Sep 27, 2020
विनोदी

किती सांगायचं मला (भाग 10)

Read Later
किती सांगायचं मला (भाग 10)

तुषार आणि समायरा दोघेही प्रोजेक्टच्या तयारीला लागले... 

ऑफिसमध्ये तर नियमित काम केलेच पण घरी देखील समायरा जाहिरातीचे काम करत असे आणि तुषार उरलेले प्रोजेक्टचे काम करत असे.... 

असं करत तीन दिवसातच त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण झाला....

 हनिमून पॅकेजमध्ये  सिल्वर, गोल्ड, प्डिलक्स सुपर डिलक्स अशी विभागणी केली...आधी देखील अश्या प्रकारची विभागणी होती पण तुषारचा कल अगदी सर्वसामान्य नवीन जोडप्याला देखील चांगल्या प्रकारचे पॅकेज मिळावे असा होता.... 

त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती.... काही नवीन थ्री स्टार हॉटेल्स होते त्यांच्यासोबत डील करण्याचे प्लांनिंग केले होते.... 

तसंच काही नवीन टॅक्सी कंपनी चा फायदा उचलण्याचे त्यानी ठरवले होते..... 

आता फक्त या गोष्टीवर तुषार आणि समायराला प्रेझेंटेशन द्यायचं होतं.. 

तो दिवस उजाडला.... आपलं पहिलंच प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित झालं आहे असा तुषारला आत्मविश्वास होता तर मात्र समायराला भीती वाटत होती....

दोघेही लवकरच ऑफिसला पोहोचले.... दोघांनी मिळून प्रोजेक्टवर नजर टाकली....

तितक्यात मार्थाही हजर झाली..... 

मार्थाने दोघांनाही गणेशमार्फत केबिन मध्ये बोलावले.... आशिषला देखील बोलवायला सांगितले... 

आशिष अद्याप आलेला नव्हता... ते ऐकून मार्था चिडली.... 

मार्था : हा आशिष काय समजतो स्वतःला.... त्याला माहीती होतं ना प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनचा दिवस आहे आज... निदान आज तरी वेळेवर यायला पाहीजे होतं त्याने....

तुषार तू सुरु कर.... आशिष काही वेळेवर येत नाही आता

तुषारने लागलीच त्याचा लॅपटॉप उघडला आणि ज्या प्रकारे त्याने आकर्षक नावे देऊन पॅकेजची विभागणी केली होती ते सगळं मार्था समोर प्रेझेंट केलं... 

आणि सांगितलं की आपल्या कंपनीतील पॅकेज मुळे अगदीच सर्वसामान्य couple पासून तर अगदीच गर्भश्रीमंत couples याचा लाभ घेऊ शकतील.... 
आणि हे करत असतानाच आपल्या कंपनीला त्याचा चार पट फायदा होईल..... 

मार्था : तो कसा काय?? 
तुषार : मी कमीतकमी दहा हजार रुपये पॅकेजपासून सुरुवात केली आहे.... आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपये हे डोमेस्टिक लेव्हल ला आणि पाच लाख रुपये इंटरनॅशनल लेव्हलला अशी पॅकेजनुसार विभागणी केली आहे.... 

मार्था : दहा हजार रुपये फक्त !! तुषार तूला माहिती आहे ना की आपण फक्त थ्री स्टार,  फाईव्ह स्टार आणि त्याच्या पेक्षाही जास्त स्टार असणाऱ्यांसोबतच डील करतो ते.... 

तुषार : हो !! मी अभ्यास केला आहे याचा.....मी थ्री स्टार हॉटेललाच वापरणार आहे फक्त ते नवीन असतील इतकंच... आपल्या कंपनीचं नाव इतकं आहे की ते आपोआपच आपल्याशी डील करायला तयार होतील.... आणि त्यांची क्वालिटी बघायला हवं तर मी एकदा स्वतः भेट देईन.... 

मार्था : गुड, समायरा तू काहीच बोलत नाहीयेस... 

समायरा : मार्था मी प्रोजेक्ट च्या जाहिराती तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे.... 

मी एकदम कमीत कमी खर्चात ऍनिमेशन वापरून ह्या दोन जाहिराती बनवल्या आहेत... 

तूम्हाला त्या आवडल्या तर मी पॅकेजनुसार सगळ्या जाहिराती तयार करेल..... 

असं म्हणत समायराने जाहिरातीचा फोल्डर उघडला... व तयार केलेल्या दोन्हीही जाहिराती मार्थाला दाखवल्या.... 
मार्थाला त्या जाहिराती खूपच आवडल्या.... 

मार्था : खरंच खूप सुंदर कल्पना आहे ही ...

समायरा : मार्था ! मला अजून काही सुचवायचं होतं.... 

मार्था :बोल ना !!

समायरा : आपण या जाहिराती तयार करतो आहोत त्यांच्या पब्लिसिटी साठी मला एक सोशल मीडिया वर आपल्या कंपनीच्या नावाचे पेज तयार करावे लागेल त्यासाठी लेखी परवानगी हवी होती.... 

मार्था : दिली परवानगी !! मार्थाने लागलीच गणेशला सांगून स्टेनो मीराला बोलावून घेतले आणि परवानगीचे आदेश लिहायला सांगितले...... 

मार्था : अजून काही?? 

तुषार : सध्या तरी इतकेच...... आणखी चारपाच दिवसात आपल्या कंपनीच्या जाहिरातीला सूरूवात झालेली असेल...

 त्या आधी जे लोक पॅकेजेस साठी येतील त्यांच्या जवळ mouth to mouth पब्लिसिटी करण्यात येईल... हे काम मात्र अगदीच आजपासून सुरु होईल याची आम्ही काळजी घेऊ...

मार्था : ठीक आहे चालेल !! And very nice project and presentation, keep it up ????

थँक्स मार्था येतो आम्ही असं समायरा म्हणाली आणि दोघेही त्यांच्या केबिन मध्ये गेले... 

तुषार : समायरा, तूला काही लक्षात आले का?? 

समायरा :काय?? 

तुषार : अगं हेच की जर आपल्यापैकी कुणीही ऑफिसला लेट आलं तर लागलीच आपल्याला नोटीस मिळते... पण आशिषच्या बाबतीत मार्थाने काहीच ऍक्शन घेतली नाही... म्हणजे, दाल मे कूछ काला है..... नक्कीच 

समायरा : हो, असेल कदाचीत.... आपल्याही ताक फुंकून प्यावे लागेल.... 
थोड्याच वेळात आशिष ऑफिसला आला... त्याची चाहूल तुषार आणि समायराला लागली... दोघांनीही लॅपटॉप उघडून त्यावर काम करत आहे असा अविर्भाव आणला... 

आशिष त्यांच्या केबिनला आला.... 

आशिष : काय !! झाले का प्रेझेंटेशन?? 

तुषार : हो !! आम्ही तूझी खूप वाट पहिली, पण तू?? 

आशिष : हं !! मग ती खडूस म्हातारी माझ्या नावाने बोंबलली असेल.... 

तुषार : काय?? 

आशिष : नाहीतर काय??  नुसती माझ्यावर खार खाऊन असते... माझ्याशी काय दुश्मनी काय माहीती... थोडं उशीरा झालं असतं तर काय बिघडलं असतं !!

तुषार : बरं तूला बघायचं आहे का प्रेझेंटेशन?? आणि लॅपटॉप समोर केला.... 

आशिष : अरे तू बनवला आहॆस ना मग बेस्ट असणार !! मी बघतो निवांत... एकदा म्हातारीला जाऊन भेटतो.. तीला जाब विचारतो माझ्याशिवाय कसं काय प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन झालं ते... 

तुषार आणि समायरा एकदम अवाक होऊन आशिष कडे बघत बसले 

समायरा तर आशिषच्या अश्या उद्धट बोलण्याचा खूप राग येत होता...... 

आशिष तिथून तडक मार्थाच्या केबिनमध्ये गेला.... दोघांचाही आवाजाचा गोंधळ बाहेर स्पष्ट ऐकू येत होता... 

तिथून गणेश सटकून बाहेर आला होता.... 

तोच तुषारने गणेशला आवाज दिला.... 

गणेश : काय साहेब?? काय झालं?? 

तुषार : अरे कसला गोंधळ चालू आहे?? 

गणेश : काही नाही साहेब हे नेहमीचच आहे?? 

तुषार : मार्था काहीच ऍक्शन का घेत नाहीत  त्याच्यावर?? 

गणेश : ऍक्शन कशी घेणार??  त्यांचा पुतण्या आहे तो...

तुषार आणि समायराला आणखी एक धक्का बसला... 

तुषार : पण  नावावरून तसे वाटत नाही... 

गणेश : हो, त्याच्या आईवडिलांचं लव्ह मॅरेज होतं... 

तुषार : मार्थाला मूल वगैरे नाही का?? 

गणेश : आहे ना!! सुहास नाव त्याचं.... एकुलता एक.. पण आता तो अमेरिकेत असतो... सध्या शिकत आहे तो.... 

तुषार : आता शिकत आहे?? बराच लहान आहे मग !!

गणेश :  हो.. त्याचा जन्म मार्थाच्या लग्नानंतर वीस वर्षांनी झाला असं ऐकून आहे.... 

तितक्यात मार्थाने गणेशला आवाज दिला.... आणि ताण ताण करत आशिष ऑफिसच्या बाहेर पडला.... 

सगळ्या ऑफिसच्या लोकांची कुजबुज चालू झाली.... 

रजनी : मार्था  कश्याला याला इतकं सहन करते काय माहिती?? 

दिवाकर हा त्या ऑफिसमधील सगळ्यात सिनियर सहकारी होता... तो म्हणाला, काय करणार?? तीने आपल्या नवऱ्याला प्रॉमिस केलं होतं की याचा सांभाळ करेन... पण हा मात्र पार डोक्याच्या वरचा निघाला... 

तुषार आणि समायराला देखील आता आशिषबद्दल सगळा अंदाज यायला लागला होता.... 

समायरा (हळूच ): तरीच हा इतकं फ्रॉड करतो आहे... नाहीतर मार्थाचा स्वभाव बघता कुणी फ्रॉड करायचा विचारही करणार नाही.....

तितक्यात दिवाकरचा आवाज आला तो रजनीला बोलत होता.... पण काही का असेना आशिष मार्थाची सगळी धुरा सांभाळत आहे ना... नाहीतर एखाद्याने आतापर्यंत सगळं स्वतःच्या नावावर केलं असतं..... 

तुषार आणि समायरा पून्हा गोंधळले.... समायारा म्हणाली 
.. एक तर आशिष या दिवाकरला फसवत आहे किंवा हे दोघेही मिळून फ्रॉड करत असावेत.... 

तुषार : आपण तर्क वितर्क करणं इथेच थांबवू या... नाहीतर एक एक धक्क्याने आपली पागल होण्याची वेळ येईल.....

तुषारने विषय बदलण्यासाठी छोटूला फोन करून दोन कप चहा मागवला.... 

छोटूने चहा आणला..... 

तुषार : काय रे छोटू छान अद्रक टाकली आहे ना चहात?? डोकं जाम बधिर झालं आहे.... 

छोटू : हो साहेब, अस्सल दुधाचा चहा आणला आहे मलाई मारके.. 

छोटूने दोघांच्या हातात चहा ठेवला.... 

तुषार : समायरा!! आजपासून आपण एक काम करू... 

समायरा : काय?? 

तुषार : आपण आधी आपल्या प्रोजेक्ट आणि जाहिरातीवर concentrate करू.... हे आशिष प्रकरण थोडं बाजूला ठेवू... असंही ज्या वेळेस तू तयार केलेल्या जाहिराती त्याच्यासमोर येतील तेव्हा आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.... 

समायरा : हो ना !! मार्थाच्या केबिन मधून आपण बाहेर निघाल्यावर किती छान वाटत होतं... पण तुषार त्या आशिषने आपल्या प्रोजेक्टवर साधी नजर सुद्धा नाही फिरवली.... तूला विचित्र नाही वाटले का?? 

तुषार : अगं समायरा !!त्याच्या नजरेत आपण सध्या मूर्ख आहोत आणि दुसरी गोष्ट त्याला आपण दोघेही खटकलो आहोत... कारण तो हे काम आधी पाहायचा.... खूप कमावलं असणार त्याने.... आणि आता हे काम आपल्याला मिळालं आहे.... 
got it समायरा हा आशिष नक्कीच आपल्याला नौकरीवरून काढून टाकण्याच्या मागे लागणार..... 

समायरा : बापरे !! म्हणजे आता या आशिषपासून फार सांभाळून राहावे लागणार.... 

तुषार : जाऊ दे... "servival of the fittest "  आता आपल्याला लढण्याशिवाय पर्याय नाही.... 

असं म्हणून दोघेही आपापल्या कामात गुंग झाले... 

ऑफिसची वेळ संपली... नेहमीप्रमाणेच दोघेही तुषारच्या बाईकवर बस स्टॉप पर्यंत गेले.... 

बस स्टॉप वर समायरा उतरणार तोच तीची नजर बसस्टॉपच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या आशिषवर गेली.... 

समायरा: तुषार !! थांब.. अरे आशिष.... 

तुषारला हेल्मेटमुळे काही ऐकूच आले नाही आणि तीला बसस्टॉप वर उतरवले.... 

समायराने एकदम तुषारचा हात दाबला.... त्यामुळे तुषार एकदम गोंधळून गेला.... त्याने हेल्मेट काढलं आणि आता बरोबर समायराच्या मागे उभ्या असलेल्या आशिषकडे त्याची नजर गेली.... 

समायराने देखील नजरेनेच तुषारला खुणावले.... 

तुषार : हे बघ समायरा !! तू आई कडे जात आहॆस ना, सोबत फळे घेऊन जा... घरी येण्याची घाई करू नकोस... उद्या डायरेक्ट ऑफिसला ये मग इथूनच उद्या सोबत घरी जाऊ.... 
अरे आशिष !! तू इथे?? 

आशिष : अरे माझी बाईक पंक्चर झाली... म्हणून तर सकाळी उशीर झाला होता... 

तुषार : तूला सोडायचं का??  कुठे जायचं आहे.... 

आशिषने पत्ता सांगितला !!

तुषार : रस्त्यातच आहे... चल मी सोडतो तूला... 

आशिष : ठीक आहे चल.... 

तुषार : आरामशीर जा समायरा.... 

समायरा : हो... 

तुषार आणि आशिष बाईकवर निघाले.... 

आणि समायराने 'वाचलो बुवा' असं म्हणत सुस्कारा सोडला.... 

क्रमश : 
©® डॉ.सुजाता कुटे.
क्रमश :
©® डॉ सुजाता कुटे

Circle Image

DR SUJATA KUTE

Medical officer

I am a doctor, working in govt hospital