कितीदा नव्याने तुला आठवावे. भाग -१०

वाचा एक हळवी प्रेमकथा.
कितीदा नव्याने तुला आठवावे.
भाग -दहा.

मागील भागात :-

यापुढे रागिणीचा विषय न काढता आपण आपले आयुष्य जगायचे असे अजय ठरवतो. इकडे रागिणी त्याच्या आठवणीत झुरत असते.
आता पुढे.


"ए, तू नको ना वाईट वाटून घेऊस. आम्ही सावरलोय यातून. बाबांची पेन्शन, गावाला असलेली शेतीवाडी.. बरं चाललंय आमचं. आईसाठी मी तिचे सर्वस्व आहे आता आणि आईच्या पायाचे ऑपरेशन झाल्याशिवाय मला दुसरा कसला विचार करायचा नाहीये."


"होईल गं सगळं ठीक. आता तू एकटी नाहीयेस. मी आहे ना सोबतीला? तुझ्या प्रत्येक निर्णयात मी नेहमी साथ देईन." तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला.

त्याचा तो विश्वासपूर्ण स्पर्श आठवून रागिणीच्या डोळ्यातील थेंब हातातील फोटो फ्रेमवर पडले.

******

"..किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला?
कितीदा रडूनी जीवाने हसावे.

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातील पाणी नव्याने वाहावे.."

गाणे संपले तसे संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.


"..आणि स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी आजच्या प्रमुख पाहुण्या ज्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण होणार आहे त्यांना आम्ही मंचावर आमंत्रित करीत आहोत. आदरणीय रागिणी दातार मॅडम, प्लीज मंचावर येण्याची कृपा करावी."
आयोजकांनी पहिल्या रांगेत बसलेल्या पाहुण्यांकडे बघून विनंती केली.


अंगावर सिल्कची साडी, कानात मोत्यांचे स्टड आणि गळ्यातही मोत्यांची माळ. केसांचा गुंफलेला अंबाडा आणि त्यावर खोचलेले चाफ्याचे फूल. एका वेगळ्याच रूपात रागिणी मंचावर दाखल झाली.

"तृतीय क्रमांक - आशिष सुतार
द्वितीय क्रमांक -रजनी भालेराव.."

आयोजक नाव घेत होते. रागिणी स्मित करून विजेत्यांना पदक आणि सर्टिफिकेट प्रदान करत होती. मन मात्र दुसरीकडे उडत होते. तिच्या हृदयात वसलेले गाणे गाणारी गायिका प्रथम क्रमांकास पात्र आहे, पण ती कुठे आहे? याचा ती विचार करत होती.


'छे, ते गाणं माझ्या खूप जवळचे आहे म्हणून मला तसे वाटत असावे. निकाल जो असेल तोच लागेल ना.' ती स्वतःला समजावत असतानाच आयोजकांनी प्रथम क्रमांकाची घोषणा केली

"आणि आजच्या स्पर्धेची प्रथम क्रमांकाची विजेती आहे.. मिस स्वरागिणी देशमुख."

रागिणीने अधीर मनाने मंचावर येणाऱ्या त्या मुलीकडे पाहिले. तिला पदक देताना उगाच डोळे भरून आल्यासारखे वाटले. का? ते तिलाच कळले नाही.

स्वरा पदक हातात घेत आशीर्वादासाठी खाली वाकली.

"तू खूप सुंदर गातेस. खूप मोठी हो, यशस्वी हो. गायचं कधीच सोडू नकोस." तिच्या डोक्यावर हात ठेवून तिने भरभरून आशीर्वाद दिला.

"थँक यू मॅम." ती आनंदाने खाली उतरली. तिच्या चेहऱ्यावर उमललेली कळी बघून रागिणीच्या ओठावर प्रसन्न हसू उमटले.

*****

"रागिणी मॅडम, ती मुलगी तुम्हाला भेटायचे म्हणतेय." कार्यक्रम आटोपल्यावर काही वेळाने रागिणी जायला बाहेर आली तेव्हा तिला आयोजकांचा कॉल आला.

"कोण मुलगी?"

"तीच स्पर्धेत पहिली आलेली. कदाचित पार्किंग एरियात ती आलीसुद्धा असेल." ते बोलत असताना रागिणीने नजर वळवून बघितले.

स्वरागिणी तिच्याकडेच येत होती आणि तिच्यासोबत आणखी दोन व्यक्ती होत्या. एक स्त्री आणि दुसरा पुरुष.


"अजु..?" त्या पुरुषाकडे बघून तिच्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले. कसेबसे कारला टेकत तिने स्वतःला सावरले.


"मम्मा, पप्पा, मीट हर. या रागिणी मॅम. यांच्याच हस्ते मला ट्रॉफी मिळालीय." स्वरागिणीने त्यांना ओळख करून दिली.


"रागिणी? म्हणजे रागिणी दातार? म्हणजे अजयची मैत्रीण? ओ माय गॉड! बरोब्बर दहा वर्षांपूर्वी आपण भेटलो होतो. तुम्हाला आठवते? मी मेघा आणि ही स्वरा. तुमच्या मावशीच्या घरी आपण भेटलो होतो आणि .." मेघाला आणखी बरंच काही बोलायचे होते.


"हो आठवते ना मला. एकदा कुणाला भेटले तर सहसा विसरत नाही मी. स्वरा खूप गोड आहेस तू. लहानपणी होतीस अगदी तशीच." अजयकडे बघणं टाळत ती स्वराला म्हणाली.


"थँक यू आँटी.. म्हणजे मॅम. ओह! आँटी म्हटलेले चालेल ना तुम्हाला?" ती डोक्याला हात मरून घेत म्हणाली.


"अगं चालेल की." तिच्या गोंधळावर खळखळून हसत ती म्हणाली.


तिचे ते खळखळून हसणे आजही तसेच होते.. बावीस वर्षांपूर्वीचे. इतकावेळ दुसरीकडे बघत असलेल्या अजयने चमकून तिच्याकडे पाहिले. अंगावर साडी, मोजकेच दागिने, केसात माळलेले फूल…तेही चाफ्याचे. पुरती बदलली होती रागिणी. पण तिचे हसू? ते हसू मात्र कणभरही बदलले नव्हते.


"बरं निघू मी? माझी मुलं वाट बघत असतील." हातातील घड्याळाकडे बघत ती मेघाला म्हणाली.


"असं कसं? इतक्या वर्षांनी तुम्ही भेटत आहात. मग घरी तर यायलाच हवे. काय रे अजय?" त्याला कोपराने मारत मेघा म्हणाली.


"तिला घाई होतेय तर असू दे ना." खरं तर मेघा अशी अचानक रागिणीला घरी बोलावेल हे कुठे त्याला ठाऊक होते?

खरे सांगायचे तर तो इथे रागिणीला भेटणार आहे हेच त्याला माहिती नव्हते. स्वराने एक खूप मोठे सरप्राईज आहे आणि तुम्हाला कसेही करून कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचे आहे म्हणून कॉल केला, तेव्हा पोरीने नंबर पटकावला असेल या खुशीत तो मेघासह इथे आला होता आणि आल्यावर त्याला हे असे अनपेक्षित सरप्राईज मिळाले होते.


"असा रे काय म्हणतोस? शी बाबा तुला काही एक्साईटमेन्टच नाहीये. असा रे कसा मित्र तू?

रागिणी आँटी, मी तुमची खूप मोठी फॅन आहे बरं का. म्हणजे लहान असताना तुम्हाला ऐकले ना, तेव्हाच तुमच्या प्रेमात पडले मी. इतकी की तुमच्याकडेच गाण्याचा क्लास लावायचा असा पप्पाकडे हट्ट धरला होता. तेव्हा आमच्या घरी या ना. प्लीज?

हवे तर हा बालहट्ट समजा किंवा तुमच्या फॅनची विनंती. पण चला ना आमच्यासोबत." स्वरा तिला गळ घालत म्हणाली.


"बालहट्ट टाळू नये म्हणतात. त्यामुळे तुम्हाला यावेच लागेल." मेघा हसून म्हणाली.


"ओके." ती स्मित करून म्हणाली. "पण जास्त वेळ थांबता येणार नाही मला. सायंकाळच्या वेळी माझ्या छोट्यांना मी लागतेच." मुलांचे कारण पुढे करत ती म्हणाली.


"एक आई म्हणून मी समजू शकते. जास्त वेळ घेणार नाही तुमचा. अजय तू यांच्यासोबत ये. स्वरा आपण आपल्या कारने जाऊयात." मेघा म्हणाली.

"अगं पण.."

"अरे, त्यांना आपले घर थोडेच माहिती आहे? त्यामुळे त्यांच्यासोबत ये. तसेही त्यांच्याकडे वेळ कमी आहे तेव्हा वाटेत तुमच्याच थोडया गप्पा तरी होतील." त्याचे बोलणे तोडत स्वराला आपल्यासोबत घेऊन जात मेघा म्हणाली.


"तू ड्राइव्ह करशील? म्हणजे मला तुझे घर माहिती नाही ना, म्हणून." त्याच्याकडे कारची किल्ली देत रागिणी म्हणाली.

त्याने मुकाट्याने कार सुरु करताच ती त्याच्या शेजारी बसली.

"तुझी बायको आणि मुलगी दोघीही खूप गोड आहेत रे." त्याच्या कडे बघत ती म्हणाली.

"थँक यू." उत्तरादाखल तो बोलला.


"अजु, इतक्या वर्षांनी भेटतोय आपण आणि तू माझ्याशी असेच बोलणार आहेस का?"


'अजु..' किती वर्षानंतर त्याने ही साद ऐकली होती. तिच्या तोंडून त्याचे नाव ऐकून त्याचे मन दाटून आले. वाटलं अशीच एक घट्ट मिठी मारावी आणि विचारावं, 'कुठे होतीस इतकी वर्ष?' पण त्याने स्वतःवर आवर घातला.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
कथेतील गीत - ती सध्या काय करते? चित्रपटातून साभार.
*****

🎭 Series Post

View all