किनारा

A boy in search of himself come across so many beautiful things through his childhood friend . Read the story to know how it happens..

किनारा:- 

दूरवर क्षितिजाकडे तो तांबडा गोळा हळुहळु त्या अथांग समुद्रात विलीन होतांना दिसत होता. "अरे थांब ना असाच नको ना जाऊ अस एकट सोडून " मनीष चे मन ओरडून ओरडून सांगत होते आणि धावत जाऊन त्याला घट्ट धरून ठेवावे असच काहीसे त्याच्या मनात येत होतं.

मन कसल्याश्या विचारांनी भंडावून गेलं होतं, तो एकांत हवा होता पण शांतता ही जीवघेणी वाटत होती. त्याच्या बाजूलाच बसलेल्या अविनाश ला याची काहीच कल्पना नव्हती , मनीष म्हणजे मनकवडा मनातले जाणणारा पण त्याचे मन जाणायला कोणी नव्हते.

मनीष काळे,  एक असे जबरदस्त व्यक्तिमत्व की ज्याला बघून कोणालाही हेवा वाटावा. मुलीचं कशाला पण मुलं सुद्धा वळून बघतील असा तो हँडसम तरुण मुलगा. त्याच्या नुसत्या असण्याने कोणीही प्रफुल्लित होईल इतके गोड, लाघवी बोलणे ज्याने कोणीही आपलेसे होईल. वाणीत इतकी शक्ती की कुणीही कांन देऊन ऐकेल, त्याच्या जोडीला असलेला शब्दकोश, अखंड आणि अगाध वाचनाने मिळालेलं ज्ञान आणि नवीन शिकण्याची त्याची आसक्ती यामुळे तो कुणालाही हवाहवासा वाटत असे. अतिशय तल्लख बुद्धी असलेला, भरभरून रूप मिळालेला असा मनीष त्याच्या संस्कारांमुळे आलेल्या तेजामुळे आणखीच रुबाबदार वाटे.

असंख्य ओळखी, खंडीभर मित्र मैत्रिणी, भरपूर नातलग असा असलेला मनीष हा जरी वरकरणी बोलघेवडा, उत्साही वाटत आला तरी त्याच्यातील त्याला मात्र तो अनोळखीच होता. सगळ्यांना  त्याची मैत्री होती पण त्याची मैत्री स्वतःशीच नव्हती, खूप एकलकोंडा असलेला मनिष अबोल राहिल्याने त्याच्या ईच्छा, त्याची स्वप्ने हे जणू त्यांच्यासाठीच एक कोड होते. मस्त काहीतरी वाचत बसावं नाहीतर छान फिरायला जावं हे त्याचे आवडते छंद.

दुसऱ्यासाठी काहीही करायला तयार असलेला हा मनीष स्वतःसाठी न  उलगडणारे कोडे होता. 

सतत आजूबाजूला लोक असत तरी हा एकटा, त्यामुळे शांत कुठेतरी जावे, समुद्रकिनारी बसावे आणि एकटक त्या क्षितिजाकडे झुकणाऱ्या त्याच्या मित्राला बघत बसावे हा त्याचा आवडता छंद.

खांद्यावर हात जाणवला तसे त्याने पाहिले तर अविनाश त्याला सांगत होता" अरे अंधार पडलाय किती बघ. मला तर भूक लागलीय, चल काहीतरी खाऊयात आणि जाऊयात."

अजिबात ईच्छा नसूनही तो उठला आणि अविनाश च्या पाठोपाठ चालू लागला.

घरी आल्यावर नेहमीप्रमाणे काहीतरी विचार करत कधी डोळा लागला हे त्याला कळलेच नाही, पण अचानक दचकून काहीतरी बडबडत तो जागा झाला. त्याच्या आवाजाने रूम मध्ये त्याची आई पण धडपडत आली " काय झालं मनीष ? काय बोलत होतास स्वप्नात? " म्हणत त्यांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याला पाणी प्यायला दिले.

पाणी पिऊन तो थोडा शांत झाला "आई माझ्या स्वप्नात कोणीतरी वृद्ध स्त्री आली, ती मला बोलत होती की रागवत होती मलाच कळले नाही पण तिने मला हुकूम वजा खूप काही करायला सांगितले."

" म्हणजे नक्की काय ते नीट बोलशील का?" 

" माझा जन्म हा काहीतरी विशेष करण्यासाठी झालाय हे ती मला सांगत होती. माझ्या वागण्याचा तिला राग आला होता अस काहीसं मला वाटत होतं. तिने आपलं कपाट उघडलं आणि भराभरा त्यातून पुस्तके काढून जमिनीवर फेकली, माझ्या कितीतरी जुन्या डायरी होत्या, त्या तिने उघडून उघडून माझ्यापुढे ठेवल्या. का नक्की ते मला कळत नव्हतं म्हणून मी विचारण्याचा प्रयत्न करत होतो आणि मला जाग आली."

" मनीष  हा  दृष्टांत झालाय तुला ! तू काहीतरी  वेगळं करावस असा तुला निरोप दिलाय त्या शक्तीरूपी स्त्री ने."

तो काहीच बोलला नाही.

 "खर सांगायचं तर तुझं काही वागणं मला पण पटत नाही बघ. तू खूप छान लिहितोस, तुझ्याकडे वाचन आहे, कला आहे,  छंद म्हणून जोपासत खूप वेगवेगळ्या लोकांना भेटलास, स्थळांना गेलास त्यामागे काहीतरी विधिलिखित असेल. आशय समजण्याचा प्रयत्न कर." इतकेच बोलून आई तिच्या खोलीत झोपायला गेली.

 मनीष मात्र बेचैन झाला आणि त्याच्या खोलीत फेऱ्या घालत होता. त्यांने कपाट उघडले आणि तिथल्या त्याच्या जुन्या खूप जुन्या सगळ्या डायरी काढल्या. समजायला लागले तेव्हापासून लिहिण्याचा छंद त्याला लागला होता, रोज काही न काही जे सुचेल ते तो लिहीत असे. 

आज त्यांनी एक डायरी हातात घेतली आणि हळूच पाने उलगडत वाचत होता. हे सगळे आपण लिहिले का हा प्रश्न त्याला पडत होता. कुठे काही छान कथा होत्या, कुठे अनुभवरूपी लेख होते तर कुठे काही ठिकाणचं वर्णन होते. बऱ्याच ठिकाणी तर त्याने काही प्रोग्रॅम बनवून ठेवले होते की काय आणि कसे करायचे कुठे जायचे काय फायदेशीर आहे तर कुठे खूप सखोल माहिती.

 त्याच्या कवी मनाने लिहिलेल्या हळुवार कविता सुद्धा त्यात होत्या तर काही विचारांवर लिहिलेले मोठं मोठे लेख पण होते. हे सगळं  एकदा बघून आपण हे सगळं काळाआड करून विसरून गेलो होतो याची त्याला जाणीव झाली.

आता मात्र 2 दिवस कुठेही जायचे नाही असे मनाशी पक्के ठरवून त्याने त्याने 2 दिवसांचा आराखडा तयार केला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याने एक पेन, रायटिंग पॅड आणि तो  हस्तलिखिताचा सगळा ढीग घेऊन बसला.

प्रत्येक पान वाचून त्याने वेगवेगळे विषय याप्रमाणे सगळे सेपरेट केले. कथा एकीकडे, लेख एकीकडे ,त्याचे विचार याप्रमाणे काही गायडन्स वाटणारे लेख तर कविता चा एक वेगळा संग्रह तयार केला. ठिकाण-लोक तेथील संस्कृती यावर तयार केलेले प्रोग्रॅम, ट्रॅव्हल गाईड प्रोग्रॅम त्यावरील मार्गदर्शन असे सगळे वेगवेगळ्या लेबल खाली मांडले. प्रत्येक विषयावर खूप छान असे पुस्तक तयार होईल इतके मटेरियल तयार होते, जेव्हा आईने पाहिले तेव्हा तर ती आवाक झाली.

कवितांमध्ये  त्याने  त्याचे मन उलगडले होते तर कथांमध्ये त्याचे विचार.  वाचनामुळे वेगवेगळ्या विषयांवरील त्याचे मत मांडत काही लेख लिहले होते तर त्याच्या फिरायला जाणे या नादात नवीन अनुभव, माहितीपत्रके आणि बरेच त्याबद्दल माहिती वगैरे असे काही होते.

हे सगळं असंच मांडून ठेवले असताना, त्याच्या मित्राचा फोन आला. मित्राकडे काही मेडिकल मदत हवी म्हणून पळाला. 

जाताना आईला सांगून गेला की माझ्या गोष्टींना हात लावू नको मी आल्यावर बघेन. 

तो गेल्यानंतर थोड्याच वेळाने दारावरची बेल वाजली तसे त्याच्या आईने दार उघडले " हॅलो काकू" म्हणत मानसी एकदम गळ्यात पडली.

2 वर्षांनी अचानक तिला बघून त्यांना सुखद धक्का बसला आणि आनंदही झाला. मानसी मनीष ची बालमैत्रीण होती जी पुढील शिक्षणासाठी परदेशी गेली होती.  मनीष कुठे आहे म्हणत उत्तराची वाट न बघताच ती त्याच्या रूम कडे धावत गेली.

आतला पसारा बघून "अग काकू, हा कसला इतका पसारा" म्हणत तिथेच बसली आणि जे समोर होते ते उचलून बघत होती आणि वाचत होती. हातात पाण्याचा पेला घेऊन आलेली त्याची आई म्हणाली " अगं, त्याच्या कोणा मित्राकडे काही प्रॉब्लेम झाला म्हणून सगळं असाच टाकून गेला बघ, आता कोण आवरणार?" वैतागून त्या बोलल्या.

" अग काकू, हा पसारा नाहीय! आणि हा इतका छुपा रुस्तम असेल वाटलं नाही ग मला."

" तू बस, मी कॉफी करून आणते" म्हणत त्या आत गेल्या आणि ती  डोळे फाडून सगळं वाचत होती.

कॉफी घेऊन त्या फोनवर बोलत आल्या," अरे काय पण हे तुझं नेहमीच. आपली बॅग तयार आणि त्यात तुझी 2 दिवसाची सोय पण. ही बघ........" असे त्या म्हणत असतानाच मानसी ने त्यांना बोलण्यापासून थांबवलं मग जुजबी बोलून त्यांनी फोन ठेवला.

"तो पुण्याला गेलाय,मित्राच्या वडिलांचं तब्बेतीच काहीतरी बोलत होता,  2 दिवसांनी येईल म्हणाला."

 त्या मानसीला सांगत होत्या.

"मला त्याला सरप्राईज द्यायचे आहे सो काही बोलू नकोस त्याला आणि खरं तर मीच सरप्राईज झालीय हे बघून" म्हणत तीचे वाचन सुरूच होते.

असेच काही तास निघून गेले, तरी ती उठली नाही,आणखी थोडा वेळ गेला तिने कोणालातरी फोन केला आणि यायला सांगितले.

"काकू ऐक ना एक माझं, plz मला मदत करशील का?"

" बोल ना मानसी, काही प्रॉब्लेम आहे का?"

" प्रॉब्लेम मी नाही हा मनीष आहे बघ. माझा एक मित्र आहे,  मी त्याला बोलावले आहे.तसाही हा दोन दिवस येणार नाहीय. त्याला कळत नाही की तो किती प्रतिभावान आहे ते. हा पसारा म्हणजे काय याची किंमत मी तुला नंतर सांगते. तू फक्त हे सगळं मला इथून न्यायची परवानगी दे.....मी तुला प्रॉमिस करते की यातून काहीच गहाळ होणारं नाही पण यातून खूप काही तयार करता येईल."

जर भीतच आई म्हणाली "त्याला काय सांगू आल्यावर?"

" तू नको काळजी करुस मी बघते काय ते, plz हो बोल ना!"

कसातरी हो नाही करत त्यांनी परवानगी दिली. तिने सावकाश सगळे ते गठ्ठे वेगवेगळ्या पिशवी मध्ये भरले आणि सगळं घेऊन ती आलेल्या तिच्या मित्राबरोबर गेली.

दोन दिवसाने येणारा तो एक आठवडा झाला तरी आला नव्हता हे मानसी च्या पथ्यावर पडले होते.

आणि एक दिवस सकाळीच दमून थकून तो आला आणि खोलीत जायला निघाला तर आईने त्याला सांगितले " मनीष जाऊ नको तिथे!अरे काहीतरी वास येतोय मला जरा बघावं लागेल, तू असे कर माझ्या खोलीत जा आणि आराम कर." 

दमलेल्या त्याने फारसे मनावर न घेता पाय धुतले आणि तसाच बिछान्यावर झोकून दिले आणि गाढ झोपला. 

 तसे लगेच त्यांनी मानसी ला फोन केला 

" मानसी तो आलाय आतां, झोपलाय माझ्या खोलीत पण उठला की जाईल त्याच्या रूम मध्ये आणि तो पसारा नाही दिसला की चिडेल बघ!  त्याला हात लावू नको असे सांगून गेला होता मला. "

" तू काळजी करू नकोस, तासाभरात मी येतेय."

तासाचे दोन तास झाले तरी तो उठला नव्हता. 

थोड्या वेळाने आळोखे पिळोखे देत तो उठला, फ्रेश झाला आणि सवयीप्रमाणे आपल्या खोलीत गेला तर ती एकदम टाप टीप होती कुठेही काहीही कागद नाही की डायरी नाही. वैतागत बाहेर आला तर त्याच्या आधीच आई त्याला म्हणाली " मनीष ते बघ जरा तुझ्यासाठी काही पुस्तके आलीत बाहेर. कोणीतरी ठेऊन गेलं, तुला दे इतकाच निरोप मिळाला मला", म्हणत तो बोलायच्या आत त्यांनी त्याला सांगून टाकले. 

बाहेर जाऊन बघतो तर टेबलवर 9 पुस्तके एकावर एक रचून छान लाल रिबीन लावून ठेवली होती. खाली एक कार्ड होते त्यावर इतकेच " माझ्या प्रिय बालमित्रास"  असे लिहिले होते.

इकडे तिकडे बघतो तर कोणी नाही.

एक, एक करून त्याने पुस्तक उघडून बघायला सुरुवात केली तर त्याचे डोळे विस्फारत गेले आणि तो पुन्हा पुन्हा ती पुस्तक बघत होता. छानसी प्रस्तावना, त्यातील त्याचे इन्ट्रोडकशन, त्यावर त्याचा फोटो,  त्या पेज ची क्वालिटी त्याचे स्टाइलिश कव्हर, हे बघण्यात तो गर्क असताना अचानक मागून डोक्यावर टपली पडली " काय रे मन्या कसा आहेस?"

आधीच गरगरणार डोकं, त्यात असे ऐकून मागे वळून बघितले तर अजून एक धक्का!

" तू ?........ तू कधी आलीस?" इतकेच तो बोलू शकला.

ती मोठ्याने खळखळून हसली...

सोफ्यावर एकदम बसत असतानाच एक मुलगा आत आला " हॅलो, मी प्रसाद दीक्षित. मानसी चा मित्र आणि प्रेरणा पब्लिशिंग हाऊसचा ओनर." 

मनीष ला ,आणखी एक धक्का कारण प्रेरणा पब्लिशिंग ही एक खूप नावाजलेली कंपनी होती आणि त्याच्या हातातील पुस्तके जी होती त्यावर तेच नाव होते.

" हॅलो, बस ना आय मिन बसा ना!"

त्याची ही गम्मत बघत असलेली मानसी एकदम पुढे येऊन " काय मग कसे वाटलं सरप्राईज? आली की नाही मज्जा एका मुलाची?"

" म्हणजे तू? तू हे?"

" अरे नॉर्मल हो जरा. तुझी प्रतिभा  तुलाच कळली नाही कधी. अरे काय जबरदस्त लिहिले आहेत सगळे. त्या दिवशी योगायोगाने मला सगळे वाचायला मिळाले आणि मी हे सगळे प्रसाद ला दाखवले. तो पण अवाक झाला हे सगळं बघून आणि त्याच्या अनुभवावरून एक मोठा लेखक पण लिहिणार नाहीस इतक्या सहज आणि सुंदर शब्दात तू सगळं लिहिलंस असे म्हणाला. खूप वेगवेगळे विषय तू सहज हाताळलेले आहेस. प्रसाद तूच बोल प्लिज"

" मनीष तुझी परवानगी न घेता आम्ही म्हणजे मी आणि मानसी ने ह्या तुझ्या लिखाणाला पुस्तक स्वरूप दिले. ज्या माझ्या जवळच्यांनी हे वाचले ते सुद्धा तूझे लिखाण बघून हरखून गेले आणि मग मी तुझ्या नावाने या लिखाणाच्या 500 कॉपी बनवल्या आहेत . मला माहित आहे की याला आणखी डिमांड येणार पण तुर्ताच हे माझ्या कंपनीकडून" असे म्हणत प्रसाद ने एक लिफाफा त्याच्या हातात दिला.

मनीष ने तो उघडला तर त्यात त्याच्या नावाचा '1 लाखाचा' चेक होता त्याने लगेच प्रसाद कडे पाहिले , " मनीष ही फक्त इनिशील छोटी रक्कम आहे, बुक्स आज तुला पाहिले दिल्यावर मार्केट मध्ये जाणार आणि बघ काय धमाल आणणार!  लवकरच पुन्हां भेटू " म्हणत प्रसाद गेला सुद्धा आणि पुतळा बनून मनीष उभा होता.

गेल्या काही मिनिटात काय घडतेय याचे त्याला भानच नव्हते.

आईने डोक्यावर हात फिरवला आणि मानसी ने तोंडात पेढा तेव्हा तो भानावर आला.

" मानसी, आयुष्याची सकाळ घडवलीस माझ्या, तुझे आभार कसे मानू?"

" बस एक पार्टी दे आणि लांब फिरायला ने!" हसत ती म्हणाली.

 त्या दिवशी छान फिरून समुद्रकिनारी मानसी सोबत बसला असताना तोच सुर्यास्त, तेच क्षितिज त्याला नवीन भासले. आज तो सूर्य त्याच्याकडे बघून हसत होता आणि मनीष त्याच्याकडे बघून!

आज तो सूर्याला थांब म्हणणार नव्हता कारण त्याला खात्री होती उद्याच्या सूर्योदयाची आणि त्याचबरोबर स्वतःच्या कर्तृत्वाची!

आणि का नसावी, त्याच्या आयुष्याला खरोखरचा 'किनारा' जो मिळाला होता!

©®अमित मेढेकर