किंमत

A couple takes a bold decision to adopt the child of a girl who accidentally got pregnant and then they move forward happily as they know value of people, relation , sacrifice!

किंमत:- 

" अरे अजित , आज घर एकदम शांत कसे वाटतंय ! नित्य आणि दीप कुठे गेलेत?"
घरात पाऊल ठेवताक्षणी नीलिमा म्हणाली. तिच्या हातात सामान होते आणि एक बॅग ज्यामध्ये बरेच गिफ्ट्स पॅक दिसत होते.
लगेच अजित ने लगबगीने तिला मदत करायला घेतली. तिच्या हातातल्या  बॅग घरात नेऊन ठेवल्या.  सकाळची वेळ होती आणि अजित बाहेर झोक्यावर छान पेपर वाचत बसला होता , अचानक नीलिमा आलेली बघून अजित थोडा गडबडला . 
"अग ताई , अशी न कळवता अचानक कशी काय आलीस ? तुला घ्यायला आलो असतो ना मी?" पाण्याचा पेला तिच्या हातात देत अजित म्हणाला.
" अरे अचानक मनात आलं नि निघाले , आज वाढदिवस ना नित्य  आणि दीप चा. बघता बघता 9 वर्षाचे झाले बघ दोघे"
हे ऐकून जणू नव्याने अजित काही काळ मागे गेला. 10 वर्षांपर्यंत चे  क्षण नजरेसमोरून तरळत गेले.
अजित आणि प्रिया चे लग्न होऊन आज 5 वर्षे झाली होती . लग्नाचा 5 व वाढदिवस मोठया आनंदाने साजरा केला पण मनात कुठेतरी सल जाणवत होती की अजून ती दोघेच होती , तिसरे कुणी आनंदाने प्रवेशले नव्हते. 
त्याच दिवशी हट्ट करून प्रिया ने त्याला डाक्टर कडे जायला भाग पाडले, चेक अप झाले , सगळ्या टेस्ट केल्या.  दुसऱ्या दिवशी रिपोर्ट मिळणार म्हणून परत आले आणि घरच्या घरी वाढदिवस छान उत्साहात सेलिब्रेट केला. 
दुसऱ्या दिवशी रिपोर्ट घेऊन डॉक्टर कडे गेले .
" हे बघा मिस्टर अजित , रिपोर्ट बघून एक तर लक्षात येते की थोडे दमाने घ्यावे लागेल , ट्रीटमेंट ची गरज आहे . आपण नक्की प्रयत्न करू यात पण हे मात्र नक्की की सगळे सहज शक्य नाहीय. थोडे कॉम्प्लिकेशन आहेत ."
हे ऐकून प्रिया चा धीर खचला आणि ती एकदम शांत आणि अबोल झाली , तिची समजूत काढायचा अजित ने खूप प्रयत्न केला पण ती हवी तशी नॉर्मल नव्हती.
त्याच दरम्यान अजित ची बदली नाशिक ला झाली , उत्साह नसून सुदधा जाण्याशिवाय पर्याय नसल्याने सामानाची बांधाबांध सुरू झाली आणि एकदाचे सामानासाहित नाशिक ला ते पोचले. 
अबोल अशी प्रिया आणि चंचल असा अजित यामुळे खूप जास्त नाही पण थोडीफार ओळख झाली आजूबाजूला आणि यातूनच वर्षा नावाची एक मुलगी घरकामाला येऊ लागली. एकीकडे ट्रीटमेंट सुरू होती त्याला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता आणि आयुष्य अगदी हळुवार सुरू होते.
वर्षा एक 20 वर्षाची अनाथ मुलगी होती जी जवळच्या कोण्या नातेवाईकांकडे राहायची , कामसू , शांत आणि गुणी अशीच. नाही म्हणायला तिच्या या स्वभावामुळे ती प्रिया ला खूप आवडत होती आणि दोघी एकमेकींना समजून घेऊन त्यांच्या नकळत एक बंध आपापसात जोडला गेला होता.
अजित आपल्या कामात गर्क झालेला पण घरात बसून तेच तेच विचार करत प्रिया मात्र अजून अजून कुढत होती. वर्षा ही एकच व्यक्ती होती जिच्याशी प्रिया बोलत असे. मनातील भावना व्यक्त करत असे. दोघी जणी जणू एकमेकींच्या साठी होत्या त्याप्रमाणे त्यांचे नाते फुलले होते. बहीण की मैत्रीण हे त्यांनाही माहिती नव्हते पण एकमेकींना भेटल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नसे एवढे खरं.
एकदा मात्र 2 दिवस होऊन गेले पण वर्षा अचानक यायची बंद झाली. काही निरोप नाही , फोन नाही.  प्रिया ला ते खूप खटकले होते कारण अस वागणे हे वर्षा च्या स्वभावात नव्हते. न राहवून तिने अजित ला भरीस घालत वर्षाच्या घरी जायला भाग पाडले आणि जेव्हा ती दोघे तिथे गेली तेव्हा त्यांना इतकेच कळले की वर्षा दवाखान्यात ऍडमिट आहे. 
लगबगीने प्रिया हॉस्पिटलमध्ये पोहचली आणि तिथे जे कळले त्यामुळे ती चक्क भोवळ येऊन पडली. वर्षा सोबत जे घडले होते ते ऐकून ती फारच अस्वस्थ झाली. 
वर्षा तर या स्थितीत नव्हतीच की काही बोलेल जणू प्रेतवत पडून होती. 
4 दिवसांनी जरा सावरल्यावर प्रिया पुन्हा तिला भेटायला गेली , तेव्हा वर्षा शुद्धीत आली होती , प्रिया ला बघून फक्त ओक्साबोक्शी रडत होती. 
प्रिया ने तिला धीर देत विचारले "वर्षा घाबरू नकोस , मी आहे तुझ्या सोबत . नक्की काय आणि कसे झाले? कोण होते ते?"
"ताई , आम्ही गरीब लोकं! पण म्हणून काय रस्त्यावर आहोत का हो? मला पण मन आहे ना ! माझा काका ज्याच्याकडे मी राहत होते त्याने जबरदस्तीने माझं लग्नं जमवले होते मला ते मान्य नव्हते. दारुडा माणूस जो फक्त बसून असतो काही काम करत नाही असा व्यक्ती लग्नासाठी खरच योग्य होता का? त्या दिवशी तो घरी आला, मी त्याला हाकलून लावले आणि सांगितले की मला नाही लग्न करायचे तुझ्याशी. 
रागात तणतणत तो गेला खरा पण त्याची नजर खूप खुनशी होती. काका काकू त्या दिवशी बाहेरगावी गेले होते. घरात मी एकटीच होती , रात्री हा उशिरा दारू पिऊन आला आणि घरात शिरला . मी खूप प्रयत्न केला पण माझं काही चाललं नाही. नको ते सगळं करून त्याने मला मारायचा प्रयत्न केला पण माझं नशीब खराब म्हणा ना की मी वाचले बघा. काय करू आता न कशी जगू?" म्हणत ती आणखी जोरात रडू लागली.
तिला कसा धीर द्यायचा हे कळत नसूनही प्रिया ने तिचा हात घट्ट धरून तिला आधार दाखवला.
 त्यानंतर तिला काका ने ही घराबाहेर काढले कारण काय तर, ती आता आई होणार होती. 
प्रिया ला जेव्हा हे कळले तेव्हा आपण मागतो तर मिळत नाही आणि या गरीब मुलीला बिचारीला सोसवत नाही, काय ही विचित्र  दैना या विचारात तिने अजित ला सांगून वर्षाला घरी आणले. दिवस पुढे जात होते आणि एक दिवस वर्षा ने जुळ्यांना जन्म देऊन ती मात्र हे जग सोडून गेली.
हीच ती दोन रत्ने ज्यांनी अजित आणि प्रिया च्या घरात आनंदाचा आधार वड  दिला. नित्य आणि दीप. 
या निराधार आणि निरागस जीवांना अनाथ आश्रमात टाकण्याचा धीर प्रिया आणि अजित ला झाला नाही आणि तसेही दैव देते  त्याप्रमाणे त्यांच्या झोळीत ही गोंडस बाळे आली होती. त्याचा स्वीकार करत प्रेमाने त्या दोघांनीही नित्य आणि दीप चे संगोपन केले. दैवाने जे दान पदरी दिले  त्याचा आदर करत त्यांनी मनापासून स्वीकार केला.
कॉफीचा मग समोर आल्यावरोबर एकदम अजित ची तंद्री भंगली. प्रिया ने गोड हसत त्याला आणि नीलिमा ला कॉफी दिली.
" खरं आहे ताई, काळ कोणासाठी थांबत नाही पण आम्हाला मागील 9 वर्ष ही इतकी सुखकर आणि आनंदी गेली ती फक्त आणि फक्त दैवी कृपा आणि वर्षा चे हे अमूल्य दान यामुळेच." हलकेच डोळे टिपत प्रिया बोलली.
तेवढ्यात एक गोंगाट अचानक ऐकू आला ज्याने वातावरण बदलून गेले. 
" अत्तू कधी आलीस?"  असे म्हणत, नित्य आणि दीप एकदम नीलिमा च्या गळ्यात पडली. "काय आणले आमच्यासाठी "म्हणत नित्य ने लगेच बॅग उपसायला घेतली.
सगळे खळाळून हसत होते.
 "अरे माझ्या पिल्लानो,  इकडे या" म्हणत नीलिमा ने गिफ्ट ची बॅग हाती घेतली . छान गिफ्ट्स रॅप केलेली दोघांनाही देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, दोघांची  गोड गोड पापी घेतली. गिफ्ट्स ओपन करण्याच्या नादात दोघेही व्यस्त होती आणि त्यांचा तो निरागस चेहरा, वागणे बघत अजित आणि प्रिया नकळत एकमेकांकडे बघत समाधानाने सुखावत होती. 
या समाधानात त्यांचे डोळे कधी पाणावले त्यांचे त्यांनाच कळले नव्हते.
संध्याकाळी छान जंगी बर्थडे पार्टी ठरली होती. त्याप्रमाणे सगळे आप्त स्वकीय जमले , नित्य आणि दीप चे मित्र मैत्रिणी  आले. छानसा मोठ्ठा केक दोघांनी मिळून कट केला,  छान गाणी सुरू होती. मुलांचा डान्स , गेम्स , मस्ती असे छान वातावरण होते.
सगळ्यात मोठे बर्थडे गिफ्ट्स हे अजित कडून होते.  अजित ने चक्क त्याच्या प्रॉपर्टी चे काही पेपर्स म्हणजे काही भाग दोघांच्या नावावर केल्याचे पेपर त्यांना त्यांच्या हातात दिले. त्या निरागस मुलांना काही कळत नव्हते पण वर्षा चा आत्मा जिथून बघत असेल तो मात्र  नक्की कृतकृत्य झाला होता.
 सगळ्या लहान मोठ्यांनी हसत , नाचत पार्टी एन्जॉय केली. छानसा जेवणाचा मेनू होता त्यावर मस्त ताव मारला आणि आनंदात दिवसाची सांगता झाली.
रात्री मुलं झोपल्यानंतर अजित निलिमाला म्हणाला, " ताई , खरं सांगतो ही मुलं आहेत म्हणून काय तो जगायचं उद्देश आहे , नाहीतर काय होते सांग ना. तुला नवल वाटतंय की मी आज जे गिफ्ट्स मुलांना दिले त्याचे,  पण अगं काही वस्तू किंवा पैसे हे जे आहेत त्याचे हे मूल्यच नाहीय."
ताई ऐकत होती.
"आज मी आहे , प्रिया आहे पण उद्याचे माहीत नाही. या जीवांची कधीच आबाळ नको म्हणून ही तरतूद बघ. अस समज पैस्यात नाही पण दैवी दानात जे मिळालं त्याची ही छोटीशी किंमत."
नीलिमा आपल्या भावाचे विचार ऐकून खूप भारावली आणि प्रिया चा याला पूर्ण पाठिंबा आहे हे बघुन अभिमान ही वाटला.
"मला खरच खूप आनंद वाटतोय आज! कदाचित हे लिखित असेल म्हणून तुम्हाला अपत्य लवकर झाले नाही, पण त्याचा त्रास न मानून तुम्ही दोघांनीही जो समजूतदारपणा दाखवला आणि परिस्थिती स्वीकारलीत ते वाखाणण्यासारखे आंहे . मला खरंच अभिमान वाटतो तुमचा."
प्रिया म्हणाली "मी आणखी एक ठरवले आहे , आज नाही पण ज्या वयात वर्षा आम्हाला भेटली त्या वयाची ही दोघे झाली की सत्य नक्कीच त्यांच्या कानावर घालेन. मोठेपणा मिरवायला नाही तर त्यांना हे ही कळायला की त्यांची खरी आई सुद्धा तितकीच सुसंस्कृत होती. शिक्षण , घर , जन्म माणसाच्या हातात नसतो पण जे तो अंगिकरतो तो सुसंस्कृतपणा आणि तोवर ती सगळे समाजण्या ईतपात मोठे ही असतील. उद्या माझ्या स्वार्थासाठी मी त्यांना सांगितले नाही असे ही व्हायला नको." 
आज नकळत सगळे घडत होते. न ठरवताही मन मोकळे होत होते आणि हे कुठूनतरी ऐकत असलेला वर्षा चा आत्मा नक्कीच सुखावत होता. 
मनुष्याला खूप काही मिळत असते , कधी कळत तर कधी नकळत पण त्याची जाणीव असणे आणि त्याची किंमत ठेवणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. 
निरागस त्या लेकरांना प्रिया आणि अजित सारखे आई आणि वडील लाभले होते, हे त्यांचे दैव आणि अशी गुणी मुलं लाभली हे प्रिया आणि अजित चे भाग्य ज्यात ते सुखाने जगात होते.
नात्याची, दानाची, कर्तृत्वाची, त्यागाची आणि सगळ्यात म्हणजे माणसाची 'किंमत' या घरात नक्की कळली होती!
©®अमित मेढेकर