कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -१२

वाचा एक हळवी प्रेमकथा.



कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग - बारा.
मागील भागात :-

मेघा रागिणीला घरी बोलावते. बोलण्याच्या ओघात ती तिला अजयशी तसे वागण्याबद्दलचे कारण विचारते.

आता पुढे.


"रागिणी, तू सोबत नसलीस तरीही आमच्याशी जोडली आहेस. आमच्या प्रत्येकाशी. तुला विसरायचं ठरवलं तरी नाही विसरू शकत. इव्हन स्वरा सुद्धा. तिच्या नावात तू आहेस. ती रोज जेव्हा नवा राग छेडते, त्या रागात तू भासतेस रागिणी. तिच्या प्रत्येक सुरात तू दिसतेस.

आज सुद्धा बघ ना, तिने तू गायलेलेच गाणे म्हटले आणि तिचे गाणे जिंकले सुद्धा. बक्षीसदेखील कोणाच्या हातून स्वीकारावे? ते तुझ्याच. आमच्या तिघांशीही इतकी जुळली आहेस तू,. मग त्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्याचा आमचाही हक्क आहे ना गं?" त्याचा स्वर कातर झाला होता.


"व्हॉट? पप्पा तुझे रागिणी आँटी सोबत अफेअर होते? ओ माय गॉड! म्हणून माझे नाव स्वरागिणी ठेवलेस? मी रागिणी आँटीची मुलगी आहे का? म्हणून का मला गायला आवडते? ओ माय गॉड, ओ माय गॉड! हे सगळं माझ्यासाठी अनबिलीव्हेबल आहे."

टेबलवर चहाचा ट्रे ठेवत स्वरा म्हणाली. ती बाहेर येत असताना अजयचे बोलणे तिच्या कानावर पडले होते.


"ए वेडाबाई, त्याला अफेअर नाही प्रेम म्हणतात आणि तू माझीच मुलगी आहेस." तिला जवळ बसवत मेघा म्हणाली.


"हम्म. आणि तुझ्या नावात माझे नाव आहे म्हणून तुला गाणं आवडतं असे नाहीये. तुझ्या आज्जीला गायला आवडायचे. त्यांचे जीन्स तुझ्यात उतरले आहेत." रागिणी हसून म्हणाली.


"ओह, असं आहे का? क्षणभरासाठी मी घाबरलेच होते ना." तिने छातीला हात लावला.

"बाय द वे, रागिणी आँटी तुमचे आणि पप्पांचे खरोखर प्रेम होते? रिअल वाला लव्ह? मला ऐकायचीय तुमची लव्ह स्टोरी. प्लीज सांगा ना." तिने रागिणीला गळ घातली.


"स्वरा, तू तुझ्या खोलीत जा. आम्ही थोडं महत्त्वाचे डिस्कशन करतो आहोत." अजय गंभीर स्वरात म्हणाला.


"नो पप्पा, आत्ता तूच म्हटलंस ना की माझ्या नावात रागिणी आँटीचे नाव आहे? मग मला तुमची स्टोरी ऐकायची आहे. तसेही आय एम ग्रोअन अप नाऊ. सेव्हनटीनची झालीये मी. तेव्हा मी हे ऐकू शकते. हो ना रागिणी आँटी? तिने रागिणीकडे बघत प्रश्न केला.


"सॉरी, माझी मुलं माझी  वाट बघत असतील. मला निघायला हवं." रागिणी तिची पर्स सांभाळत उठली.


"मघाशी चार -पाच मुलांबद्दल बोललीस. आणखीन अशी गं किती मुलं आहेत तुला? की मुलांचं केवळ निमित्त आहे?" अजयच्या रागावरचे नियंत्रण सुटले होते.


"अजय तू रागावू नकोस ना." मेघा त्याला म्हणाली


"मग काय करू? हिला काही सांगायचंच नाहीये." क्षणात त्याचा आवाज रडवेला झाला.


"अजु, काही गोष्टी मागेच सोडलेल्या बऱ्या असतात. आत्ता ते आठवून किंवा जाणून घेऊन काहीच फायदा नाहीये. होईल तो फक्त त्रासच आणि तसेही मी वचनात बांधल्या गेले आहे रे. त्यामुळे प्लीज मला आग्रह करू नकोस." तिचा आवाज हळवा झाला.

"मीही इतकी वर्ष तुझ्या वचनात बांधलो होतो तरीही तुला भेटलोच की. स्वतःहून नाही किमान स्वरामुळे भेटलो आणि काय गं? अशा कुणाच्या वचनात अडकली आहेस की अजून त्यातून तू बाहेर पडू शकली नाहीस?"


"मी आत जाते. तुम्ही बोला." अजयचे ते रूप बघून स्वरा बावरून उभी राहिली.


"नाही स्वरा, थांब तू." तिचा हात पकडत रागिणीने तिला अलगद आपल्याजवळ ओढले.


"अजु, तुला ऐकायचेय ना? मी कोणाच्या वचनात अडकलेय ते? मग ऐक, जानकी काकूंनी मला मागितलेल्या वचनाने मी बांधल्या गेलेय."


"आईच्या?" अजय आणि मेघाच्या तोंडून एकत्रच शब्द बाहेर पडले.


"कसे शक्य आहे हे? मुळात आई तुझ्याकडून असे वचन का घेईल? तिला तर तू आवडत होतीस. म्हणजे तू गातेस याचं तिला कौतुक होतं. ती तुला असे का बोलेल? " तो भांबवला होता.


"आईंना जाऊन बारा वर्ष झालीत. पण त्यांनी कधी हा विषय काढला नाही. आजी, बाबा..तेही आता या जगात राहिले नाहीत. पण त्यांनीसुद्धा या बद्दल काही भाष्य केले नाही." मेघा बुचकाळ्यात पडली.


"पण आजी तुमच्याशी असे का वागली? तुम्ही भेटला होतात का आजीला?" स्वराने काळजीने विचारले.


"तुझ्या पप्पाचे जर का माझ्याशी लग्न झाले असते तर तुझ्यासारखी गोड कळी या घरात कशी आली असती ना?" तिच्या हातावर ओठ टेकवत ती म्हणाली.


"आई असे वागणे शक्य नाही. उलट तू नकार दिलास तेव्हा तिनेच मला सावरले. तुझी आठवण येऊ नये म्हणून गाण्यात अजिबात रुची नसलेली मुलगी तिने माझ्यासाठी शोधली." तो अजूनही सांशक होता.


"त्यांना दिलेल्या वचनाच्या बदल्यात मीच हे वचन मागितले होते की तुझे लग्न गाण्याशी कुठलाच संबंध नसलेल्या मुलीशी व्हावे." डोळे पुसत रागिणी उत्तरली.


"रागिणी, हे काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड वाटते आहे अगं. नीट उलगडून सांग ना." तिच्या डोळ्यातील पाणी बघून त्याला गलबलून आले.

मेघा आणि स्वराला तर काय सुरु आहे तेच कळत नव्हते.


"तुला आठवते, तू माझ्या घरी आला होतास? तू गेल्यानंतर माझ्या आईने माझ्या मनात तू आहेस हे ओळखले होते. मला आनंदी बघून तीही आनंदी होती पण लगेच तिने मला वास्तवाचे भान करून दिले.


"कसले वास्तव?" त्याने अधीरतेने विचारले.


"अपघाताचे वास्तव. अपघातात माझे बाबा गेले. आईने तिचे पाय गमावले होते तर मी.. मी माझे स्त्रीत्व हरवले होते."


"म्हणजे?"


"त्या अपघातात माझ्या गर्भाशयाला मोठी इजा झाली होती. त्यामुळे त्यावेळी डॉक्टरांनी ते काढून टाकणेच योग्य असा निर्णय घेतला होता. माझे प्राण तर वाचले होते पण मी कधीच आई होऊ शकणार नसल्याचे दुःख मनात साचले होते.

तुझ्या प्रेमात पडले तेव्हा हे वास्तव मी विसरूनच गेले होते. तुझ्याशी लग्न करून तुझ्या सोबत आयुष्य कंठायचे एवढेच मला ठाऊक होते." तिने एक आवंढा गिळला.


"तू मला हे सांगितले असतेस तर मी तुला नाही बोललो असतो का गं? का लपवलेस तू माझ्यापासून हे सगळं?" अजयच्या डोळ्यात पाणी जमा होते.


"तू मला कधीच नाही म्हणाला नसतास, याची खात्री होती मला. तुला भेटायचे तेव्हा हे सांगावे असे खूपदा मनात यायचे पण हिम्मत होत नव्हती.

माझ्या आईने मला समजावलं, लग्न हे केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबाचे असते. मला तुझ्याशी लग्न करायचे असेल तर तुझ्या घरच्यांना माझे सत्य माहित असायला हवे.

अजु, तुला आठवते? मी सेकंड इयरला असताना तू मला तुझ्या आईशी भेटवले होतेस. त्यावेळी बहुधा आजी आणि बाबा बाहेरगावी गेले होते. मला काकूंचा स्वभाव आवडला होता. त्यांनाही माझ्या गाण्याचे कौतुक होते. कदाचित तुझी आवड त्यांना आवडली होती.

मला वाटलं की त्या मला समजून घेतील. म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा भेटून सत्य सांगण्याचे ठरवले." ती बोलायची थांबली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
*****



🎭 Series Post

View all