कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -११

वाचा एक हळवी प्रेमकथा


कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -अकरा.

मागील भागात :-
स्वराच्या गाण्याच्या कार्यक्रमात अजय आणि मेघा रागिणीला भेटतात. स्वरा आणि मेघा तिला घरी येण्याची गळ घालतात.

आता पुढे.

"अजु, इतक्या वर्षांनी भेटतोय आपण आणि तू माझ्याशी असेच बोलणार आहेस का?"


'अजु..' किती वर्षानंतर त्याने ही साद ऐकली होती. तिच्या तोंडून त्याचे नाव ऐकून त्याचे मन दाटून आले. वाटलं अशीच एक घट्ट मिठी मारावी आणि विचारावं, 'कुठे होतीस इतकी वर्ष?' पण त्याने स्वतःवर आवर घातला.


"किती वर्षांची मुलं आहेत तुला?" त्याने वेगळाच प्रश्न केला.


"सर्वात लहान दोन वर्षाचे. त्यानंतर चार, पाच, सात, दहा वर्षांची."

"इतकी मुलं?"

"हम्म. सर्वात मोठी मुलगी आहे, ती सोळा वर्षांची आहे. खूप हुशार आहे. माझं सोड, तू तुझ्या मुलीचे नाव मुद्दाम स्वरागिणी ठेवलंस ना? माझं नाव जोडून? म्हणजे तू अजूनही विसरलेला नाहीस मला?" अगदी सहज विचारावे तसे तिने विचारले.


तिच्या अनपेक्षित प्रश्नाने त्याने करकचून कारचा ब्रेक दाबला.


"हो, मुद्दाम तिचे नाव तुझ्या नावावरून ठेवले. नाही विसरलोय गं तुला. माझं पहिलं प्रेम होतीस तू, मग कसा विसरेन?

रागिणी, कुठे होतीस तू इतकी वर्ष? का खेळलीस माझ्या भावनांशी?" त्याच्या डोळ्यात राग, दुःख दोन्ही भावना एकाचवेळी उफाळून आल्या होत्या.


"कुठे होते म्हणून काय विचारतोस? तुझ्याच तर मनात होते." डोळ्यातील ओल बाहेर न पडू देता उसणे हसून ती म्हणाली.


"आणि तुझ्या भावनांशी खेळले कुठे? उलट प्रेमाचा खेळ अर्ध्यावर सोडून मागे परतले होते." तिचे ते अलवारपणे बाहेर पडलेले शब्द अजयच्या हृदयात काट्याप्रमाणे रुतत होते.


"का पण?" त्याने रुद्ध स्वरात विचारले.


"ट्रॅफिक जाम होतेय." ती हसून म्हणाली.


"हं?" त्याने प्रश्नार्थक तिच्याकडे पाहिले.


"कार मध्येच थांबवली आहेस, त्यामुळे जाम होणाऱ्या ट्रॅफिक बद्दल म्हणतेय मी."


"तुला सगळ्यांचा तेवढा विचार येतो. माझ्या जाम झालेल्या मनाचा कधीच विचार आला नाही का गं?" कार सुरु करत तो म्हणाला.


"तुझ्या बायकोला तुझा पास्ट माहिती आहे?"

"हो. तूच म्हणाली होतीस ना की माझ्या डोळ्यात तुला प्रामाणिकपणा दिसतो? मग लग्नासारखे पवित्र नाते मी खोट्याच्या आधारावर कसे पुढे नेणार होतो? लग्नापूर्वीच मी मेघाला माझा भूतकाळ सांगितलाय."


"आणि तरी तिने मला घरी बोलावले? ग्रेटच."


"तुझा नसला तरी माझ्या बायकोचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे." त्याच्या मुद्दाम तोडून बोलण्याने तिच्या डोळ्यात पाणी तराळले.


"तू तुझ्या नवऱ्याला तुझा भूतकाळाबद्दल सांगितलेस की नाही?" कार पार्क करत त्याने विचारले.


"तुझं घर आलेय वाटतं. मस्त एरिया आहे रे." ती बाहेर बघत म्हणाली.


"नवऱ्याबद्दल सांगायचं का टाळतेस? आणि आता केसात फुलंही माळायला लागलीस. नवऱ्याला आवडतं वाटतं?" ब्रेक लावत तो म्हणाला.


"बाबा असताना आई चाफा माळायची. ते गेल्यानंतर मी मुद्दाम तिला माळून द्यायचे." एक दीर्घ श्वास घेऊन रागिणी थांबली.

"आता तीही नाहीये. मला वाटलं होतं, बाबा गेल्यानंतर स्वतःला सावरले तिने. पण नाही रे, प्रेमाची माणसं गेल्यावर सावरणे प्रत्येकाला नाही जमत. ते वरवर फक्त तसे दाखवतात.

आईचे ऑपरेशन करायचे म्हणत होते मी. पण त्यापूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर मीच हा चाफा माळायला घेतला. आईची आठवण म्हणून." त्याच्याकडे बघून ती म्हणाली.


"रागिणी, खरंच गं सॉरी. मला हे नव्हतं माहिती." त्याच्या स्वरात अपराधीपणाची भावना होती.


"दरवेळी सारखं काय रे सॉरी म्हणतोस ? तुला नव्हतं माहिती, म्हणूनच तर सांगतेय ना?" ती कारचा दरवाजा उघडत म्हणाली.

******

"वेलकम टू अवर होम!" दारात उभे राहून स्वराने रागिणीचे स्वागत केले.

मंद स्मित करून ती आत आली. नीटनेटके आवरलेले घर बघून नकळत तिला आईची आठवण झाली. घरातील कलाकुसरीच्या वस्तू, पेंटिंग्स.. बघून ती भारावून गेली.


"खूप सुंदर कलेक्शन आहे." तिच्या तोंडून बाहेर आले.


"मम्माची क्रिएटीव्हीटी आहे." स्वरा.


"म्हणूनच त्यात जिवंतपणा आहे. प्रत्येकाच्या हातात नसते ही कला. तुझी मॉम खरंच ग्रेट आहे."


"त्यात कसला ग्रेटपणा? दिवसभर एकटी घरी असते म्हणून मग काहीतरी करणं सुरु असते." पाणी घेऊन येत मेघा म्हणाली.

"मम्माच्या हातात कला आहे हे ती कधीच मान्य करत नाही. इथे नागपूरला येऊन आम्हाला फक्त सहा महिने झालीत. घर पूर्ण लावून व्हायचे आहे. नाहीतर आणखी छान छान पेंटिंग्ज तुम्हाला पहायला मिळाल्या असत्या."


"प्रत्येक मुलाला आपल्या आईचं कौतुक वाटतं. तुमच्या मुलांनाही तुमची गाणी आवडत असतील ना?" इति मेघा.


"हो आवडतात ना." पाणी पीत ती म्हणाली.

"मेघा, एक सांगू? मला असं अहो जाहो नको ना करुस. फार फार तर दोनचार वर्षांनी तुझ्याहून मी मोठी असेल. मला फक्त रागिणी म्हटलं तरी चालेल."

"बरं. काय घेणार? चहा की कॉफी?" मेघाचा प्रश्न.

"अगं, खरंच काही नको. बसून थोड्या गप्पा मारूया, मग निघेन मी." तिचा हात पकडून तिला बसवत रागिणी म्हणाली. तेवढ्यात अजय देखील आवरून आला.


"तुम्ही गप्पा मारा मी मस्तपैकी चहा करून आणते." स्वरा स्वयंपाकघरात जात म्हणाली.


"काय मग, कारमध्येही मैत्रिणीशी बोलला की नाहीस? की अजूनही रागावलेला आहेस?" मेघाने अजयकडे पाहिले.


"बोलला ना. त्याचा राग कुठे जास्त काळ टिकतो?" त्याच्याआधी रागिणी उत्तरली.


"पण मी मात्र रागावले आहे हं. एवढ्या चांगल्या मुलाला अचानक का नकार दिलास?" मेघाने डायरेक्ट मुद्यात हात घातला.


"मी नकार दिला म्हणून तर एवढं प्रेम करणारी, त्याला समजून घेणारी तुझ्यासारखी बायको मिळाली ना." ती हसून म्हणाली.

"सिरीयसली मेघा, थँक यू. तुझ्यासारखी सहचारिणी मिळायला भाग्य लागतं. अजु भाग्यवान आहे म्हणून त्याला तुझ्या रूपात इतकी गुणी बायको लाभली." हसता हसता रागिणीचा स्वर गंभीर झाला.


"खरं सांगू? मी त्याची बायको आहे. सहचारिणी आहे, खूप चांगली मैत्रीण सुद्धा आहे. पण प्रेयसी नाही होऊ शकले.

रागिणी, ते स्थान फक्त तुझे होते, तुझे आहे. अजयच्या त्या हळव्या कोपऱ्यात अजूनही तूच आहेस. त्यासोबत एक सल देखील आहे.. अपराधीपणाची.

त्यावेळी नेमकं काय झालं होतं, सांगशील का? इतकं प्रेम असूनही अचानक का नकार दिलास याला?" रागिणीचा हात हातात घेत मेघाने अलवारपणे विचारले.


"मेघा, अगं आता या गोष्टीला काही अर्थ उरलाय का? आपण सगळे आपापल्या लाईफमध्ये स्टेबल आहोत, खूश आहोत. भूतकाळाची जळमटं आता कशाला काढायची ना?"


"कारण मनाची जळमटं स्वच्छ करायची आहेत म्हणून." दोघींच्या चर्चेत सामिल होत अजय बोलू लागला.

"रागिणी, तू सोबत नसलीस तरीही आमच्याशी जोडली आहेस. आमच्या प्रत्येकाशी. तुला विसरायचं ठरवलं तरी नाही विसरू शकत. इव्हन स्वरा सुद्धा. तिच्या नावात तू आहेस. ती रोज जेव्हा नवा राग छेडते त्या रागात तू भासतेस रागिणी. तिच्या प्रत्येक सुरात तू दिसतेस.

आज सुद्धा बघ ना, तिने तू गायलेलेच गाणे म्हटले आणि तिचे गाणे जिंकले सुद्धा. बक्षीसदेखील कोणाच्या हातून स्वीकारावे? ते तुझ्याच. आमच्या तिघांशीही इतकी जुळली आहेस तू,. मग त्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्याचा आमचाही हक्क आहे ना गं?" त्याचा स्वर कातर झाला होता.

देऊ शकेल का रागिणी त्याच्या प्रश्नाचे उत्तर? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all