुला सून करून घ्यायला मलाही आवडेल गं." त्या गोड हसल्या.


"आई म्हणते लग्न हे केवळ दोन व्यक्तींचे नाते नसते तर त्या बंधाने दोन कुटुंब जोडली जातात."

"बरोबर आहे त्यांचं."

"म्हणून मला तुमच्यापासून काहीच लपवायचे नाहीये. खरं तर अजुलाच हे सांगणार होते पण त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगणे मला जास्त योग्य वाटतेय." ती काहीशी गंभीर होत म्हणाली.

तिने मग शब्दांची जुळवाजुळव करत अपघाताबद्दल सांगितले.


"रागिणी, तुझ्यासोबत जे घडले ते खूप वाईट होते." तिच्या हातावर त्यांनी हात ठेवला.


"अशा मुलीला सून करून घ्यायला तुम्हाला चालेल?" डोळ्यात अश्रू घेऊन तिने विचारले.


"तुला पहिल्यांदा भेटले, तेव्हाच तू मला आवडली होतीस. आताही तुझा प्रामाणिकपणा खूप भावला मला. पण.."


"पण काय काकू?" त्यांच्या मध्येच गप्प होण्याने तिने विचारले.


"पण हे नातं पुढे नेवू नये असं मला वाटतं." गंभीर होत त्या म्हणाल्या.


"काकू?" तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.


"रागिणी, तू मला चुकीची समजू नकोस गं. तू किती चांगली आहेस हे कळतेय मला. एखादी मुलगी असती तर तिने कदाचित हे सांगितलेही नसते. तू तशी नाहीयेस." बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आले.


"लग्न होऊन ज्या घरात यायची तुझी इच्छा आहे, त्याबद्दल तुला काहीच माहिती नाही. आमचं घराणं इतकं पुढरलेलं नाहीये गं, की अशा गोष्टी ते सहज मान्य करतील. अजयचे बाबा? ते तर आधीच हात वर करतील आणि माझ्या सासूबाई? त्या तर कधीच तयार होणार नाहीत.

आणि मी? मी जिथे कधी माझा स्टॅंड घेऊ शकले नाही, तिथे या विषयावर काय बोलणार? मलाही गाण्याची खूप आवड होती. लहानपणापासून. लग्न झाल्यावर खुंटलं सगळं. सासूबाईंनी तर माझा तानपुराचं तोडून टाकला. मी तेव्हाही काहीच बोलू शकले.

तुला गाणं आवडतं हे ऐकून मी तुझ्यात स्वतःला पाहिलं होतं. क्षणभर वाटलं तू गायलीस की समजेन मीच गातेय. अजु तुला पाठींबा देतोय हे बघून तर आनंदच झाला मला. पण पुन्हा माझा तुटलेला तानपुरा डोळ्यासमोर आला आणि डोळे पाणावले. वाटलं होतं माझ्या तानपुऱ्यासारखं तुझेही स्वप्न यांनी तोडले तर?

रागिणी, कदाचित गाणारी पोरगी स्वीकारतीलही ते. पण आईपण नसलेली मुलगी नाही गं स्वीकारणार. तुला छळून जगणं नकोसं करतील, सतत घालुनपाडून बोलून अपमान करतील. मला नाही सहन होणार ते. अजूला तर नाहीच नाही. घर तुटेल गं अशाने." जानकीकाकूंचा हुंदका बाहेर पडला.


"मी स्वार्थी नाहीये गं. पण जे मी भोगतेय ते दुःख किंवा त्याहून जास्त भोग तुझ्या वाटेला येऊ नये म्हणून हे बोलतेय." त्यांनी तिचा हात घट्ट पकडला.


"रागिणी, मला एक वचन देशील? तू अजूच्या आयुष्यातून त्याला काहीही न सांगता निघून जाशील? तो आणि मी सोडून तुमच्या नात्याला कोणीच मान्यता देणार नाहीत गं. सगळे घर विखरून जाईल. मला माझा लेक हवाय." जानकीकाकूंच्या डोळ्यातील पाणी रागिणीच्या हातावर ओघळले.

"काकू?" त्यांच्या अनपेक्षित मागणीने तिने हात मागे खेचला.

"निर्णय तुला घ्यायचा आहे बाळा. भावनिक न होता सारासार विचार करून निर्णय घे. कदाचित तुला समजून घेणार दुसरं घराणंही तुला सहज मिळून जाईल. या घरात आयुष्यभर केवळ मनस्ताप सहन करावा लागेल. तुला, अजयला आणि सगळ्यांनाच." त्या उठत म्हणाल्या.

मातृत्व हिरावलेल्या एकीला दुसरी स्त्री तिच्या मातृत्वासाठी शब्द मागत होती.

"काकू दिले मी वचन. परीक्षा झाल्यावर मी एकदा शेवटचे त्याला भेटले की परत कधीच भेटणार नाही. हा माझा शब्द आहे. पण त्याबदल्यात तुम्हालाही वचन द्यावे लागेल. तुम्ही त्याला माझ्याबद्दल कधीच सांगणार नाही.

त्याचं लग्न सुद्धा अशा मुलीशी करून द्याल जीला संगीतातलं काहीही ज्ञान नसेल. नाहीतर तो मला विसरू शकणार नाही हो." जानकी काकू वळल्या तसे त्यांचा हात हातात घेत ती म्हणाली आणि उत्तराची वाट न बघता डोळ्यातील पाणी पुसत घराकडे निघाली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
*****

🎭 Series Post

View all