विषय:- रक्ताची नाती
शीर्षक:- किंमत नात्यांची
भाग-२
सचिन एक खाजगी काॅलेजमध्ये प्राध्यापक होता. त्याचं लग्न होऊन दोन मुलं होती त्याला. तो रागीट आणि चिडचिडा असल्याने त्याच्या बायकोचंही काही चालतं नसायचे. सुजाता शांत, संयमी होती. तिचा नवरा नागेशही तसाच समंजस व शांत होता.
सगळं सुरळीत चाललं होतं आणि अचानक कोरोना या महामारीने विळखा घातला. त्या परिस्थितीचा शिकार सचिन झाला. त्याला कोरोनाची लागण झाली. पुरता घाबरून गेला तो. घरातच क्वारंटाईन झाला. उपचार सुरू होते. पण त्याने काही सुधारणा होतं नव्हती. दिवसेंदिवस त्याची अवस्था मात्र गंभीर होत चालली. त्यातच त्याचे एक दोन कलिग कोरानाने गेल्याचं त्याला कळताच त्याने हाय खाल्ली. शरीराने आणि मनानेपण तो खूपच खचून गेला. दिवसेंदिवस तब्बेत खालावत चालली. घरचे खूपच घाबरले. दवाखान्यात दाखल होण्यासाठी एकही जागा पूर्ण शहरात शिल्लक नव्हती. खूपच बिकट परिस्थिती निर्माण झाली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ताप कमी होईना, खोकून खोकून डोळे पांढरे व्हायचे. घसा खूप दुखायचं, कसलीच चव कळत नसायची. दोन घास घश्याखालून जात नव्हते. त्यात घरातील लोकांनाही कोरोनाची लागन झाली. आपल्यामुळे सगळ्यांना कोरोनाची लागण झाली ही गोष्ट त्याच्या मनाला लागली. 'आता आपलं काही खरं नाही, आपण काय जगत नसतो, आपल्याला काही झालं तर आपल्या मागे आपल्या माणसाचं काय होईल?' असे विचार त्याच्या मनात घोळत होते. त्याला स्वतःसोबत घरच्या माणसांचीही काळजी वाटू लागली. सगळ्यांपेक्षा त्याची हालत फारच वाईट झाली. आपण वाचू शकणार नाही ही शंका त्याच्या मनात घर करू लागली.
नियतीचा फेरा पण कसा असतो ना, क्षणात फासे पटलतात. योगायोगाने कोरोना काळात सुजाता आरोग्य खात्यात नोकरीला लागली तेही कोरोना सेंटरमध्ये. तिचं शिक्षण त्याच क्षेत्रात झालं होतं. तिला सचिनबद्दल कळताच लगेच त्याला फोन केला.
"हॅलो, दाद्या, काळजी करू नकोस. मी आहे ना. तू लवकर बरा होशील. मी बोलले डाॅक्टरांनी. इथे एक बेड शिल्लक आहे आणि सगळ्यांची मी व्यवस्था करेन. तुम्ही सगळे या इकडे. हे गाडी पाठवून देत आहेत." सुजाता काळजीने म्हणाली.
"हो, सुजा, मला वाचवं गं. खूप त्रास होतं आहे मला. तुझे खूप उपकार होतील गं. प्लीज वाचवं मला. एक वचन दे मला. माझं काही बरं वाईटऽऽ" तो खूप घाबरलेला अगतिक होतं बोलत होता. त्याच ते बोलणं मध्येच तोडतं ती त्याला म्हणाली,"गप रे, काहीही काय बोलतोस? काहीही होणार नाही तुला. थिंक पाॅझिटिव्ह रे, वेड्यासारखं बरळू नकोस. बघ बाहेर गाडी आली असेल. सकाळीच पाठवली होती. पटकन ये. बोलण्यात वेळ घालवू नकोस." हे बोलताना तिला खूपच गहिवरून आलेलं. दाटत्या कंठाने बोलून तिने फोन ठेवला. तर इकडे सचिनही फोन हातात घेत बहिणीच्या मनाच्या मोठेपणा आज अनुभवत रडत होता.
तिने फोन ठेवताच सुजाताने पाठवलेल्या गाडीचा आवाज आला तसा सुमती व श्रीधर यांनी घराला कुलुप लावले व सचिनला घेऊन पूर्ण कुटुंब त्या गाडीत बसून सुजाताकडे आले.
सुजाताने आधीच ती जिथे काम करतं होती त्या ठिकाणी सचिनसाठी लगबगीने संपर्क साधून एका बेडसाठी तिने तजबीज केली होती. डाॅक्टरांशी संपर्क साधून दवाखान्यात त्याला दाखल करून घेऊन ताबडतोब त्याच्यावर उपचार सुरू केले. बाकी सर्व घरच्यांना कोरोनाची जास्त लागन नसल्याने त्यांना दुसरीकडे एका सेंटरमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्यावरही तातडीने उपचार करण्यात आले. फक्त त्याच्यासाठी नाही तर पूर्ण कुटुंबासाठी ती एका देवदूतासारखी धावून आली होती.
सचिनला श्वास घ्यायला खूप त्रास होतं होता म्हणून त्याला व्हेटींलेटरवर ठेवण्यात आलं होतं. सलाईन, औषधे, इंजेक्शने, गोळ्या, जेवण सगळं तिने वेळेवर बघितलं. तिने सर्वांची खूप काळजी घेतली. यात तिच्या नवऱ्यानेही तिला मोलाची साथ दिली. तिच्या अनुपस्थितीत तो सगळं बघायचा. चार- पाच दिवसांनंतर सचिनला थोडे बरे वाटू लागले. तोंडावर लावलेलं ऑक्सिजन मास्क काढण्यात आलं. अधूनमधून कधी श्वास जड होऊन धाप लागायची. तेव्हा पुन्हा ऑक्सिजन मास्क लावलं जायचं. पंधरा दिवसांनी तो जरा बरा झाला. तेव्हा कुटुंबासह पुन्हा आपल्या घरी आला.
पूर्ण बरे व्हायला त्याला दोन महिने लागले. त्यावेळी कोरोनामुळे थोडे दिवस काॅलेज बंद असल्याने सचिनचा पगारही लवकर झाला नाही. या काळातील सगळा घरखर्च सुजाता आणि नागेश यांनी केला. कोणतीही, कसलीही अपेक्षा न करता अगदी प्रेमाने, आपुलकीने केलं. अधूनमधून ते येत जात असायचे. काळजी घे, काही लागलं तर कळवं, कशाचीही काळजी करू नकोस. ती जेव्हा जेव्हा घरी त्याला भेटायला यायची तेव्हा तेव्हा त्याला 'मी आहे ना' हे धीराचे बोलं म्हणत असायची. तेव्हा सचिनला खूपच भरून यायचं पण तो आवरत असे. स्वतःच्याच नजरेत पडल्याने त्याला तिच्याशी नजर मिळवण्याची लाज वाटायची. त्याला स्वतःच्या वागण्या-बोलण्याचा राग येत होता.
क्रमशः
सचिनला त्याचा वागण्याचा पश्चाताप होत होता, माफी मागेल का तो सुजाताची? करेल का ती त्याला माफ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा..नात्यांची किंमत..
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा